कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

बहिणी असलेल्या एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याला किंवा मुलांना‘तुमची बायको / आई काय करते?’ असा प्रश्न विचारला तर नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त वेळा ‘काही नाही’, किंवा ‘घरीच असते’, अशी उत्तरं येतात. स्त्रियांचे श्रम न मोजले जाणं, ते अनुल्लेखानं मारले जाणं किंवा त्यांचा उल्लेख अनादरानं केला जाणं ही आपली ‘परंपरा’ बनली आहे. या परंपरेच्या संदर्भात पाठ्यपुस्तकांची भूमिका काय असते? ती या परंपरांना फाटा देतात की त्यांचं दृढीकरण करतात? स्त्री-पुरुषांमधल्या श्रमविभागणीला झुगारतात की त्या श्रमविभागणीतल्या विषमतेला पुष्टी देतात? असे अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारून त्यांची उत्तरं शोधण्याचं काम ‘निरंतर’च्या ‘Textbook Regimes : A Feminist Critique of Nation and Identity’, या पुस्तकात करण्यात आलंय.
पाठ्यपुस्तकांमधून केल्या जाणार्याs लेखनाला ज्ञानाचं ‘वैध’ किंवा ‘बरोबर’ रूप मानलं जात असल्यानं त्याच्या चिकित्सक अभ्यासांची गरज असते, ही गोष्ट आता जगभरातले अभ्यासक मान्य करतात. पण समाजात प्रचलित असलेल्या सत्तासंबंधात अपेक्षित असलेल्या बदलांचं प्रतिबिंब पाठ्यपुस्तकात अभावानंच आढळतं. जात, धर्म, लिंगभाव, वंश, भाषा, भौगोलिकता इत्यादी भेदांवर आधारित विषमतांविषयी, त्यांच्यातल्या संघर्षांविषयी आपली पाठ्यपुस्तकं गप्प राहण्याचं धोरण स्वीकारतात. अशा भेदांविषयी गप्प राहणं हे दरवेळी अनवधानानं होतं, असं मानण्याचं कारण नाही. या संदर्भात ‘Textbook Regimes’ मधलं एक उदाहरण फार महत्त्वाचं आहे. एन.सी.ई.आर.टी.ने १९८२ साली प्रकाशित केलेल्या ‘The Status of Women through Curriculum’, या पुस्तकात पाठ्यपुस्तकं लिहिणार्यांपसाठी काही सूचना करण्यात आल्या होत्या.
उदाहरणार्थ, ‘वेदोत्तर संस्कृत साहित्यातील स्त्रीदास्याच्या कल्पनांचं खंडन करण्यात यावं’. म्हणजे स्त्रीदास्याच्या वस्तुस्थितीचा इतिहास आहे, पुरावे आहेत पण ते दाखवलं जाऊ नये. किंवा ‘स्त्रियांच्या नव्या सामाजिक स्थानाची मांडणी करताना संघर्ष नव्हे तर सहकार्य हा पाया असावा. त्यासाठी संन्याससूक्त किंवा अथर्ववेदासारख्या वैदिक वाङ्मयाचा आधार घेण्यात यावा.’ म्हणजे त्यातील निवडक उदाहरणांनाच सामान्य परिस्थिती म्हणून दाखवलं जावं. लिंगभावावर आधारित विषमतांना, यथास्थिती वादाला १९७५ नंतर बसू लागलेल्या धक्क्यांमुळं असे सल्ले देण्यात आले, यात शंका नाही. शिवाय वैदिक काळ म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचा काळ असा ब्राह्मणी प्रचार इथं थेट दिसतोय.
