…न होता मनासारिखे दुःख मोठे

निसर्गदत्त देह आणि नितळ निरागस
मन घेऊन जगण्याच्या खेळात
आपला प्रवेश होतो.
मात्र पुढे हा खेळ…
खेळ राहत नाही.
असं का होतं?

n hota mana sarikhe.jpg

‘खेळ’ हा शब्द उच्चारताना आपल्या मनात स्वाभाविकपणे उमटणारी त्या गोष्टीची प्रतिमा बहुतांशी रंजनात्मक असते. ज्यात मन गुंतले, काही काळ मजेत गेला, झालीच तर थोडीफार शिक्षणाला मदत झाली, शारीरिक हालचाल घडली किंवा नाही, ज्याला खिलाडूपणा वगैरे म्हणता येईल असे काही गुण रुजले तर रुजले… इतपतच माफक अवकाशात आपण बहुतेकांनी खेळ या गोष्टीला दैनंदिन जगण्यात स्थान दिलेलं असतं. खेळाची करियर, त्यातले मॅनेजमेंटचे संदर्भ ही त्यामानानं नवखी गोष्ट आहे. गांभीर्यानं त्याकडे वळणार्यांंची संख्या अजून कमी आहे. त्यामुळे तूर्त, आपण ते बाजूला ठेवू.

खेळाची सर्वसाधारण व्याख्या व्यापक करत नेली तर आपल्याला काय दिसतं, सापडतं? खेळ या गोष्टीला आपण कसे सामोरे जातो? आपण खेळतो म्हणजे काय करतो? खेळाला सुरुवात करताना आणि खेळ संपताना काय घडलेलं असतं? खेळानं आपल्या जगण्यात काही फरक पडतो का? हे माझ्या कुतूहलाचे प्रश्न आहेत.

या ठिकाणी प्रथमतःच एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की खेळ याची माझी व्याख्या विस्तारित आहे. ती मी जगण्याशी जोडून घेतो आहे. त्यामुळे कदाचित, वाचताना आपल्या मनात असलेली खेळाची संकल्पना आणि मी मांडू पाहतोय तो खेळाचा परीघ यात अंतर पडण्याचा संभव आहे.

‘खेळ’ ही आपल्या जगण्यासाठीची अत्यंत चपखल मेटॅफर आहे असं मला वाटतं.

त्यासाठी काढायची झाली तर अनुभवामृतातल्या ज्ञानेश्वरांची साक्ष काढता येईल. ते म्हणतात, ‘शिवपार्वतीच्या मैथुनाच्या ‘खेळातून’ हे विश्वाचं बाळ जन्माला आलं. जो काही सारा पसारा दिसतो आहे ती प्रकृतीची कला. ते प्रकृतीचे प्रकटन.’

म्हणजेच असणेपणाचे दृश्यमान रूप असे हे जे काही प्रकट जग आहे तो मुळात, आदिम खेळातूनच प्रकटलेला आविष्कार आहे. शिवपार्वती बाजूला ठेवून आपल्या स्वतःच्या जन्मापासून सुरुवात करू.
आपलाही जन्म मैथुनाच्या खेळातूनच झालेला आहे. त्यातूनच या जगण्याच्या खेळात आपला प्रवेश झालेला आहे. जगण्याच्या खेळात आपण स्वेच्छेने सामील झालो असं आपल्याला म्हणणं शक्यच नाहीये, ती आपापतः प्राप्त होणारी, वाट्याला आलेली वस्तू आहे. तिथे ना आपल्या इच्छेचा संदर्भ असतो ना तसा काही अधिकार असतो. किंबहुना ज्या ‘आपण’चा उल्लेख करतो आहोत त्या ‘आपण’ या अस्तित्वालाच काही संदर्भ नसल्यामुळे इच्छे-अनिच्छेशी संबद्ध असण्याचा संदर्भही अप्रस्तुत ठरतो.

पोहणं शिकताना (पूर्वीच्या काळी, पालक-पाल्य समजूतदार संवादपूर्वकाळात) ज्या पद्धतीनं मोठी माणसं लहान पोेरांना प्रवाहात ढकलून देत तद्वतच (आपण) जगण्यात, या खेळात ढकलले जातो. जगणं आपल्याला प्राप्त होतं.
‘ऍज ईज व्हेअर ईज… आता बघा काय ते’ असं लिलावात काढल्यासारखं आयुष्य आपल्याला लाभतं.

