लेटर फ्रॉम फादर टू हिज सन

माय डियर सन, सन्नी तू घरासमोर खेळत होतास, त्याचवेळी शेजारचा म्हातारा मोती, गाडीखाली आला नि गेला, ही बातमी तू फोन करून मला दिलीस.

तुझ्या भावना तू जड आवाजात मला कळविल्यास.

तुझं काही बिघडतं, तेव्हाच तू फोन करतोस, एरवी तू मला किंवा घरातल्या सर्वांना मूर्ख समजतोस. हा तुझा दोष नाही, मिशी फुटायला लागण्याच्या वयाचाच हा गुणविशेष आहे.

‘मोती म्हातारा होता, जाणारच होता, असं अचानक जाणं बरंच झालं’, माझे असे शब्द तुझं सांत्वन करायला पुरेसे नव्हते.

खरं म्हणजे त्या मोत्याच्या जाण्यापेक्षा तुला झालेल्या दुःखामुळेच मी विचारात पडलो.

हे बघ सन्नी, असं इतकं संवेदनशील असणं बरं नाही. आपल्या संवेदनेच्या वेदनेची टोकं अशी आपल्यालाच रुतायला नकोत.
अरे कशा – कशाचं वाईट वाटून घेशील?

तुला माहिताय? परवा परवा एक म्हातारी आजी आपल्या चौकातून बसमध्ये बसली. तिला जायचे होते जवळच्या खेड्यात तिच्या मुलीकडे. तिकीट द्यायच्या वेळी गावाचं नाव ऐकून कंडक्टर जाम वैतागला – चिडला, कारण बस होती ‘एक्सप्रेस’, तिथे थांबणार नव्हती. तिच्या थांब्याच्या पाच-सात मैल पुढे तिला या पठ्ठ्याने उतरवलं. रस्ता ओलांडत असताना ती मोटरसायकल खाली आली – तीन उचक्या – नि गेली सरळ वर. आता त्या म्हातारीकडे नॅनो असती तर अशी वेळ तिच्यावर आलीच नसती.

मोत्याचं माणसाच्या गाडीखाली येणं……
माणसाचं-माणसाच्या गाडीखाली येणं……
काही फरक वाटतो?
कशाचं वाईट वाटून घेशील?

मोती कुत्रा होता. कुत्र्याच्या मौतीनं मेला, ती म्हातारी तर माणूस होती – ती कशी गेली? माणसंही त्याच तर्हेनं मरायला लागलीत. आणि हे काय आजच घडलंय का? जे पुन्हा पुन्हा घडतं, त्याची लोडशेडींगसारखी सवय व्हावी, म्हणजे मग वाईट वाटत नाही.

असे अपघात पुन्हा पुन्हा घडतील, तेव्हाच तर आम्ही अधिक रस्ते तयार करू, म्हणजे……
कुत्र्यांकरिता वेगळे रस्ते
म्हातार्यांकरिता वेगळे रस्ते
फोर व्हीलर्स करिता वेगळे रस्ते
टू व्हीलर्स करिता वेगळे रस्ते
सायकल करिता वेगळे रस्ते
रस्त्यांवर रस्ते
रस्त्यांखालून रस्ते
खरा विकास हाच
हेच खरं शांघाय
तुला माहिताय….
आपण आधी बाहेर जायचो,
मग व्यवस्था घरीच झाली.
अन् आता
जेटसह कमोड घरी आला
विकास असा होत असतो
शहाण्यांनी धीर धरायचा असतो.

आपला तो मंगेश मिस्त्री – तू त्याला चांगला ओळखतोस – आठ दिवसांपासून आजारी होता, म्हणून कामावर जाऊ शकला नाही. काम नाही – पैसा नाही. होते तेवढे औषधावर खर्च झालेले – आराम नाही. पुन्हा दुसर्या चांगल्या डॉक्टरकडे गेला.
डॉक्टर फी दीडशे
पॅथालॉजी तीनशे
मुलीच्या खाऊचे संपले.

रात्री मुद्दाम तुझ्या आईने त्याला भेटून यायला पाठवलं म्हणून गेलो. तर गडी डॉक्टरची चिठ्ठी चक्क उशीखाली घेऊन झोपला होता.
औषध कुठाय?
आणलं नाही
का रे?
पैसा नाही
कशाचं वाईट वाटून घेशील?