स्त्रीशिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात मुलींना दक्ष गृहिणी अन् चांगल्या आया बनवण्यासाठीच शिकवायचं, असं अनेक ‘राष्ट्रीय’ पुढार्यांाचं देखील मत होतं. १९१७ साली महर्षी धोंडो कर्व्यांनी फक्त मुलींसाठी विद्यापीठ (एस.एन.डी.टी.) सुरू केलं तेव्हा लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’त अग्रलेख लिहून याच गृहकृत्यदक्ष शिक्षणाची भलावण केली होती. पुढं मुली अर्थाजनासाठी शिकू लागल्यानंतरही ‘घरचं सगळं सांभाळून नोकरी करणं’ हाच विचार तेव्हापासून आजतागायत प्रभावी दिसतो. या सर्व पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तकांमधे दिसणार्याे स्त्रियांच्या दृश्य / अदृश्य प्रतिमांचे, पाठ्यपुस्तकांच्या आशयांचे विश्लेषण करणारे काही अभ्यास देशाच्या विविध भागांत झालेत. त्यांच्या तुलनेत ‘निरंतर’चा अभ्यास समाजातले सत्तासंबंध केंद्रस्थानी ठेवून, पाठ्यपुस्तकांमधल्या स्त्रियांच्या प्रतिनिधित्वाचा सखोल विचार करतो. ‘निरंतर’ अभ्यासगटाच्या म्हणण्यानुसार, ‘सामाजिक चिकित्सेच्या राष्ट्रीयत्व, जात, धर्म, वर्ग इत्यादी संकल्पनांना व्यापून त्यापलीकडे लिंगभाव उरतो…. त्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या स्त्रीवादी चिकित्सेमधे इतरही सामाजिक उतरंडींच्या अभ्यासाचा समावेश होतो.’ अशा संकल्पनांपैकी एक असणार्याइ ‘स्त्रियांचे श्रम’, या संकल्पनेविषयी पाठ्यपुस्तकं काय म्हणतात ते आपण आता जाणून घेऊया.
‘निरंतर’च्या अभ्यासाप्रमाणे पाठ्यपुस्तकांमधून श्रमाचा विचार एखादं कर्तव्य अथवा कुटुंब / देशाच्या सेवेच्या रूपात केला जातो. सामाजिक संरचनेशी श्रमांचा संबंध लक्षात न घेतल्यानं श्रम म्हणजे काम किंवा व्यवसाय बनतात. भिन्न प्रकारच्या श्रमांमधले सत्तासंघर्ष विद्यार्थ्यांसमोर आणले जात नाहीत. हा अभ्यास करताना ‘निरंतर’ने लिंगाधारित श्रमविभागणीच्या विचार – चौकटीचा वापर केला आहे. श्रमविभागणीचे दोन प्रकार समाजात आढळतात – स्त्रियांनी करण्याची कामं आणि पुरुषांनी करू नयेत अशी कामं. वरवर पाहता हे दोन्ही प्रकार एकच वाटतील, पण ते तसे नाहीत. अगदी कौटुंबिक पातळीवर स्वयंपाक, झाडलोट, पाहुण्याचं आगतस्वागत अशी कामं ‘निसर्गतः’ स्त्रियांची मानण्याची पद्धत आहे. या उलट मुलांचं हगणंमुतणं साफ करणं, उष्टीखरकटी आवरणं अशी कामं पुरुषांनी कधीही करायची नसतात. कारण ही कामं ‘अप्रतिष्ठित’ मानली गेली आहेत. स्त्रिया अर्थार्जन करत असल्यामुळं पुरुषांची मानली गेलेली कामं स्त्रियांना करावी लागतातच, शिवाय त्यांच्यासाठी काही खास कामं राखून ठेवलेली असतातच. श्रमविभागणीच्या संदर्भात आधुनिकतेचा पुरस्कार करताना, एखादा पुरुष आपल्या आई / बायकोला घरकामात / स्वयंपाकात किती ‘मदत करतो’, अशी कौतुकानं वर्णनं केली जातात. पण ‘स्वयंपाक – घरकाम ही कामं स्त्रियांचीच’, या मध्ययुगीन समजुतीतून आपण बाहेर पडलेलो नाही – याचा त्या आधुनिकतेला विसर पडतो. या समजुतींचा पगडा पाठ्यपुस्तकांवर असल्याचं ‘निरंतर’ला आढळलं. श्रमविभागणीविषयीच्या अशा विचारांमुळं मानवी जीवनातल्या खाजगी आणि सार्वजनिक गोष्टींची विशिष्ट प्रकारची मांडणी होते. स्त्रियांची कामं घरगुती म्हणजे खाजगी तर पुरुषांची अर्थार्जनाची म्हणजे सार्वजनिक असं मान्य केलं जातं.

