मुलांना वाचायला कसे शिकवावे

डॉ. व. सी. देशपांडे हे भारतीय शिक्षण संस्थेमधील शिक्षण अभ्यास केंद्राचे माजी संचालक आहेत. शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक्रम विकसन तज्ज्ञ या सगळ्या भूमिका त्यांनी जाणतेपणाने केल्या. आज अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रम समित्यांचे ते सदस्य आहेत. राज्यात सध्या प्रचलित असलेल्या डी.एड.च्या अभ्यासक्रम विकसनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

अनेक वाचकांना हा प्रश्न हास्यास्पद वाटेल. ते म्हणतील, ‘‘आम्ही नाही का शिकलो? ना आम्हाला कधी हा प्रश्न पडला ना आमच्या घरातल्या इतरांना.’’ अगदी खरं आहे. नाहीतरी न्यूटनपूर्वी अनेकजणांना ‘झाडावरचे फळ खाली का पडते?’ असा प्रश्न कधी पडलाच नव्हता! ज्यांना तो पडला होता, त्यांनी त्याचा न्यूटनसारखा पाठपुरावा केला नव्हता. म्हणून फक्त न्यूटनलाच गुरुत्वाकर्षणाचे नियम शोधून काढता आले.

‘वाचनाची सुरुवात कशी करावी?’, ‘निरर्थक अक्षरे मुलांनी कशी लक्षात ठेवावीत?’, ‘कमी वेळात मुलांना अधिक वेगाने का व कसे वाचायला शिकवावे?’, ‘वाचनाची प्रक्रिया नेमकी आहे तरी काय?’, ‘शाळा महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर बहुसंख्य मुले, तरुण, प्रौढ, वाचन करायचा कंटाळा का करतात?’ हे आणि यासारखे प्रश्नदेखील फक्त काहीजणांनाच पडले होते, आणि त्यांनीदेखील शास्त्रज्ञांच्या ‘भावनिक अस्वस्थते’ने, अदम्य चिकाटीने आणि चिकित्सक बुद्धीने वर्षानुवर्षे शोध घेऊन त्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढली आहेत. मराठी भाषेच्या संदर्भात आचार्य अत्रे, गुंजीकर, अत्तरदे इत्यादींची नावे घेता येतील.

१९व्या शतकापासून अमेरिकेत आणि २०व्या शतकाच्या पूर्वार्धापासून आपल्या देशात वाचनाच्या क्षेत्रात झालेल्या या संशोधनांचा परिचय आपण आजच्या युगात करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आजचे युग हे ‘ज्ञानयुग’ आहे. जो ज्ञानी असेल तोच या युगात जगायला पात्र ठरेल. कारण रोजचा व्यवहार असो, शेती उत्पादन असो, राजकारण असो, संरक्षणाचे क्षेत्र असो अथवा आंतरराष्ट्रीय संबंध असोत, त्या त्या क्षेत्रांतील ज्ञान हे अतिशय वेगाने वाढते आहे. इ.स. १९८० ते २००० या काळात असे म्हणत असत की दर पाच वर्षांनी जगातील ज्ञान दुप्पट होतेय. हा वेग आजच्या काळात आणखी वाढला आहे. हे ज्ञान कमीतकमी वेळात आत्मसात करण्याची नवनवीन कौशल्ये प्राप्त केली नाहीत तर आज मनुष्य ‘मागासलेला’ ठरून व्यवस्थेबाहेर फेकला जातोय. मग तो शेतकरी असो, छोटा व्यावसायिक असो, कार्यालयीन कारकून असो, नाहीतर संरक्षणदलातील अधिकारी असो ! आपली अवस्था अशी होऊ नये यासाठी शहाणी माणसे स्वतःचे ज्ञान वाढविण्याचा सतत प्रयत्न करताना दिसतात.

