भरारी

सीमा कुलकर्णी या लातूरच्या जीवन विकास प्रतिष्ठानाच्या मतिमंद मुलांच्या विद्यालयात क्रिडा व विशेष शिक्षिका म्हणून काम करतात. थोडासा मतिमंद आणि पूर्णतः कर्णबधिर असलेल्या अन्वरने शाळेत प्रवेश घेतल्यापासून स्वतःच्या पायावर जिद्दीने उभे राहण्यापर्यंतच्या प्रवासातली काही निरीक्षणे इथे नोंदवली आहेत. शिक्षणाच्या विशेष गरजा असलेलं एखादं अपंग मूल (खरं तर दोन प्रकारचं अपंगत्व असलेलं) शाळेने उपलब्ध करून दिलेल्या संधी, त्यातून त्याच्या उपजत गुणांचा झालेला विकास आणि एखाद्या संवेदनशील शिक्षिकेचा मदतीचा हात यामुळे आत्मनिर्भर आयुष्य जगू शकतो याचा हा एक वास्तव अनुभव !

१ ऑगस्ट १९९५ ला दहा वर्षांचा अन्वर शेख आमच्या शाळेत दाखल झाला. थोडासा मतिमंद आणि पूर्णतः कर्णबधिर असला तरी प्राथमिक मूल्यांकन चाचणीतच त्याच्यातल्या जिद्दीची, न कंटाळता प्रयत्न करत राहण्याच्या त्याच्या स्वभावाची चुणूक त्यानं आम्हाला दाखवली. माझ्याकडेच असलेल्या educable group मधे त्याला प्रवेश देण्यात आला. या ग्रुपमधे तो लवकरच चांगला रुळला. अन्वर खूप जिद्दी आहे – एखादी गोष्ट करायची असे ठरवले की तो हात धुवून तिच्या मागे लागतो, त्याच्याकडे समयसूचकता आणि प्रसंगावधानही चांगले आहे, हे थोड्याच दिवसात माझ्या लक्षात आले.

जानेवारी ९६ मध्ये कोल्हापूराला विशेष मुलांसाठी आंतरशालेय स्पर्धा होत्या. त्यात एक दहा कि.मी. सायकलिंगची स्पर्धा होती. अन्वर रोज शाळेत सायकलवर यायचा. म्हणून धाडस करून आम्ही त्याचं नाव नोंदवलं होतं. स्पर्धेत साधारण त्याच्यासारखेच अपंग असलेले बारा खेळाडू होते. रस्ता खडतर, घाटातला होता. अन्वरने नेटाने नऊ कि.मी. अंतर कापलं – नंतर मात्र तो पूर्ण थकला. आम्ही सोबतच्या गाडीतून त्याला तू आता थांब असं ओरडून सांगत होतो पण तो थांबला नाही. प्रयत्नांची शिकस्त करून त्यानं अंतर पूर्ण तर केलंच पण कांस्यपदकही मिळवलं. स्पर्धेनंतर लगेच त्याला थंडी वाजून ताप आला. आम्ही घाबरून गेलो होतो. पण हा पठ्ठ्या त्याही अवस्थेत हसत होता. दवाखान्यात नेऊन दोन सलाईन्स् दिल्या आणि लगेच बराही झाला.

या प्रसंगानं त्याच्यातल्या जिद्दीवर शिक्कामोर्तब झालं. हळूहळू त्याच्यातला कलाकारही उमलायला लागला. मन लावून सुरेख चित्रं काढायचा. रांगोळी आणि मेंदीसुद्धा उत्तम काढायला शिकला. हस्तकलेतल्या वस्तू कल्पकतेनं बनवायचा. नाटकात काम करायला तर सदैव एका पायावर तयार. कोणतंही काम जीव लावून करायचा त्यामुळं सगळ्या स्पर्धांमधे तो चमकला ड्रॉईंगची परीक्षा ‘ए’ ग्रेडमधे उत्तीर्ण झाला. क्रिकेट, व्हॉलीबॉल, फ्लोअर हॉकी – अशा खेळासाठी शाळेच्या संघाचे कर्णधारपद त्याने शाळा सोडेपर्यंत जबाबदारीने निभावले. गणपतीची सजावट असो, राष्ट्रीय सणांची तयारी असो की अगदी शेजारच्या घरातलं वाढदिवसाचं डेकोरेशन – हा सदैव पुढेच असायचा.