तो खेळ, मग काहीएका कालावधीपुरता आपल्याकडून खेळला जातो आणि एका क्षणी त्या खेळातला आपला सहभाग संपतो, वास्तवातून आपण नाहीसे होतो.
आपल्यापुरती खेळाची इतिश्री होते. देहाचा मृत्यू होतो. आपला खेळ खलास होतो.

‘आधी जे अव्यक्त असतं आणि नंतरही जे अव्यक्तच असणार असतं, त्या दरम्यान व्यक्तपण प्रकटून जातं. ते येतं तेही अव्यक्तातून आणि विलीन होतं तेही अव्यक्तातच.’ असं ज्ञानेश्वर सांगतात. तो व्यक्तपणाचा कालावधी म्हणजे आपलं जगणं.
जिवंत असताना भावात्मक आणि नसताना अभावात्मक अशा दुहेरी रितीने आपला हा प्रवास, अपरिहार्यपणे जगण्याच्याच खेळाशी संलग्न राहतो.

कोणत्याही खेळाचा विचार करताना सुरुवातीला आपल्याकडे काय आहे याचा अंदाज तर असावा लागतो. पत्ते खेळताना काय पानं आहेत, क्रिकेट खेळताना कोणते खेळाडू आहेत, त्यांची प्रावीण्याची क्षेत्रं कुठली वगैरे जसं लक्षात घेतलं जातं तसं जगण्याच्या या खेळाच्या प्रारंभिक बिंदूवर आपण असतो तेव्हा आपल्याकडे काय असतं? कोणत्या साधनांनी हा खेळ आपण खेळण्याचा प्रयत्न करणार असतो?

दोनच गोष्टी निसर्गदत्तपणे आपल्याला लाभलेल्या असतात. एक… आईवडिलांच्या सहभागानं मिळालेला देह आणि दोन… नितळ, नवं, ताजं, कोणत्याही स्मृतीचा डाग नसलेलं, निरागस मन. संपूर्ण शुद्ध मनासोबत (चित्ताने) आपला जन्म होतो आणि जगण्याच्या खेळाचा प्रवास सुरू होतो.

माझ्या मते खेळातली सगळ्यात महत्त्वाची आणि मनोहर असणारी गोष्ट म्हणजे स्मृतिविरहितता. खेळ ही केवळ वर्तमानकालीन संदर्भ असणारी घटना असते. काल याने शंभर धावा काढल्या म्हणून आज… असं काहीच नसतं. आज संपूर्ण वेगळंही काही घडू शकणारच असतं आणि घडतंही. निव्वळ वर्तमानाचीच नित्य उपस्थिती खेळाला खेळ ही उपाधी प्राप्त करून देत असते.

खेळाची सुरुवात तर योग्य पद्धतीनं होते. मग पुढच्या प्रवासात असं काय घडतं की खेळ, खेळ न उरता क्लेश निर्माण करणारा, संघर्षांनी भरलेला, सतत लढायला लावणारा नकोसा वाटणारा अनुभव होऊन बसतो?
यासाठी जगण्याच्या संपूर्ण प्रवासाचा आपल्याला खेळाच्या अंगानं लेखाजोखा घ्यायला हवा.

संपूर्ण शुद्ध मनासोबत जगणं प्राप्त होताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते. ती आपापतःच मिळालेली असते. जन्मासोबत आपण नात्यात येतो. (नात्यांमुळेच नंतर गोत्यात येतो हा विनोदाचा भाग सोडा.)
आपल्यासोबत नाती जन्माला येतात असं म्हणण्यापेक्षा आपला जन्म नात्यात होतो हे खरं आहे. आपल्या जन्मापूर्वीच आपली आई ही, आई या नात्यात असतेच, आपलं पितृत्व कुणाकडेतरी असतं. आसपासचा आपला भवताल, परिसर निश्चित झालेला असतो. सगळी तयारी पूर्ण असते. या सगळ्यात शेवटी येणारा तो ‘नवा जीव’ असतो.

निसर्गातली, सृष्टीतली कोणतीच गोष्ट पृथक पृथक नसते; जे काही असतं ते सगळं नात्यातच असतं असं योग म्हणतो ते खरंच आहे.