आता ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या पद्धतीतही सुधारणा झाल्या आहेत. नवनवीन दृक्श्राव्यसाधने आल्येत, दूरस्थ शिक्षणाच्या सोयी झाल्यात. या साधनासुविधांच्या आधारे झालेले शिक्षण टिकवायचे असेल, वाढवायचे असेल तरीही वाचनाच्याद्वारे होणार्या स्वयंशिक्षणाला पर्याय नाही. मग अगदी संगणकांचा अथवा दृक्चित्रफितींचा वापर करणारे ‘प्रगत नागरिक’ असले तरी त्यांनाही ‘पडद्यावर’चे का होईना वाचन करावे लागणार आहेच. प्रचंड वेगाने आणि प्रचंड प्रमाणात समोर येऊन पडणारे साहित्य तितक्याच वेगाने ‘चाळून’, ‘निवडून’, वाचावे लागणार आहे, त्यावर सारासार विचार करून त्यातील ‘सत्त्व’ स्वीकारावे लागणार आहे आणि त्यासाठी ‘अधिक वेगाने अधिक चांगले वाचन’ करण्याच्या पद्धती शिकून घ्याव्या लागणार आहेत.

ही सगळी ‘प्रगत वाचन कौशल्ये’ तेव्हाच सहजसाध्य होतील, जेव्हा ‘सुरुवातीचे वाचन’ योग्य पद्धतीने झालेले असेल. जिव्होर्दानो ब्रुनो यांनी म्हटले आहे की सुरुवातीचे वाचन हे बुशकोटाच्या पहिल्या बटणासारखे आहे. ते लावायला चुकले तर सगळा बुशकोटच वेडावाकडा दिसू लागतो. वाचनाचे देखील तसेच आहे. सुरुवातीला चुकीच्या सवयी लागल्या तर पुढचे सगळे वाचन आणि ज्ञानार्जन वेडेवाकडे होते. जर आपल्या मुलांच्या बाबतीत तसे व्हायला नको असेल तर त्यासाठी आपल्याला मुलांच्या ‘सुरुवातीच्या वाचना’कडे अधिक सजगपणे लक्ष द्यायला हवे.

‘वाचना’चे विविध अर्थ

‘वाचन करण्या’ची जी प्रक्रिया आहे तिच्यासंबंधात सर्वसामान्यांमध्ये तसेच तज्ज्ञांमध्येही मतभेद असल्याचे दिसून येते. ते मतभेद पुढील व्याख्यांतून व्यक्त झालेले दिसतात…

वाचन करणे म्हणजे


 समोर आलेले मुळाक्षर ओळखणे आणि त्याचा उच्चार करणे.
 समोर आलेला शब्द, वाक्य ओळखणे, त्याचा अर्थ समजणे व आवश्यक तर उच्चार करणे.
 समोर आलेले वाक्य ओळखणे, त्याचा अर्थ समजणे व आवश्यक तर उच्चार करणे.
 समोर आलेले शब्द, अर्थ, शब्दांद्वारे लेखकाने अथवा कवीने व्यक्त केलेले विचार, कल्पना आणि भावना समजणे. त्यावर प्रकट वा मनातल्या मनात प्रतिक्रिया व्यक्त करणे आणि जे पटले असेल त्याचा आपल्या वर्तनात समावेश करणे.

