खेळघराच्या खिडकीतून

मुख्य प्रश्न होता ह्या मुला-मुलींना शिकवायचं कसं? मुलांना जर अभ्यास आला नाही तर शाळा सोडतील. शाळेतली भाषा वेगळी असते. त्यासाठी गाणी – गोष्टी, परिसरातले शब्द, त्यांची कार्डे, तक्ते, चित्रं काढणे, चित्रांना नावं देणं, एकेक मुळाक्षर – त्याचे शब्द, वाक्य, पाटीवर पाहून फळ्यावर सराव, चित्र वाचन असं सगळं घेतो. मग हळूहळू ती ऐकायला, एका जागी बसायला लागतात.

मी याच वस्तीत राहते. मला दोन मुली. दुसरीपासून दोघीही खेळघरात यायला लागल्या. मी खेळघराबद्दल मुलींच्या गप्पातूनच ऐकलं. त्यावेळेस असं वाटलं की शाळेपेक्षा वेगळं इथं नक्कीच काय तरी असणार. त्याची मुलींना अधिक गोडी वाटते. मलाही खेळघराला भेट द्यावी वाटलं. त्याच वेळी पालकसभेच्या निमित्ताने खेळघरात जाण्याचा योग आला.

मुलं इथं काय करतात, वेगवेगळ्या शिकवण्याच्या पद्धती, वेगवेगळे उपक्रम, ट्रीप, जेणेकरून अभ्यासाची मुलांना गोडी वाटेल याची तिथे माहिती मिळाली. प्रत्येक पालकसभेला वेगवेगळ्या विषयावर चर्चा व्हायची. मग गटात बोलू लागले. विचार करू लागले. तो सगळ्यांपुढे मांडू लागले. एक दिवस काकूंनी मला खेळघरात काम करण्याविषयी विचारलं. त्या वेळेेस मनातून माझा होकार होताच. पण घरच्यांचं मतही घ्यायचं होतं आणि मनात थोडीशी भीतीही होतीच की आपल्याला ही जबाबदारी पेलेल का?

तीन वर्षापूर्वी मी खेळघरात शिकवायला लागले. विद्याताईबरोबर नॉनस्कूलच्या वर्गाला जाऊ लागले. या वर्गात सहा वर्षाच्या पुढची पण शाळेत न जाणारी मुलं असतात. शाळेत जाण्यासाठी त्यांची तयारी करून घ्यायची असते. पुढे दाखले काढून शाळेत घालायचं असतं.

या वर्गाचे प्रश्न निराळेच आहेत. ही मुलं कधीच शाळेत न गेलेली. त्यांना वेळेवर शाळेत यायची माहितीच नव्हती. रोज बोलवायला जायला लागायचं. आम्ही दोघी रोज मुलांना बोलावून आणायचो. बोलवल्यावर सर्व मुलं पळतच यायची परंतु वर्गात अजिबात स्थिर नसायची. सारखी धावपळ. मधेच कधीही घरी जायची. वेळेचं भानच नव्हतं त्यांना. मनात येईल ते करायची, बाहुलीघरात जाऊन बसायची. आम्ही काय सांगतोय त्याच्याकडे लक्षच नसायचं. ऐकण्याची अजिबात सवय नव्हती. मला वाटायचं, ‘हा कसला वर्ग? या मुलांना काही शिस्तच नाही. शिकवायचं तरी कसं यांना?’ माझी त्यावेळी चिडचिड व्हायची. विद्याताईशी चर्चा केली, विचार केला, मग माझ्या लक्षात आलं. ही कधीच शाळेत न गेलेली मुलं. त्यामुळे त्यांना काहीच माहीत नाही – वेळ पाळणं, बाईंचं ऐकणं, शांत बसणं.

ही मुलं स्वतंत्र होती. वार्यासारखं पळणं, फिरणं, बंधन नाही. कारण दिवसभर आई-वडील घरात नसतात. कोणी बोलायला नाही. मनाचे राजे होते. मग एकाएकी वर्गात कसे शांत बसतील? रागावून बसवलं तर मुलं परत येणारच नाहीत. त्यामुळे रागावणं, मारणं, अपमान करणं हे आम्हाला वर्ज्य होतं. मग आपल्यातच बदल करायला हवेत, असं वाटलं. मुलं वर्गात का येतील? तर त्यांना यावंसं वाटलं पाहिजे. त्यांना कधी छान वाटेल? तर खेळणी खेळण्यास दिल्यावर, गाणी म्हणून दाखविणे, त्यांना म्हणायला सांगणे, गोष्टी सांगणे त्यामुळे ऐकायची व एका जागी बसण्याची सवय होते. त्यांच्याशी छान नातं जमलं पाहिजे हे महत्त्वाचं, त्यासाठी वैयक्तिक बोलणं, गटात संवाद घेणं, यातून छान वाटलं पाहिजे – आनंद मिळाला पाहिजे. तर मुलं येऊ लागतील.
अजून एक प्रश्न म्हणजे मुलांचा मोठा वयोगट – सहा ते तेरा वर्षापर्यंत. म्हणून नंतर दहाच्या पुढच्या मुलींसाठी यल्लरु हा वर्ग नवीन चालू केला (यल्लरू म्हणजे कानडी भाषेत ‘आम्ही सार्याजणी’). आता छोट्या वर्गात पाच-सहा मुलींबरोबर त्यांची छोटी भावंडंही असतात. त्यांना घरी एकटं सोडून येता येत नाही. त्यामुळे ‘घेऊन या’ असं आम्ही सांगतो. ही बाळं एक-दोन वर्षांची असतात. त्यांना सांभाळायला वेगळी मदत मिळेल का? ह्याचा शोध घेतला जातो. खास त्यांच्यासाठी वेगळे खेळ आणले. त्यांना वेळ दिला. नवीन असताना आम्हाला बघून रडायची. मग त्यांना खाऊ देणे, बाहुलीघरात वेगळं खेळायला देणे असं करायचो. आता छान रमलीत. आपापले खेळतात व ताई म्हणून हाक मारतात. खेळून दमली की झोपून जातात.

