कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण

लहान मुलं संवेदनांच्या माध्यमातून विलक्षण एकाग्रतेनं सभोवतालच्या जगाचा कसा शोध घेतात, आपापल्या पद्धतींनी त्याचा अर्थ कसा लावतात आणि ते कसं व्यक्त करतात, हे आपण पहिल्या लेखांकात समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामधे शाळेत किंवा घरात मुलाचं जे कला शिक्षण होतं; त्याचं एकूण शिकण्याच्या प्रक्रियेशी काय नातं आहे? आणि ‘कला’ हा शिकण्याचा आणि संवाद साधण्याचा एक कृतिशील मार्ग कसा आहे हे जेन साही सांगतात.
प्रत्येक मुलाची अभिव्यक्तीची आपापली विशिष्ट पद्धत असते. मुलं केवळ बाहेरून वस्तू/व्यक्तीचं दिसणं नव्हे तर आतून त्यांना वाटलेलं मांडत राहतात, हे समजून घेतल्यावर शिक्षक म्हणून वर्गातली माझी भूमिका कशी असायला हवी? या पुस्तकात तपशीलवार, पायर्याभपायर्यांतनी स्पष्ट केलं आहे. भाषा, गणित, परिसर अभ्यास हे विषय शिकवताना कलेचा मार्ग कसा अवलंबायचा यासाठी वर्गात शिक्षकांनी करण्याच्या साध्यासोप्या कृती तर आपण समजून घेणारच आहोत. तो या पुस्तकाचा प्रमुख भाग आहे. मात्र या कृती मुलांकडून करवून घेताना, त्याचे व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि मूल्यमापन करताना शिक्षक आणि पालक म्हणूनही आपली भूमिका आणि दृष्टिकोन तपासून, सुधारून घेणं आवश्यक आहे.

शिक्षकांची भूमिका

कलात्मक विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. वेगवेगळ्या वयात यासाठी कशाची मदत होऊ शकते हे समजून घेणं आवश्यक आहे. शिक्षक प्रोत्साहन देणारे नसतील तर मुलं नाउमेद होऊन त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
ठरावीक साच्यातल्या चित्रांचं अनुकरण करायला सांगून मुलांची चित्रं सुधारण्याचा प्रयत्न करणं, चित्रांची पुस्तकं रंगवणं, शिक्षकांनी आखून दिलेले प्रकल्प करणं यामुळे मूल स्वतःला बंदिस्त करतं, मोठ्यांवर अवलंबून राहायला शिकतं. परावलंबी होतं. आपल्याजवळ सांगण्यासारखं महत्त्वाचं असं काहीच नाही, आपण फक्त कुणाच्या तरी मार्गदर्शनाची वाट पहायची असा विचार करू लागतं.
समंजस संवेदनशील शिक्षक मुलांच्या कामाला महत्त्व देतात. परिणामापेक्षा प्रक्रियेचा अधिक विचार करतात. जे शिक्षक मुलांनी आकर्षक, सुसंगत, चित्रे किंवा कलाकृती तयार करावी याची चिंता करतात ते मुलांच्या अभिव्यक्तीमधील उत्स्फूर्ततेत, नैसर्गिकतेत अडथळा निर्माण करतात.
IMG_5775.JPG

