दीदीने सिखाया

डीटीएड किंवा कोणत्याही पदवी, पदविका अभ्यासक्रमांमधील कृतिसंशोधन प्रकल्पांसाठी सुबक देखणे अहवाल तयार करून घेतले जातात. त्यामध्ये ‘निवडलेल्या समस्येसाठी संदर्भ शोधणे, उपाय शोधणे आणि अहवाल लिहिणे’ हीच जणू ‘कृती’ असते. पण इथे वेगळं घडलं.
कृतिसंशोधनाचा अहवाल प्रत्यक्ष केलेल्या ‘कृती’वर आधारित असावा आणि यातून सराव पाठशाळेतील मागं असलेल्या मुलींना पुढं जाण्यासाठी काही मदत व्हावी असा आग्रह धरला गेला. एका अर्थानं छोट्या असलेल्या या बदलातून शिक्षिका होऊ पाहणार्याु मुलींनी ‘ढ’ शिक्का बसलेल्या मुलींबरोबर समजून आणि समरसून काम केलं. त्या विषयी –

आम्ही पुण्यातील शासकीय उर्दू अध्यापक विद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी आहोत. चार महिन्यांनंतर शिक्षिका म्हणून या कॉलेजमधून बाहेर पडू. आमच्या प्राचार्य आम्हाला ‘पालकनीती’ मासिकातले काही लेख अधूनमधून वाचून दाखवतात. त्यावर वर्गात चर्चापण होतात. ‘अस्सं शिकणं सुरेख बाई’ या सदरातले लेख वाचून आपणसुद्धा शिक्षिका झाल्यावर मुलांना असंच शिकवावं असं नेहमी वाटतं.

या वर्षीच्या आमच्या अभ्यासक्रमात ‘कृतिसंशोधन’ हा एक विषय होता. या विषयावरील तासांना, पुस्तकं वाचताना खूप गोंधळ उडाला होता. पी.एच.डीसाठी संशोधन करायचं असतं – तो विषय आम्ही का शिकायचा- याचं उत्तर मिळत नव्हतं. शिक्षक सोपं करून सांगायचा प्रयत्न करायचे, त्यातून कळलं होतं की शिक्षक म्हणून काम करताना आपल्यापुढे काही समस्या येतात, त्यातली एक निवडायची, तिची कारणं शोधायची, मग त्यावर उपाय काढायचे, त्याचा अहवाल तयार करायचा. आधीच्या वर्षीच्या मुलींनी हस्ताक्षर, पाढे पाठांतर, स्पेलिंग पाठांतर अशा समस्यांवर अहवाल केले होते. शिक्षक म्हणून काम करायच्या आधीच आपल्याला ‘समस्या’ कशी कळणार? उपाय करून बघितल्याशिवाय ते बरोबर आहेत की नाहीत हे कसं सिद्ध होणार? असे खूप प्रश्न पडत होते. याच टप्प्यावर बडे मिसनी (प्राचार्य मॅडमनी) सराव पाठशाळेतल्या शिक्षकांच्या बरोबर आमच्यासाठी एक छोटी कार्यशाळा घेतली. सुरुवातीलाच ठरलं की सराव पाठशाळेतल्या मुलींच्या समस्यांवर प्रत्यक्ष काम करायचं. त्या कार्यशाळेमध्ये प्रत्येक इयत्तेच्या शिक्षकांनी आपापल्या वर्गातल्या मागं असणार्याा मुलींची संख्या विषयनिहाय सांगितली. समस्यांची भली मोठी यादी तयार झाली.

आता समस्या सोडवयाच्या कशा? शाळेतल्या शिक्षकांनाही ज्या सोडवता आल्या नाहीत. त्या आम्ही कशा सोडवणार?

मग बडे मिसनी उदाहरणादाखल एखाद्या समस्येचा विचार किती बारकाईने करता येतो, करायचा असतो याबद्दल सांगितलं.

