आनंदवनातून प्रतिसाद

पालकनीतीच्या स्वधर्माला अनुसरून प्रकाशित करण्यात आलेला हा दीपावली विशेषांक, अन्य दीपावली अंकापेक्षा भिन्न स्वरूपाचा असला तरी त्यातील मान्यवर शिक्षक लेखकांमुळे तो वाचनीय… मननीय झाला आहे. सवंगपणाचा स्पर्श न लागल्यामुळे वरकरणी हा अंक दुर्बोध वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही, पण विद्यार्थीदशेतील आजच्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांच्या मनांचे, विचारांचे प्रतिबिंब अंकात उमटल्याने, या प्रत्येकाशी अंकाने गाढ जवळीक नक्कीच साधली आहे. विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळेे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान आणि भारतीय संस्कृतीत होत चाललेली घसरण मनाला घरे पाडून जाते. अंकातील सर्वच लेख अभ्यासनीय असल्याने हा अंक प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्याच्या वाचनात यावयास हवा.
आनंदवन वाचनालयात हा अंक ठेवण्यात आल्याने प्रकल्पवासियांसमवेत इथे येणार्या प्रत्येकाला हा अंक हाताळण्याची-वाचण्याची संधी मिळणार आहे. पालकनीतीमुळे आमच्या वाचनालयाचा दर्जा समृद्ध होईल, हे नक्की. शतश: आभार!
आपले – आपल्या परिवाराचे आनंदवनी सदैव स्वागत !! हार्दिक शुभकामनांसह…

डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे,
आनंदवन, वरोरा