संवादकीय – मार्च २००८
मुंबई आमची ! मुंबई मराठ्यांची !
घोषणा ऐकल्या, पेपरमधे वाचल्या.
म्हटलं बरंय बाबांनो, मुंबई तुमची तर तुमची.
पण ‘आमची’चा अर्थ काय? कसा लावायचा तो? आमची मुंबई चांगली राहावी म्हणून तुम्ही प्रयत्न करणार की ‘माझ्या घरात मी वाट्टेल तसं वागेन’ म्हणणार?
हे सगळे बाळबोध प्रश्न नि त्यांची बाळबोध उत्तरं ठेवावीत मनातच, अशी वागणूक मुंबईत आणि इतरत्रही सुरू झाली. बिहारी दिसला की ठोकून काढायला लागली जनता. मोठ्या माणसांबरोबर लहान मुलं देखील ! आपल्यासमोर दुसर्यानं गयावया करावं, मारू नका म्हणावं, गुपचूप खिशातलं काढून सगळं देऊन टाकावं यात एवढं सौख्य सामावलेलं असतं? कोणत्याही निमित्तानं आलेला सत्तेचा अंश एवढा सुखावणारा? एरवी निदान लहान मुलांच्या तरी मनात येणारा प्रश्न – ‘या जागी आपण असलो तर कसं वाटेल रे?’ तोही कोणाला सुचू नये?
इथे हे बोलताना एकीकडे विचार करतेय, प्रत्यक्ष आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही की काय? की आपल्याही मनातल्या अंधार्या कोपर्यात असलं काही काही भरलेलं आहे?
मागच्याच महिन्यातली गोष्ट. महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूरहून नागपूरला चाललेली. रिझर्व्हड् डबा. आम्ही सतराजण कोल्हापूरपासून निघालो होतो. पुणे स्टेशनला रात्री दहा वाजता गाडी थांबली तेव्हा शांतपणे काही वाचत वगैरे झोपायच्या तयारीत प्रवासी आपापल्या जागी लवंडले होते. पुण्याला गाडी थांबताच डब्यावर हल्ला झाल्यासारखे एकदम शेकडो लोक डब्यात चढले. डब्यातल्या आधीच रिझर्वेशन केलेल्यांना एकदम राग आला. सगळे त्यांना ओरडायला लागले – इथे नाही चढायचं, उतरा खाली, तिकडच्या डब्यात जा – टी.सी.ला बोलवा – पोलीसला बोलवा.
चढणारे लोक – कान नसलेलेच. सगळ्या दरवाज्यांमधून भराभरा आत. शिवाय आणि इमर्जन्सी विंडोमधूनही काही बायका पोरांना चढवतायत, सामान आत टाकतायत्. तोंडानं एक शब्द नाही.
मलाही वाटलं. बापरे असे कसे इतके लोक आमच्या डब्यात शिरले? एवढ्या गर्दीत कसा पंधरा सोळा तास प्रवास करणार आम्ही? जेवणखाण सोडा, पण पाणी तरी लागेल, संडास पर्यंत तरी जाता आलं पाहिजे. डब्यातले लोक विरोध करतायत्, तेच बरोबर. स्टेशन यायच्या आधीच आपण दरवाजे लावून घ्यायला हवे होते वगैरे वगैरे.
आतापर्यंत आमच्या सीटपर्यंत लोक येऊन पोचले होते. २७-२८ वर्षाचा मुलगा, त्याची २०-२२ची बायको, १८चा भाऊ, तीनेक वर्षाची मुलगी, बरोबर मोठमोठी गाठोडी, खोकी. सगळे गप्प. भेदरलेले. कुणाच्याही चेहर्यावर रिझर्वड् डब्यात घुसण्यासाठी असावी ती मस्ती-मुजोरी नव्हती.
हळूहळू मग गर्दी स्थिर झाली. दोन तीनदा साखळी खेचणे, खेचणार्यालाच खाली उतरवणे वगैरेनंतर गाडी सुरू झाली. आधी वाटलं होतं तसं ही मंडळी कुठे यात्रेला, प्रवासाला जाणारी नव्हती. मग एकदम् ट्यूब पेटली – ही मंडळी पुण्यामुंबईतून जीव घेऊन पळतायत् – बिहारकडे. रात्रभर कुणी कुणाशी बोललं नाही. विरोध करणार्यांचे ताबूत थोड्याच वेळात थंडे झाले कारण कुणी पोलीस/टी.सी. इकडे फिरकणार नाही हे स्पष्टच झालं होतं.
मग हळूच त्या कुटुंब प्रमुखानं बोलायला सुरुवात केली. त्याच्या हातात तिकीट होतं. भुसावळला उतरणार… म्हणाला – गेले तीन दिवस आम्ही पुणे स्टेशनला बसून आहोत. इतकी गर्दी आहे गाड्यांना की आम्ही चढूच शकलो नाहीये. पिंपरीमधली खोली, कामं सगळं सोडून परत घराकडे चाललोय. इकडे पैसे मिळत होते खरंय पण जीव राहिला तर तो पैसा हवा. नाहीतर तो मिळवून काय करणार? आता बघू…. काम कसं, काय मिळणार…. खेड्यात तर काही नाही.
अगदी लाज वाटली. मला सोळा सतरा तास कसे काढायचे याची चिंता पडली होती आणि इथे ही शेकडो हजारो माणसं… त्यांना पूर्ण आयुष्य कसं काढायचं हा प्रश्न आहे.
कशामुळे उभा राहिला हा प्रश्न? आपल्यापेक्षा जास्त कष्ट करायची या गरिबांची तयारी आहे म्हणून त्यांनाच कुणी पळवून लावायचं? आपण झुंडीनं गेलो की त्यांना मारू लुटू शकतो म्हणून लुटायचं – मारायचं? आपलं डबकं वेगळं म्हणून त्यांच्यावर हल्ले करायचे?
मला शिंडलर्स लिस्ट चित्रपट आठवला. तो बघताना वाटायचं – इतके कसे हे जर्मन्स क्रूर? असे कसे हे माणसांना इतकं वाईट वागवू शकतात? न्याय-अन्यायाची चाड इतकी उरत नाही माणसांना? सत्ता माणसाला इतके वाईट बनवून टाकते?
आता हे सगळे प्रश्न विचारताना उरलेली चार बोटं आमच्याकडे आहेत असं सरळ दिसतंय. आपण वेळीच जागं व्हायला हवंय.
केवळ आपण हात उगारू शकतो म्हणून दुसर्या कुणावर हात उगारताना, आपण विचार करायला हवाय. मग तो आपल्याच लहानग्यावर, बायकोवर किंवा दुसर्या कुणावर असेल.
जगाला समता, करुणा शिकवणारे बाबा आमटे आता नाहीत. पण त्यांची कविता आहे. आपलं डबकं सोडून पाणी वाहतं करणारी.