संवादकीय – दिवाळी २०१०

मूल वाढवताना आपली जाणीव जागी ठेवण्याची गरज कुठल्याही काळात असतेच आणि ती एकंदर बदलांच्या पटीत वाढतही जाते आहे. आपल्या मुलाला जगात कधीही – आपल्याला आपली माणसं आहेत, ती आपल्या सुखदु:खांशी सहभावी आहेत ह्याची खात्री असणं सर्वात महत्त्वाचं असतं. जगाचा मायावीपणा सातत्यानं वाढत जात असताना ही गोष्ट अधिकाधिक कठीण होऊन बसली आहे.
काळ कितीही बदलला तरी आपल्या मुलाबाळांवर आपलं प्रेम असणारच. मुलांनी काय शिकावं, कुठं राहावं ह्याचे निर्णय ज्याचे त्यानंच घ्यायचे असतात, आणि पेलायचेही असतात. तरीही कुणाला कधी फसवू नकोस आणि कुणावर बळजबरी करून दुसर्याचे मानवी हक्क लुबाडू नकोस एवढं तरी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायला साधलंच पाहिजे. अर्थात शब्दांपेक्षा कृतीमधून पोचता आलं तर ते अधिक फलदायी ठरेल हे काय आम्ही कुणाला सांगायला हवं?