Streevadi Bhumika‘निरंतर’च्या अभ्यासानुसार संस्कृत पाठ्यपुस्तकांमधून आळस आणि परिश्रम या दोन मानवी वृत्तींना दुर्गुण व सद्गुण अशा गटांमधे विभागून प्रचंड श्रम करणं अगदी ‘नैसर्गिक’ असल्याचं मांडलं जातं. ‘मेहनतीचं फळ’ ही संकल्पना सर्व राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमधे आढळते. पण रात्रंदिवस खपून, प्रचंड मेहनतीनंतरही गरिबीच्या चक्रातून बाहेर पडू न शकणार्यार बहुसंख्यांबद्दल पाठ्यपुस्तकं काही बोलत नाहीत. ‘यशस्वी’ होण्यासाठी मेहनतीबरोबर जी सामाजिक – सांस्कृतिक परिस्थिती जबाबदार असते तिच्याविषयी मौन बाळगून पाठ्यपुस्तकं श्रमाच्या ‘संस्कारा’तून सत्ताधारित संघर्षांना बगल देतात. महाराष्ट्रातल्या पाठ्यपुस्तकातही ही वृत्ती अनेकदा आढळते.
श्रमांविषयी बोलताना त्यातल्या भौतिकतेबद्दल कोण कोणती कामं कोणासाठी करतंय याविषयी न बोलता श्रमांना romanticize करण्याचा पाठ्यपुस्तकांचा प्रयत्न असतो. उदाहरणार्थ पश्चिम बंगालच्या English Reader मधे चर्मोद्योगाबाबतचा एक पाठ्यांश आहे. चर्मोद्योगातल्या सर्वात अवघड अशा कातडी कमावण्याच्या कामाविषयी, त्यातल्या जातीभेदांविषयी, त्या कामाच्या अप्रतिष्ठेविषयी न बोलता, चर्मोद्योग म्हणजे फॅशन डिझाइनिंग असा आव आणला आहे. श्रमांना या प्रकारे romanticize केलं की स्त्रियांच्या श्रमांना त्याग, सेवाभाव, कर्तव्य, उपजत वृत्ती, निसर्गनियम अशा भावनांशी जोडता येतं. स्त्रियांच्या श्रमांविषयी असणारं मध्यमवर्गीय, पुरुषी आकर्षण पाठ्यपुस्तकांमधून वारंवार दिसतं. वडील वर्तमानपत्र वाचत असताना आईनं कामात ‘रमलेलं’ असणं म्हणजे पुरुषांना बौद्धिक आनंद मिळावा म्हणून स्त्रियांनी सेवाभाव दाखवणं हे चित्र या आकर्षणाचा भाग आहे. ‘निरंतर’ला आढळलेल्या अशा चित्रांसारखी चित्रं आपणही अनेकदा पाठ्यपुस्तकांत पाहात असतोच. श्रमांना एकदा romanticize करायला सुरुवात केली की अशी चित्रं स्वाभाविक वाटू लागतात. ती तशी वाटत राहिली तरच स्त्री-पुरुषांच्या श्रमांमधली शारीरिक विरुद्ध बौद्धिक विभागणी टिकून राहू शकते. श्रमांचं उदात्तीकरण करण्यासाठी पाठ्यपुस्तकांमधून महात्मा गांधी, अब्दुल कलाम अशी प्रतीकं वापरली जातात. महात्मा गांधींनी झाडू मारण्याचं, स्वैपाकाचं काम केलं, अब्दुल कलाम यांनी लहानपणी खूप कष्ट केले. पाणी भरण्यापासून त्यांना कामं करावी लागत असं सांगितलं जातं. ज्या श्रमांना romanticize केलं जातं ते श्रम मात्र ‘स्त्रियांची कामं’ किंवा ‘खालच्या जातींची कामं’ या वर्गवारीत मोडणारे असतात.
