मेंढ्या चारू पण शाळा शिकू

‘जेवढं शक्य असेल, तेवढं तरी शिक्षण प्रत्येक मुलाला मिळू दे आणि त्यासाठी आपल्याला शक्य असेल, ते ते आपण करायचंय’ ही भावना गावीतसरांनी तत्परतेने कृतीत आणली.
सक्ती, धाक, नियम, कायदे यातनं गोष्टी साधतात पण त्या तात्पुरत्या असतात. शिक्षणाची गोडी मनात रुजण्यासाठी आवश्यक असते, ती समजूत, बदलाची तयारी, सहकार्य आणि वंचितांच्या पदरातही शिक्षणाचं माप पडावं ही आच.

मुलांच्या अनुभवाला पुरेसं स्थान देऊन त्यांना आत्मविश्वास देणं तो वाढवणं हा तर अभ्यासक्रमाच्या पलीकडचं शहाणपणाचं शिक्षण देण्याचाच मार्ग आहे.

सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेलं इंजिवली हे चारशे लोकवस्तीचं छोटंसं गाव आहे. गावातील शाळेत जेमतेम वीस-बावीस मुलं शिकतात. शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत. बहुवर्ग अध्यापन, शैक्षणिक समस्या, केंद्रप्रमुखांच्या अवेळी तातडीच्या मिटिंगा, शिक्षकांच्या रजा अशा काही कारणांमुळे शालेय कामकाजाचे ताळमेळ बसवून दोन-दोन वर्गांना शिकवताना शिक्षकांना मोठी कसरत करावी लागते. तरीही या सगळ्या गोष्टींवर मात करून मुलांचा सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास करावा ही अपेक्षा शिक्षकांकडून असते. शिक्षण हक्क कायद्यानं मुलांना शिक्षण मोफत, सक्तीचं केल्यामुळे वाडी, वस्ती, पाडा, तांडा, शाळेच्या परिसरातील वीटभट्टी, फार्म हाऊस, शेतावर किंवा अन्य ठिकाणी दिसणार्‍या सहा ते चौदा वयोगटातील शालाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी शिक्षक बारीक नजर ठेवून असतात.

नुकतीच दिवाळीची सुट्टी संपून शाळा सुरू झाल्या होत्या. शाळेत जाताना रिक्शा स्टँडवर उभा असताना घडलेली ही गोष्ट. दोन मुलं मला म्हणाली, ‘‘काका, साळोख – बार्ण्याला जायला येथे रिक्शा लागत्यात व्हय?’’ मी म्हणालो, ‘‘होऽऽय की, पण तुमासनी जायचं कुठं व्हय?’’ त्यांना माझ्या या बोलण्यानं जवळीक वाटली असावी. त्यातलं ते जाणतं पोरगं पुन्हा माझ्याकडून माहिती काढू लागलं. ‘‘पर, तुमासनी जायचं कुठं?’’ त्यावर मीच त्याला उलटा प्रश्न केला, ‘‘तुमासनी जायचं कुठं ते सांगा.’’ त्यावर ती दोघं इंजवलीला असं म्हणाली. दोघांच्या तोंडात पानाचा विडा, कमरेला धोतर, अंगात फाटका, थोडासा मळकट सदरा, हातात कडं, डोक्यावर आजोबांसारखी टोपी, कानात बाळी आणि पायात अनेकदा शिवलेली चामड्याची चप्पल. एकाच्या हातात काठी तीही त्याच्याच उंचीची. रिक्शाला बसून ती माझ्या शाळेच्या गावी येणार होती. मलाही इंजिवलीला जायचं आहे असं मी सांगितल्यावर ती म्हणाली, ‘‘आमी दर वरीस इंजवलीला येतो. पर तुमासनी आज परक ओळख नाय कशी?’’ मी म्हणालो, ‘‘कशी ओळख राहील? म्या मास्तर म्हणून आलोय त्या गावात.’’ ‘काय मास्तर?’ असं म्हणून ती चार पावलं मागं सरली आणि माझ्याशी थोडं अंतर ठेवून बोलू लागली. बाजारात मेंढीची लोकर विकून त्यांच्या तांड्यावर ती परत चालली होती. ज्या वयात मुलांनी शाळेत जावं त्या वयात त्यांना अशी कामं करून आई-वडिलांना मदत करावी लागते. गरिबी, भटकं जीवन यामुळं अशी मुलं शिक्षणापासून कोसो दूर राहतात. यांना आपण थोडे दिवस का होईना शाळेत आणायचंच असं मी मनाशी पक्कं ठरवलं आणि मनातल्या-मनात योजना बनवू लागलो. मी म्हणालो, ‘काय रे, मला पण मेंढीचं लोकर विकत देणार का?’ ‘‘आवो म्या तेच इचारनार व्हतू बघा ! माझा बा म्हणत व्हता कोण गिर्हारईक गवलं तर लोकर विकायचं म्हणाव त्याला.’’ ‘‘अरे, मी लोकर विकत घेईन पण एका अटीवर.’’ ‘‘काय मास्तर कोणती अट हाय?’’ ‘‘तुमच्या बाला शाळंत आणायचं.’’ ‘‘केवढं लोकर घेणार तुमी?’’ ‘‘तीस किलो घेईन की.’’ ‘‘मग लयी मोठं गिर्हाहईक गवलं. सांगतो बाला अन् आजच साळंत आणतो बघा.’’

