आश्‍वासक आधार

वसंतराव पळशीकर यांना ज्येष्ठ विचारवंत म्हणून आपण ओळखतो. समाज प्रबोधन संस्थेचे कार्यकर्ते, समाज प्रबोधनपत्रिकेचे संपादक, नवभारतचे संपादक, लेखक या सर्व नात्यांनी त्यांनी महाराष्ट्रातील वैचारिक परंपरांचा समग्रतेनं विचार केला आहे. विविध विचारसरणीच्या लोकांबरोबर त्यांचा औपचारिक आणि अनौपचारिक पातळीवर सततचा संपर्क आहे. सामाजिक काम करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी त्यांची वेगळी आणि जिव्हाळ्याची ओळख आहे. त्यातून कार्यकर्त्यांच्या एका फळीची जडणघडण झालेली आहे.
आसपास घडणार्‍या घटनांमुळे कार्यकर्ता अनेकदा भांबावून जातो. अनेक पेच निर्माण होतात. काम चालू ठेवावं की थांबवावं, चालू ठेवूनही काही भलं घडताना दिसत नाही अशा सारख्या प्रश्नांनी मनाचा गोंधळ उडतो. निराशा दाटून येते. अशा परिस्थितीत, शांतपणे आणि ठामपणे बोलणार्‍या वसंतरावांशी बोललं की निराशेतही आशा जागी होते. दिशा सापडते. विचाराला भरीव आधार मिळतो. आपण करतोय ते बरोबर आहे असा विश्वास आणि खात्री वाटू लागते. काम करणार्‍या माणसासाठी हे अत्यंत महत्त्वाचं असतं. स्त्रीवाद, मार्क्सवाद, समाजवाद, समता, सहिष्णुता, गांधीविचार यापैकी काहीही जाणून घ्यायचं असेल तर ते वसंतरावांच्या लिखाणात, आणि मग आचरणात सापडेल. तुमचा गोंधळ वैचारिक असो की व्यवहारातला, तुम्हाला आश्वासक आधार सापडेल. आणि हे सारं अगदी सहज, कोणताही आग्रह न धरता, स्वतःसाठी कणभरसुद्धा अपेक्षा न करता.
वसंतरावांच्या पत्नी वेणूताई यांनी रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये शिकवलं. साधं राहणं आणि अत्यंत धाडसीही विचार प्रत्यक्ष जगणं ही त्यांची खासियत. ६२-६३ सालच्या सुमारास स्वतःपेक्षा वयानं लहान असलेल्या सामाजिक कार्यकर्त्याशी लग्न करणं, मुलांची, संसारासाठीच्या अर्थार्जनाची जबाबदारी स्वेच्छेनं उचलणं, नवर्‍याला अरेतुरे म्हणण्याइतकी सहजपणानं आत्मसात केलेली समता, अत्यंत साधी राहणी, सातत्यानं आणि खुशीनं केलेले श्रम, काही काळ जात्यावर स्वतः दळून केलेल्या पिठाचाच वापर घरात करणं, अंगणातल्या बागेत श्रम करून भाजीपाला पिकवणं आणि तोच खाणं, अनेकदा गरजू कार्यकर्त्यासाठी मदत पाठवणं हे त्यातले काही भाग.
वसंतराव, त्यांची मुलगी मेघना, त्यांच्या जुन्या सहकारी-अक्षरनंदनच्या विद्याताई पटवर्धन यांच्याशी आम्ही बोललो. त्याचं पालकनीतीसाठी केलेलं हे शब्दांकन.

