मीरा कहे…

मीरा मूळची अमेरिकेतली आहे. भारतीय तरुणाशी लग्न करून भारतात आली, आणि भारतातच राहिली आहे. वैद्यकीय पदवीधर आहे. गेली अनेक वर्ष आरोग्य हिताच्या अनेक कार्यक्रमांचं संयोजन, लालनपालन तिनं केलेलं आहे. ‘तथापि’ नावाच्या संस्थेची स्थापना करून समाजात लैंगिकता जाणीव वाढवण्याचा प्रयत्न करते आहे.

ती अतिशय कल्पक आहे, त्याहीपेक्षा जास्त संवेदनशील आणि प्रेमळ आहे. मीराच्या ह्या सगळ्या कामा-प्रवासाबद्दल विचार करताना, एक बाब अटळपणे सतत समोर असते. तिला ‘उदासीनतेचे’
झटके काळाकाळानं पण सातत्यानं येत असतात. मानसिक आजारांना घेऊन ह्या जगात जगणं फार फार अवघड असतं. कुठलंही काम सातत्यानं झेपत नाही. समाजाकडून तर्हातर्हांनी दूषणं मिळत राहतात. कधी आजाराबद्दल, तर कधी अकार्यक्षमतेबद्दल.

समाज बाजूला राहू दे, स्वतःला स्वीकारणं तरी सोपं असतं का? उदासीनतेच्या झटक्यांमध्ये वेगळ्या जगात जगत राह्यचं, आणि मग बाहेर येऊन प्रत्येकवेळी नव्यानं स्वतःला आणि जगाला सामोरं जायचं.
मीराशी बोलून हे सगळं आम्ही मांडायचं ठरवलं, ते अशासाठी की हे सगळं स्वीकारून, माणूसपणाबद्दल प्रेम आणि जगण्याबद्दल विलक्षण आस्था घेऊन मीरा ताठपणे उभी आहे. लग्न, माहेर, सासर, जोडीदार, मूलबाळ, नातेवाईक, घरसंसार, जबाबदार्या अशा संकल्पना तिनं स्वतःच्या क्षमतांशी आणि वास्तवांशी जोडून घेतल्या आहेत. वेगळ्यानं त्याचा अर्थ लावला आहे. वाट्याला आलेल्या वास्तवाचे चटके स्वीकारून ती तडफेनं उभी आहे.

Branson मधे मी ज्युनियर कॉलेजमधे असताना वसंतऋतूच्या सुमारास एक विचित्र घटना घडली – मी कित्येक महिन्यांसाठी depression/उदासीनतेमधे गेले. लहान असतानाही मला अशा विचित्र/वेगळ्या भावना जाणवत. पण हे पहिलं ‘डिप्रेशन’ नक्कीच काहीतरी वेगळं होतं. मला वाटलं की जणू मी या ‘देहाबाहेर आहे – हे खूप धक्कादायक, गडद आणि न सांगता येण्याजोगं होतं. मी सर्वांपासून तुटले गेले – सगळ्याच गोष्टींपासून – अर्धवट अवस्थेत आणि हे खूप दु:खदायक होतं. मी आईला सांगायचा प्रयत्न केला. तिच्या म्हणण्यानुसार, माझ्या बहिणीनेही ‘देहाबाहेर’ची भावना अनुभवलेली होती. तरीही मी एकंदरीनं शाळा पूर्ण होईपर्यंत मजेत होते. मी एक बर्यापैकी चांगली विद्यार्थिनी होते – माझे विषय, शिक्षक मला आवडत. खेळात भाग घ्यायला, पोहायलासुद्धा आवडे ! माझ्या आईच्या आग्रहाने मी अभ्यासेतर विषयातही भाग घेत असे.

कॉलेजच्या दुसर्या वर्गात असताना मला पुन्हा एकदा ‘डिप्रेशन’ आलं आणि गेलं. नंतर मी Swarthmore कॉलेजमधे गेले. त्याचं असं झालं की कॉलेजचे प्रमुख माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना भेटायला आले होते. आणि तेव्हा ते ‘जिव्हाळा’ असणार्या (Compassionate) विद्यार्थ्यांच्या शोधात होते. आणि मला वाटतं, त्यांना माझ्यात तो गुण दिसला. पण त्या कॉलेजच्या अभ्यासाच्या – मार्कांच्या अपेक्षा फारच होत्या, त्यासाठी बरंच झगडावं लागलं मला. ते व्हिएतनाम युद्धाचे दिवस होते. आणि आम्ही ‘Anti-war वॉशिंग्टनवर स्वार’ ला सामील झालो. तेव्हाच माझं डिप्रेशन पुन्हा एकदा आलं. कशीबशी मी कॅलिफोर्नियाला घरी परत आले.

