आता बोला (कविता) …

आदिम काळापासून धडपडतोय माणूस एकमेकांसोबत जगण्यासाठी.
हाताबोटांच्या, नाकाडोळ्यांच्या आणि गळ्यातून निघणार्‍या आवाजाच्या खुणा पुरेनात,
मनातलं तर्‍हेतर्‍हेचं देण्याघेण्यासाठी….
तेव्हा आपल्याच गळ्यातल्या आवाजांना
निरखत… उलगडत… वापरत शोधल्या नि ठरवल्या त्यानं –
मनाआतलं लाख परीचं काही बाही – एकमेकांपाशी पोहोचवणार्या शब्दांच्या खुणा.
आता तर पार क्षितिजापल्याड नेऊन ठेवलंय आपण –
आपल्या हाकेचं अंतर….
अख्खी पृथ्वीच आणून ठेवलीय खिशाच्या रेन्जमधे (टॉकटाईमचा पल्सरेट तेवढा मोजला की झालं).
तशी कधीकधी नेमकी हवी तेव्हाच जाते ही रेन्ज
पण नको असतं तेव्हा ती गेल्याचा बहाणाही येतो करता !
कधी नाहीच जमलं बोलायला तर पोहोचवता नि आत घेताही येते बोलण्याची इच्छा !
आणि इच्छा असेल तर ऐकताही येते –
हाकांच्या व्हायबे्रशन्सची लांबी, रुंदी आणि खोलीही.
बोलता बोलता ऐकू येतोच
दोन शब्दांमधल्या स्तब्ध अंतरातला कल्लोळही…
अगदी कितीही अंतरावरून – पण –
पण यासाठी थांबावं लागतं थोडं – आपआपल्या अँटिनांच्या स्टेशनात
आणि ठाऊक असायला लागतं ज्या गावाला जायचं आहे त्याचं नाव.
नाहीतर मग बोलतच राहतात माणसं –
उठता बसता – चालता – जेवता – घरात दारात – गाडीत गाडीवर – कामाचं बिनकामाचं
… बॅलन्स किंवा चार्जिंग कुणी एक संपेस्तोवर.
जॅम…. जॅम होत जाते ध्वनिलहरींची ट्रॅफिक –
त्यात सापडतो – अडकतो नि गुदमरून जातो संवादाचा श्वास.
अजूनही अदिमतेपाशीच आहे का
एकमेकांपाशी पोहोचण्याची आमची धडपड?
अख्ख्या पृथ्वीला तळहाताच्या रेन्जमधे आणूनही !
सुजाता लोहकरे