स्त्रियांच्या बाबतीत असो वा खालच्या जात – वर्गांच्या बाबतीत, पाठ्यपुस्तकांमधून श्रम – ‘संस्कार’ केले जातात तेव्हा बहुतांश पाठ्यपुस्तकं श्रमणार्यांमच्या शोषणाविषयी चकार शब्दही काढत नाहीत. स्त्रियांच्या बाबतीत घर हेच आदर्श कार्यक्षेत्र मानलं जात असल्यामुळं त्यांना घरातच अडकवून ठेवणार्याा श्रमांचं romanticization पाठ्यपुस्तकात होत असतं. बहुजन – श्रमिक वर्गात फारशी न आढळणारी व मध्यमवर्गाला लुभावणारी लिंगाधारित श्रमविभागणी उर्दू पाठ्यपुस्तकांमधून कामगार व निम्न आर्थिक वर्गातल्या स्त्रियांवर लादल्याचं निरंतरच्या अभ्यासकांना आढळलंय. ‘‘थकला – भागला नवरा घरी आल्यावर त्याच्या स्वागतासाठी आसुसलेली बायको तयार होऊन दारात उभी आहे.’’ हे एक महत्त्वाचं मध्यमवर्गीय स्वप्न. अशी स्त्री मक्तांबा जामिया – ८ या उर्दू पुस्तकात एका फेरीवाल्याची बायको म्हणून दाखविण्यात आली आहे. ‘‘…. त्याचे हातपाय धुवायला ती त्याला पाणी देते. उन्हाळ्याच्या दिवसात तो जेवायला बसला की त्याच्या शेजारी बसून ती त्याला पंख्यानं वारा घालते.’’ अशी साद्यंत वर्णनं पाठ्यपुस्तकांतून येतात तेव्हा स्त्रियांच्या श्रमांना घरांच्या कोंदणात बसवून मध्यमवर्गीय पुरुषी स्वप्नांच्या सार्वत्रिकीकरणाचा प्रयत्न चाललाय का, असा प्रश्न आपल्याला पडतो.
लिंगाधारित श्रमविभागणीचा इतका सोस पाठ्यपुस्तकांना आहे की प्राणीजगतावरही ही विभागणी ती लादतात. तामिळनाडूच्या पहिलीच्या पुस्तकात घरं बांधणार्याे प्राण्यांची गोष्ट आहे. काम करणारे प्राणी मानवी वेशभूषेमधे दाखवले असून कुशल – अकुशल कामांची त्यांच्यामधील विभागणीसुद्धा बांधकाम मजूर स्त्री-पुरुषांप्रमाणेच दाखवलेली आहे, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
विविधतेत एकता हे भारतीय समाजजीवनाचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. ‘Textbook Regimes’ मध्ये अभ्यासलेल्या पाठ्यपुस्तकांमधे प्रांत, भाषा, गोष्टी, परिस्थिती या सर्वांची मोठी विविधता आहे. पण लिंगाधारित श्रमविभागणी श्रमांमधल्या संघर्षांकडं, सत्तासंबंधांकडं कानाडोळा करणं या बाबतीत देशभरातल्या या पाठ्यपुस्तकांमधे कमालीची एकता आहे, असं खेदानं म्हणावं लागतं.

मोबाईल – ९४२३५८६३५१
kishore_darak@yahoo.com