होता होता आपण जगू लागतो. जगण्याच्या खेळात पावलं टाकू लागतो. सुरुवातीला आपण सगळ्यांच्या परिचयाचे असतो पण सगळे आपल्या परिचयाचे नसतातच. मग हळूहळू आपण सगळ्याची ओळख करून घ्यायला लागतो.
आधी परिवाराशी, मग समाजाशी आणि सृष्टीशी अशा पद्धतीनं नात्यांचा परीघ विस्तारत जात नवा जीव खेळात रमू लागतो.
त्या रमण्यातूनच गडबड व्हायला सुरुवात होते.

लहान मुलाचं भान जागं नसतं. जे येतं त्याला तो केवळ सामोरा जात असतो. त्यातनं नकळत एक गोष्ट व्हायला लागते.
नवा जीव गोष्टी बघायला, ऐकायला, अनुभवायला लागतो. त्यांचे ठसे मनावर (चित्तावर) उमटू लागतात. नुसते उमटतात असं नाही तर त्यांची साठवणूकही व्हायला लागते.
ज्यांच्या सोबतीनं तो जीव जगत असतो त्यांच्या सूचनांनुसार तो साठा, त्याला ‘आशय’ असाही सुंदर प्रतिशब्द आहे, वाढू लागतो, घडू लागतो. त्या परिसराशी सुसंगत असा त्याला आकार यायला लागतो. या सूचना दरवेळी अगदी प्रकट असतात असं नाही. खूपदा त्या अप्रकट आणि वातावरणात वावरणार्या ही असतात. त्यात सुखाचे मानलेले क्षण असतात, ठरलेल्या दुःखांचे क्षण असतात, चांगल्या वाईटाचे निश्चित निकष असतात, कधी नुसती माहिती असते… काहीही असतं; परंतु त्यातनं हा आशय वाढायला लागतो हे सत्य.

यापेक्षा वेगळं काही असू शकतं, असा साठा करण्याची आवश्यकता नाही याची कुणाला जाणीवही नसते आणि कुणालाच नसते त्यामुळे आपल्यालाही होत नाही.
या साठ्याला ‘स्मृती’ असं नाव दिलेलं आहे. स्मृती ही जगण्याच्या खेळातलं आपल्याकडचं महत्त्वाचं आयुध, अस्त्र आहे ही आपली समजूत असते किंवा करून दिलेली असते. ती जितकी मोठी तितका जगण्याच्या खेळाला उपयोग… असा मतप्रवाह असतो.

पुढे जाण्यापूर्वी एका गोष्टीची इथे नोंद घ्यायला हवी. जगणं हा खेळ आहे आणि त्याच सहजतेनं तो खेळला पाहिजे याचं एका स्तरावर आपल्याला उपजत भान असतं. मात्र ते नाहीसं कधी होतं आणि जगणं हे युद्ध आहे, ते जिंकण्यासाठीच प्रयत्न करायला हवा, लढायला हवं अशी आपली कल्पना कधी व्हायला लागते हे काहीसं गूढच आहे.
कदाचित औपचारिक शिक्षणाच्या सुरुवातीचा ह्यामागे हात असू शकतो. असो !
खेळ या संकल्पनेशी अधिकाधिक फारकत होण्यात स्मृतीचा मोठा वाटा असतो. तो कसा?

‘स्मृती’ ही मूलतः मृतच असते. मात्र ती मृत आहे याचं कोणतंही भान आपल्याला नसतं. आपल्या लेखी ती फार मोठी जिवंत, आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट असते. त्यावर अवघं जगणं जसं तोललेलं असतं. मृत वस्तूंचे ढीगच्या ढीग आपण चित्तात जमा करून ठेवतो. नुसते जमा करतो असं नाही तर ती आधाराची, गरजेची गोष्ट आहे, त्याशिवाय जगणं अशक्य असा भ्रमही निर्माण करून घेतो.
सामान्य खेळात, एकाचा जिवंत वर्तमान दुसर्याेच्या जिवंत वर्तमानासामोरा उभा ठाकतो. जे काही होतं ते दोन जिवंत गोष्टींदरम्यान.