तिसरीतल्या काही मुलींना वाचता येत नव्हतं. त्यावर चर्चा झाली. त्यातून वाचन शिकण्याचे टप्पे पुढे आले. काहीजणींना काही अक्षरांची पुरेशी ओळख नव्हती. ती जेव्हा शब्दांमध्ये जोडून येत तेव्हा वाचता येत नव्हते. उर्दू लिपीत स्वतंत्र मुळाक्षरांचा आकार आणि शब्दात येणारा आकार वेगवेगळा दिसतो. काहींना जोडाक्षरं वाचता येत नव्हती. तर काहींना वाक्यं.

मागं असलेल्या मुलींचा वर्गवार विचार करताना लक्षात आलं की सारख्याच समस्या असलेल्या काही मुली दुसरीत, चौथीत आणि पाचवीतही होत्या. मग इयत्तांपेक्षा समान टप्प्यावर असलेल्या मुलींचे छोटे गट (आठ ते दहा मुलींचे) घेऊन प्रत्येकीनं काम करायचं असं ठरलं. आमच्या वर्गातल्या एकोणतीस छात्र शिक्षिकांना आपापल्या आवडीनुसार विषय आणि समस्या निवडायला सांगितली.

आम्ही दोघींनी इयत्ता सातवीतल्या गणितात मागं असलेल्या तेरा मुलींसाठी काम करायचं ठरवलं. या मुलींना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत गणिती क्रिया करतानाच अडचणी येतात असं वर्गशिक्षकांनी सांगितलं. बहुतेकींना बेरीज व गुणाकार थोडाफार जमतो; पण वजाबाकी, भागाकाराची थोडी अवघड गणितं, शाब्दिक गणितं करता येत नाहीत, त्यामुळं पुढची बैजिक गणितं, पदावल्या, शेकडेवारी, नफातोटा हे त्यांना कितीही सांगितलं तरी समजत नाही असं शिक्षकांचं म्हणणं होतं.

वेळ संपल्यामुळं यावर जास्त चर्चा न होताच कार्यशाळा संपली. दुसर्यात दिवशी आम्ही आमच्या मनातले प्रश्न लिहून काढले आणि प्राचार्यांना भेटलो. त्यांना म्हणालो, ‘‘कुठल्यातरी एका छोट्या समस्येवर सखोल काम करायचं असं आपलं ठरलंय. मुलींना तो विशिष्ट भाग शिकवायला आम्हाला दररोज एक या प्रमाणं फक्त पन्नास ते साठ तासिका मिळणार… मग या तेरा मुलींना आम्ही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी नेमकं काय शिकवायचं? सुरुवात कुठून करायची?’’ मॅडमनी आमच्या कुठल्याच प्रश्नाचं थेट, सरळ उत्तर दिलं नाही. आम्हालाच प्रश्न विचारत राहिल्या. त्यांची सगळी उत्तरं आम्हाला सहज सांगता आली. त्यांनी जो शेवटचा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर म्हणजे आमच्या मुख्य प्रश्नाचं उत्तर होतं. ते आम्हीच त्यंाना दिलं होतं. ‘मूल्यमापन’ या विषयात आम्ही ‘नैदानिक चाचणी’ बद्दल शिकलो होतो. त्याचाच उपयोग करून, या मुलींना नेमक्या कोणत्या टप्प्यापर्यंत गणिताच्या मूलभूत क्रिया करता येतात ते सहज शोधता येणार होतं.

आम्ही नैदानिक चाचणी तयार केली. बिनहातच्याच्या दोन अंकी बेरीज, वजाबाकीपासून सुरुवात केली. चढत्या क्रमानं एकेका पायरीनं अवघड होत जाणारी उदाहरणं त्यात घातली. शेवटचं शाब्दिक गणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारी क्रिया करून सोडवायचं होतं.

तेरा मुलींना ती चाचणी सोडवायला दिली. त्यांची उत्तरं तपासून प्रश्ननिहाय तक्ता भरताभरताच पुढे काय करायचं हे स्पष्ट झालं. सुरुवात नेमकी कुठून करायची हे समजलं. आम्ही समजत होतो की या तेरा मुलींना ‘गणित’ येत नाही कारण आम्हाला तसं सांगण्यात आलं होतं. पण तेराही जणींनी आमच्या चाचणीतली पहिली तीन गणितं बिनचूक सोडवली होती. त्यापुढे प्रत्येकीचा स्वतंत्र ‘व्हरायटी शो’ होता. शेवटची तीन गणितं एकाही मुलीला सोडवता आली नव्हती. तिघीजणींनी पंधरा पैकी बारा उदाहरणं बिनचूक सोडवली होती. मग मुलींचे गट पाडून पन्नास तासिकांचं तपशीलवार नियोजन केलं. ते करताना कार्यशाळेत झालेल्या चर्चेतले तीन मुद्दे डोळ्यासमोर ठेवले होते.