मनाची जडणघडण :
मी हैद्राबादला लहानाचा मोठा झालो. लहान असताना मला वाचनाची आवड लागली. तेव्हा साने गुरुजींची पुस्तकं, त्यांनी लिहिलेली लहान मोठी चरित्रं असं वाचन जास्त झालं. विशेष म्हणजे ‘श्यामची आई’ जशी वाचली, तसे ‘श्याम-खंड १, खंड २’ देखील वाचले. ‘धडपडणारी मुले’ वाचलं. याचा संस्कार माझ्या मनावर खोलवर झाला असं निश्‍चित म्हणता येतं. ध्येयनिष्ठ मुलांनी ग्रामीण भागात एक प्रकल्प उभा केला आणि बदल घडवून आणला याची कथा ‘धडपडणारी मुले’ मध्ये आहे.
माझ्या वडिलांनी मला लागतील तेव्हा मला हवी ती पुस्तकं आणून दिली. मात्र कोणत्याही प्रकारे – अमुक वाच, तमुक वाचू नको- असं सांगितलं नाही. ते स्वत: सूत कातत, खादी वापरत त्याचा संस्कार आम्हा मुलांवर झाला. गांधीविचारांचा खोलवर संस्कार आमच्यावर वडिलांमुळे झाला. त्यांनी आम्हाला ते विचार सांगितले असं म्हणता येणार नाही. आणि घरातलं सर्व वातावरण गांधीवादी होतं असं नाही. बाकी माझं आयुष्य चारचौघा मुलांसारखंच गेलं, पण वाचन आणि वडिलांचा संस्कार याचा खोलवर परिणाम माझ्यावर ं लहान वयातच झाला असला पाहिजे. कारण, सोळाव्या-सतराव्या वर्षी इतर मुलांच्या मनात जे विचार आकार घेतात, ते माझ्या डोक्यात अकराव्या-बाराव्या वर्षीच तयार होत होते असं मला आठवतं.
विनोबांचा प्रभाव
त्या सुमारास हैद्राबादची संस्थानी राजवट जाऊन लोकांचं राज्य यावं, कारभार लोकांच्या हाती यावा अशी राष्ट्रीय भावना वातावरणात होती. विद्यार्थ्यांमध्येही ही भावना मोठ्या प्रमाणात होती. आमचंदेखील तीन-चार मित्रांचं मंडळ होतं. आमच्यात भरपूर चर्चा चालत. त्यावेळचा गणेशोत्सव धार्मिक भावनेपेक्षा राष्ट्रीय भावनेनं साजरा होई. बाराव्या-तेराव्या वर्षी वडिलांनी मला गांधीजींची संस्था पहायला म्हणून वर्धा आणि सेवाग्रामला पाठवलं. याआधी मी साने गुरुजींनी लिहिलेलं विनोबा भावेंचं चरित्र वाचलेलं होतं. योगायोगानं त्या मुक्कामात विनोबांची भेट झाली. त्यांच्याबरोबर दीड-दोन दिवस त्यांच्या आश्रमात राहिलो. ते पवनारला राहत आणि रोज तेथून सुरगावला जाऊन स्वच्छतेचं काम करत. रस्ते-सफाई म्हणजे खरोखरी मैला-सफाईच करायची असे. त्यांच्याबरोबर जाऊन मीसुद्धा ते काम करी. दरम्यान गप्पा होत असत. विनोबा भावे तेव्हा प्रकृती सुधारण्यासाठी म्हणून पवनारच्या बजाज बंगल्यावर राहात होते, त्याही काळात ते सफाईचं काम करत असत.
‘अथातो ब्रह्म जिज्ञासा’ या प्रेरणेनं संस्कृत शिकण्यासाठी विनोबांनी तरुणपणी कॉलेजचं शिक्षण सोडलं होतं. त्यांच्या प्रभावी सहवासात माझ्या लक्षात आलं, की कॉलेज-शिक्षण सोडूनही काही भलं काम करता येतं. ‘धडपडणारी मुले’ हा आदर्श माझ्या डोक्यात होताच. तसं काम करायचं तर शिक्षणाची आवश्यकता नाही आणि ते सोडताही येतं अशी काहीशी पुसट कल्पना तेव्हा डोक्यात राहिली. विनोबांकडून दोन गोष्टींचा पक्का संस्कार झाला. एक तर गांधीविचारांना अनुसरून चालेल्या कामाची रूपरेषा कळली. दुसरं म्हणजे त्यासाठी पठडीतलं शिक्षण आवश्यक नाही हे समजलं.