मुंबईला ड्रायव्हरची नोकरी करीत असलेले अन्वरचे वडील २००३ साली वारले. या गोष्टीचा त्याला खूप धक्का बसला. त्याच्या घरी परिस्थिती बिकट असल्याने आम्ही त्याला नेहमीच अनेक प्रकारे मदत करायचो पण आता होता नव्हता तो वडिलांचा आधारही गेला होता. या धक्क्यातून त्याला सावरायला आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. पण थोड्याच दिवसांनी (२००४ मधे) त्याला जपानमधल्या आंतरराष्ट्रीय फ्लोअर हॉकी स्पर्धेत भारतीय संघात खेळायची संधी मिळाली. या स्पर्धेत भारत पाचव्या स्थानावर आला होता. जपानवरून परतलेल्या अन्वरचा आत्मविश्वास आणखीन वाढला होता. पूर्वीपेक्षा अधिक सोशलही झाला होता. विशेष म्हणजे तिथल्या महिनाभराच्या वास्तव्यात तो तिथल्या मित्रांकडून ओरिगामी शिकून आला होता. नंतर वर्षभर त्याला तिथल्या मित्रांचे फोन आणि पत्रंही येत होती.

२००५ मधे अठरा वर्षं पूर्ण झाल्यामुळे अन्वरला शाळा सोडावी लागणार होती. अन्वरसारख्या मुलांना १८ वर्षानंतर शाळेतच उपलब्ध असतील तशा नोकर्या देण्याचं शाळेचं धोरण आहे, मात्र सगळ्या जागा भरलेल्या असल्यानं त्याला नोकरी देता येणं शक्य नव्हतं. अन्वरची कला, त्याचा स्वभाव, त्याच्याजवळचा प्रमाणपत्रांचा ढीग यामुळं त्याला बाहेर सहज नोकरी लागेल असं आम्हाला वाटत होतं. पण ते घेऊन तो वर्षभर नोकरीसाठी वणवण भटकला, आम्हीही ओळखी पाळखीच्या माणसांकडे शब्द टाकत होतो. त्याचे शाळेत आम्ही अनुभवलेले गुण सांगत होतो पण उपयोग होत नव्हता. त्याच्याबद्दल दया सगळ्यांनाच वाटायची पण नोकरी कुणी देत नव्हतं. पण आपल्या म्हातार्या आणि आजारी आईला आपल्याला सांभाळायचं – त्यासाठी काम मिळवायचंय हे त्यानं मनाशी पक्कं ठरवलं होतं. याच काळात तो टायपिंग आणि कॉम्प्युटर पण शिकला. त्याच वेळी लातूरात नव्यानं सुरू होत असलेल्या ‘संवेदना’ या सेरेब्रल पाल्सी मुलांच्या शाळेविषयी कळलं. तिथले श्री व सौ. पाटील यांच्याशी अन्वरबद्दल बोलणं झालं – आता अन्वर (जून २००७ पासून) या संस्थेत केअर टेकर म्हणून उत्तम रितीनं काम करतो आहे. या शाळेतल्यासारखाच लळा त्यानं तिथंही सर्वांना लावलाय. बागकामापासून सजावटीपर्यंत सगळी कामं पुढाकार घेऊन उत्साहानं करतो. शिवाय उरलेल्या वेळात एका शैक्षणिक साहित्य निर्मिती केंद्रात हेल्पर म्हणून काम करतो. आम्ही अधूनमधून त्याला भेटायला जातो. तिथली सगळी माणसं त्याचं आणि त्याच्या कामाचं कौतुक करतात तेव्हा मिळणार्या समाधानाची तुलना आम्ही दुसर्या कशाशीही करू शकत नाही.