वेगळेपणानं चमकणारा ‘तारा’

तारे जमीं पर’ या चित्रपटाबद्दल लिहायच्या आधी काही कबुलीजबाब देणं मला आवश्यक वाटतं. खरं म्हणजे पालकनीती सारख्या मासिकांतून आणि मुलांसाठीच्या मासिकांतून पुस्तक परीक्षण किंवा शिफारस याप्रमाणे चित्रपटांविषयीही नियमित लिहायला हवं आहे हे जाणवत होतं पण कुठेतरी मनातल्या ठोक कल्पना किंवा सरळ सरळ आळस आड येत होता. ठोक कल्पना बहुधा अशी की ललितचित्रपट ही लिखित ललितसाहित्यापेक्षा कमी प्रतीची कला (चित्रपट ही कला!) आहे आणि ती सर्व सामान्यपणे करमणुकीसाठी असते. इथे आळसाचा मुद्दा येतो तो असा की चित्रपटाबद्दल सिरियसली लिहायचं (वर्तमानपत्रातल्या दर आठवडी चित्रपट-परीक्षणाच्या रतिबापेक्षा वेगळं) तर तसा तो बघितलाही पाहिजे, फक्त करमणूक म्हणून नव्हे, म्हणजे जास्त कष्ट-प्रयत्न हवे हे ओघानं आलंच.

शिवाय माध्यमांनी कानीडोळी ओरडून सांगितल्यावरच काही गोष्टी रजिस्टर होतात, असंही होत असावं. नाही तर मी ‘आम्ही असू लाडके’ या आधी रिलीज झालेल्या मराठी चित्रपटाबद्दल विस्तृत असं काही का लिहिलं नाही? आता मी ‘तारे जमीं पर’ या हिंदी, सुपरस्टार आमीर खान दिग्दर्शित ज्याचं प्रमोशन सर्व वाहिन्या व वर्तमानपत्रांतून पद्धतशीरपणे होतं आहे अशा चित्रपटाबद्दल तो दाखल झाल्याबरोबर लिहिते आहे ही खंत आहे. दोन्ही चित्रपटांच्या रचना-मांडणीत फरक खूप असला तरी मुख्य कथाबीज बरंचसं सारखं आहे. ‘कशीही असली तरी(उच्च, मध्यम, निम्न क्षमता असणारी) सर्व मुलं प्रेमाला पात्र असायला हवीत. त्यांचे अन्न-वस्त्र-निवारा, रंजन-शिक्षण, सुरक्षितता हे हक्क त्यांना मिळायला हवेत, त्यांना समाजात जगण्याची कौशल्यं आत्मसात करण्यासाठी प्रौढांची मदत मिळाली पाहिजे आणि त्यांना समाजात सामावून जायला अडचण आली तर समाजानं त्यांना सामावून घेतलं पाहिजे.’ असं ते बीज आहे. ते विस्तारण्यासाठी मग दोन्ही चित्रपटांच्या कथेत वेगवेगळी व्यक्तिमत्वं, त्यांचे नातेसंबंध, प्रसंग यांची निवड करून गुंफण केली आहे. मुख्य फरक सहज कुणालाही जाणवणारा आहे तो मार्केटिंग-पब्लिसिटीतला आणि तांत्रिक निर्मिती मूल्यांचा; बजेट लहानमोठं असल्यामुळे निवडलेला सोपेपणा किंवा तांत्रिक-आधुनिकतेमधला. दोन्ही चित्रपटांबद्दल ‘प्रचंड आवडला, आवडला, ठीक आहे, नाही आवडला’ अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतीलच. कारण प्रेक्षकांच्या कुवती आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात. परंतु दोन्हीमधली मुलांना समजून घेण्याच्या गरजेविषयीची तळमळ प्रेक्षकांना सारखीच जाणवण्याची शक्यता आहे. तेव्हा अभिराम भडकमकर दिग्दर्शित ‘आम्ही असू लाडके’ या (त्यातल्या त्रुटी जाणवूनही) मला आवडलेल्या चित्रपटाविषयी लिहायला हवंय हे मनात ठेवून ‘तारे जमीं पर’ चा हा आस्वाद…

