पहिली पायरी – मनातलं बोलणं

मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवले, ता. मावळ, जि. पुणे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करते. मागच्याच वर्षी या शाळेत माझी बदली झालीय. माझ्याकडे इयत्ता सातवीचा वर्ग आहे.

मला नेहमी असं वाटतं की मुलांनी आपल्याशी मनमोकळं बोललं पाहिजे. कारण मुलांजवळ बोलण्यासारखं खूप असतं, बोलण्याची इच्छा असते पण ऐकणारं माणूस त्यांना भेटत नाही. मुलंही एवढी चाणाक्ष असतात की, पुरेसा मोकळेपणा असल्याशिवाय कुणाजवळही आणि कुठेही ती असं बोलत नाहीत. बर्यााच शाळांमधे शिस्तीच्या नावाखाली मुलांना फक्त ऐकवतात. चांगलं शिकण्यासाठी तर मोकळ्या वातावरणाची फार गरज असते. म्हणून वर्गातील वातावरण मोकळं ठेवण्यासाठी मला काय करता येईल यावर माझा विचार सुरू झाला.

सुरुवातीला मी मुलांना आवडतील, त्यांना बोलता येईल अशा विषयांवर गप्पा मारायला सुरुवात केली. प्रतिसाद तसा कमी होता. पण ही सुरुवात होती. काही मुलांना बोलतं करावं लागत होतं.
याशिवाय सर्व विषय मीच घेत असल्यानं वेळापत्रकाच्या भिंती मला लवचीक करता यायच्या. मी मुलांनाच विचारत असे, ‘‘आता कोणत्या विषयाचा अभ्यास करूया?’’ मग सर्वाधिक मुलांच्या पसंतीनुसार विषयाची निवड होत असे.

एका विषयातून दुसर्या विषयात प्रवेश करण्यापूर्वी मी एखादा विनोद सांगत असे, छोटा खेळ, गंमतशीर गाणे अशा प्रकारच्या मोकळिका घेत असे.
मुलांच्या म्हणण्याचा मी आदर करत्येय हे त्यांना कळल्यावर त्यांच्या आणि माझ्यातलं अंतर हळूहळू कमी होऊ लागलं. याची प्रचितीही येऊ लागली. ‘‘कोणत्या विषयाचा अभ्यास करूया?’’ या प्रश्नावर ‘English’ असं उत्तर मिळालं की माझा पुढचा प्रश्न असायचा ‘का बरं?’ ‘This is our favourite subject’
Anna-3.jpg
‘मजा येते’, ‘मी इंग्रजीत बोलायला लागलो की आईला लै भारी वाटतं’, अशी उत्तरं मिळायची. गणिताच्या निवडीला ‘सकाळी सकाळी गणितं छान समजतात’ असं उत्तर मिळायचं.

याशिवाय मोकळ्या वातावरणाची थोडी सवय होऊ लागल्याने स्वतःला पडणारे प्रश्नही काही मुलं विचारू लागली. उदा. चित्रात पाण्याचा रंग निळाच का दाखवतात? पाण्याबाहेर आल्यावर जास्त थंडी का वाजते? इ.इ. मीपण येणार्याा प्रत्येक प्रश्नाचा आदर ठेवून मुलांना समजेल अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असे. तसंही संपूर्ण अभ्यासक्रमात मुलांनी इतरांना प्रश्न विचारण्याची संधी अभावानेच मिळते. माझ्या वर्गात मात्र मुलं या संधीचं सोनं करू लागली. एकाच्या प्रश्नाला दिलेली शाबासकी इतरांना नकळत प्रोत्साहन द्यायची. परिणामी मला प्रश्न विचारणार्यां ची संख्या हळूहळू वाढू लागली. असाच एक सुखद अनुभव मी नुकताच घेतला.

शाळेच्या दारात पोहचताच एक विद्यार्थी धावतच माझ्याकडे आला. मी गाडीतून उतरलेही नव्हते तोच त्याचे प्रश्न माझ्यावर आदळले. ‘‘बाई, हे अण्णा हजारे कोण आहेत? त्यांना अटक का झाली? उपोषण म्हणजे काय? सगळ्या चॅनेलवर त्यांच्याच बातम्या ! पण मला त्यातलं काहीच कळलं नाही. तुम्ही सांगा ना प्लीज !’’ त्याच्या बोलण्यातून त्याची अस्वस्थता जाणवत होती.

दहा-पंधरा मिनिटांच्या फरकानं दोन मुली परत हेच प्रश्न विचारू लागल्या. मग मात्र मी लगेचच अण्णा हजारेंचं सैनिकी जीवन, राळेगणसिद्धीचा त्यांनी केलेला कायापालट, भ्रष्टाचार – उपोषण म्हणजे काय अशा मुद्यांपासून लोकपाल विधेयकापर्यंतची माहिती मुलांना समजेल अशा पद्धतीने सांगितली. सारा वर्ग शांतपणे ऐकत होता. भ्रष्टाचार करणार्यां बद्दल राग, अण्णांविषयी आदर अशा अनेक संमिश्र भावना मुलांच्या चेहर्याचवर दिसत होत्या.
Anna-1.jpg

एक मिनिटभर वर्गात शांतता पसरली. नंतर मात्र एकेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. ‘‘किती भारी ना अण्णा हजारे !’’ ‘‘देशासाठी ते किती दिवस उपाशी राहतात, आपण एक वेळ पण उपाशी राहू शकत नाही.’’ प्रत्येकालाच काहीतरी बोलायचं होतं, एकानं मांडलेल्या मुद्यावर आपलं मत द्यायचं, तर कधी त्याचं म्हणणं खोडून काढायचं होतं. या चर्चेत काही मुलं इतराचं म्हणणं नीट ऐकून घेऊन मगच बोलत होती. काही जणांमधे मात्र तेवढा धीर नव्हता. अशा वेळी मला मधे पडावं लागलं. पण या चर्चेत ‘‘आपल्याही गावातले लोक भ्रष्टाचार करतात, पैसे खातात, आपण मोठ्ठे झालो की हे सगळं थांबवायचं. सगळ्यांनी आपलं काम प्रामाणिकपणानं करायचं.’’ ‘‘अन्याय झाला तर अण्णा हजारें सारखंच मारामार्या न करता पण भांडायचं.’’ अशा प्रतिक्रिया आल्या पण काही ठरावीक मुलंच जास्त बोलत होती.

चर्चेचा पहिला भर ओसरल्यावर मी म्हटलं, ‘‘अण्णांबद्दल तुम्हाला काय वाटलं, ते सगळ्यांनी जमेल तसं लिहून काढा.’’ पडत्या फळाची आज्ञा स्वीकारून लगेचच मुलं लिहिती झाली. लिहितानाही मुलं फार गंभीर झाल्यासारखी वाटू लागली. माझीही उत्सुकता वाढली होती.

या प्रतिक्रिया वाचताना मला जाणवलं की मी सांगितलेली माहिती मुलांनी त्यांच्या अनुभवाशी जोडून घेतली होती. हे मला अनपेक्षित होतं. काहींनी अण्णा हजारेंची बाजू घेण्याचं ठरवलं तर काहींनी त्यांच्याचसारखं प्रामाणिक होऊया असंही ठरवलं. अण्णांसारखा आपणही आपल्या गावाचा कायापालट करू शकतो असा विश्वास काहींना वाटला तर काही Anna Hajare is Great एवढ्यावरच थांबले.
मुलांना प्रश्न पडणं, ते त्यांनी विचारणं, त्या निमित्तानं त्यांच्या विचारांना धुमारे फुटणं हे सगळं या ठिकाणी घडलं होतं.