प्रत्यक्ष जगण्यात मात्र नित्य नूतन वर्तमान विरुद्ध मृत स्मृती असा संघर्ष सतत उभा राहतो आणि मृत गोष्टीला अपरंपार महत्त्व देण्याच्या आपल्या मानसिकतेनं नवजात वर्तमानाकडे आपण दुर्लक्ष करू लागतो. ताज्या फुलाला निर्माल्याच्या अनुषंगाने तपासण्याचा हा सगळा खटाटोप. आणि तेच योग्य आहे, तसंच केलं पाहिजे, त्याला पर्याय नाही अशी आपली त्यातनं घट्ट होत जाणारी धारणा. जगण्यातल्या जवळपास प्रत्येक गोष्टीचा निवाडा, आपण मृत स्मृतीच्या आधारावर लावू बघणं ही स्मृतिबद्धता. स्मृतिबद्ध रितीने जगण्याला सामोरं जाण्याला ‘अनुभवी’ असं समजण्याची आपल्याकडे प्रथा आहे.
खरं तर जगण्याच्या खेळातला ‘स्मृतिबद्धता’ हा सगळ्यात मोठा ‘फाऊल’ मानला पाहिजे.

स्मृतिबद्धतेसोबत लक्षात घेण्याचा आणखी एक भाग आहे तो म्हणजे ‘अपेक्षा’.

अमुक पद्धतीनं, प्रकारानं एखादी गोष्ट व्हावी, घडावी, आकाराला यावी ही इच्छा म्हणजे ‘अपेक्षा’. अपेक्षेचा संदर्भ भविष्यकालाशी आहे असं प्रथमदर्शी वाटत असलं तरी, तो भविष्यकाल आपला आपण, स्वयंभू पद्धतीने उदयाला आलेला नसतो. त्यानं भूतकालातूनच जन्म घेतलेला असतो. स्मृतीच्या मृत पुरातन साठ्यातून निर्माण झालेल्या इच्छा, वासनांचं भविष्यकालावर प्रक्षेपण केलं की अपेक्षा निर्माण होते हे आपल्या लक्षातच येत नाही.
या ठिकाणी हेही लक्षात घ्यायला हवं की विचार हासुद्धा मूलतः मृतच असतो कारण त्याचाही उगम निर्जीव स्मृतीतूनच होतो. नवा विचार असं काही नसतं. जे नवीन वाटतं ते गेलेल्या जुन्याचंच नवं वाटणारं रूप असतं इतपतच.
विचारामुळेच अपेक्षा उदयाला येते.

वेगळ्या अर्थानं ‘अपेक्षा’ हे स्मृतीचंच अर्भक असतं. त्यामुळे तेही मेलेलंच असतं. मात्र ते तसं नाही, ही आपली पारंपरिक मानसिकता त्याला इंधन पुरवून पुरवून जिवंत करण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहते.
स्मृती जशी आपण भूतकाळातून ओढून वर्तमानावर लादतो तसंच अपेक्षांचं भविष्यकालीन भासमान ओझंही आपण वर्तमानाच्या बोकांडी घालतो. या प्रकारात गुदमरून जाणार्याम ‘आत्ताचा’ श्वास आपल्याला जाणवतही नाही. वर्तमानाला आपण विन्मुख होतो. ज्या ज्या क्षणी आपली वर्तमानाशी संगत सुटते त्या त्या क्षणी आपण खेळ व्याख्येपासून दूर गेलेलो असतो हे आवर्जून लक्षात घ्यायला हवं.
‘खेळणे’ म्हणजे वर्तमानात सातत्यपूर्ण रितीने उपस्थित असणे.

स्मृती-अपेक्षांच्या ओझ्यानं हे होऊ शकतं का?

स्मृतिबद्धतेसारखाच जगण्याच्या खेळात आपल्याकडनं होणारा ‘अपेक्षा’ हा दुसरा मोठा फाऊल.

यदाकदाचित याची जाणीवही न होता मी खेळत राह्यलो तरी माझी मनोवस्था काय असते?

माझ्या अपेक्षेप्रमाणे झालं म्हणजे मी जिंकलो आणि माझ्या अपेक्षेविपरीत झालं की मी हरलो एवढीच जिंकण्या हरण्याची आपली ढोबळ संकल्पना बनून राहिलेली असते. त्या चिल्लर गोष्टीपाठी आपण आपलं जगणं पणाला लावतो आणि मग खेळ हा खेळ न राहता हारजीत होण्याशी संलग्न असं युद्ध उभं करतो.