‘तारे जमीं पर- every child is special’ या चित्रपटाची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे तो पाहिलेल्या असंख्य लोकांना तो आवडला. त्याचं एक कारण असं असावं की त्यातलं मुख्य मुलाचं पात्र, त्याचा भाऊ, त्याचे मित्र, इतर मुलं जे काही करतात, अनुभवतात, त्यात कुठे ना कुठे प्रत्येकाला आपल्या लहानपणातलं काही साम्यस्थळ नक्की भेटतं. कुणाच्यातला शिक्षक सजग होतो, कुणा पालकाच्या मनात काही समजूत उमलून येते. हे झालं व्यक्ती पातळीवरचं.
चित्रपट माध्यमातली एक निर्मिती म्हणून याच्या काही खासियती आहेत. पहिली खासियत ही एक ललित कलाकृती आहे (fiction film) डिसलेक्सियावरची डॉक्युमेंटरी नाही, याचं ठेवलेलं भान. ईशान अवस्थी या उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाला अध्ययन क्षमतेचा प्रश्न आहे आणि तो त्याच्या पालक-शिक्षकांना-सहाध्यायींना समजलेला नाही. त्यातून त्याच्या जीवनात अडचणी येतात. पालक त्यांच्या परीनं मार्ग काढतात. त्याचे विपरीत परिणाम होतात. स्वानुभवातून समज आलेला सृजनशील शिक्षक कमतरतेसहित मुलाला स्वीकारतो आणि त्याचं जीवन थोडं सोपं करण्याचा, त्याचा आत्मविश्वास जागविण्याचा प्रयत्न करतो, त्याला काही प्रमाणात यश येतं. अशी कथा प्रामुख्यानं सांगताना आपल्याला डिसलेक्सिया विषयी माहिती मिळते. ईशानची अक्षमता कुठल्या पातळीची आहे, यासाठी त्याला लेखन-गणन शिकविण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते असू शकतात हे कळत जातं. ईशान, त्याचा शिक्षक, त्याचा भाऊ, त्याचे पालक कळत जातात. आपल्याकडचे पठडीतले चित्रपट खर्या समस्येपासून सुरू होतात आणि कल्पनारम्य उत्तर देऊन सुखी शेवट करतात. आता या पठडीत बदल घडवणारे लहान मोठे अनेक चित्रपट येऊ लागलेले आहेत. त्यात ‘तारे’… उठून दिसणारा आहे. (तरीही याच्या शेवटाबद्दल आणि सर्वसामान्य प्रेक्षकाला लागणार्या अर्थाबद्दल सविस्तर चर्चा करावी लागेल.)

दुसरी खासियत-सत्याचा विपर्यास शक्यतोवर न करता, कलामूल्यांची तडजोड न करताही मुख्य धारेतील (main stream) प्रेक्षकाला रुचेल, पचेल, पहायला-ऐकायला आवडेल अशा तर्हेनं केलेली निर्मिती. तिसरी खासियत-यातली मुलं ‘फिल्मी’ वाटत नाहीत, मिनिएचर ऍडल्ट्स वाटत नाहीत, कथानक नाट्यपूर्ण करण्यासाठी वापरलेली साधनंही वाटत नाहीत, यातला दारशील साफरी हा नट रहात नाही तो ईशान अवस्थी हा तिसरीतला डिसलेक्सिक मुलगा होतो. त्याचं यशस्वी होत राहणार्या भावाशी आणि अपंग मित्राशी असलेलं नातं या जगातलं वाटतं, ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असलं वाटत नाही.

चवथी खासियत-हाताशी मोठं बजेट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि मुलं हा केंद्रबिंदू असलेला चित्रपट आहे म्हणून काहीतरी भव्य, कल्पनातीत (Fantastic) करून सोडायचा मोहही टाळलेला दिसतो. जे जे उपलब्ध आहे त्यातलं काय आणि किती वापरायचं याचं तारतम्य भल्याभल्या अनुभवी दिग्दर्शकांनाही अनेक वेळा राखता येत नाही – हे आपल्याला मुख्य धारेतील चित्रपटांतून आणि कलात्मक समजल्या जाणार्या चित्रपटांतूनही दिसतंच. ही जिवंत मुलाच्या जीवनातल्या एका भागाची कथा आहे आणि त्या भागात त्याच्या मनातलं काही-जे अमूर्त आहे, इतरांना पाहता येत नाही, त्यालाही ते नेहमी शब्दात पकडता येत नाही ते आणि तेवढंच प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी दिग्दर्शक आमीर खान यांनी ऍनिमेशन तंत्राचे वेगवेगळे प्रकार वापरले आहेत. नेहमीचे सर्वसामान्य अनुभव, एक वेगळा मुलगा वेगळ्या तर्हेनं कसे पाहतो हे दाखवताना त्यांनी दृश्यदर्शन अगदी साधं सरळ ठेवलं आहे पण मधूनच कॅमेर्याचे काही वेगळे कोन फक्त वापरले आहेत. त्या जोडीला कार्टूनमधल्या सारखे ध्वनी वापरून रसभंग केलेला नाही. अतिशयोक्त तांत्रिक करामती केलेल्या नाहीत.

