अध्ययन वैविध्य : एक तोंडओळख
अथर्वच्या निकालाचा दिवस म्हणजे घरातलं वातावरण बिघडवणारा दिवस. अथर्व हा एक बुद्धिमान पण गुंड मुलगा. भरपूर दंगामस्ती करतो. त्याला तोंडी सगळं येत असतं पण परीक्षेत भरपूर मार्क कधीच पडत नाहीत. अथर्वच्या आईने यावेळी स्वत: अभ्यासात लक्ष घालायचं ठरवलं. त्याच्या बरोबरीने वेळ घालवून त्याला विषय समजावून सांगितला. त्याला तो समजला आहे ना याची खात्री करून घेतली. अथर्व बोलताना अगदी छान पोपटपंची करतो. लिहायची वेळ आल्यावर मात्र तो खूपच कमी पडतो. आणि त्यामुळे त्याला कधीच समाधानकारक मार्क मिळवता येत नाहीत. अथर्वला स्वत:लासुध्दा वाईट वाटतं पण नेमकं काय चुकतंय ते त्यालाही समजत नाही. हळूहळू घरी आणि शाळेतही अथर्वला काही विशेषणं चिकटायला लागल्येत. त्यातली काही ओळखीची वाटताहेत का बघा-आळशी, अभ्यासात लक्ष नसणारा, लक्ष एकाग्र न होणारा, गतिमंद, मतिमंद इ. खरं तर अथर्व उत्तम बुद्धिमत्तेचा मुलगा आहे. या विशेषणांपैकी काहीच त्याला लागू पडत नाही. मग का मार्क पडत नाहीत त्याला? शालेय जीवनात यशस्वी असणं किंवा नसणं हे मार्कांवरूनच ठरवलं जातं आणि म्हणूनच अथर्वसारखी मुलं अपयशी वाटतात. अथर्वसारखी समस्या असणारी अनेक मुलं तुमच्या आसपास असतील. होय ना? काय असतं नेमकं कारण या मुलांच्या गूढ प्रगतीचं?
हुशार असूनही मार्क मिळवू न शकणार्या अथर्वसारख्या मुलांची खरी समस्या असते अध्ययन वैविध्याची. अध्ययन वैविध्य (learning differences) ही सामान्य आणि उत्तम बुद्धिमत्तेच्या मुलांमधे आढळणारी एक समस्या आहे. अनेक गुण आणि उत्तम बुद्धिमत्ता असूनही ही मुलं अभ्यासात मागे पडतात. या मुलाच्या अभ्यासात मागे पडण्याच्या विविध कारणांचा शोध पालक, शिक्षक आणि स्वत: मुलेही आपापल्या परीने घेत असतात. त्यावर काही उपायही करून पाहिले जातात. पण नेमका रोग न समजल्याने उपाय लागूच पडत नाहीत. मग सगळे प्रयत्न थकल्यावर ‘जबाबदारीची जाणीव झाल्यावर सुधारेल’ असं म्हणून दुर्लक्षही केलं जातं. पण वाढत्या वयाबरोबर समस्याही मोठी होत जाते. त्या समस्येचा परिणाम संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर आणि पर्यायाने आयुष्यावर पडतो. अध्ययन वैविध्याची ही समस्या योग्य वयात लक्षात आली तर त्यावर उपाय शोधणे सोपे जाईल म्हणून या समस्येची ओळख करून घेऊयात.
‘अध्ययन वैविध्य’ ही जैवमज्जासंस्थेतील दोषांमुळे निर्माण होणारी समस्या आहे. जैवमज्जासंस्थेतील दोषांमुळे माहिती मिळवणं, साठवणं, माहितीचं समायोजन करणं, तिचा वापर आणि पुनर्वापर करणं यामधे अनेकविध समस्या येऊ शकतात. एखादी गोष्ट शिकताना, माहिती मिळवून ती साठवून वापरताना येणार्या समस्यांची अनेक कारणं असू शकतात. पण ‘अध्ययन वैविध्य’ हे याहून वेगळे आहे. १८८६ साली ही समस्या प्रथम जाणवली. १९४८ साली डॉ. सॅम्युएल क्रीक यांनी या समस्येला ‘अध्ययनातली कमतरता’ (learning disabilities) असं नाव दिलं. त्यानंतरच्या संशोधनाने ही गोष्ट जाणवली की ‘अध्ययनातली कमतरता’ (पंगुत्व) अनेक कारणांनी असू शकतं. मतिमंदत्व, मेंदूच्या दुखापतीमुळे उद्भवणारे विविध आजार, फिटस् येणे, मानसिक असंतुलन, मनोविकार, शारीरिक अपंगत्व, गतिमंदत्व, वर्तणूकविषयक दोष, विविध सामाजिक समस्यांमुळे शिक्षणात समस्या येऊ शकते. पण यातले कुठलेही कारण नसताना जर शिक्षणात समस्या येत असेल तर ती अध्ययन वैविध्यामुळे असते.