नंतर आम्ही अहमदनगरला राहायला गेलो. कारण हैद्राबादला रझाकार चळवळीमुळे त्रास फार वाढला. नववी-दहावी मी नगरलाच केली. तेव्हा सुट्टीत मी मुंबईला काकांकडे जात असे. तिथे साने गुरुजींची भेट झाली, सेवादलाची माहिती झाली. साने गुरुजींनी तेव्हा ‘साधना’ सुरू केलं होतं. त्यांच्याबरोबर साधनाच्या प्रेसवर राहिल्याचंही आठवतं. त्या सुमारास सेवादलाच्या नेरळला झालेल्या शिबिरात दीड-दोन महिने राहून तिथला तलाव साफ केला होता. दहावीच्याच वर्षात नगरचे गांधीवादी कार्यकर्ते शंकरराव दिघोळकर यांचीही ओळख झाली. त्यांच्या घरी सूतकताई, विणकाम दोन्ही चालत असे. त्यांच्या घरीच माग बसवलेला होता. त्यांच्यामुळे गांधींचे अनुयायी कसे असतात हे मला प्रत्यक्ष पाहायला मिळाले, त्यांचा सहवासदेखील लाभला. त्यामुळे मनात उत्पन्न झालेले विचार पक्के व्हायला मदत झाली.
दहावीनंतर पुन्हा दोन वर्षं हैद्राबादला शिकलो. इंटरसायन्स झाल्यावर शेतीची पदवी घ्यायची हे मनात पक्कं होतं, कारण मला ग्रामीण भागात काम करायची इच्छा होती. पण प्रत्यक्ष तो अभ्यास करतानाचा अनुभव चांगला नव्हता. प्रत्यक्ष शेतातलं काम, शेतकर्‍यांचं वास्तव याचा तिथल्या शिक्षणाशी काहीही संबंध नव्हता. म्हणून वैतागून तो कोर्स सोडून दिला. ते १९५२ साल होतं.
१९५१ साली तेलंगणात पोचमपल्ली येथे मोठा हिंसाचार झाला होता. त्यातून मार्ग निघतो का, हे बघण्यासाठी विनोबांचा दौरा निघाला. ते वध्यार्र्हून हैद्राबादला चालत आले. पूर्ण तेलंगण हिंडले. तुरुंगात असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांना भेटले. त्या सर्व चर्चा-अनुभवातून पुढे भूदान आंदोलनाचा जन्म झाला. मी जेव्हा शेतीचा कोर्स सोडला तेव्हा बिहारमध्ये भूदान आंदोलन चालू होतं. मी विनोबांच्या टोळीत सामील झालो. विनोबांच्याबरोबर शिवाय स्वतंत्रही बिहारमध्ये हिंडलो. लोकांनी समजून, स्वेच्छेनं भूदान करावं अशी आंदोलनाची अपेक्षा होती. तेलंगणात तशी दानं मिळाली पण बिहार-उत्तर प्रदेशात वेगळं घडत होतं. विनोबा नसताना जिथं कार्यकर्त्यांकडून आंदोलन चालवलं जायचं, तिथं लोकांना ‘पटवलं’ जायचं, दान गोळा केलं जायचं. सरपंचाच्या घरीच सभा बोलावली जायची. त्याच्या दडपणाखाली लोक दानपत्रं करत, ते मला आवडत नसे. म्हणून मग त्यात भाग घ्यायचं मी बंद केलं.