शाळेत पोहोचल्यावर शाळेत दोन नवीन मुलं येणार असल्याची पूर्वकल्पना मुलांना दिली. शाळेच्या दर्शनी भागावर एका हातात काठी अन् दुसर्या् हातात मेंढीचं पारडू (पिल्लू) घेतलेल्या मुलाचं चित्र काढलं. शेजारी,
‘‘शाळाबाह्य मुलगा – शेळ्या, मेंढ्या चारू, पण शाळा शिकू’’ असं वाक्य लिहिलं.

मोठ्या सुट्टीनंतर शाळा भरून अवघी दहा ते पंधरा मिनिटं झाली असतील अन् समोरून ती पोरं दोघांच्या वडिलांना घेऊन शाळेच्या दिशेनं येताना दिसली. त्याचबरोबर मी घाई-घाईनं त्यांच्या स्वागताची तयारी केली. दोघांना देण्यासाठी एक-एक बिस्किट पुडा आणवला, वडिलांसाठी शाळेच्या परिसरातील फुलांचा पुष्पगुच्छ बनवून घेतला. मी वर्गाबाहेर येऊन त्यांच्याबद्दल दाखवलेल्या आपुलकीमुळे ती कुठलाही संकोच मनात न ठेवता त्वरित वर्गात आली. त्याचबरोबर मुलांनीही त्यांचं स्वागत केलं. मुलांना अभ्यास देऊन मी त्या चौघांशी बोलू लागलो. ‘‘मी तीस किलो लोकर विकत घेईन पण त्यासाठी माझी एक अट तुम्हाला मान्य करावी लागेल.’’ त्यावर सदाचे वडील म्हणाले, ‘‘काय अट हाय मास्तर?’’ मी म्हणालो, ‘‘जोपर्यंत तुम्ही गावाच्या परिसरात तांड्यावर उतरली आहात तोपर्यंत सदा अन धोंडिबा यांना साळंत लावायचं.’’ ‘‘काय पोरांक साळंत? आमी अन् साळंत? मास्तर आमच्या पिढ्यान् पिढ्या मेंढरांच्या मागं असत्यात. ना घर ना दार, आमी रानोमाळ भटकणारी माणसं. आज इथं तर उद्या कुठं?’’ मी म्हणालो, ‘‘तुम्ही नाही शिकले पण तुमच्या मुला-बाळांना शिकवा. चार अक्षरं शिकल्यानं माणूस शहाणा होतो. दिवसभर उन्हातानात मेंढरांच्या मागे उंडारण्यापेक्षा चार भिंतीच्या आत, मुलांबरोबर बसून शिकणं काय वाईट?’’ त्यावर धोंडिबाचे वडील म्हणाले, ‘‘मास्तर, आजपरक आमच्या कुटुंबात समदी अडाणी. अंगठा बहाद्दर ! तांड्याव म्हणतील ‘‘विठू लय शहाणा झाला. लेकासनी मास्तर बनवाय निघला बघा. अशा सतरा भानगडी कोण मागं लावून घेताव. कुठं माझा बाप शिकला व्हता? तरी जगलाच की. अन् कोणाची पोरं रिकामी हाय ! गिर्हालईक शोधायचं, लोकर विकायचं, मेंढरं वळवायची तीच करत्यात की !’’ तरीही शिक्षणानं माणूस कसा सन्मानानं जीवन जगतो याची उदाहरणं देत गेलो. उपराकार लक्ष्मण मान्यांबद्दल सांगितलं.

मी लोकर घ्यायचं, त्यांनी मुलं शाळेत पाठवायची असा निर्णय होईपर्यंत त्यांच्याबरोबर थांबायचं असं मी ठरवलेलं होतं. शाळेतील घड्याळ दुपारी तीन वाजून गेल्याचं दाखवत होतं. ‘उद्यापासनं आमी पोरांक साळंत घेऊन येतो’ म्हणेसपर्यंत त्यांची मानसिकता बदलून घेतली. ती नजरेआड होईपर्यंत मनात अनेक प्रश्न निर्माण होऊन शांत झाले.

दुसर्‍या दिवशी सकाळी पंधरा-पंधरा किलो लोकराची पोती घेऊन बापलेकं शाळेत आली. पोरांच्या डोक्यावरनं हात फिरवीत बाप म्हणाला, ‘‘मास्तर लय भारी हाय. तुमासनी पाटी पेन्सिल देणार हाय बघा. समदं गवलं की नीट ठेवायचं, नीट बसायचं, मास्तर सांगल ते ऐकायचं, साळा सुटल्याव मुकाट्यानं सांजला तांड्याव परतायचं. सदाची माय म्हनत व्हती नाय बसला साळंत तर त्याला चांगला कुटा म्हणा मास्तरला. नीट ऐकलं वय. चला लेका, चला मास्तर येतो. मेंढरांच्या मागं त्याची मायच हाय तवा.’’