पाचवी खासियत – गाण्यांचं टेकिंग. कथेला पुढे नेण्यासाठी, प्रसंगांचा मूड स्थापित करण्यासाठी, पात्रांबद्दल अधिक काही – जे अनुभूतीच्या अमूर्त पातळीवरचं आहे ते सांगण्यासाठी आणि मुलांच्या मनात सतत जागणारी ‘गंमत’ आणि ‘हार्मलेस मिश्चिफ’ प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी ही गाणी येतात. उदा. सोचो सूरज रोज नहाए या, बाल भिगोके ये बुद्धू बनाए हमे ! ये सारे तारे टिमटिमाए, या फिर गुस्सेमे कुछ बडबडाते रहे ! प्रसून जोशी या जाहिरात क्षेत्रातल्या लेखकानं लिहिलेली गाणी गुलजारांच्या कविता-गाण्यांशी नातं सांगतात. शंकर, एहसान, लॉय यांच्या संगीतामुळे गाण्यांचं मुळातच कथेशी असलेलं नातं अधिक एकजीव होतं.
मैं कभी बतलाता नहीं पर
अंधेरेसे डरता हूँ मैं मॉं
यूँ तो मैं दिखलाता नहीं
तेरी परवाह करता हूँ मैं मॉं
तुझे सब है पता, है ना मॉं.
तुझे सब है पता, — मेरी मॉं
— हा जो ‘मेरी मॉं’च्या आधीचा पॉज आहे त्यानंतर हळुवार ड्रम्स बरोबर ‘मेरी मॉं’ येतं. तो पॉज भल्याभल्यांच्या गळ्यात आवंढा आणतो. प्रेक्षकांना कसं रडवलं हे सिद्ध करण्याचा हेतू नसणार यात. जे व्यक्त करू शकत नाही ते आईला कळतंय असंही वाटतंय. तरीही व्यक्त तर करायचंय पण जमत नाही. ती न कळण्याची रिकामी जागा आहे, तो पॉज.

पहिल्या गाण्याची सुरुवात सगळ्या ‘नॉर्मल’ माणसांच्या जगण्याच्या गडबडीनं होते. मग येतं ‘यहॉं अलग अंदाज है, जैसे छिडता कोई साज है, हर कामको टाला करते है, ये सपने पाला करते है.’ ईशानचं वेगळेपण इतरांच्या ठोक नजरेतून आपल्याला दिसतं..शब्द-संगीताच्या मेळातून कळतं, अजून आपण ईशानला ओळखत नाही, ती ओळख होणार आहे पुढे – हे कळतं.
(टेंपररी चित्रकला शिक्षकाच्या शाळेतल्या पहिल्याच दिवशी त्यानं केलेला विदुषकी पोषाखातला नाच आणि त्यातल्या हालचाली, शिस्तप्रिय शाळेत विसंगत वाटतात परंतु मुलांच्या अभिनयामुळे आणि गाण्यातल्या शब्दसुरांच्या चपखल रचनेमुळे-त्यात थोडं तत्त्वज्ञानही आहे, ‘पॅच ऍडम’ आणि ‘पाईड पाइपर’चं हे मिश्रणही तसं खपूनच जातं)

सहावी खासियत-प्रसंगांची, दृश्यांची चपखल निवड आणि त्यात केलेला रंगसंगती, कमी अधिक प्रकाशाचा, त्यातून निर्माण होणार्या दृश्य पोताचा वापर.
या सगळ्या खासियतींना एकत्र करून असं म्हणता येईल- ‘चित्रपटाची भाषा’ आत्मसात केलेल्या मंडळींकडून आपण ईशानची गोष्ट समजून घेतो. कथनक्रम आणि संहिता बांधणार्यांचं कौशल्य, अभिनेत्यांची निवड, पात्रांचा अभिनय, ध्वनी आणि दृश्यरचनाकारांचं कौशल्य, स्थळ निवड आणि सेट-रचनाकारांचं कौशल्य, पात्रांना दृश्यरूप देणार्यांचं कौशल्य, संवाद, गाणी लिहिणार्यांचं कौशल्य ही सगळी वाद्यं आहेत आणि दिग्दर्शक हा त्यांचा कंडक्टर आहे. त्यानं एक वाद्यमेळ रचून आपल्याला काही दृक्श्राव्य अनुभूती दिली आहे. यात कुठे एखादा विसंवादी सूर येऊनही जातो. परंतु एकूण परिणामापुढे त्याचा विसरही पडतो.

मुलाच्या गतीनं त्याला प्रगती साधायला मदत करणारा शिक्षकही शेवटी चित्रकला स्पर्धा (ती कितीही हलकी फुलकी असली तरी) घेतो. त्यायोगे ईशानची चित्रकला सगळ्यांसमोर यावी याबद्दल त्याला वाटणारी निकड त्याच्या देहबोलीतून, कृतीतून दिसते. ईशान चित्रपटाचा हीरो आहे म्हणजे त्याला पहिलं बक्षिस मिळणार – तेही स्वत:च्या शिक्षकाला हरवून. पठडीतलं, अपेक्षितच हे, पण इथे बक्षिस घेणारा वेगळा आहे. ते घेणंही त्याला सोपं नाही हे दाखवण्याची निवड दिग्दर्शक करतो. संगीताच्या चढत्या सूर-ताला बरोबर हिरोच्या हातांनी उंचावलेला सोनेरी कप इथे निवडलेला नाही निवडलाय तो जिंकलेला तरीही ‘सहमा हुआ’ ईशान.