मला घरी असताना अगदी ‘जगात सर्वात उंचीवर’ असल्याप्रमाणे वाटत होतं. त्यानंतर उन्हाळ्यात Intertribal Friendship house in outland या संस्थेमार्फत मी १६ अमेरिकन-भारतीय मुलांना गोळा करून त्यांना पोहायला शिकवलं ! आणि मी परत जाऊ शकणार नाही असं कळत होतं तरी मी Swarthmore ला गेले. नंतरचं डिप्रेशन लगेच आलंच- काही आठवड्यात मी पुन्हा एकदा घरी ! माझा बाबा मला म्हणायचा – ‘अगं किती आत्मविश्वास होता मागच्या उन्हाळ्यात आणि आता हे काय?’ मी त्याच्याकडे गुंगीत बघायचे, ऐकायचे. माझ्या या ‘ध्रुवीय’ मानसिक आंदोलनांकडे कसं बघायचं ते कुणालाच कळेना. इथूनच माझ्या कॉलेज गळतीला सुरुवात झाली. माझ्या बहिणीकडे असताना, सायकियाट्रिस्ट नसताना अचानक मी डिप्रेशन मधून बाहेर आले – केस कापून घेतले आणि छान झाले. मग मला अनिल सद्गोपाल भेटला-कॅलटेक मधला ग्रॅज्युएट त्यानेच मला हसवलं आणि म्हणाला, ‘‘डॉक्टर का होत नाहीस तू?’’ मी आश्चर्यानं बघतच राहिले, पण मी ते गंभीरपणे घेतलं आणि UC Berkeley मधे pre-medical सुरू केलं. नंतर त्या वर्षीच (१९६६) एका मोठ्या अपघातात माझ्या कुटुंबियांपैकी ८ जण गेले. माझे आई-वडील, मोठा भाऊ, त्याची बायको आणि चार मुलं ! मी वीस वर्षांची असेन- ही पोकळी भरून काढणं अशक्यच होतं – मला तर ‘डिप्रेशन’ सुद्धा आलं नाही त्या वर्षी !
वैद्यक-पूर्व अभ्यासक्रमाची दोन वर्षे होतानाच मी हिंदी शिकले आणि १९६८ मधे भारतात गेले. मी व अनिलने दिल्लीमधे आर्य समाज पद्धतीने लग्न केले. नंतर लगेचच मी मुंबईतल्या वैद्यकीय कॉलेजमधे ऍडमिशन घेतली. तिथल्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी मी एकटीच ‘पाश्चिमात्य’ होते. बाकीचे पूर्व आफ्रिका, पॅलेस्टाईन, मलेशिया, श्रीलंकेतून आलेले. माझे अमेरिकन उच्चार लवकरच बदलले आणि मी ‘घर’ विसरले. पण – हो, माझं डिप्रेशन मात्र परत आलं.

यावेळी माझ्या कॉलेजच्या सायकियाट्रीच्या प्रोफेसरांनी मला निराशा-मारक औषधं दिली. माहितेय, त्यानं एकदम् जादू झाली – १० दिवस ही औषधं सुरू होती आणि त्यांचे साईड-इफेक्टस् एकदम बेकार होते. तरी त्यांचा
गुण आला ! माझ्या ‘डिप्रेशन’चा माझ्या ‘मानसिक’तेशी असणारा संबंध त्यातून माझ्या लक्षात आला. पूर्वी ‘जगण्याची खंत’ असते असं मला वाटायचं. तसं ते नव्हतं. डिप्रेशन येण्याचं थांबलं नाही. पण औषधं घेऊन, आणि एक

सहामाही बुडवून का होईना मी माझी इंटर्नशिप पूर्ण केली. आणि १९७४ मधे मला मेडिकल पदवी मिळाली !
याच दिवसात अनिलने, मुंबईच्या TIFR मधे मोलेक्युलर बायॉलॉजिस्ट असताना, खेड्याच्या विकासासाठी काम करायचे ठरवले. सुरुवातीला काही निवडक लोकांना घेऊन तो मध्य प्रदेशात गेला. माझे शिक्षण झाल्यावर मीपण तिकडे गेले. त्याच सुमारास मी मेडिको फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पातळीवरच्या गटाची संस्थापक सदस्य झाले. हा गट अजूनही कार्यरत आहे.