यात लढताना आपण कधी घायाळ होऊन जातो तर कधी शिखरावर पोहोचल्यासारखे वागतो.
प्रत्यक्षात घडलेलं काहीच नसतं. खेळातलं एखादं पान उलटसुलट झालेलं असतं इतपतच.
आपण मात्र त्याच्याशी निर्माण केलेल्या सारूप्यतेमुळे खेळातली सगळी मजाच गमावून बसतो.

या सगळ्यात असणारा सर्वात महत्त्वाचा धोका म्हणजे या कशाचंही आपल्याला जागरूक अवधान नसतं. आपण कधी क्षणभर थांबत स्वतःकडे बघत नाही की जगताजगता स्वतःचं जगणं तपासत नाही. जू निघालेल्या बैलासारखे आपण रानोमाळ उधळत राहतो, जगत जातो.

या सगळ्यासोबत आपल्या नकळत आपल्यात आणखी एक गोष्ट रुजत राहते ती म्हणजे ‘अधिकाराची जाणीव’.
जगताना काही गोष्टी आपल्या वाट्याला येतात. काही आपण कष्टानं मिळवल्या असंही वाटायला लागतं. कष्ट आणि फळ यांचं आपल्या मनात नकळत समीकरण तयार होऊन बसतं. जसजशी फळांची म्हणजेच तथाकथित यशांची चळत वाढायला लागते तसतशी आपण या यशाला, या अधिकाराला पात्र आहोत याविषयी आपली आतून खात्री पटू लागते.

स्मृती-अपेक्षेसोबत अधिकाराची ही जाणीव आपला हळुवारपणे कब्जा घेते. त्यातनं आपल्याभोवती आणखीन एक बंध तयार व्हायला लागतो. ‘मी आजवर हे केलं, ते केलं, असं यश मिळवलं, त्यासाठी अमुक केलं…’ ही सगळी वाक्यं आतल्या अधिकाराच्या जाणिवेचीच प्रतिबिंबं असतात. हळूहळू अधिकाराचा अंमल पसरू लागतो. कोणताही अधिकार विशिष्ट रचना जन्माला घालतो तशी कुणी वर कुणी खाली अशी व्यवस्था जन्माला येऊ लागते. ती सोयीचीही वाटायला लागते. हे अधिकाराचं प्रकरण व्यावहारिक स्तरावर असतं तोवर ठीक असतं. पण दुर्दैवानं ते तसं पृथक राहू शकत नाही. त्याचा नातिक सत्ताकारणातही प्रवेश होतो.
नात्यातल्या संभाषणांना अधिकाराची सहेतुक झालर लागायला लागते.

खेळात मागच्या पुण्याईचे, विजयाचे, चालींचे, हेतूंचे मोल सद्य डावात मागता येत नाही, आता मात्र तसे न होता जगण्याच्या ‘खेळात’ याशिवाय पुढची चाल अशक्य झाल्यासारखी स्थिती उत्पन्न होते.
या टप्प्यावर जगणं खेळाच्या मूलभूत व्याख्येपासून खूप दूर आलेलं असतं.
हा अधिकार तरी कुठून येतो? जरा खोलात जाऊन तपासलं तर पुन्हा आपल्या लक्षात येतं की ह्याचीही जननी स्मृतीच आहे. ज्या मृत कचर्या च्या ढिगाचं आपण जिवापाड जतन करू बघत असतो तिथून आणि त्यातूनच अधिकाराचाही उगम झालेला असतो.

मिळवलेलं वाटणारं कोणतंही यश किंवा काहीही, त्या मिळण्याच्या क्षणानंतर जिवंत कसं राहू शकेल? तो क्षण सरताच त्याचा मृत्यू निश्चित असतो. तसा तो होतोही. मात्र त्या मृत्यूनंतरही आपण मात्र अधिकाराला कवटाळून बसतो. असा अधिकार पुढच्या क्षणाला, गोष्टीला, वस्तूला, अनुभवाला जिवंत राहू देतच नाही. वर्तमान सामोरा उभा राहताच तो त्वरेनं स्मृतीत ढकलण्याचा, त्याला कप्पाबंद करण्याचा प्रयत्न तो करत राहतो.
जगण्यातल्या खेळातला हा तिसरा फाऊल.

काही माणसांची, माहिती असलेलं, नसलेलं काहीही समोर आलं तरी जवळपास अनैच्छिक असल्यासारखीच एक प्रतिक्रिया येते, ‘…मला माहितीच आहे ते…’ किंवा ‘मला माहितीच होतं असं होणार होतं ते…’
हे काय सांगतं? कशाचं घोतक आहे हे म्हणणं?