1) या मुलींना वर्गातल्या शिक्षकांनी या गोष्टी एकदा (किंवा अनेकदाही) शिकवलेल्या आहेत. मात्र त्यांना ते समजलेलं / जमलेलं नाही. आता त्यांच्यासाठी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धती, नवीन उपक्रम शोधायला हवेत.

2) नियोजनात ऐनवेळच्या परिस्थितीनुसार बदल करता यायला हवा.

3) प्रत्येक मुलीची नेमकी अडचण/चूक लक्षात येईल अशा पद्धतीनं जायला हवं – म्हणजे त्यांना जास्तीत जास्त करायला द्यायला हवं – आपण निरीक्षण करायला हवं – म्हणजे मदत नेमकी कुठे करायची ते कळेल.

हे नियोजन करताना आम्हाला खूप छान वाटत होतं. जवळपास प्रत्येकीचा आरंभबिंदू वेगळा असला तरी या तेराही मुलींना, किमान तीन आकडी संख्यांची आणि एकापेक्षा अधिक गणिती क्रिया असलेली शाब्दिक उदाहरणं सोडवता आली पाहिजेत; इथपर्यंत आमचं ध्येय आम्ही निश्चित केलं.

गणिताचे बरेच खेळ शोधून ठेवले. त्यासाठीचं साहित्य पाहून ठेवलं. काही तयारही केलं.

या कामासाठी आम्हाला दिवसाची शेवटची तीस मिनिटांची तासिका मिळायची. मुली कंटाळलेल्या, खेळायच्या मूडमध्ये असायच्या. पहिले आठ-दहा दिवस खूप त्रास झाला.

‘‘दीदी, कंटाळा आलाय. आजच्या दिवशी नको ना अभ्यास !’’
‘‘दीदी आज मूड नाहीये’’ हे चालूच असायचं. दहा-पंधरा मिनिटं समजावण्यात जायची. मग ठरवलं, की पहिली दहा मिनिटं आपणच रोज त्यांच्याबरोबर खेळायचं. त्यासाठी रोज एका खेळाचा विचारसुद्धा करून ठेवला. मग उरलेली वीस मिनिटं त्या मनापासून लक्ष द्यायला लागल्या. हळूहळू ‘आज खेळायला नको दीदी’ हे त्यांच्याकडून यायला लागलं. आम्हाला मस्त वाटलं. सुरुवातीला एकेका प्रकारचं एकेक गणित प्रत्येकीकडून फळ्यावर सोडवून घेतलं. (आतापर्यंत वर्गात कधीच हा ‘मान’ त्यांना मिळाला नव्हता!) त्यामुळं प्रत्येकीची नक्की कुठे चूक होतीय हे आम्हाला कळलं. कधीकधी तर आमच्या आधी बाकीच्या मुलींमधलीच कुणीतरी तिला समजावून सांगायची. दहाजणींना ‘हातचा’ ही कल्पनाच स्पष्ट नव्हती. पहिल्या दिवशी काडीपेटीतल्या काड्या, रबर बँड वापरून दहा दहाचे, शंभरचे गठ्ठे करून प्रात्यक्षिकेच केली. उसना, शतक, दशक, सुटे हे स्पष्ट झालं. तीन-चार दिवसांनी दहापैकी सहाजणींना जमायला लागलं. घरी करायला दिलेली उदाहरणं त्यांनी उत्साहानं सोडवून आणली होती.

