आम्ही पुस्तक बनवतो
फुलपाखराच्या जन्माची गोष्ट
खेळघराच्या गच्चीवर मुलांनी बाग केली आहे. पाणी घालताना एकदा मुलांच्या लक्षात आलं की पानफुटीची पानं कुरतडल्यासारखी, आतून पोखरल्यासारखी दिसताहेत. बारकाईनं बघूनही त्यावर पानं खाणार्या अळ्या किंवा किडे दिसले नाहीत. ताईंनी इंटरनेटवर शोधून पाहिलं तेव्हा त्यांना ‘रेड पायलट’ या जमिनीलगतच्या छोट्या झुडुपांवर अंडी घालणार्या फुलपाखराची माहिती मिळाली. त्यानंतर पुन्हा नीट निरीक्षण केल्यावर पानांच्या खालच्या बाजूला ‘कोष’ सापडला. ताईंनी पानासह तो कोष खेळघरात एका काचेच्या हंडीखाली ठेवला. त्यानंतर काही दिवस खेळघरातल्या लहान-मोठ्या सर्वांनाच खेळघरात आल्या-आल्या हंडीतल्या घडामोडी निरखायचा नाद लागला होता. आठवड्याभरात त्या कोषातून सुंदर लाल फुलपाखरू बाहेर आलं. त्याच्या जन्माचा कौतुक सोहळा निरखून झाल्यावर त्याला स्वातंत्र्य बहाल करण्यात आलं.
आता मुलं सहजच बागेतल्या रोपावरच्या कोष, अंडी, अळ्या शोधू लागली होती. एके दिवशी मुलांनी ताईंना घाईघाईनं बोलावून नेलं. पानफुटीच्या पानावर फुलपाखरू अंडी घालत होतं. सर्वांनी शांतपणे त्याचं निरीक्षण केलं. नंतर आठवड्याभरात या अंड्यातून अळी बाहेर येणं आणि तिनं स्वत:भोवती कोष बनवणं, हेही मुलांनी नोंदवलं.
या सगळ्या निरीक्षणांतून आणि त्या अनुषंगानं होणार्या संवादातून मुलांना अंडी-अळी-कोष-फुलपाखरू हे जीवनचक्र नीट लक्षात आलं. हे सारे टप्पे ताईंनी कॅमेरानं टिपून ठेवले होते.
शिंजीर पक्ष्याच्या जन्माची पण
शिंजीर पक्ष्याच्या पिल्लांची हकिकतही अशीच रंगतदार आहे. खेळघराच्या वरच्या मजल्यावर लावलेल्या चाफा, लिंबू अशा झाडांच्या फांद्या खेळघरात डोकावतात. लिंबाच्या झाडाच्या एका फांदीच्या अगदी टोकाशी शिंजीर पक्षानं घरटं बांधलंय, हे ताईंच्या लक्षात आलं. त्यांनी या घरट्याकडं बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या कामात मुलांना आणि इतर तायांनाही गोवून घेतलं.
मग मादीनं अंडी घालणं, ती उबवणं, त्यातून दोन पिल्लं बाहेर येणं, नर-मादीनं रोज त्या पिल्लांना भरवणं, पिल्लं मोठी होणं, त्यांचा रंग बदलणं आणि एके दिवशी भुर्रकन उडून जाणं हे सारं सर्वांनी मोठ्या कौतुकानं बघितलं.
हातातली कामंधामं सोडून लहान-मोठे घरट्याच्या खाली उभं राहून बारकाईनं निरीक्षण करताहेत, चर्चा करताहेत, ताई वेगवेगळ्या कोनांतून फोटो काढताहेत असं दृश्य खेळघराच्या गच्चीत त्या काळात वारंवार दिसत होतं.
फार महत्त्वाचं असं काहीतरी घडतंय आणि आपण त्या घटनेचे साक्षीदार आहोत, ती कॅमेरात नोंदवून ठेवत आहोत, हा गंभीर भाव सर्वांच्याच मनात होता.
फोटो झूम करून बघताना आणखी बारकावे लक्षात येत होते. फोटो बघताना ताईंच्या मनात एक वेगळीच कल्पना आली. ‘या सुंदर फोटोंचं मुलांसाठी छान पुस्तक बनवलं तर?’
….आणि मग या गोष्टींची पुस्तकं
पुस्तकासाठी फोटो निवडताना पुस्तकाच्या उद्देशावर चर्चा झाली. मुलांना विज्ञान शिकवणं हा या पुस्तकाचा उद्देश मानायला नको, असं एकमत झालं. या निमित्तानं मुलांना मज्जा वाटेल आणि ती सभोवतालच्या निसर्गाकडे जागेपणानं बघायला लागतील हा एक उद्देश ठरला. दुसरा उद्देश अर्थातच पुस्तकांच्या सुंदर दुनियेची मुलांना अनुभूती मिळावी आणि त्यांच्या मनात पुस्तकाची ओढ निर्माण व्हावी हाही होता.
मग पुस्तक बनवायला सुरुवात झाली. मोठ्या आकाराच्या रंगीत कागदांवर फोटो चिकटवले. फुलपाखरू आणि शिंजीर पिल्लू स्वत:च ही प्रक्रिया कशी सांगतील, असे संवाद लिहायचे ठरले. शब्दांच्या गमतीजमती करत बोलके संवाद रचले गेले. नंतर ते सुवाच्य अक्षरात फोटोंच्या शेजारी लिहिले. खेळघरातल्या सगळ्यांचाच या पुस्तक-निर्मितीत हातभार लागला. त्यामुळे पुढचे काही दिवस, दिसेल त्याला ही पुस्तकं हौसेनं दाखवली गेली. लहान वर्गांमध्येही ताईंनी पुस्तकं वाचून दाखवली. पुस्तकं कशी बनली यावर गप्पा झाल्या. आपल्या अवतीभोवती अशी घटना घडताना कुणालाही दिसली तरी त्यानं ती ताईंना आणि इतरांना सांगायची आणि सर्वांनी मिळून ती समजावून घ्यायची असंही ठरलं. आपण अनुभवलेल्या, पाहिलेल्या घटनेतून तयार झालेली पुस्तकं पुन्हा पुन्हा बघायला मुलांना खूप आवडतं असंही जाणवलं.
मुलांच्या सभोवताली आनंदानं, उत्साहानं, मुलांच्या बरोबरीनं शोध घेणारी मोठी माणसं असतील तर मुलं आनंदानं शिकतील, हुरुपानं प्रश्नांची उत्तरं शोधतील आणि कदाचित त्यांच्या नोंदींमधून छान छान पुस्तकंही तयार होतील!
– खेळघर प्रतिनिधी
khelghar@gmail.com