बनखेडी – होशंगाबाद तालुक्यातलं पूर्वेकडचं गाव. १९७४ ते १९८९ अशी बनखेडीतली सोळा वर्ष अत्यंत सुंदर आणि वेगळ्या अनुभवांनी भरलेली होती – अर्थातच जेव्हा जेव्हा ‘डिप्रेशन’ येत असे, तेव्हा तो सगळा काळ मी धसकलेली असे. आम्ही तिकडे Lathyrism चे सर्वेक्षण केले. अत्यंत गरीबीत जगणारे कित्येक जण भूक मारण्यासाठी Lathyris sativa च्या (लाखेच्या) गोळ्या खातात. आणि त्यातून त्यांना अर्धांगवायू होतो. आम्ही आमच्या घरी एक डॉक्टरांचे शिबिर घेत असू. त्यात सहभागी होणार्या शिकाऊ डॉक्टरांपर्यंत या गरिबांची अनारोग्याची अवस्था आणि दु:ख पोहचवण्याचा हा एक प्रयत्न होता. मी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात अर्धवेळ काम करायचे – मला शासकीय सेवा योजना द्विगुणित करण्यात रस नव्हता. मला फक्त तिथं येणार्यांना मदत करायची होती.

इथेच परंपरागत सुईणीचे काम करणार्या (दाई) स्त्रियांबरोबर काम करायची संधी मला सुदैवानं मिळाली. जन्मत:च मृत वाटणार्या बाळाला त्या इतक्या विशिष्ट पद्धतीनं जगवत की अचंबा वाटावा ! आम्हाला या दायांबरोबर काम करण्यासाठी चांगले अनुदानही मिळाले पण मला मधेच एका मोठ्या डिप्रेशनने घेरले आणि हे अनुदान परत करून मी दिल्लीला गेले.
नेहमीप्रमाणे, काही काळाने मी पूर्ववत झाले. ८१ साली जानेवारी ते जूनमधे मी एक छोटे प्रशिक्षण घेतले. दिल्लीतल्या AIMS ह्या संस्थेने आयोजलेले हे खेड्यातील प्रसूतीविषयक प्रशिक्षण होते. या दरम्यान, दायांना लागणारी मदत समजून घेण्यासाठी मी शेकडो प्रसूती जवळून बघितल्या.

मी बनखेडीला काम करण्यासाठी परत आले. तोपर्यंत आमच्या गटाचे काम वाढले होते. त्यातून प्रेरणा घेऊन भूमिहीन आणि छोट्या शेतकर्यांचे ‘मजदूर संघटन’ झाले होते. त्याद्वारे ते सरकारकडे आणि स्थानिक धनिकांकडे आपले हक्क मांडत होते.

हा खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल होता या भागात. अशा प्रकारे प्रथमच शासकीय यंत्रणेला कुणीतरी जाब विचारत होतं. आणि तोही सर्वात गरीब माणसाकडून विचारला जात होता. पण मी काय करत होते – पुन्हा डिप्रेशनमधे गेलेली होते. ह्यावेळी एक वेगळा, नवा मित्र भेटला. त्याला माझ्या या Crisis चं फारच आश्चर्य/आकर्षण वाटलं आणि विशेष म्हणजे त्याने माझा आदर केला. तो म्हणाला, ‘‘तू या सगळ्या बायकांना तुझ्या अनुभवांविषयी सांगायला हवंस. तुला वाटणारी भीती, भावना, सांग त्यांना…’’

हा जोगिन – यानेच मला सगळ्यांसमोर हे बोलायला लावलं. या सगळ्या बायकांना मी पहिल्यांदाच खरी माणूस म्हणून दिसले. ‘‘आम्हालाही अशी भीती असते’’ त्या म्हणाल्या, ‘‘आम्हाला वाटायचं की तू देवदूत आहेस आणि आम्ही शक्तीहीन.’’ त्या दिवसापासून मी त्यांच्या ‘उपयोगी’ झाले. ‘जरुरी दवाई की सुविधा’ नावाची एक सहकारी संस्था आम्ही मिळून चालू केली. नंतर एकत्र येऊन ‘झडते फूल (falling blossoms) या नावाने दोन वर्षाचा, दोन खेड्यात मिळून बालक जन्म-मृत्यू (mortalitiy) विषयक सर्वेक्षण व अभ्यास केला.

