कविता

जर आपलं मूल जगत असेल परीक्षणांच्या पहार्यात
तर जगाला दोषच द्यायला शिकेल ते
वैरभावाचे अनुभव भाग पाडतील त्याला भांडायला.
उपहासच केलात त्याचा तर –
मिटवून घेईल ते स्वत:ला लाजाळूसारखं.
लाज शरमेच्या किडीमुळे वाटेल त्याला अपराधी,
सहिष्णुतेच्या अनुभवातून शिकेल ते चिकाटी.
प्रोत्साहनाचं खतपाणी मिळालं तर
आत्मविश्वासाची पालवी फुटेल त्याच्या असण्याला
आणि स्वत: कौतुकाच्या सरीत भिजताना
शिकेल ते सार्या जगाकडेच कौतुकानं पाहायला!
चांगुलपणा अनुभवला तर न्याय शिकेल,
सुरक्षित राहील तर विश्वास ठेवेल,
त्याच्या अस्तित्वाला असेल मान्यता
तर प्रेम करेल ते स्वत:वर
स्वीकार आणि मित्रत्वाच्या हवेत
घेत असेल ते आपले श्वास
तर जगातलं प्रेमही
शोधायला शिकेल ते !
अनुवाद – सुजाता लोहोकरे
इंटरनेवरून साभार

धावू द्या आम्हाला
आमच्या वेगाने.
एकाच वेगाच्या श्रेणीत,
कैद नका करू आम्हाला.
‘जगणं’ जसं अनुभवानं
पक्व होतं.
‘शिकणं’ही अगदी तसंच
घडत जातं.
पण, तुम्हाला समजावणार कोण?
आणि काय?
तुमच्या सगळ्या प्रश्नांना
आम्हाला उत्तरं ‘द्यावीच’ लागतील.
तुमच्यावर मात्र
‘असलं बंधन’ नाही.
‘तो’ पहिला आला म्हणून
‘मीही’ का पळ पळ पळावं?
कशासाठी मान मोडून
इतकी घोकंपट्टी करावी?
नाही लागत लक्ष वर्गात!
खिडकीबाहेरचं आकाश
खुणावतं मला.
ढगांचे वेगवेगळे आकार
खेचून घेतात मला.
ती ‘रंगांची दंगल’
ओढून घेते मला…
स्वत:त!
मग सांगा, फळ्याच्या
काळ्या रंगात अणि
खडूच्या पांढर्या रंगात
मन कसं रमेल?

चित्रात बरसणारं आभाळ
‘पेपरात’ कसं उतरेल?
‘वाचन’ कधी आपलं
वाटलंच नाही.
‘लिहिणं’ जगण्यासाठी आहे
कुणी सांगितलंच नाही.
गणितातली मजा कुणी
दाखवलीच नाही.
याहून वेगळं आणखी
कोणतं नवीन ‘शिक्षण’
तुम्ही देणार आहात?
उंदरांच्या शर्यतीत अजून
कुठवर पळवणार आहात?
जिंकलो तरी शेवटी
उंदीरच ठरणार ना?
नको आहेत या
प्रश्नांची उत्तरे आम्हाला!
आम्हाला आमचा-आमचा
आभाळाचा तुकडा द्या.
आम्ही मिळून आभाळ जोडू
अथांग बनवू.
‘शिकणं’ म्हणजे ‘जगणं’
आणि ‘जगणं’ म्हणजेच शिकणं,
हा-पाठ गिरवू.
आमचं ‘स्वातंत्र्य’ आणि
आमचं ‘आमचंपण’
आम्हालाच राहू द्या.
तुम्ही फक्त कौतुकाची
थाप द्या.

चुकेल तिथं ‘जाणतेपणाची’
साथ द्या.
धावू द्या आम्हाला
आमच्या वेगाने,
प्रत्येकजण इथं वेगळा आहे.
प्रत्येकाचं स्वत:चं एक
‘आभाळ’ आहे.
प्रत्येकाची एक ‘उडान’ आहे.

– फारूक एस्. काझी,
नाझरा, सांगोला

काहीतरी नवीन करून बघायला काहीच हरकत नाही.
आणि चुका करायलासुद्धा घाबरायचं कारण नाही.
चुकांमधूनच तर खूप शिकत जातो आपण.
धोके पत्करायला काहीच हरकत नाही.
आणि घाई करायचं काही कारण नाही.
आपली स्वत:ची गती शोधून काढावी,
आणि आपल्याला मनापासून वाटतं तसंच करावं.
नापास झालं तर काहीसुद्धा बिघडत नाही.
न घाबरता पुन्हा प्रयत्न करता येतोच.
कुणाला आपण मूर्ख वाटलो, तरी हरकत नाही.
इतरांपेक्षा वेगळे असलो, तरी काहीच बिघडत नाही.
आपल्या मनाची तयारी होईपर्यंत थांबलं तरी चालतं.
नवे प्रयोग केले तर छानच असतं. काळजी मात्र घ्यायची !
हे असंच का? असं विचारावंच.
आपण आहोत तसे असणं खासच असतं.
पसारा तर करणं आवश्यक असतं.
तो आपण नंतर आवरून टाकला की झालं.
नवीन काही निर्माण करायचं तर
थोडा पसारा, थोडा कचरा, थोडा चिकचिकाट होणारच.
कवी – ऍन सायर वाइजमन
अनुवाद – शोभा भागवत