मुलांचा विकास अनेक प्रकारांनी व टप्प्यांनी होतो. त्यांचे स्वभाव, अनुभव, भावनिक व बौद्धिक वाढ यांना अनुसरून असलेल्या गरजा ओळखणे व त्यांचा आदर करणे हे शिक्षकासाठी खूप महत्त्वाचे आहे. ही प्रयोग करून पाहण्याची वेळ असते, अचूकता, निश्चितता आणि कौशल्यावर अति भर देण्याची नसते.
मुलांना अवकाश व साहित्य उपलब्ध करून देणं, मुलांच्या म्हणण्याला सहानुभूतीनं योग्य प्रतिसाद देणं हेच या टप्प्यावर मोठ्यांचं काम आहे. गोष्ट, कविता किंवा शाळेतला घरातला अनुभवाचा विषय सुचवून मोठ्या होत असलेल्या मुलांच्या कल्पनाशक्तीला उत्तेजन देता येतं.
कधी कधी निष्क्रिय झालेल्या, हारलेल्या मुलाला खुलवतील अशा नव्या शक्यता दाखवून त्याला आव्हान देणंही योग्य ठरतं.
शिक्षक व पालक म्हणून ही भूमिका आपल्याला स्वत:ला स्पष्ट झाली की आपापल्या कार्यक्षेत्रातील इतरांना – शाळेतील सहकारी शिक्षक, प्रशिक्षण वर्गातील शिक्षक यांना पटवून देण्याची गरजही आपल्याला अनेकदा वाटते. विशेषत: आपण एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक किंवा कोणत्याही स्तरावरील प्रशिक्षणात शिक्षक प्रशिक्षक किंवा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करीत असू तर ही गरज अधिक तीव्रतेने जाणवते.
आपल्या मुलांचं – जास्तीत जास्त मुलांचं शिकणं अधिक चांगलं-आनंददायी आणि परिणामकारक व्हावं यासाठी स्वत:ला समजलेल्या, पटलेल्या नव्या गोष्टी आपापल्या वर्तुळातल्या सर्व संबंधित घटकांशी वाटून घेतल्या तर त्या इतरांनाही कळतातच पण प्रक्रियेत आपल्यालाही अधिक स्पष्ट होत जातात. हे जाणूनच जेन साही यांनी या पुस्तकाच्या शेवटच्या भागात कलेचं अभ्यासक्रमातील स्थान, कला शिकवण्याच्या विविध पद्धती, कलेच्या अभ्यासात मुलांना प्रोत्साहन देणारा व मदत करणारा या शिक्षकाच्या भूमिकेचे स्वयंमूल्यमापन आणि प्रत्येक मूल कलाकार असतं का? या मुद्यांवर शिक्षकांशी करायच्या चर्चेबाबत मार्गदर्शन केलेले आहे. केवळ शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी आणि शिक्षक प्रशिक्षक यांच्यासाठीच नव्हे तर सर्व स्तरावरील विशेषत: राज्यस्तरावरील शिक्षकप्रशिक्षणाचे नियोजन करणार्या व्यवस्थेलाही ते अत्यंत उपयुक्त ठरेल असे आहे.

शिक्षक चर्चा – १

कलेचा शिक्षणातील हेतू –
(भाषा, गणित, विज्ञान यासारखे विषय का शिकवायचे याबाबत शिक्षकांच्या कल्पना सर्वसाधारणपणे स्पष्ट असतात. पाठ्यपुस्तकानुसार शिकण्या-शिकवण्याशी अभ्यासक्रमात दिलेल्या उद्दिष्टांचा काही संबंधही जोडता येतो. मात्र कलेच्या बाबतीत याविषयी गांभीर्यानं काही विचार केलेला सहसा दिसत नाही. शिकण्याच्या प्रक्रियेशी असलेलं कलेचं नातं, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट व्हावा यासाठी ही चर्चा अतिशय उपयुक्त ठरते.)
चर्चेच्या आरंभासाठी शिक्षकांच्या गटासमोर दोन प्रश्न उपस्थित करायचे आहेत.
१) शाळेत कला का शिकवावी?
२) कलेसाठीच्या कृतींमधून मुलं काय शिकतील असं तुम्हाला वाटतं?
चर्चेतून आलेली उत्तरे फलकावर लिहावीत
उदा.-
१) मुलांमधील सुप्त कलागुणांचा विकास करणे.
२) कलेसाठीच्या कौशल्यांचा विकास करणे.
३) वर्ग सजावट करणे.
४) अभ्यासात मागे असणार्या मुलांना प्रोत्साहन देणे.
५) अभ्यासाच्या ताणानंतरची विश्रांती.
६) काही जण भविष्यात कलाकार म्हणून नाव/पैसा कमवू शकतील.
७) मुलांना आपल्या भावना व्यक्त करता येतात.
८) परिसराबद्दलची जाण/जाणीव विकसित व्हावी.
९) पाठ्यपुस्तकातले धडे शिकणं अधिक मनोरंजक व्हावं.
१०) जगाकडे अधिक जवळून पाहायला मदत करण्यासाठी.
११) संवेदनांची जाणीव विकसित करण्यासाठी.
आता गटात चर्चा करा आणि ठरवा
१) सर्वात महत्त्वाची तीन कारणे कोणती
व का?
२) सर्वात कमी महत्त्वाचे कारण कोणते व का?
३) यामधील एखाद्या कारणाशी तुम्ही सहमत नाही असे वाटते का?
४) यापेक्षा अधिकची / वेगळी काही भर वरील कारणांमधे / परिणामांमधे घालू इच्छिता का?