वरील व्याख्यांकडे सजगपणे लक्ष दिले तर आपण यापैकी कोणती तरी व्याख्या कळत वा नकळत स्वीकारली होती हे आपल्या सहज लक्षात येईल. आपल्यापैकी बहुतेकांनी ती नकळतच स्वीकारलेली असते, कारण आपल्याला ज्या पद्धतीने सुरुवातीचे वाचन शिकविले गेले असते, ती पद्धती ज्या व्याख्येवर आधारलेली असते ती व्याख्या आपण स्वीकारलेली असते. तीच एकमेव आणि योग्य पद्धती आहे अशी आपली ठाम समजूत होते. त्या पद्धतीशी सुसंगत अशा वाचन सवयी आपल्याला लागलेल्या असतात. सुरुवातीला लागलेल्या वाचनसवयी प्रयत्नपूर्वक बदलल्या नाहीत तर त्या आयुष्यभर आपली संगत करतात आणि त्याचे परिणाम आपल्या वर्तनात पाहायला मिळतात. आपण वाचन यांत्रिकपद्धतीने करतो, अर्थ समजून करतो की लेखकाशी वाद संवाद करीत, उच्च मानसिक प्रक्रियांचा उपयोग करतो? आपण सावकाश वाचतो की ‘गतीने आणि समजून’ वाचतो, ते बहुधा सुरुवातीच्या वाचन शिकविण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. काही जणांना नंतरच्या आयुष्यात त्यात इष्ट ते बदल करण्याची संधी मिळते. त्या बदललेल्या सवयींचे फायदेही झालेले दिसतात. परंतु बहुतेकांच्या जीवनात मात्र ‘सुरुवातीचे वाचन शिकविणार्या पद्धती’चा परिणाम कायम राहिलेला दिसतो. अशा या पद्धती कोणत्या आहेत ते आता समजावून घेऊ या.

वाचन शिकविण्याच्या पद्धती


इ.स. १९५३ साली युनेस्कोतर्फे प्रसिद्ध वाचनतज्ज्ञ विल्यम ग्रे यांनी ‘सुरुवातीचे वाचन व लेखन शिकविण्याच्या पद्धतीं’चे जागतिक सर्वेक्षण केले. तेव्हा त्यांना असे आढळून आले, की सुरुवातीचे वाचन शिकविण्याच्या प्रमुख चार पद्धती असून त्यापैकी एक अथवा तिचे बदल केलेले रूप जगभराच्या विविध भाषांत उपयोगात आणले जाते. त्यांचा खालीलप्रमाणे थोडक्यात परिचय करून देता येईल…

१) मुळाक्षर पद्धती
या पद्धतीनुसार मराठी भाषिक मुलांना सुरुवातीला ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंत एकेक अक्षर वाचायला… खरे म्हणजे लिहायलासुद्धा… शिकविले जाते. मुलांना मुळाक्षरे वाचता येऊ लागली की बाराखडीची चिन्हे लावून ती अक्षरे वाचायला… लिहायलादेखील… शिकविले जाते. नंतर या अक्षरांपासून बनलेले शब्द वाचायला शिकविले जातात आणि शेवटी शब्दांपासून वाक्ये आणि वाक्यांच्या साहाय्याने धडे वाचायला शिकविले जातात.
वाचन-लेखन एकदमच शिकविले जात असल्याने आणि लेखनाचे महत्त्व अधिक वाटल्याने ‘अ ते ज्ञ’ ही उच्चाराच्या दृष्टिकोनातून चालत आलेली पारंपरिक व्यवस्था सोडून लेखनाच्या दृष्टीने साम्य असलेली ‘ग म भ न’ यासारखी मुळाक्षरे सुरुवातीच्या वाचन लेखनासाठी निवडली जातात. पुढची वाटचाल वरील पद्धतीनेच चालू राहते.

मुळाक्षर पद्धतीचे फायदे
मुळाक्षर पद्धतीमुळे मुले वाचन करताना कोणताही अपरिचित मजकूर वाचू शकतात. कारण त्यांना प्रत्येक अक्षराचा आकार आणि ध्वनी परिचित असतो शिवाय बाराखडीचा परिचय झालेला असल्याने ३६ X १२ = ४३२ इतकी अक्षरे त्यांना ओळखता येत असतात. त्यामुळे सुविधा आणि आत्मविश्वासाच्या बळावर ते ‘स्व-तंत्र वाचक’ बनतात.

मुळाक्षर पद्धतीचे तोटे
वर नोंदविलेले फायदे त्याचवेळेला मिळू शकतात, ज्यावेळी मुलाला मुळाक्षरे ओळखता येतात. मुळात अडचण येते ती अक्षरांची ओळख होतानाच ! ज्या अक्षरांना अर्थ नाही, जी अक्षरे काही वेळा एक सारखी असतात तर बहुधा एकमेकांपेक्षा खूपच वेगळी असतात अशी ४० अक्षरे लक्षात ठेवता ठेवता सगळा गोंधळ उडून जातो. ‘‘एवढी साधी गोष्ट लक्षात राहत नाही मग पुढे काय शिकणार !’’ अशी शिक्षकांकडून कडक टीका होते तर वर्गातील मुलांकडून उपहास होतो, आणि नको ते शिक्षण असे वाटू लागते.

यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक अक्षराला एकेका वस्तूचे साहचर्य दिले जाते. जसे, ‘अ’ अननसाचा’ ‘आ’ ‘आगगाडीचा’ ते ‘क्ष’ ‘क्षत्रियातला’ आणि ‘य’ ‘यज्ञातला’ इ. अनेक वेळा साहचर्यासाठी वापरलेल्या व्यक्ती, वस्तू, प्राणी मुलांना परिचित नसतात. त्याचबरोबर एकाच उदाहरणाच्या अति साहचर्याचा विपरीत परिणामही पाहावयास मिळतो. खेडेगावातील शाळांतून फिरत असताना काही मुले ‘गवत’ शब्द वाचताना ‘‘ग गडूतला, व वजनातला, त तलवारीचा ग…व…त…’’ असे वाचताना आढळली. अशी खडखडत जाणारी गाडी मुक्कामाला पोहोचते तेव्हा वाचलेल्या वाक्याचा अर्थ निसटून गेलेला असतो.

ज्यांनी या अडथळ्यांवर मात केलेली असते त्यांनी केवळ मूळ अक्षर वाचण्यात यश मिळविलेले असते. त्यांच्यातही एक मोठा दोष आलेला असतो, तो म्हणजे त्यांना वेगाने वाचता येत नाही. सावकाश वाचन करणार्यांना वाचनाचा लवकर कंटाळा येतो. शिवाय विचाराची गती ही वाचनाच्या गतीवर अवलंबून असल्याने त्यांना विचारही सावकाश करायची सवय जडते. या दोनही सवयी नव्या वेगाने ज्ञानयुगाशी जुळवून घेण्यात अडचणी निर्माण करणार आहेत.
वाचनसाहित्य तयार करणार्यांवरही या पद्धतीमुळे बंधने येतात. पहिलीची पूर्वीची अथवा प्रचलितही पाठ्यपुस्तके पाहताना सुरुवातीच्या पाठांत केवळ मुळाक्षरयुक्त वा ‘आकारान्त’ ‘इकारान्त’ ‘उकारान्त’ इ. शब्दांचे पाठ तयार करावे लागल्याने आलेली कृत्रिमता आणि तिच्यामुळे निर्माण झालेली नीरसता मुलांच्यात वाचनाची नावड उत्पन्न करायला कशी कारणीभूत होत असेल ते आपल्या सहज लक्षात येते.

२) शब्दपद्धती
मुळाक्षरपद्धतीचे तोटे लक्षात आल्यावर काही तज्ज्ञांनी वाचनाला शब्दापासूनच सुरुवात करावी असे सुचविले. इ.स. १८८५ मध्ये कॅटेल यांनी प्रयोग करून असे दाखवून दिले की दिलेल्या मर्यादित वेळेत परस्परांशी संबंध नसलेली चार-पाच अक्षरे ओळखली गेली, पण तेवढ्याच वेळेत दोन शब्द ओळखले गेले आणि दोहोत मिळून १२ अक्षरे होती. येथे ‘समष्टीवादी’ मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेला ‘‘जे जे अर्थपूर्ण त्याचा अवबोध लवकर होतो.’’ हा सिद्धांतही काम करताना दिसत होता. त्याचाच आधार घेऊन शब्द पद्धतीत वाचनासाठीचे सुरुवातीचे एकक म्हणून शब्दाची निवड केली जाते आणि मुलांना एकदम शब्दच वाचायला शिकविले जातात.
अक्षर ओळख झालेली नसतानाही मुले शब्द वाचू शकतात, हे मुळाक्षरे पद्धतीने शिकलेल्यांना पटतच नाही. पण त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की अक्षरे काय अथवा शब्द काय या केवळ खुणा आहेत. त्या कशाचे तरी सूचन करीत असतात. लाल दिवा ही जशी धोका असल्याची खूण आहे, हिरवा दिवा ही जशी धोका नसल्याची खूण आहे, तशीच आंब्याचे चित्र ही ‘आंबा’ या फळाची खूण आहे. ‘आंबा’ हा लिखित शब्द हीसुद्धा एक त्याच फळाची खूण आहे. हा शब्द चित्रासह दाखवून शिक्षक जेव्हा त्याचा उच्चार करतात अथवा मुलांकडून वारंवार उच्चार करवून घेतात तेव्हा आंब्याचे फळ आणि ‘आंबा’ हा शब्द यांचे साहचर्य मुलांच्या मनात निर्माण होते आणि पुढे केव्हाही तो नुसता शब्द पाहिला तरी मुले तो अर्थासह ओळखू शकतात.