या सगळ्या खासियतींबद्दल खूप सविस्तर लिहिता येईल. काही निवडक वेगळेपणा पाहूया. चित्रपटात पडद्यावर जेजे दिसतं त्यातलं काहीही योगायोगानं घडलेलं नसतं. कॅमेरा कशापुढे ठेवायचा. कॅमेर्यापुढे काय ठेवायचं. दृश्याशी कुठला ध्वनी जोडायचा-जोडायचा नाही, दृश्य चौकटीत काय रचना करायची, कशाला अधिक प्राधान्य द्यायचं, आपली पात्रं प्रेक्षकांना कशी ‘दिसली’ पाहिजेत ही निवड दिग्दर्शक करतो. हा अधिकार वापरून ईशानचा बाबा कसा निवडलाय? तो अतिशय स्मार्ट, आकर्षक बघताक्षणी ‘यशस्वी झालेला’ वाटलाच पाहिजे असाही घेता आला असता. परंतु तो सामान्य दिसणारा आणि निम्न मध्यमवर्गातून उच्च मध्यमवर्गात आला असावा असा वाटणारा निवडलाय. यामुळेही त्याच्या आणि मुलांच्या नात्याला काही वेगळा रंग प्राप्त होतो. ईशानही गोरागोमटा-गोबरा-क्यूट नाही. या निवडींमुळेही चित्रपट अधिक वेगळा होतो. ‘बूट पॉलिश’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘मासूम’ या सारख्या चित्रपटांतून अशी गोड गोबरी मुलं, प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्यासाठी निवडलेली आपण पाहत आलो आहोतच. त्यात बदल होतो आहे. आपला सुपरस्टारपणा सिद्ध करण्यासाठी आमीर खानही आपले किटलीच्या कानासारखे कान, आणि वाढतं वय दाखवणारी त्वचा ‘चांगले कॅमेरा अँगल’ घेऊन लपवायचा प्रयत्न करत नाही. गोड, सुंदर निवडींना हरकत नाही. प्रश्न आहे कथेसाठी पात्रांनी विश्वासार्ह ठरण्याचा. ह्या चित्रपटानं ही विश्वासार्हता जागी ठेवली आहे.

मात्र वास्तवाशी जवळीक साधण्याचा हा प्रयत्न कधीकधी इतका वाढतो, की चित्रपट विचार करायला लावण्यापेक्षा भावनांनी पार घुसमटवून टाकतो. प्रेक्षागृहात चहूकडे नाकडोळे पुसण्याचे आवाज येत असतात. मध्यंतरात प्रसाधनगृहातही बहुतेक नाकाची टोकं आणि डोळे लालस दिसत रहातात. बायाबापड्यांना रडवण्याचा खेळ जरी आमीरखाननं खेळलेला नसला, तरी ह्या चित्रपटानं प्रेक्षकांना विचार करायला लावला तर ते खरं यश असेल. ते ह्या अश्रूंच्या पुरात वाहून जाऊ नये. तरीही एकंदरीनं हिंदी चित्रपटांच्या क्षितिजावर क्वचितच बघायला मिळणारा, आजच्या edutainment च्या जमान्यातला हा तारा आपला प्रकाश टेलिव्हिजनवर टाकूनही काही बदल घडवेल अशी आशा करूया.

आता कितीही म्हटलं तरी मुख्य धारेत यश मिळवणार्या हिंदी चित्रपटाची बात असल्यानं, काही थोड्या गंमती त्यात आहेत. उदाहरणार्थ एका सहामाहीत एकदम नव्हत्याचं होतं होत नाही. चित्रकलेच्या शिक्षकाचे प्रयत्न असले, तरी, ते नामोहरम करणारी इतर आसपासची परिस्थिती बदलायलाही खूप वेळ लागतो. सहाध्यायी मुलं प्रसंगी क्रूर वागून होत्याचं नव्हतं करायला सज्ज असतात. पालक-शिक्षकांना ह्या चित्रपटातून प्रत्येक मुलाला मुलीला वेगळ्यानं समजावून घेण्याची प्रेरणा मिळत असली तरी, त्यासाठी निराश न होता सतत आणि भरपूर धडपडत रहावं लागेल, भराभर यश मिळणार नाही, हे आपलं आपण लक्षात ठेवावं लागेल.