पुढं अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांचा लेखनिक म्हणून मी काम करू लागलो. ते सर्व-सेवा संघाचे सहमंत्री होते. त्यानिमित्तानं त्यांचा पत्रव्यवहार संपूर्ण देशभर चालत असे. सर्व-सेवा संघाला महाराष्ट्रात विशेष स्थान होतं. त्या सर्व कार्यकर्त्यांशी अण्णासाहेबांचे घरगुती संबंध असत. त्यामुळे महाराष्ट्रात, त्याचबरोबर देशातही काय चाललं आहे ते वृत्त मला कळत राही. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं काम तेव्हा मला जवळून पाहता आलं. हा माझ्यासाठी एक शैक्षणिक अनुभवच ठरला. संपूर्ण देशाचा एक ‘परस्पेक्टीव्ह’ मला मिळाला. पुढंही माझं अण्णासाहेबांबरोबर जाणं-येणं राहिलं किंबहुना मी त्यांचा अनुयायी झालो, ही माझी सर्वात मोठी उपलब्धी.
माझे अनुभव… त्यातून शिकणं
याच काळात सेवाग्राममधलं ‘नई-तालीम’चं काम जवळून पाहता आलं. ते तेव्हा बरंच विस्तारलेलं होतं. ग्रामीण भागातलं शैक्षणिक काम नई-तालीमच्या पद्धतीनं करावं असा निर्णय सरकारनं केलेला होता. त्याचा परिणाम म्हणून सेवाग्रामच्या मध्यवर्ती संस्थेचं स्वरूप पार बदलून गेलं होतं. नई-तालीमचं काम कसं करू नये याचा वस्तुपाठ एकप्रकारे इथं पाहायला मिळत होता. त्यामुळे नई-तालीमचं काम करायचं झालं तर ते या पद्धतीनं वाढणार नाही अशी माझी खात्री झाली. त्याचवेळेला एका वेगळ्या संदर्भामध्ये मला अलमोडा जिल्ह्यातील कौसानी गावातील ‘लक्ष्मी आश्रम’ची माहिती मिळाली. आसपासच्या भागातील मुलींसाठी ही निवासी शाळा नई-तालीम पद्धतीनं चालवली जाई. सरलाबेन नावाच्या ब्रिटिशबाई शाळेच्या मुख्य म्हणून काम करत. शाळेच्या आवारात शेती चालत असे. मुलींचं जीवन त्या शेतीवर अवलंबून होतं. मुलीच शेती सांभाळत. पहाडी संस्कृतीच्या त्या मुलींची स्वतंत्र वृत्ती पाहण्यासारखी होती. सगळ्या शाळेचं वातावरण मोठं आनंदी आणि कष्टाळू होतं. या देशात नई-तालीमचं काम वाढायचं असेल तर ते लक्ष्मी आश्रमच्या धर्तीवर वाढू शकेल असा ठसा माझ्या मनावर तेव्हापासून उमटलेला आहे.
यापुढच्या वर्ष – दोन वर्षांमध्ये माझा बराचसा वेळ श्रम-शिबिरांमध्ये गेला. ही शिबिरं ‘सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’ या संस्थेमार्फत भारताच्या वेगवेगळ्या भागात भरायची. सात-आठ युरोपियन स्वयंसेवकांची टोळी ही शिबिरं संघटित करायची. त्यात इथलेही युवक सामील व्हायचे. सगळे मिळून पंधरा-वीसजण तीन-चार महिने एक-एक काम करत. वरोड्याला आनंदवनात आमट्यांच्याकडे एक मोठं शिबिर झालं होतं. गावातील तरुण मंडळी बर्‍याच मोठ्या संख्येनं सामील झाली होती. पण मुख्यत्वेकरून आम्ही तीस-चाळीसजण काम करत असू. आमटे कुटुंबाचा पूर्ण सहभाग यात आमच्या बरोबरीनं होता. या शिबिरात तीन-साडेतीन महिन्याच्या काळात आम्ही एक मोठी विहिर आणि तीन पक्क्या इमारती बांधल्या. या शिबिरांचं वैशिष्ट्य माझ्या लक्षात राहिलं