कधी कधी तर आम्ही दिलेला गृहपाठ दाखवण्यासाठी शेवटच्या तासापर्यंत मुली थांबायच्याच नाहीत. मध्येच कुठेही आम्हाला गाठायच्या आणि दाखवायच्या. म्हणायच्या ‘दीदी, जिंदगीमें पहली बार हमको इतना अच्छा समझा’. त्यामुळं आमच्या अंगावर मूठभर मांस चढायचं. पण असंच मुली त्यांच्या शिक्षकांसमोर म्हणाल्या तर? त्याची धाकधूक वाटायची. उरलेल्या चारजणींचं आव्हान अजून होतंच. त्यातली एक नुसरत – सतत नुसते प्रश्न विचारायची. कधी कधी वाटायचं ‘वो हमे ही आजमाना चाहती है!’ स्वत: तर गोंधळायचीच पण इतर मुलींनाही गोंधळात टाकायची, ‘‘दीदी, हम कुछ ‘हासिल’ करते है तो वो चीज हमारी हो जाती – यहा तो आप हासिल को (हातचा) वापिस करने को बोलती, क्यूं?’’ असे प्रश्न असायचे तिचे. ती हुशार आहे, तिला समजतंय हे आम्हाला कळत होतं पण गणितं मात्र चुकायचीच. एक दिवस आमचा संयम सुटला. आम्ही दोघीही तिच्यावर ओरडलो. असं पहिल्यांदाच झालं होतं. ती तर हमसून हमसून रडायलाच लागली. आम्ही क्षणभर गोंधळलो. पण मग तिला जवळ घेऊन समजावलं, ‘‘आप इतनी समझदार बच्ची है – कितने intelligent सवालात पूछती है – आपको पता है ना, ये रोना बुझदिली की अलामत है’’ हे ऐकल्याबरोबर काय झालं कुणास ठाऊक पण डोळे पुसून ती झटक्यानं म्हणाली, ‘‘बुझदिल नही हूँ मैं, हमारी बडी मिस ने बताया था – जो भी मनमें आये, पूछना चाहिये – इसलिये आपको पूछा – तो डाटा क्यूँ मुझे?’’ तिला सॉरी म्हटलं, समजावलं आणि त्यानंतर हळूहळू तिची गणितं बरोबर यायला लागली. बदल नक्की कशामुळे झाला ते कळलं नाही पण तो झाला होता हे नक्की !

सुफिया नावाची एक मुलगी आहे. ती पहिल्या दिवसापासूनच तोंडी उत्तरं पटापट द्यायची. ती इतकी पटकन उत्तरं द्यायची की बाकीच्या मुली तिच्यावर चिडायच्या – त्यांना उत्तरं द्यायची संधी मिळायची नाही तिच्यामुळं. मग त्या म्हणायच्या ‘‘इसको ट्यूशन की जरुरत ही नहीं है दीदी, इसको सब आता है !’’ पण तेच गणित वहीवर सोडवताना ती हमखास चुकायची. तिची वहीवर गणितं सोडवण्याची पद्धत एकदा नीट पाहिली तर आकडे एकाखाली एक लिहिताना शतक, दशक, सुट्यांचा – होणारा घोळ लक्षात आला. इतकी छोटी गोष्ट – ती जरा नीट समजावून दिली – एक दोन दिवसातच तिला लेखी गणितंही बिनचूक सुटायला लागली. पुढे आम्हाला काहीच करावं लागलं नाही. उलट तिची इतर मुलींना मदतच व्हायला लागली.

आमच्या वर्गात आम्ही खूप मोकळं वातावरण ठेवतो. आम्ही खरोखरच त्यांच्या ‘दीदी’ सारख्या वागतो. बडे मिस्नी सांगितल्याप्रमाणं. तेव्हा पटलं नव्हतं – वाटायचं की, ‘‘धाक असल्याशिवाय अभ्यास नाहीच करणार या मुली !’’ पण सुरुवातीला केवळ मिसनी सांगितलं म्हणून केलं – हळूहळू म्हणजे खरं तर आज हे लिहित असताना स्पष्ट कळतंय की आम्हाला या मुलींची गणिताची गाडी नेमकी कुठे अडकत होती हे कळलं, कारण आम्ही त्यांच्या मैत्रिणी झालो होतो. गेल्या दोन महिन्यात तेरापैकी दहा मुलींनी आम्हाला यशाचा आनंद दिलाय. त्यांना आम्ही ठरलेल्या उद्दिष्टांपर्यंत नेऊ शकलो. त्यांना येतंय हे दिसलं की त्यांच्यापेक्षा जास्त आनंद आम्हालाच व्हायचा. मागच्या दीड वर्षात आम्ही चाळीस तरी पाठ घेतले. त्यासाठी टिपणं काढून, ती चारचारदा पक्की करून, पूर्ण तयारीनिशी आम्ही पाठ घ्यायचो. पण या तेरा मुलींना शिकवतानाच मजा येतीय. जास्त शिकवता आणि शिकता येतंय.