या वर्गातल्या मोठ्या मुलीसुद्धा पेंगतात कारण घरातील कामे, बाळं सांभाळून थकतात. जेवणाची पण आठवण राहत नाही. वर्गात आल्यावर म्हणतात, ‘‘ताई भूक लागली, घरी जातो.’’ अर्धवट वर्ग सोडून जायच्या. नंतर आठवड्यातून दोन वेळा पौष्टिक खाऊ चालू केला. त्यांच्याशी गोलात बसून पौष्टिक आहाराविषयी बोललो. दुकानातील पेप्सी, बॉबी फिंगर, बंटी-बबली हे खाऊ नये – त्या ऐवजी पेरू, शेंगदाणे, फुटाणे घेऊन खा हे सतत सांगत असतो. चहाबरोबर बटर, खारी, टोस्ट खाऊ नका, त्याऐवजी चहा पोळी, पोळी भाजी खावी असं सांगत असतो.

सुरुवातीला मुलं खूप अस्वच्छ असायची. त्यांना हात – पाय धुण्याचे, आंघोळीचे प्रात्यक्षिक दाखविले. केस विंचरण्याचे, नखे काढण्याचे शिकविले. केसात उवा असल्यामुळे सर्वांच्या डोक्यात गामास्कॅब लावले. रोज त्यांच्याशी दात घासणे, हात धुणे, स्वच्छतेबद्दल पाच मिनिटे तरी बोललं जातं.

मुख्य प्रश्न होता ह्या मुला-मुलींना शिकवायचं कसं? मुलांना जर अभ्यास आला नाही तर शाळा सोडतील. शाळेतली भाषा वेगळी असते. त्यासाठी गाणी – गोष्टी, परिसरातले शब्द, त्यांची कार्डे, तक्ते, चित्रं काढणे, चित्रांना नावं देणं, एकेक मुळाक्षर – त्याचे शब्द, वाक्य, पाटीवर पाहून फळ्यावर सराव, चित्र वाचन असं सगळं घेतो. मग हळूहळू ती ऐकायला, एका जागी बसायला लागतात. मुळाक्षर, शब्द वाचता यायला लागले की त्यांना खूप मजा येते. आकडे मोजता यायला लागले – दहापर्यंत वस्तूंच्या भाषेत बेरजा वजाबाक्या यायला लागल्या की आम्ही दुकान – दुकान खेळतो. पैसे – नोटांशी त्यांची आधीच ओळख असते.

या सगळ्यात वर्ष कधी संपतं समजत नाही. पुढच्या जूनमधे या मुलांना शाळेत घालणं हे महत्त्वाचं काम. नुसतं घालून उपयोग नाही तर ही मुलं शाळेत टिकायला हवीत. मार्चनंतर शाळेची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेला भेट देणे, माझी शाळा हे गोष्टीचं पुस्तक वाचून दाखविणे, शाळेच्या गमती जमती सांगणे शाळेची उत्सुकता वाढवणे, हे सर्व करत असतो. मे मधे सगळ्या मुलांचे दाखले काढतो. मुलांना शाळेत जाता यावं म्हणून पालकांशी खूप बोलावं लागतं. लहान भावंडांची काही वेगळी व्यवस्था करता येते का त्यासाठी मदत करतो. मग जूनमधे महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षकांना भेटून सगळी माहिती सांगतो. मुलाबद्दल काही सांगायचे असल्यास आम्हाला फोन करा म्हणून खात्री देतो.

पुढे ही मुलं खेळघराच्या प्राथमिक गटाच्या वर्गाला यायला लागतात. कुठल्याही कारणानं शाळा सुटत नाही ना इकडे आमचं लक्ष असतं.

गेल्या तीन वर्षांत या वर्गाच्या निमित्तानं मी खूप काही शिकले. आता रस्त्यात खेळणारी, खोड्या काढणारी, छोट्या-छोट्या चोर्याही करणारी मुलं दिसली तरी त्यांचा राग येत नाही. मुलं खेळघरात कशी येतील यासाठी विचार सुरू होतो.