दिवस असा की

Magazine Cover

मुलांना शिकवणं हे आपलं स्वत:चंही शिक्षणच असतं. मुलांना शिकताना मजा यावी, सहज शिक्षणाचे आनंद क्षण त्यांच्या वाट्याला यावेत म्हणून प्रयत्न करणार्‍या शिक्षकाचाही प्रत्येक दिवस मग सकारात्मक सर्जनानं भरून पावतो. हे उमजणार्‍या शिक्षकांनी त्यांचा हा आनंदाचा ठेवा आपल्यासमोर मांडला आहे.

खेडेगावात शिक्षक म्हणून काम करताना मुलांच्या नैसर्गिक वृत्ती जवळून पहायला, अनुभवायला मिळतात. इथं खेळाला मुलांच्या दिनक्रमात फार महत्त्वाचं स्थान असतं. शाळा भरण्यापूर्वी एकत्र आलेली मुलं, शाळा सुटल्यानंतरही खेळातच मश्गुल असतात. त्यांचे काही खेळ पाहूयात – Feb_3.jpg

शाळा भरण्यापूर्वी – शिवाशिवी, लपंडाव.

शाळा भरल्यावर – प्रार्थनेच्या वेळी एकमेकांना डिवचणं. मौनाच्या वेळी एक डोळा उघडून वर्गाचं निरीक्षण, मधूनच हसून चारचौघांचं लक्ष स्वतःकडं वेधून घेणं.
Feb_1-1.jpg
लहान सुट्टी – झाडावर चढणं, कट्ट्यावरून / व्हरांड्यातून उड्या, टांगा-टांगा.

मोठी सुट्टी – लपाछपी, चोर पोलीस, विष की अमृत.

खेळाचा तास – लंगडी, खो-खो, कॅप्टन कोण?, चुळचूळ मुंगळा, लगोरी, जमीन की पाणी?, फुगडी (मुलं-मुली एकत्र), अधून-मधून वर्ग सफाई, वर्ग सजावट.

शाळा सुटल्यावर – आट्यापाट्या (सूरफाटी), बकाबकी (कापडी, रबरी चेंडू वापरून, कधी-कधी बदामाची कोवळी फळंही वापरली जातात. साधनं नाहीत म्हणून खेळ थांबत नाही), कधीतरी क्रिकेट.
वर्गात असताना – शाब्दिक कोडी, गणिती खेळ, पाढ्यांचे खेळ, कागदी वस्तू बनवणं, मातीच्या वस्तू बनवणं, वाचलेल्या कथेचं नाटक करून दाखवणं, बसताना रोज आलटून पालटून बसणं, किंवा जो लवकर येईल तो पगा (पहिला), दोन नंबरचा दुगा, तिगा इ… असं म्हणत-म्हणत बसणं. लघवी लागलेली नसताना उगीच विचारून बाहेरची हवा खाण्यासाठी फेरफटका मारून येणं, शिक्षकाची एखादी वस्तू लपवून ‘‘कुणाचं काय हरवलं? ते आम्हाला सापडलं !’’ असं म्हणून त्यांची मजा पाहणं, हे आणि असे कितीतरी खेळाचे ज्ञात-अज्ञात प्रकार मुलं खेळून पाहतात. यात ठरवून केलेल्या गोष्टी कमी व सहजवृत्ती अधिक असते. याचा मी नियमित अनुभव घेत असतो. म्हणूनच ‘दिवस असा की – खेळाविना जात नाही’ असंच म्हणावं लागतं.

एक डाव माझाही….

सर्वसाधारणपणे मुलं आपल्या समवयस्क वा आपल्यापेक्षा लहान अथवा मोठ्या मित्रांत खेळणं जास्त पसंत करतात. काही कारणानं एखादं मूल गटातून वेगळं पडत असेल, (मुद्दाम) पाडलं जात असेल तर एक शिक्षक म्हणून अशा मुलांना खेळण्यासाठी बोलवणं, स्वतः त्यांच्याशी गप्पा मारणं, खेळात स्वतः सहभागी होणं, अबोल मुलांना कवायत-योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी पुढे बोलावणं, मुलांसोबत जेवायला बसणं, जेवताना प्रत्येक मूल नीट जेवतंय का – आनंदी आहे का याकडे लक्ष पुरवणं, जेवताना ‘एक घास देवाण-घेवाणीचा’ कार्यक्रम, आधी स्वतः एखादी वस्तू बनवून दाखवायची व मुलांना काहीतरी करून पहायला उद्युक्त करायचं, मुला-मुलींना मिळून भात (शालेय पोषण आहार) वाढायची जबाबदारी देणं इ. इ. असे कितीतरी ‘खेळ’ खेळावे लागतात. हे तुटक उपक्रम नाहीत. मुळात मूल व शिक्षक यांच्यातलं नातं ‘जवळचं’ व्हावं म्हणून खेळले गेलेले खेळच असतात. यात काळजी एकच घ्यावी लागते ती म्हणजे ‘सकारात्मक बदलांची.’ अप्रगत मुलांना इतरांबरोबर प्रवाहात आणण्यासाठी ह्या खेळांनी मला निश्चितपणे खूप मदत केली आहे.

Feb_2.jpg

शिक्षक हा leader (नेता) नसून तो mentor (a trusted helper) विश्वासू मदतनीस असतो, हे इथं नमूद करावंसं वाटतंय. तो विश्वासू सल्लागार असायलाच हवा. त्यानं मुलांना पर्याय द्यायला हवेत. तसेच त्यांचे निर्णय त्यांना स्वतःला घ्यायला भाग पाडायला हवं. त्यासाठी मदत करायला हवी.

वर्गात व वर्गाबाहेर मुलांशी सतत होणार्‍या आंतरक्रियेतून (interaction) काही गोष्टी मला समजल्या आहेत.
– खेळ ही मुलांची आवड नसून ती महत्त्वाची गरज असते.
– मुलांना सतत नवनव्या गोष्टींची ओढ असते. खेळांतले त्यांचे सर्जन चकित करणारे असते.
– मुलांना तात्काळ प्रतिसादाची गरज असते. प्रतिक्रिया नको; शाब्बासकी, एखादं स्माईल, उंचावलेला अंगठा (thumbs up), आपलेपणाचं मार्गदर्शन. या आणि अशा सकारात्मक गोष्टीच मुलांना पुढं जायला मदत करतात. तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी आदराची व त्याहून अधिक ‘आपलेपणाची’ जागा बनता. हरल्यावरही जी त्यांच्या मेहनतीचं कौतुक करतील, त्यांना समजून घेतील अशा माणसांच्या शोधात ती सतत असतात.

(या लेखातील रेखाचित्रे फारुक काझी यांची आहेत.)