रशिदा, हीना आणि समरीन या तीन मुलींनी मात्र अद्यापपर्यंत आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही. हीना तर स्पष्ट म्हणते, ‘‘स्कूल छोडनेहीवाली हूँ मै सातवी के बाद, तो क्यूँ ये झंझट करू?’’ तिला, तिच्या घरच्यांनाही समजावण्याचा प्रयत्न केलाय, पण अजून अधिक प्रयत्न करावा लागणार आहे. समरीन आणि रशिदा दोघींच्याही मनात गणिताची नावड, भीती जणू काही खोल रुजलीय. आपल्याला हे येणारच नाही याची त्यांना प्रचंड खात्री आहे. शिक्षकही तेच म्हणताहेत. लहान वर्गात असं काहीतरी घडलं असावं आणि ते कुणाला कळलंही नसावं. आता ती भीती पक्की झालीय. आम्हीही अजून ती काढू शकलो नाहीय. अजून एक महिना आहे. तेवढ्यात प्रयत्न करणारच आहोत.
आमच्या बडे मिस म्हणाल्या होत्या, ‘‘कभी कभी तो कुछ छोटीसी चीज अटकी होती है बीच में – इसलिए पानी बहता नहीं है. आपको इन बच्चोके मन मेंे अटका हुवा कुछ ढूँढना, पहचानना है और वो निकालने के लिये मदद करनी है उसकी…. बस, फिर पानी अपनेआप बहने लगेगा.’’

तेरा पैकी दहा मुलींच्या बाबतीत गणित शिकण्याच्या संदर्भात आम्ही हे करू शकलो – खरं तर ‘कसं करता येतं’ हे शिकलो.

शिक्षण हक्क कायद्याबद्दल वर्गात चर्चा झाली होती. वर्गातल्या सर्व मुलांना शिकवणं ही आता शिक्षकांची कायद्यानं बंधनकारक अशी जबाबदारी झाली आहे. शिक्षक म्हणून आपण वर्गातल्या सगळ्याच मुलांना एकदम शिकवत असतो. सगळ्यांना सारखंच शिकवत असतो. पण त्यातली काही मुलं पटकन शिकतात, काही सावकाश शिकतात. काहीजण थोडंसं तर काहीजण बर्याकच गोष्टी शिकूच शकत नाहीत. अशा वेळी शिक्षकानं नेमकं काय करायचं? प्रत्येकाला वेगवेगळं, त्याच्या-तिच्या शिकण्याच्या पद्धतीनुसार शिकवणं, तेही उपलब्ध वेळात हे कसं जमवायचं? असे खूप प्रश्न पडले होते. पण कृतिसंशोधनाच्या निमित्तानं केलेल्या या प्रात्यक्षिकामुळं बर्या च गोष्टी कळल्या. न शिकणार्याय मुलांच्या मनात शिरण्याची गरज या अनुभवामुळं लक्षात आली आणि त्याचा मुलांना ‘शिकतं’ करण्यासाठी असलेला उपयोगही. आम्हाला या कामासाठी दिलेल्या पन्नास तासिका संपल्यात, तरी या मुलींच्याबरोबर एकाच आवारात आम्ही अजून दोन महिने असणार आहोत. त्या तिघींना आम्ही आवर्जून वेळ काढून भेटतो. त्यांच्याशी बोलतो… त्यांना ‘मूड’ असला तर गणितंपण होतात. अजून यश नाही. ते एवढ्यात मिळेल न मिळेल पण प्रयत्न केल्याचं समाधान तरी नक्की मिळेल ना?

शब्दांकन-प्रा. समीना पठाण