सदा आणि धोंडिबाचे पोशाख, आचार, विचार, राहणं, वागणं, बोलणं इतर मुलांपेक्षा अगदी वेगळं होतं. त्यामुळे या सगळ्याचा मेळ काही बसत नव्हता. जो तो कुतूहलाने त्यांच्याकडे पहात होता. बर्या च दिवसांनी शाळेला शाळापण आलं. थोड्या वेळाने ‘राजा म्हणतो’ सारखे खेळ घेतले. त्यामुळे मुलांनी आणि शिक्षकांनी आपल्याला कधी स्वीकारलं हे त्यांना कळलं नाही.

वर्गातल्या काही मुलांबरोबर बोलताना मी त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. त्यासाठी त्यांची बोलीभाषा मी आत्मसात करून घेतली. त्यामुळे त्यांच्या एकूणच समस्या समजून घेणं सोपं गेलं. त्यांच्या मनातलं शाळेविषयीचं दडपण, भीती, मला वेळीच दूर करता आली. आता ती दररोज शाळेत येऊ लागली. वयानं मोठी असल्यानं त्यांना आवडेल त्या वर्गात बसण्याची मुभा दिली.

एक दिवस कायमचा लक्षात राहील असा प्रसंग घडला. गणिताच्या तासाला त्यांच्या जीवनातील उदाहरण देऊन शाळा आणि जीवन यांची सांधेजोड करण्याचा प्रयत्न करू लागलो. वजाबाकीचं उदाहरण मुलांना घातलं. ‘‘समजा, सदाच्या वाड्यात दहा मेंढ्या कोंडून ठेवल्या आहेत. त्यातील एक मेंढी उठून बाहेर गेली तर किती मेंढ्या उरतील?’’ बरेच दिवस शांत बसून राहणार्याय सदानं हात वर केला होता. हात वर करून तो हात जोर-जोरात हलवीत होता याचं मला आश्चर्यच वाटलं. मी त्याला खुणावलं. तो म्हणाला, ‘‘मास्तर एकही मेंढी रहणार नाय,’’ मी म्हणलो, ‘‘सदा ! तुला साधं गणित समजत नाय वय, दहातली एक मेंढी गेली म्हणजे नऊ उरतील की, एकही उरणार नाही असं कसं उत्तर सांगतो?’’ त्यावर सदा म्हणाला, ‘‘म्या सांगतो तेच खरं हाय, मास्तर तुम्हासनी नाय ठावा. माझ्या तांड्याव लय मेंढ्या हाय. एखादी मेंढी जरी वाड्यातून बाहेर गेली तरी बाकीच्या सर्व मेंढ्या त्या मेंढीच्या मागं पाठोपाठ वाड्याबाहेर पडत्यात. मेंढ्यांचं वागणं मला नवीन नाय. म्या तुमासनी सांगितलेलं खरं हाय. नाहीतर म्या उद्या पासनं साळंत यायचो नाय.’’

सदा गावालगत शेतातील तांड्यावर वीस-बावीस दिवसांपासून राहत होता. शाळेचं महत्त्व पटवून दिल्यापासनं अधून-मधून शाळेत येत होता. आणि आता कुठे चार शब्द गिरवत होता. आताच कुठं रूळू लागला होता. सदा आणि धोंडिबा शाळेत आल्यापासून माझ्याही विचारात बदल होत गेला. सदाने दिलेल्या या उत्तरानं सन २०११ सालातला ठळक प्रसंग म्हणून मनात कायम घर करून ठेवलं.
त्यादिवशी सदाला जवळ घेऊन त्याचं कौतुक केलं. बावीस दिवस सदा आणि धोंडिंबा शाळेत खूप रमले. शाळेत प्रत्येक दिवशी अनेक गोष्टींची, शब्दांची ओळख करून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. अशातच तांडा गेला, तांड्याबरोबर मुलंही गेली.

मी त्यांना शाळेत कायमस्वरूपी ठेवू शकत नव्हतो. तरी मी त्यांना शाळेत आणण्याचा एवढा खटाटोप का केला असेल? तर त्यांनाही शाळेचा परिचय व्हावा, शाळा ही चांगली गोष्ट आहे याची जाणीव व्हावी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, शाळेतील मुलांना वंचितांचं जीवन कळावं म्हणून.
शिक्षकांच्या व्यवसायाचं काही वेगळेपण देखील आहे. त्याच्या कार्यांचे परिणाम दूरगामी असतात. बाह्यभौतिक जीवनापेक्षा आंतरिक जीवनाशी, भावविश्वाशी त्या कार्याचा संबंध असतो. विद्यार्थ्यांविषयी जिव्हाळा, तळमळ आणि प्रेम हे शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचे खास पैलू आहेत.

ज्यांना विद्यार्थ्यांबाबत प्रेम नसेल त्यांनी ह्या व्यवसायात पडू नये असं एका विचारवंतानं म्हटलं आहे ते खरंच आहे.