मागे तपोवनातल्या घर आणि आप्तांपासून तुटलेल्या म्हातार्या आजोबांसोबत तू बोललास. त्यांचं ‘जमाना बदलला – लोक बदलले’ ऐकून तू काय मिळवलंस? तर तुझी रात्रीची झोप हरवली, तू बेचैन झालास – हे योग्य नाही. अशा ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे.
म्हणून म्हणतो,
कशा कशाचं वाईट वाटून घेशील?
‘महागाई आटोक्यात आणण्याकरिता वाटेल ती किंमत मोजू म्हणणार्या केंद्रीय कृषिमंत्र्यांचे हात आतापर्यंत कुणी बांधले होते?
ताटातल्या वरणात पाणी कुणी ओतलं?
‘तूरडाळ ऐंशी – आपली तूर वीस. तूर ते तूरडाळ हा प्रवास साठाचा कसा?’
‘खिदिरपूर बंदरात तीन वर्षापासून पडून असलेल्या पंधरा लाख टन आयातीत डाळींचं अन् अशा अनेक बंदरात सडू घातलेल्या डाळींचं काय झालं?’
‘सगळीच पिकं बुडाल्यावर सरकारी मेहेरबानी सोयाबीनलाच काय म्हणून?’
‘निवडणुकीच्या तोंडावर साखर कशी कडू होते?’
‘भामरागड – लाहेरी घटनेतल्या सतरा जवानांच्या घरचे दिवाळीचे दिवे नेमके विझवले कुणी?’ असे तुझे प्रश्न होते.
मिरजेतल्या दंगलीचं अन् तिच्या कारणांचंही तुला वाईट वाटलं. असे चित्र चौकाचौकात लावू म्हणणार्यांनी ‘कृष्णाजी भास्कर’ ह्याचं मुंडकं छाटतानाचंही चित्र का लावलं नाही, असंही तू माझ्यासोबत बोलला होतास.
पेपर-पुस्तकातून काही वाचलं की तुझ्या डोक्यात प्रश्न निर्माण होतात, म्हणूनच प्रमोद मुजुमदारांचं ‘गुजरात पॅटर्न’ घरी न आणता मी वडाच्या पारावरच वाचून संपविलं होतं.
तुला सांगतो असे प्रश्न विचारायचे नाहीत, नव्हे असे प्रश्न आपल्या डोक्यात निर्माण होऊ द्यायचेच नाहीत, म्हणजे मग उत्तरं शोधण्याचे कष्ट पडत नाहीत.
तुझ्यासारख्या मुलांनी कसं छान दिवसभर टी.व्ही.समोर बसावं अन् राहुलच्या खोट्या लग्नाची रियालिटी बघत दिवस घालवावा. असे कार्यक्रम म्हणजे निखळ आनंदाचे झरे असतात – यात अगदी कशा कशाचं वाईट वाटत नाही.
डियर सन्नी, तू मे महिन्यातल्या दुपारी बारा वाजता, घोड्यावर बसलेला सूट अन् टायमधला नवरदेव पाहिलायस?
सूर्यासोबत तोही तापत असतो….
तरीही चेहरा केवढा प्रसन्न असतो !
अशा गोष्टीपासून आपणही सदैव प्रसन्न राहायला शिकावं.
शेवटी वाईट वाटणं, म्हणजे दुःखी होणं – म्हणजे डोळ्यात पाणी येणं, अशानं डोळ्यांचा नंबर वाढतो. मग डोळ्यांचा डॉक्टर – फ्रेम तीच राहिली तरी काचा बदलविणं आलंच – खर्च वाढणं अपरिहार्य – हेच तर टाळलं पाहिजे आपण.
अरे, मिस – कॉल देऊन बचत करणारे आपण, चष्म्याच्या काचा बदलविण्याची उधळपट्टी का म्हणून करावी?
म्हणून म्हणतो,
कशा कशाचं वाईट वाटून घेऊ नको.

टीप : त्या म्हातार्या आजीच्या तेराव्याची पत्रिका आली का अन् त्यावर स.प. असे लिहिले आहे का? अवश्य कळवशील.

सर्वोदय प्रेस सर्व्हिस (मराठी) यांच्या सौजन्याने