मूल जन्माला आल्यापासून ते संपूर्ण मोठं होईपर्यंत त्याची वाढ अनेक पातळ्यांवर होत असते. अध्ययन वैविध्याची समस्या नेमकी कुठल्या पातळीवरच्या वाढीमधे आहे हे समजल्यास त्यानुसार त्या मुलाच्या समस्येचा अंदाज घेऊन त्याच्यासाठी विशिष्ट पद्धतीचा असा उपचारात्मक अभ्यासक्रम आखून घेता येईल. या समस्येवरील उपचारांमध्ये उपचारात्मक शिक्षण हा घटक खूपच महत्त्वाचा आहे. अत्यंत शास्त्रीय पद्धतीने हा उपचारात्मक अभ्यासक्रम आखला जातो.
उपचारात्मक अभ्यासक्रम आणि शालेय अभ्यासक्रम यामधे नेमका फरक काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. बाजारात मिळणारे रेडिमेड कपडे आणि शिंप्याने मापं घेऊन शिवलेले कपडे यामधे जो फरक आहे, तोच फरक या दोन अभ्यासक्रमात आहे. रेडिमेड कपडे हे साधारण एका ठरावीक वयाच्या व्यक्तीची, उंची, जाडी, मापं गृहीत धरून शिवलेले असतात. शिंप्याने शिवलेले कपडे हे ‘त्या’ ठरावीक व्यक्तीसाठी असतात. उपचारात्मक अभ्यासक्रम आखण्यासाठी समस्या लवकर लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे.
अध्ययन वैविध्याची समस्या अगदी लहान मुलांमधे खालील काही प्रकारांनी व्यक्त होते….
१) भाषिक कौशल्यं उशिरा आत्मसात करणे – उशिरा बोलायला, समजायला लागणे.
२) स्नायूंच्या हालचालींवर उशिरा नियंत्रण येणे. वस्तू हातात धरताना पकड नीट नसणे, लेखनसाहित्य योग्य प्रकारे धरून. त्याचा वापर करून गिरगोट्या काढण्याला उशिरा सुरुवात होणे.
३) बौद्धिक वाढीत सातत्याचा अभाव – बौद्धिक क्षमता कधी उत्तम असल्यासारखे वाटते तर कधी खूपच अविकसित वाटते.
४) उजव्या-डाव्याचा गोंधळ. लिखाणात अक्षरांच्या प्रतिमा काढणे. (mirror images) b ऐवजी d, j ऐवजी i इत्यादी.
५) वागण्या बोलण्यातली वयाला न शोभणारी अपरिपक्वता.
अध्ययन वैविध्याविषयी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा काही कुठला आजार नाही. त्यामुळे-रोग-त्यावर औषध घेणं, आजारातून बरं होणं असं इथे काहीच नसतं. ही समस्या असणार्या मुलांना मिळालेली माहिती इतर चार लोकांसारखी साठवता, आठवता व वापरता येतेच असं नाही. आणि तसं करता येण्यासाठी गरज असते अनेक विविध प्रकार, पद्धती यांचा वापर करून व्यक्तिगत शिक्षण देण्याची. उपचारात्मक शिक्षणपद्धतीच्या वापराने ह्या समस्येची उकल होणे शक्य आहे.
‘अध्ययन वैविध्याची’ समस्या असणार्या लहान-मोठ्या व्यक्तींची काही चटकन आढळणारी लक्षणे अशी असतात.
१) भाषेचा वापर करताना लेखन, वाचन, समजूत आणि प्रत्यक्ष वापर म्हणजे बोलणं या चारही पातळ्यांवर सहजता नसणं.
२) वेळेचं समायोजन योग्य पद्धतीने न करता येणं.
३) सोपी सोपी कामं पटकन सुरू करून वेगाने संपवता न येणं.
४) वागण्यावर ताबा नसणं.
५) त्या दिवशी शिकलेली गोष्ट त्या दिवशीही न लक्षात राहणं.
६) समाजात वावरताना उपयुक्त अशी कौशल्यं न येणं. (उदा. एकाचवेळी अनेकजण संवाद साधत असतील तर चुकीच्या वेळी- मधेच बोलणं, अस्थायी हसणं इत्यादी.)
ही समस्या उद्भवण्यास कारणीभूत ठरणारे काही महत्त्वाचे घटक म्हणजे – डाव्या व उजव्या मेंदूतील माहितीचे आदान-प्रदान होताना होणारा गोंधळ, शरीरातील विविध संप्रेरके आणि इतर स्राव यांचा परिणाम, आनुवंशिकता (म्हणजे घरामधे आधीच्या पिढीतल्या कोणाला ही समस्या असेल तर ती नंतरच्या पिढीतल्या एखाद्या व्यक्तीला असू शकते), घरातल्या व घराबाहेरच्या वातावरणाचा परिणाम.
मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करण्याच्या यंत्रणेतल्या दोषामुळे उद्भवणारी ही समस्या अनेक प्रकारांनी व्यक्त होते. त्यातले काही महत्त्वाचे प्रकार जाणून घेऊयात.
१) डिस्लेक्सिया (Dyslexia) – भाषेचा वापर करताना समस्या येणं. बोलणे, समजून घेणे, वाचणे, लिहिणे या संदर्भातल्या विविध समस्या असूनही अशा व्यक्ती प्रचंड हुशार आणि कल्पक असू शकतात. दृश्य माध्यमाशी निगडित कला, खेळ, तंत्रज्ञान या विषयांमधे विशेष कौशल्य आत्मसात करू शकतात.
२) डिस्ग्राफिया (Dysgraphia)- वयाला योग्य अशाप्रकारे लेखन कौशल्य विकसित न होणं.
३) डिस्कॅल्क्युलाय (Dyscalculia)- गणितातली चिन्हे, आकडे, संकल्पना समजून घेण्यात व वापरण्यात समस्या येणं ही समस्या असणार्या लोकांना अनेकदा साधी साधी आकडेमोडसुद्धा येत नाही.
४) डिस्नॉमिया (Dysnomia)- ही समस्या असणारी व्यक्ती, व्यक्तींची, वस्तूंची नावं, महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवून वापरू शकत नाही. ते वगळता त्या व्यक्तीचं बोलणं सामान्य माणसासारखं असतं.
५) नॉनव्हर्बल लर्निंग डिस्ऑर्डर (NLD) – मेंदूच्या उजव्या भागावर परिणाम करणारी ही मज्जासंस्थेशी संबंधित समस्या असते. ही समस्या असणार्या लोकांची भाषाविषयक जाणीव उत्तम प्रकारे विकसित झालेली असते. ‘डिस्लेक्सिया’ या समस्येच्या अगदी विरुद्ध अशी ही समस्या असते. बोलणं आणि समजणं ही भाषिक कौशल्यं उत्तम प्रकारे विकसित झाली तरी या व्यक्तींना लिखाण, दिशांची जाणीव, शब्दांशिवाय व्यक्त होणार्या गोष्टी. (म्हणजे देहबोलीतून, खाणाखुणांमधून व्यक्त होणार्या गोष्टी) समजत नाहीत. म्हणजे समोरची व्यक्ती आपलं बोलणं ऐकायला अजिबात उत्सुक नाही हे देहबोलीतून व्यक्त होत असेल तरी ते न समजून हे लोक बोलतच राहतात.
६) स्मरणशक्तीविषयक समस्या (memory disabilities) – स्मरणशक्तीविषयक समस्या अनेक प्रकारच्या असू शकतात. काही लोकांना नावं, नंबर, घटना यांच्या स्मरणाला समस्या येते तर काही लोकांना गोष्टींचा क्रम लक्षात ठेवण्यास समस्या येते. ही समस्या असणार्या शालेय विद्यार्थ्यांना वर्गातल्या छोट्या छोट्या चाचण्यांमधे चांगले मार्क पडतात कारण तिथे अभ्यासक्रम थोडाच असतो. सहामाही किंवा वार्षिक परीक्षेत अभ्यासक्रम वाढल्यावर या मुलांच्या गाड्या घसरतात.
७) श्राव्य माहिती प्रक्रिया विषयक समस्या (auditory processing disability) ऐकलेली माहिती समजण्या आणि वापरण्याविषयीच्या या समस्येत वाचणं, बोलणं या कौशल्यांवर परिणाम होतो. ऐकलेल्या माहितीचं मेंदूत समायोजन करण्याच्या प्रक्रियेत तीन वेगवेगळ्या पद्धती असू शकतात.
साधारणपणे सारख्या व्यंजनांमधे गोंधळ होणे – उदा.म,न. आवाजातले चढउतार, चेष्टा न समजणे-
आवाजाच्या पार्श्वभूमीवर इतर आवाज ऐकायला न जमणे. टी.व्ही., रेडिओ चालू असताना बोललेले न कळणे.
ऐकताना क्रमात घोळ होणे – चारशे एक ऐवजी. एकशेचार ऐकणे.