यानंतर मी पुन्हा डिप्रेशनमधे गेले आणि दिल्लीला रवाना झाले. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर शिखांविरुद्ध पेटलेल्या दंगलीच्या वेळेसही मी डिप्रेशनमधे होते. ही घटना अगदी अमानुष आणि भयंकर होती. शिवाय भोपाळच्या Union Carbide Factory मधली वायूगळतीची घटना घडली. जवळजवळ ८००० लोक त्यात गेले त्याहून जास्त अपंग झाले ! माझे सहकारी लगेचच रिलीफ कामांसाठी गेले. मी डिप्रेशनमधेच होते – मला काहीच माहीत नव्हते.
फेब्रुवारीच्या सुरुवातीला मी औषधांमुळे उदासीनतेमधून बाहेर आले आणि काही डॉक्टरांच्या गटाबरोबर या दुर्घटनेतल्या लोकांना मदत करायला गेले. ते सहा महिने आम्ही तिथे वैद्यकीय मदत देत होतो. एकदा तर ‘जन स्वास्थ केंद्र’ नावाने आम्ही नवीन गट सुरू करून काम केल्याबद्दल पोलिसांनी सगळ्यांना धरलं आणि जेलमधेही टाकलं होतं.

१९८७ ते ८९ मधे ‘जनन-जाणीव’* कार्यक्रमासाठी आम्हाला अनुदान मिळालं आणि मी बनखेडीमधे काम सुरू केलं. माझ्या उदासीनतेच्या दोन झटक्यांमुळे काम न थांबवता माझ्या गटानं ते चालूच ठेवलं होतं. अनेक बायकांना जनन प्रक्रियेत दिसणार्या खुणा कळू लागल्या, अगदी अशिक्षित बायकासुद्धा आपली निरीक्षणे नोंदवू लागल्या आणि जवळपासच्या शिकलेल्या बायकांनाही शिकवू लागल्या. दुर्दैवानं याच वेळी आमचा गट मात्र आतून तुटत चालला होता. त्यामुळं हे काम गुंडाळावं लागलं. आमचा संसारही फारसा चांगला चालला नव्हता.

१९८९ मधलं माझं डिप्रेशन म्हणजे सगळ्यात कहर झाला ! आदल्या वर्षी, खूप कंटाळून मी माझ्या औषधांचा जास्ती डोस घेतला – वाटलं, काय फरक पडतोय? मी शहरातल्या दुकानापासून लांब राहत असल्यानं माझ्याकडे खूप औषधं होती. सुदैवानं शासकीय डॉक्टरला माझ्या पोटातला सगळा डोस काढण्यात यश आलं. दोन दिवस मी बेशुद्धावस्थेत होते.

त्यातून बाहेर पडल्यावर मला अजूनच कामाचा जोर आला. मी पुन्हा एकदा जनन-जाणीवेचं काम हाती घेतलं. आम्ही एक राष्ट्रीय पातळीवरचं शिबिर घेतलं पण – पण मी पुन्हा एकदा खोल गर्तेत गेले – खोल खोल. बास! मी सगळं गुंडाळून कॅलिफोर्नियाला गेले.

माझ्या मोठ्या बहिणीकडे. बर्कलेला ! मी ठरवलं की या वेळी डिप्रेशनमधून औषधांशिवाय बाहेर पडायचं. खूप खूऽऽऽप वेळ लागला. त्या सगळ्या अस्वस्थ दिवसांतच मी पुन्हा माझं अस्तित्व जोडायला सुरुवात केली – निदान नाव तरी आठवलं – मेरी डकिन. मी सर्व प्रकारच्या गोष्टी करून पाहिल्या – आठवणं, विसरणं, आजारातून बरं होणं, वेळ घालवणं. ‘बर्कले’ मधे अनेक संधी होत्या – कलेचे क्लास, ‘हिलींग मंडळे’, बुद्धिस्ट पद्धतीचं ध्यान, वेगवेगळ्या उपचार पद्धतींचे क्लासेस, स्व-मदत केंद्रे – मी ‘बर्कले बायपोलर’ नावाच्या एका गटात सामील झाले. सगळे हेरिक हॉस्पिटलच्या तळघरात भेटायचो. इथेच, इतरांच्या आरशातून मला माझीच वेगवेगळी रूपे समोर आली. पण जेव्हा डिप्रेशन सात महिने लांबलं तेव्हा एका डॉक्टरला भेटले – psycho-pharmacologist म्हणून काम करणारे हे डॉक्टर होते. आणि बरोबर साडेनऊ दिवसांनी माझं डिप्रेशन उठलं –