शिक्षक चर्चा – २

कला अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती
कला अध्यापनाच्या पद्धती अनेक प्रकारच्या असू शकतात. फळ्यावर चित्र काढणं, मुलांना ते तसंच काढायला सांगणं, चित्रं गोळा करणं, चित्रं देऊन ती रंगवायला सांगणं… पण (कोणतीही पद्धत वापरताना) आपण हे सगळं का करतो आहोत आणि त्यामुळे आपले उद्दिष्ट कसे / कितपत साध्य होणार आहे, यावर विचार करणं महत्त्वाचं. उदा. इयत्ता दुसरीच्या मुलांचा चित्रकलेचा तास आहे आणि विषय आहे ‘झाड’. या तासाच्या तीन वेगवेगळ्या पद्धती पुढे दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर काही प्रश्न दिले आहेत. प्रश्नांच्या मदतीने तीनही पद्धतींचे विश्लेषण करा आणि त्यानंतर ‘पक्षी’ या विषयावरचा पाठ घेताना तुम्ही कोणता दृष्टिकोन स्वीकाराल आणि तो कसा अमलात आणाल ते सांगा.
पद्धती-१
पाठाचं नियोजन काळजीपूर्वक केलंय. साहित्याची व्यवस्था केलीय. प्रत्येक मुलाजवळ कोरा कागद आणि पेन्सिल आहे. शिक्षक फळ्यावर वडाच्या झाडाची रेखाकृती काढतात. मुलांना विचारतात ‘हे कशाचं झाड आहे?’ मुलं उत्तर देतात. मग त्यांना ते चित्र कागदावर काढायला सांगतात. मुलं चित्र काढत असताना वर्गात फिरून निरीक्षण करतात. काही मुलांचं कौतुक होतं. काही जणांना पूर्ण चित्र तर काहीजणांना एखादा भाग खोडून पुन्हा काढायला सांगतात. बेल होते. तास संपतो. चित्रे गोळा केली जातात. नंतर व्यवस्थितपणा व अचूकता या निकषावर गुण दिले जातात. त्यानंतर त्या चित्रांचा उपयोग होत नाही.
पद्धती-२
शिक्षक मुलांना सांगतात, ‘आजचा तास वडाच्या झाडाचा आहे. हे झाड आपण आधी पाहणार आहोत नंतर त्याचे चित्र काढणार आहोत.’ शिक्षक मुलांबरोबर झाड पहायला जातात. मुलांना काही अंतरावरून झाडाचा आकार आणि मग जवळून फांद्या, फळं, पानं पहायला सांगतात. मुलांनी दुसरीकडे कुठे कुठे हे झाड पाहिलंय त्याविषयी गप्पा होतात. आठवणी आणि निरीक्षणांवर चर्चा होते. त्यातून जेव्हा प्रत्येक मुलाच्या मनात त्याचं त्याचं चित्र तयार होतं, तेव्हा मुलं वर्गात परत जातात. आपापलं चित्र काढून रंगवतात. चित्र काढायला सुरुवात करण्यासाठी थोडा वेळ दिला जातो. मुलांच्या चित्राचे निरीक्षण करताना कधी प्रश्नोत्तरे होतात, काही सूचना दिल्या जातात. त्याची आपल्या मनातील चित्र पाहण्यासाठी मुलांना मदत होते.
ज्या मुलांना काही सुचत नाहीये त्याला ‘फांद्यावर पानांचे आकार कसे होते पाहिलंत का तुम्ही? सगळ्या फळांचा रंग एकच होता का?’ असे प्रश्न विचारून शिक्षक थोडी चालना देऊ पाहतात.
बेल होते. हा कलेचा तास शेवटचा तास असतो. काही मुलांचं चित्र पूर्ण झालेलं असतं. काही विचारतात – ‘आम्ही काढत बसू का चित्र?’ काहींना ते पूर्ण करायला घरी न्यायचं असतं. दुसर्याो दिवशी सर्व मुलं आपापलं चित्र वहीवर चिकटवतात.
पद्धती-३
शिक्षक मुलांना कागद आणि रंग देतात. आणि म्हणतात. ‘तुम्ही आता यावर एक झाड काढायचं आहे.’ काही मुलं लगेच सुरुवात करतात, काही गोंधळतात.
वर्गात फेरफटका मारताना आत्मविश्वासाने सुरुवात करणार्याु मुलांच्या चित्रावर काही बोलतात. काहींना प्रोत्साहन, शाबासकी देतात. काही मुलं त्यांच्या चित्रांची नक्कल करतात. बहुतेक चित्रं एकसारखी येतात. सुरुवात न करणार्याा मुलांना काहीच म्हणत नाहीत. बेल होते. शिक्षक काही चांगली चित्रं निवडतात व ती भिंतीवर लावतात.