हा, जिवंत अनुभव अधिकार वापरून मृत करून घेण्याचा प्रकार आहे.

जिवंतपणाला सामोरं जाण्याऐवजी एकदा का तो अनुभव स्मृतीत ढकलला की त्यातनं मग नवं अनपेक्षित जन्म घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ज्याक्षणी स्मृतीचा चष्मा डोळ्यांवर येतो तेव्हा स्पष्ट आणि यथार्थ कसं दिसणार? जे काही दिसणार ते स्मृतीच्या अधीन असणारं, स्मृतीला मानवणारं, स्मृतीवर शिलालेखाप्रमाणे कोरलेलंच असणार आणि गाभ्यातून मेलेलंच असणार.
वेगळं काहीही नाकारलं जाणार. ह्यातनं पूर्वग्रह आणि गंड अधिकाधिक गडद आणि घट्ट होत जातात आणि आपण नव्याला पारखे – पारखे होत जातो.
आणखीन जरा खोलात उतरलं तर काय दिसतं?

या सगळ्याचा संदर्भ सुरक्षितपणाशी किंवा सुरक्षितपणाच्या आपल्या कल्पनांशी गुंतलेला असतो. सुरक्षितता म्हणजे अपेक्षिततेतून निपजणारे फळ. आपल्याला अपेक्षित तेच घडण्यानं सुरक्षितता वाटते. कोणतंही उदाहरण तपासायला हरकत नाही. अगदी मुलाची शाळेतली ऍडमिशन ते नात्यातल्या दुसर्यातच्या वागणुकीतली प्रेडिक्टॅबिलीटी. जेव्हा जेव्हा आपल्या इच्छेविपरीत घडतं तेव्हा तेव्हा आपण अस्थिर का व्हायला लागतो? तसं स्वच्छ म्हटलं नाही तरी आपल्याला असुरक्षित का वाटायला लागतं?

खेळाचा सगळा संदर्भ जिवंतपणाशी म्हणूनच अनपेक्षिततेशी आहे आणि कदाचित हेच आपल्याला नको असतं म्हणून जसजसे आपण मोठे व्हायला लागतो तसतसे खेळातून, अगदी साध्यासाध्यासुद्धा आपण बाजूला राहू लागतो. खेळात भाग घेण्याचं टाळू लागतो. भाग न घेण्यानं आपल्याला सुरक्षित वाटतं का?

मुळात सुरक्षितपणाची कल्पनाही स्मृतीतूनच जन्मलेली असते. त्यामुळे त्या अर्थानं तीही मृतच. जे काही जिवंत असतं त्यात अनपेक्षितता शिगोशीग भरून असते. किंबहुना अनपेक्षिततेतच जिवंतपणा निपजू शकतो. मात्र अनपेक्षितपणाविषयी आपल्या मनात भयगंडच तयार झालेला असल्यामुळे जिवंत असणारं काहीही नाकारण्याकडे आपला कल झुकतो.
कोणत्याही गोष्टीला, स्वच्छ दृष्टीशिवाय समजावून घ्यायला नकार हा जगण्याच्या खेळातला चौथा महत्त्वाचा फाऊल.

रेड कार्डच खरं तर.

खरं तर इथेच, या टप्प्यावर आपण खेळातून बाहेर पडायला हवं. मात्र तोवर जगण्याचा बराचसा प्रवास पार पडलेला असतो. आपण स्वतःला अनुभवी वगैंरे समजायला लागतो. हा सगळाच खेळ आपल्याला समजलाय आणि तो इतरांना समजावणं आपलं कर्तव्य आहे अशा भ्रमानं मनात ठाण मांडलेलं असतं.