आहे- जी कामं आम्ही करायचो त्यामधील कामाची आखणी, पद्धती, शिस्त ही पूर्ण व्यावसायिक पद्धतीनं आयोजलेली असे. सकाळी सहापासून कामाला सुरुवात होई. दिवसभरात किमान आठ तास काम. गप्पागोष्टींसाठी नंतरचा वेळ मोकळा असे पण कामाच्या वेळात गप्पा मारण्याची सवड कोणालाच नसे. याप्रकारचं श्रम-शिबिर मी पुढं अनुभवलं नाही. साने गुरुजींच्या सेवापथकाच्या शिबिरात नाही किंवा पुढं आमट्यांच्या संस्थेत जी शिबिरं झाली त्यातदेखील नाही. श्रम-शिबिर ही कल्पना आपल्याकडे खर्‍या अर्थानं रुजलीच नाही. सेवादलासारख्या संस्थेनं ही मोठी संधी पूर्णपणे घालवली असं माझं मत झालं. इतर शिबिरांबद्दल तर बोलायलाच नको. (जपानमध्येदेखील मी दोन-तीन शिबिरात श्रमदानाचं काम केलं. तिथंदेखील कामाची शिस्त वाखणण्यासारखी होती. शनिवार रविवार अशी दीड-दोन दिवसांची शिबिरं भरवली जात. इमारती बांधणं, रंग देणं, शेतीमधलं काम इ. आपल्याकडे शिबिरामध्ये सफाईचं काम बहुधा केलं जातं. त्यात काम कमी आणि गप्पा जास्त चालतात.)
१९५४ मध्ये एका चर्चा-शिबिरात माझी मार्जरी साइक्स यांच्याशी ओळख झाली. मध्यप्रदेशातील रसूलिया इथं क्वेकर लोकांच एक केंद्र फार पूर्वीपासून काम करतं. त्या केंद्रात हे शिबिर भरलं होतं. ‘वन स्ट्रॉ रेव्होल्यूशन’ हे पुस्तक मी इथेच वाचलं. तेव्हाच, हे भारतात प्रसिद्ध व्हायला पाहिजे आणि त्याचं भाषांतर मराठीत व्हायला पाहिजे असं मी ठरवलं होतं.
१९५५-५६ साली मी ओरिसामधल्या कोरापुट जिल्ह्यात सर्वोदय संघातर्फे काम केलं. भूदानात मिळालेल्या काही गावांमध्ये डेव्हलपमेंट मॉडेल तयार करायचं होतं. आपापल्या पद्धतीनं काम करायला सरकारनं सुरुवातीला मोकळीक दिली होती. पण पुढे सरकारचा रोख बदलला व ते बंद पडलं. मात्र या दोन वर्षांत ग्रामीण विभागात काम कसं करावं, लोकांचा सहभाग कसा मिळवावा, कोणत्या प्रकारचे अग्रक्रम ठरवावेत याबद्दल पुष्कळ शिकावयास मिळालं. पुढे महाराष्ट्रात खादी कमिशनच्या वतीनं एका ‘सघन क्षेत्र योजने’मध्ये कामाचा अनुभव घेतला. दोन्ही ठिकाणी पुष्कळ शिकायला मिळालं, पण काम फार झालं असा भाग नाही. काम न होण्याची काही कारणं सरकारी आणि काही संस्थांची गैरवर्तणूक या सदरात मोडतात.
१९५६ नंतर माझ्या कामाचं स्वरूप पार बदललं. ग्रामीण विकासाच्या कामाशी प्रत्यक्ष संबंध कमीच राहिला. पण वैचारिक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारची कामं बरीच केली- वैचारिक शिबिरं घेणं, संपादनाचं काम, लेखन करणं, करवून घेणं इत्यादि. पुढं समाजप्रबोधन संस्थेमध्ये काम केलं. त्या संस्थेच्या पत्रिकेचं संपादन केलं. कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण करण्याच्या बाबतीत काही अनुभव गाठीशी बांधला. पुढं नवभारत मासिकाचंही संपादन केलं. यासगळ्या कामाला आवश्यक तो पूर्वतयारीचा भाग म्हणून या सर्व काळात वाचन आणि चिंतन होत राहिलं.