विश्लेषणासाठी प्रश्न

१) पाठ घेण्यापूर्वी काही पूर्वतयारीसाठी विचार केला होता का?
२) पाठाच्या विषयाबाबत मुलांशी काही चर्चा झाली होती का? त्यावेळी मुलांचे अनुभव निरीक्षणे स्वीकारली का?
३) अनेक उत्तरांची शक्यता असलेले प्रश्न विचारले की वस्तुनिष्ठ प्रश्न?
४) सर्व मुलांची चित्रे एकसारखी असावीत अशी अपेक्षा होती का?
५) मुलांची चित्र काढण्याची शैली आणि दृष्टिकोनातील विविधतेला मान्यता मिळाली का?
६) मुलांच्या कामाचे मूल्यमापन करताना कोणत्या गोष्टींना महत्त्व दिले जाते?
• व्यवस्थितपणा • मूलभूतता, मूलगामित्व (originality) • एकाग्रता • प्रयत्न आणि समरसता • कल्पनाशक्ती • अचूकता
• काळजीपूर्वकता • अभिव्यक्ती
७) तासिकेच्या शेवटी काही मुलं असमाधानी असतात का?
८) कृतीमधून मुलं नेमकं काय शिकतात?

* या प्रश्नांच्या आधारे तीनपैकी कोणती पद्धती उपयुक्त आहे?
* ‘पक्षी’ या विषयावरील तुमच्या पाठाचे नियोजन करा.