अशा तर्हेनं मी माझ्या अगणिताव्या डिप्रेशनमधून बाहेर पडले – पुन्हा एकदा आयुष्याकडे बघायला लागले. आपण कोण आहोत याचा विचार करू लागले. किती अनुभवांचा साठा होता माझ्याकडे-सगळा अचानक तुटला, अनिल आणि माझ्यातही अनेक गोष्टी घडून गेल्या होत्या. आम्ही एकत्र आहोत असं वाटेना. मी अमेरिकेतच राहू का? नको, भारतच माझं घर आहे. पण जाणार कुठे?

मी पुण्याला परत जायचं ठरवलं – इथे माझे काही जुने, चांगले मित्र-मैत्रिणी आहेत. सर्वात पहिल्यांदा मी काय केलं असेन तर एका मोठ्या हॉस्पिटलच्या ‘मानसोपचार’ डिपार्टमेंटमधे माझं ‘भविष्यातला संभाव्य रोगी’ म्हणून नाव नोंदवून आले. इथल्या प्रमुखांनी मला ‘विपश्यना’ करायला भाग पाडलं. आणि त्याचा मला खरंच खूप फायदा झाला. या वेळी अगदी हळूहळू काम पाहत होते. ‘सिहाय समूह’ नावाने मी आणि आणखी दोघांनी मिळून ‘मानसिक आरोग्यासाठी स्वमदतीचा गट सुरू केला. तो जवळजवळ सात वर्षं चालवून नंतर एका मोठ्या गटामधे सामील केला.

मी पुन्हा एकदा जनन-जाणीवेचं काम हातात घेतलं. Innovators for the public ची १९९२ मधे फेलोशिप मिळाल्यावर मी स्त्रियांचे आरोग्य आणि सक्षमता (empowerment) यावर शहरी आणि ग्रामीण स्त्रियांमधे काम चालू केलं.

१९९३ मधे WAH (Women and Health) या नावाने एक राष्ट्रीय पातळीवरचा उपक्रम सुरू झाला. वाह म्हणजेच आनंदाचा, कौतुक करणारा उच्चार – यात आम्ही आरोग्य संवादकांसाठी
(co-ordinator) एक वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम ठरवला. आणि भारतात तीन ठिकाणी चालवला.

महाराष्ट्र राज्यात इतर दोन संस्थांबरोबर एकत्रित रित्या घेतलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमातून २५ प्रशिक्षणार्थी बाहेर पडले.
या दरम्यान घडलेली अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे – एका साडेतेरा वर्षाच्या चुणचुणीत मुलीनं – सुनीतानं दिनानाथला व मला ‘पालक’ म्हणून दत्तक घेतलं ! सुनीता लातूरच्या भीषण भूकंपातून वाचलेली – ती तशीच भूकंपासारखीच आमच्या आयुष्यात आली आणि त्यानं आमच्यावर भलताच परिणाम झाला. एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेली, ही कधी शाळेत न गेलेली बंडखोर मुलगी अगदी ‘छोटी’ फुलनदेवीच. सुनीताबरोबर वाढलेलं, फुललेलं आमचं जीवन ही एक वेगळी, स्वतंत्र कथाच होईल.

महाराष्ट्रातल्या वाहच्या ‘डॉक्युमेंटेशन युनिट’ मधून आम्ही ‘तथापि’ ह्या संस्थेची स्थापना केली आणि ‘वाह’च्या अंतर्गत अपेक्षित असणार्या पद्धतीनुसार आम्ही तथापितर्फे काम चालवले. ‘सार्वजनिक आरोग्यहितावर’ काम करताना ‘स्त्रियांवरील हिंसाचार’ हा मुद्दा आम्ही विशेष पुढाकाराने हाताळला. जगभर दिसते त्याप्रमाणेच भारतातही ‘स्त्रियांवरील अत्याचार’ ही एक तर ‘अत्यंत खासगी बाब’ म्हणून तरी पाहिली जाते किंवा कायद्याच्या चौकटीतली तरी. सरकारी आणि खासगी संस्थांबरोबरच्या आमच्या कामाच्या अनुभवावर आधारित आम्ही डॉक्टर्स-नर्सेस यांच्यासाठी कार्यरिती तयार केली आहे. स्त्रियांना मदत करणार्या संस्थांच्या मदतीने या आरोग्यसेवकांनी लिंगभावावर आधारित हिंसेच्या मुद्द्यावर काम करायचे आहे.