त्यातनं मग पुन्हा अधिकाराचा जन्म. तो प्रकट करणारी काही उदाहरणे, ‘आमचे केस काय उगाच पांढरे झालेत का?अमुकतमुक पावसाळे बघितलेत आम्ही. आम्हाला समजलंय काय योग्य काय अयोग्य ते….’
मग हा खेळ मी म्हणीन तसाच खेळायचा, मी सांगेन तीच पद्धत, मला हवा तसाच त्याचा निर्णय हवा अशा पद्धतीची चिरेबंदी बांधणी मनात आकाराला येऊ लागते. मृत स्मृतीचा त्याला आधार लाभतो.
‘मला हवंय ते तू तुझ्या इच्छेनं, तुला हवंय म्हणून, तू कर’ ही आपली जवळच्या नात्यांकडनं मागणी व्हायला लागते. बापमुलाचं नातं घ्या. आईलेकीचं नातं घ्या नाहीतर मित्रमैत्रिणींचं, मित्रमित्र किंवा कुठलंही नातं घ्या. हीच अपेक्षा. बरं अपेक्षा का तर तू माझ्या जवळचा आहेस. म्हणजे माझा तुझ्यावर अबाधित अधिकार…. सगळं चक्र पुन्हापुन्हा सुरू… प्रकटपणे आपण व्यक्त करत नसलो तरी जगताना असं घडावं अशी आपली इच्छा असते.
रामदासस्वामी मनाच्या श्लोकात लाख गोष्ट सांगून गेलेत… ‘न होता मनासारिखे दुःख मोठे…’ माझ्या मनासारखे झाले नाही तर मी दुःखी होणार. माझ्या दुःखाचे कारण एकच, माझ्या मनासारखे झाले नाही. मनासारखे म्हणजे काय, तर स्मृतिबद्धतेशी सुसंगत असे. ज्याची मला अपेक्षा आहे, सवय आहे, जे मला माझ्या अधिकारातले वाटते असे, जे सुरक्षितता प्रदान करते. ते घडले नाही.

त्यातनं क्लेश, मनाची निस्तरंगावस्था कोसळत, ढासळत जाणार. मन गढूळ होणार… सगळा कोलाहल. संघर्षग्रस्त मन. आणि सर्वात शेवटी आधुनिक माणसाचा लाडका शब्द… स्ट्रेस.
अस्मिता, अभिनिवेश, दुःख हे जसे क्लेश तसा सुख हाही क्लेशच असं पतंजलीही म्हणतो ते वरील अर्थानं. वृत्तींशी सारुप्याचं म्हणजे वर्तमानाचं भान जाणं. खेळाशी अनुसंधान सुटणं. खेळ खेळ न राहता त्याचं युद्धात परिवर्तन होणं.

‘खेळ हा खेळ आहे आणि तो खेळाच्या पद्धतीनं खेळला पाहिजे, त्यात आपण गुंतता कामा नये, त्याची स्मृती करून ठेवता कामा नये याचं लयाला गेलेलं भान म्हणजे अविद्या. जे विद्यमान आहे त्याकडे दुर्लक्ष करून जे विद्यमान नाही त्यात रमणे म्हणजे अविद्या.’

या अविद्येच्या क्षेत्रात आपण वसत असल्याने खेळाशी आपला संदर्भ पुरता संपून जातो. जो आनंद जगण्यातनं मिळायला हवा तो न मिळता केवळ संघर्षग्रस्त असं आयुष्य आपण ओढत राहतो. कधी गटांगळ्या खातो, कधी गुदमरतो, कधी उसळी मारत रहायचा प्रयत्न करतो.

एकच करत नाही ते म्हणजे अवधान ठेवून स्वतःकडे बघणे. आपण तसं करू शकू तर आपली सहजपणाने स्मृतिबद्धतेतून मुक्तता होऊ शकते. मुक्ती हा शब्दच स्मृतिसंस्कारशृंखलेतून बाहेर पडणे या अर्थाने प्रचलित आहे. विवेकाचे ज्ञान आणि त्यातून होणारी स्मृतीची शुद्धी हीच मुक्तता.

ती जर झाली तर पुढचं सगळं चक्रही टळू शकतं आणि रामदास स्वामी म्हणतात तसा, या जगण्यातच ‘विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी’चा प्रत्यय येऊ शकतो. वर्तमानात आपण वसू शकतो. या जगण्याचा खेळ मी मनःपूर्वक खेळलो असं खात्रीनं म्हणूही शकतो.

ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच, गीतेतला सगळा गुह्यार्थ उलगडून सांगण्याआधी श्रोत्यांना विनंती करतात आणि म्हणतात. ‘…अवधारिजो जी’. अवधान ठेवून मी सांगतोय त्याकडे लक्ष द्या. चित्ताला अति हळुवारपणा आणून सगळं जाणून घ्या.

कोणत्याही खेळाचा तोच एकमेव नियम आहे आणि तीच एकमेव पूर्वअटही.