अशाप्रकारे व्यक्ती, प्राणी अथवा वस्तू यांची चित्रे आणि नावे पाहून मुले ते शब्द ओळखू शकतात. चित्रांप्रमाणे कृतींचे साहचर्य देऊन ते शब्दही मुलांना लक्षात ठेवायला शिकविता येतात. अशा ५०-६० नावांची अथवा कृतींची ‘दृक् शब्द संपत्ती’ तयार झाल्यावर त्यापासून काही वाक्ये बनवून ती मुलांकडून वाचून घेतली जातात. या प्रक्रियेत आणखी ३०-४० ‘दृक् शब्दां’ची भर पडते. नंतर त्यांचे पृथक्करण करवून अक्षरे शिकविली जातात.

शब्दपद्धतीचे फायदे
शब्द हे भाषेतले सर्वात छोटे अर्थपूर्ण एकक असल्याने मुलांना ते लक्षात ठेवणे सोपे जाते. त्यातही शब्द निवडताना ते मुलांच्याच शब्दसंग्रहातले निवडले जातात. त्यामुळे त्यांचा उच्चार आणि अर्थ मुलांना सुपरिचित असतो. त्यांच्यावर जबाबदारी असते ती फक्त त्या शब्दाचा आकार लक्षात ठेवण्याची. म्हणजे वाचन प्रक्रियेतील फक्त एक तृतीयांश कामच त्यांना करायचे असते. हे काम ते आवडीने करतात कारण ते सोपे असल्याने लवकर जमते. ‘‘अहो मला वाचता येतेय !’’ हा अनुभव आत्मविश्वास निर्माण करतो. शिवाय मोठ्यांची शाबासकी मिळते ती वेगळीच. या सार्यामुळे अधिक वाचावे, शिकत राहावे असे मुलांना वाटते.

शब्दपद्धतीचे तोटे
एकसारखे केवळ शब्दच ओळखायला लागले तर त्याही कृतीचा मुलांना कंटाळा येतो. बरे परिचित शब्दांचाच उपयोग करायचा म्हटला तर पुढे पृथक्करणाच्या वेळी असे लक्षात येते की अनेक अक्षरे त्या शब्दांत समाविष्ट झालेली नाहीत. त्यामुळे ती अक्षरे कशी शिकवायची हा प्रश्न शिल्लक राहतोच. शिवाय या पद्धतीत शब्दांचे पृथक्करण करून अक्षरे शिकवायची असल्यामुळे प्रत्यक्षात त्या पद्धतीचा विसर पडल्यासारखे वर्तन भल्याभल्यांकडून झालेले दिसते. पाठ्यपुस्तकातील पहिल्या पाठातील शब्दांपासूनच पृथक्करणाच्या कृतीला सुरुवात होते. लगेच त्या अक्षरांपासून नवे शब्द बनविण्याचे स्वाध्याय दिले जातात. म्हणजे शब्दपद्धती राहते बाजूला आणि नकळत अक्षरपद्धतीने खुशाल अध्यापन सुरू होते. त्यामुळे वर नोंदविलेले अक्षरपद्धतीचे सर्व तोटे मुलांच्या वाट्याला येतात.