शिक्षक चर्चा-३

शिक्षकांसाठी स्वयंमूल्यमापन प्रश्नावली
अध्यापन पद्धतीचे विश्लेपषण करण्यासाठी दिलेला प्रत्येक मुद्दा हा बालकेंद्री अध्ययन-अध्यापन व्यवहारातील एकेक धागा सुटा करून आपल्याला विचारात पाडतो. हाच धागा पकडून वर्गातील मुलांकडून कलेच्या तासाला आपण करून घेतलेलं काम, ते काम करताना मुलांना आधार देण्याची, प्रोत्साहित करण्याची आपली भूमिका आणि या भूमिकेची परिणामकारकता स्वत:च तपासून घेण्यासाठी पुढची शिक्षक चर्चा उपयुक्त ठरते.
मुलांबरोबर काम करताना शिक्षकांनी स्वत:ला विचारायचे प्रश्न
१) मुलांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं काम करायला आम्ही प्रोत्साहन, आधार
देतो का?
२) इतर कुणाचीही नक्कल अथवा अनुकरण
न करता स्वत:चं काम करण्यासाठी प्रोत्साहन देतो का?
३) काम पूर्ण करण्यासाठी मुलांना आवश्यक असलेला वेळ दिला जातो का?
४) आपल्या कामाबद्दल बोलण्याची संधी दिली जाते का?
५) परिसरातील आवडत्या गोष्टींचे निरीक्षण करून त्यासंबंधी सजग राहण्यासाठी मुलांना कोणत्या मार्गाने/कशी मदत
केली जाते.
६) विविध प्रकारच्या साहित्याचा अनुभव घ्यायला दिला जातो का?
७) चौकटीच्या आत स्वातंत्र्य मिळेल अशी वर्गरचना असते का?
८) या शिकण्याचा, शिकण्याच्या इतर क्षेत्रांशी/विषयांशी संबंध जोडण्यासाठीचे मार्ग चोखाळले जातात का?
९) सर्व मुलांना सहभागी होता येईल अशी परिस्थिती निर्माण केली जाते का?
१०) विशेष व भिन्न गरजा असलेल्या मुलांना निर्मितीच्या अनेक शक्यता उपलब्ध करून दिल्या जातात का?
११) मुलांच्या कामाचे निरीक्षण व परीक्षण हे रचनात्मक, आदरयुक्त आणि आधार देणारे असते का?
१२) वर्गात, शाळेत चित्र प्रदर्शनासाठी जागा आहे का?
१३) प्रदर्शनात प्रत्येकाच्या कामाचा समावेश वर्षातून किमान एक वेळा होतो का?
१४) मुलांच्या कामाची जोडणी, घर, कुटुंब वा समाजातील त्यांना येणार्याण अनुभवाशी होते का?
१५) साहित्याचा वापर वाया जाऊ न देता काटकसरीने होतो का?

शिक्षक चर्चा-४

सर्वच मुलांची कला चांगली असते का? बंगालमधल्या ऐंशी वर्षाच्या एक आजी शांतिनिकेतनमधे शिकतानाची त्यांची एक आठवण सांगत होत्या. एके दिवशी त्यांनी शिक्षकांना विचारलं, ‘या चित्राला मी कोणता रंग देऊ?’ शिक्षक म्हणाले, ‘मी सांगेन तुला, पण मग ते माझं चित्र होईल. तुला जे रंग योग्य वाटताहेत ते तू दिलेस तर ते खर्यान अर्थानं तुझं चित्र होईल. कित्येक वर्षानंतर तिच्या नातवाने तिला असाच प्रश्न विचारला तेव्हा तिला हे आठवलं. शिक्षकांच्या एका वाक्याचा तिच्यावर इतका खोलवर परिणाम झालेला होता. स्वत:ची चित्रे काढणे नेहमीच दुसर्यांिच्या सूचनांवर अवलंबून न राहणे किती महत्त्वाचे आहे हे यावरून लक्षात येते. मुलं अनुकरण करतात. एकमेकांपासून शिकतात हे खरे आहे पण त्यासाठी शिक्षकाच्या मनातले चित्र काढण्याचे दडपण त्यांच्या मनावर येऊ नये. रेखाटन आणि रंगवण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यासाठी शिक्षकांचा आधार वाटावा, दबाव नको.

चर्चेसाठी मुद्दे
१) कला सर्व मुलांसाठी आहे की दैवी देणगी असलेल्या काही मुलांसाठी की अभ्यासात मागे असलेल्या मुलांसाठी/च आहे?
३) कलेची आवड काहीच मुलांमधे का असते? शिक्षक त्यांना त्यात अधिक आनंद घेता यावा म्हणून काय करू शकतो?
४) चित्र चुकीचे असू शकते का?

आपण शिक्षक, पालक अथवा मुलांच्या शिकण्याकडं कुतूहलानं जिज्ञासेने पाहणारी व्यक्ती असाल – मुलांच्या चित्र काढण्याकडे पाहताना आपल्या मनात उठलेले विचारांचे, भावनांचे, अगदी त्यात आलेल्या अडचणींचेसुद्धा तरंग कागदावर उतरवून आपण आमच्याकडे पाठवू शकता. आम्ही आपल्या प्रतिसाद प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आहोत.