८) दृक् माहिती ग्रहण विषयक समस्या (visual perception disability) – दृक् माध्यमातून मिळणारे संदेश समजताना व वापरताना येणारी समस्या. या प्रकारच्या समस्यातही अनेक प्रकार असू शकतात. गर्दीमधून हवी ती नेमकी व्यक्ती किंवा भरपूर वस्तूंमधून हवी ती वस्तू शोधता न येणे. धड्यातील परिच्छेदातून नेमका हवा तो उत्तराचा शब्द शोधता न येणे. दोन सारख्या वस्तूंमधला, चित्रांमधला, व्यक्तींमधला फरक लक्षात न येणे, रंगाच्या दोन छटांमधील फरक न समजणे. अंतर न समजणे – उंची खोली यांचा अंदाज न येणे. ही समस्या असणार्या व्यक्ती अंतराचा अंदाज न आल्याने धडकतात.
९) व्यवस्थापनविषयक समस्या (organisational disabilities) –
ही समस्या असणार्या व्यक्तींना दैनंदिन व्यवहारातल्या कामांमधे काळ-काम-वेगाचे गणित साधता येत नाही.
१०) स्नायूंच्या हालचालींची समस्या (motor disabilities) ही समस्या असणार्या व्यक्तींना स्नायूंच्या हालचाली करताना गोंधळल्यासारखे होते. लिखाणापासून ते बटणं लावणे, केस विंचरणे, हातात भांडं, चमचा धरणे, जेवणे या क्रिया करतानाही अडचणी येतात.
११) सामाजिक कौशल्यांची समस्या (social skill deficits) ही समस्या असणार्या व्यक्तींना सामाजिक व्यवहारातल्या मूलभूत गोष्टी समजत नाहीत. त्यांना देहबोली, अंतर या गोष्टींची जाणीव नसते. कोणी बोलत असताना मध्येच बोलणे, अगदी जवळ जाऊन बोलणे ह्या सारख्या गोष्टी दिसतात.
‘अध्ययन वैविध्य’ कशाप्रकारे व्यक्त होतं हे आपण पाहिलं. आपल्याला ही समस्या असणारी विविध वयोगटातली अनेक माणसं जाणवली असतील. होय ना? वाढत्या वयाच्या मुलांबाबत ‘ती आयुष्यात यशस्वी होतील ना? त्या मुलांची बुद्धिमत्ता वाया तर नाही जाणार?’ अशा अनेक शंका उपस्थित होतात. अध्ययन वैविध्याची समस्या असणार्या व्यक्ती त्यांना गती असणार्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रात अत्युच्च पदावर जाऊ शकतात. ही समस्या असणार्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा काही व्यक्तींची नावं कळली की तुमच्या मनातल्या शंकेचं नक्कीच निरसन होईल. अल्बर्ट आईनस्टाइन, थॉमस एडिसन (शास्त्रज्ञ), अगाथा ख्रिस्ती (लेखक), टॉम क्रूझ (हॉलीवूड अभिनेता) या व्यक्ती अध्ययन वैविध्याच्या समस्येने ग्रस्त होत्या.
या समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक आहे लवकर निदान होणं आणि त्यानंतर उपचारात्मक शिक्षणपद्धतीच्या वापराने मूलभूत अशा कौशल्यांमधे बदल घडवून आणणं. या समस्येवर काम करणार्या भारतातल्या संस्थांमधली एक महत्त्वाची संस्था पुण्यात आहे.
‘रोझ ऍण्ड लोरा मॉरिस मेमोरिअल ट्रस्ट’ या संस्थेच्या वतीने ‘बोल्ड’ नावाचा एक विशेष उपक्रम राबवला जातो.
(Bridging Over Learning Differences)
या संस्थेतले प्रशिक्षित शिक्षक उपचारात्मक शिक्षण देण्यासाठी विविध शाळांमधे जाऊन तिथल्या समस्याग्रस्त मुलांना शोधून काढतात. समस्येचं नेमकं स्वरूप शोधण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने ठरवलेल्या विविध चाचण्या केल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यक्तिगत पातळीवर उपचारात्मक अध्ययनाचे वर्ग उपलब्ध करून दिले जातात. या विषयावर काम करण्यास उत्सुक असणार्या शिक्षकांसाठी प्रशिक्षणवर्गही संस्थेच्या वतीने चालवले जातात.
आपल्या आसपास बरेचदा आढळणार्या पण तरीही अनोळखी अशा या समस्येची ओळख करून देण्यासाठी हा लेख प्रपंच! या समस्येने थेट परिणाम कशावर होत असेल तर वागणूक, शिक्षणातली प्रगती. योग्य प्रकारे, योग्य वेळी उपचार झाले तर या समस्येमुळे क्षमतांचा पुरेपूर वापर न करणार्या अनेकांच्या आयुष्यातली अनेक कोडी सुटतील. थोडंसं जागरूकपणे शोधूया या समस्याग्रस्तांना आणि योग्य उपचार देऊया !