३) वाक्यपद्धती
भाषेच्या दृष्टिकोनातून वाचनाचा विचार करणारे शब्दपद्धतीवर असा आक्षेप घेतात की शब्दाला स्वतंत्र अर्थ नसतो. त्याला अर्थ प्राप्त होतो तो वाक्याच्या संदर्भात. ‘‘तो शहाणा आहे.’’ या वाक्यातील ‘शहाणा’ शब्दाचा अर्थ ते वाक्य कोण म्हणतेय, कुणाबद्दल म्हणतेय, कशाच्या संदर्भात म्हणतेय यावर ठरत असतो. त्यामुळे वाचायला शिकविताना शब्दाऐवजी वाक्यच वाचनाचे सुरुवातीचे एकक म्हणून निवडणे त्यांना योग्य वाटते. ज्याप्रमाणे अक्षरपद्धतीत ठरावीक अक्षर अथवा शब्दपद्धतीत ठरावीक शब्द पुनःपुन्हा दाखवून, म्हणवून घेतला जातो त्याचप्रमाणे ठरावीक वाक्य पुनःपुन्हा दाखवून, म्हणवून घेतले जाते. वारंवार केलेल्या आवृत्तीमुळे ते मुलांच्या लक्षात राहते आणि पुनः ते वाक्य पाहताच मुले ते सहज ओळखू अथवा ‘वाचू’ शकतात.

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात वर्गात झालेल्या संभाषणाच्या वेळी ही वाक्ये निवडली जातात व फळ्यावर लिहिली जातात आणि मुलांकडून वारंवार आवृत्त करून घेतली जातात. अशा १०-१५ ‘दृक् वाक्यां’च्या संग्रहानंतर वाक्यांचे शब्दांत आणि शब्दांचे अक्षरांत पृथक्करण करवून घेतले जाते.

वाक्यपद्धतीचे फायदे
आपण जे बोलतो ते लिहिले जाते, ते आपल्याला वाचता येते याचा मुलांना खूप आनंद होतो. त्यामुळे मुले सुरुवातीला मोठ्या आनंदाने त्यात सहभागी होतात.

वाक्यपद्धतीचे तोटे
आपण वाचू शकतो याचा आनंद फार दिवस टिकत नाही. कारण अनेक सुटी सुटी वाक्ये लक्षात ठेवणे अवघड जाते. आत्मविश्वास डळमळू लागतो. संभाषणाच्या संदर्भातील वाक्ये असल्याने त्यातील शब्दांमध्ये सर्वच अक्षरे येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे शिक्षक मध्येच परंपरागत पद्धतीकडे वळण्याची शक्यता निर्माण होते.

४) कथापद्धती
ज्याप्रमाणे काही जणांना सुट्या शब्दांपेक्षा वाक्यात आलेले शब्द शिकविणे अधिक योग्य वाटते. त्याचप्रमाणे अन्य काहीजणांना परस्परांशी संबंध नसलेली वाक्ये सुरुवातीचे ‘वाचन एकक’ म्हणून घेणे अयोग्य वाटते. म्हणूनच ते कथा हाच पहिला वाचन एकक म्हणून पसंत करतात. कारण कथेत येणारी वाक्ये परस्परांशी संबंधित असतात. त्यामुळे ती परस्परांच्या साहचर्याने सहज लक्षात राहतात. अर्थात मोठमोठ्या कथा इथे अभिप्रेत नाहीत. पाच सहा वाक्यातही एखादी कथा, प्रसंग अथवा घटना सांगता येते. अशी कथा सांगून झाली की ती फलकावर अथवा तक्त्यावर लिहिली जाते, मोठ्याने वाचून दाखविली जाते, आपल्या मागून म्हणवून घेतली जाते आणि शेवटी वैयक्तिकरित्या ‘वाचून’ घेतली जाते. हे वाचन चालू असताना त्या त्या वाक्यावर पट्टी अथवा दर्शक ठेवला जातो. त्यामुळे त्या त्या वाक्याचे वाचन होते. अशी वाक्ये वाचता येऊ लागली की त्या वाक्यांचे पृथक्करण करवून सुटे शब्द वाचायला शिकविले जातात. शेवटी शब्दांचे पृथक्करण करून अक्षरे वाचायला शिकविली जातात.