आश्चर्य वाटेल पण लिंगभावावर आधारित अत्याचाराचं भारतातलं प्रमाण सुशिक्षित, पैसेवाल्या शहरी लोकांमधे जास्त आहे ! इतकंच नाही तर गर्भ लिंगचाचणी करून स्त्रीगर्भाची हत्या करणार्यांमधेही गेल्या १० वर्षात वाढ झाली आहे.
पुण्यातल्या गर्भलिंगनिदान करणार्या डॉक्टरांच्या विरोधात आणि कायद्याचे नियमन व्हावे म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले.

एकूणच ‘शरीरविषयक शिक्षण’ या मुद्यावर आम्ही विशेष काम करतो – जनन-जाणीव हा त्यातला एक छोटा भाग. नुकतेच आम्ही काही पुरुष व मुलगे यांच्याबरोबर ‘पुरुषत्वाची जाण’ या विषयावर काम केले. ‘लिंगभाव व लैंगिकता’ ह्या विषयी अधिक सखोल जाणून घेण्यासाठी आम्ही काही कॉलेजमधील मुलग्यांशी बोललो. तसंच १० ते १३ वयोगटातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘शरीर जाण’ असा एक अभ्यासक्रमही तयार केला आहे- आपणच आपल्या शरीराचे मित्र बनूया; त्याच्या अपेक्षा, क्षमता समजावून घेऊया असा त्याचा उद्देश आहे. अर्थातच आपलं मनसुद्धा या शरीराचा भागच आहे. आपलं ‘शरीर-मन’ नेहमीच वेगवेगळ्या भावनांमधून, जाणिवांमधून एकमेकांशीही ‘बोलत’ असतं. हे शरीर-शिक्षण म्हणजेच ही देहबोली समजून घेणं. यात इतरांना समजून घेणं, त्यांचा आदर करणंही आलंच. हा अभ्यासक्रम व्यापक आणि बळकट करण्यासाठी आम्ही शाळांमधली पूरक पुस्तकं बघत आहोत.

आता मी माझ्या भन्नाट प्रोजेक्टबद्दल सांगते. त्याचं नाव ‘जीव’ – जीव म्हणजे जीवन, म्हणजे जगण्याची शक्ती ! भारतातील आणि दक्षिण आशियातील सुईणीसारख्या जुन्या पारंपरिक पद्धतीच्या मदतनीसांकडे असणार्या अमाप ज्ञानाकडे लक्ष वेधून घेणारा हा उपक्रम. जर बाळ जन्मत: श्वास घेऊ शकलं नाही किंवा हालचाल करत नसलं तर त्या काय करतात माहितेय – नाळेची पिशवी चक्क गरम करतात, गरम पाण्यात बुडवून किंवा तव्यावर शेकवून.
प्रसूतीकाळामधे नाळ जवळजवळ एखाद्या संपूर्ण वाढ झालेल्या अवयवाचं काम करत असते. बाळाला अन्न भरवणं, ते नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्याचं संपूर्ण काम ही नाळच करते. याच दरम्यान अनेक संप्रेरकं (harmones) तयार करून बाळाच्या जन्मापर्यंत ही जीवनदायिनी बाळाला साथ देते. पण आपल्या आधुनिक शास्त्रानं तिला जवळजवळ ‘कचर्यात’ टाकलं होतं.

पण पारंपरिक पद्धतींमधे तिचं महत्त्व खूप आहे. बाळाचं जणू दुसरं भावंडं मानण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे. भारतातल्याही बर्याच भागात तिला ‘जीवनशक्ती’ किंवा ‘जीव’ मानले जाते. मी अनेक सुईणींशी बोलले. कुणी तिला ‘प्राण’ म्हणतं तर कुणी ‘जान’. कुणी ‘आत्मा’ म्हणतं तर कुणाला ती प्राणशक्ती, ऊब वाटते. एकूण काय श्वासाशी, जीवन उर्जा देणार्या, पूर्णता देणार्या शक्तीशी तिचं नातं जोडलं आहे.
माझ्या संस्थेबद्दल, ‘जीव’च्या कल्पनेबद्दल आणि सुनीताबद्दल बोलणं इथे आवश्यक आहे, पण ते पुढच्या वेळी.