कथापद्धतीचे फायदे
कथा ऐकणे आणि सांगणे सगळ्यांनाच आवडते. विशेषतः मुलांना तर ते फारच आवडते ! त्यामुळे या पद्धतीत मुलांचे लक्ष वेधून घेण्याची शक्ती सर्वात जास्त आहे. शिवाय लेखकाचे विचार, त्याने व्यक्त केलेल्या भावना वाचकांपर्यंत पोहचतात. अगदी छोट्या मुलांच्या बाबतीतही हे शक्य होते.

कथापद्धतीचे तोटे
जे आवडते ते पाठ होते. यादृष्टीने पाहता ऐकलेली कथा पाठ करण्याची इच्छा मुलांमध्ये निर्माण होते. सुशिक्षित घरात वारंवार वाचून दाखविलेली कविता अथवा कथा तीन चार वर्षाची मुले ‘वाचून’ दाखविताना आपण नक्कीच पाहिली असतील. मग पुस्तक उलटे धरलेले असेना का ! खेडेगावातील शाळांत पाठ्यपुस्तकातील धडे अशाच तर्हेने वाचणारी मुलेही काहीजणांनी पाहिली असतील. कथापद्धतीने शिकविले जाणार्या वर्गात वाचता न येणारी मुले असेच पाठांतर करताना ‘वाचल्याचा’ आनंद घेताना आढळतात. पण पुढे वाक्ये आणि शब्द यांचे पृथक्करण करायच्या वेळी मात्र त्यांची फारच चाईत होते. त्यावेळचा अपेक्षाभंग फारच निरुत्साह निर्माण करणारा आणि परिणामी हानिकारक ठरतो.

समारोप


जगातील सर्व भाषांत सुरुवातीचे वाचन शिकविताना वापरल्या जाणार्या प्रमुख पद्धतींचा परिचय करून घेताना काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील. एक म्हणजे वाचनाचे सुरुवातीचे एकक कोणतेही असो ते वारंवार दाखवून, म्हणवून घेतले जाते. त्यामुळे अगदी सुरुवातीचे वाचन म्हणजे ते एकक ‘ओळखणे’ या स्वरूपाचेच असते. दुसरे म्हणजे अक्षर पद्धतीत अक्षरांकडून वाक्यांकडे वाटचाल होते तर पुढच्या सर्व पद्धतीत ‘पूर्णाकडून भागांकडे’… कथा … वाक्य … शब्द … अक्षर अशी वाटचाल होते. तिसरे म्हणजे अक्षरपद्धतीत यांत्रिकता आहे, तर पुढील सर्व पद्धतीत अर्थाकडे अधिकाधिक लक्ष दिलेले आहे. चौथे आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे कोणतीही एक पद्धत परिपूर्ण नाही. प्रत्येकीत जसे गुण आहेत तसेच दोषही आहेत. म्हणूनच आर्थर गेटस् या शिक्षणतज्ज्ञाने ‘समावेशक वाचन पद्धती’चा पुरस्कार केला होता. मी स्वतः आपल्या भाषेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन १९६९ साली एक ‘समावेशक वाचनपद्धती’ विकसित केली होती. गेली ३९ वर्षे वेळोवेळी ग्रामीण, शहरी एवढेच नव्हे तर परदेशातील इंग्लिश शाळेत शिकणार्या मुलांना या पद्धतीने वाचन करायला शिकविले आहे आणि त्याचे चांगले परिणाम अनुभवले आहेत. पण त्याविषयी आपण पुढच्या लेखात बोलू.