लग्न, संसार
समाजप्रबोधन संस्थेमध्ये काम करत असताना, कामाच्या ओघातच माझी वेणू दाभोळकरशी ओळख झाली आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते १९६४ साल होतं. आमचं लग्न आम्हाला अनेक गोष्टी शिकवून गेलं. लग्न हा व्यवहार दोन व्यक्तींमधला असतो अशी आपली आधुनिक धारणा आहे. पण आमचा अनुभव सांगतो, की लग्न हा एक सामाजिक व्यवहार आहे. आपण म्हणतो त्यापेक्षा त्यात समाजाचा संबंध पुष्कळ जास्त येतो. दोन कुटुंबातला नातेसंबंध तर असतोच पण त्याही पलीकडे अनेक गोष्टींशी याचा संबंध पोचतो. आपल्या नात्यागोत्यातले, मित्र-मैत्रिणीतले, जात-जमातीतले संबंध या सगळ्यांशी नानाप्रकारे लग्नाचा संबंध पोचतो. हे लक्षात घेऊन योग्य व्यवहार झाला पाहिजे, याचं भान लग्न करताना बाळगावं लागतं. हे मुख्यत: लग्नाच्या निमित्तानं शिकावं लागतं. आपण सर्वचजण कमीअधिक प्रमाणात सहजीवनाचा विचार करतो. पण या सहजीवनामध्ये आपण मुलांचा, आई-वडील, भाऊ-बहीण वगैरेंचा, मित्र-मंडळींचा, समाजाचा विचार फारश्या योग्य पद्धतीनं करत नाही. मागच्या पिढीचा नाही तसा पुढच्या पिढीचाही करत नाही.
साधारणपणे लग्न झाल्यावर कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्‍न निर्माण होतो. कार्यकर्त्यांच्या बायकांनी त्यांचं कुटुंब चालवावं अशी कळत नकळत अपेक्षा असते. विशेषत: दोघं नोकरी करत असले तर नोकरी चालू ठेवायची जबाबदारी स्त्रीची आहे असं गृहीत धरलं जातं. आमच्या बाबतीत हा प्रश्‍न लग्न लागल्याबरोबरच निर्माण झाला. कारण माझ्या कामाची पद्धत आणि भूमिका यामध्ये कुटुंबाचा विचार फारसा केलेला नव्हता. कुटुंबासाठी वेणूनं नोकरी करावी असं माझं मुळीच म्हणणं नव्हतं. माझ्याप्रमाणेच तिनंही आवडेल ते काम करण्याला प्राधान्य द्यावं आणि दोघांनी मिळून संसाराचा भार उचलावा, असं माझं म्हणणं होतं. हे तिला अमान्य नव्हतं, पण कॉलेजमध्ये शिकवणं हे तिनं आवडीनंच निवडलं होतं. त्यामुळे ते सोडायचा तिचा विचार नव्हता. तिच्या पगारात आमचं भागू शकेल अशी आमची समजूत होती. त्यामुळे माझं काम मला पूर्वीसारखंच निर्वेधपणे चालू ठेवता आलं. रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून ती नोकरी करत होती. माझं काम मी तिच्या नोकरीच्याच ठिकाणी करेन असं आमचं बोलणं कधी झालं नाही. ते व्यवहारातही शक्य नव्हतं. माझं राहणं इतरत्र, बहुतेक सारं पुण्याला झालं. याचा परिणाम अपरिहार्यपणे आमच्या घरावर झाला. मुलांची व घराची जबाबदारी वेणूनं स्वीकारली. याचा तिला पुष्कळ भार पडला. घरी असलो तर मी घरकामात मदत करत असे पण असं अगदी कमी वेळा व्हायचं. मुलांची जबाबदारी मी पूर्णपणे घेऊ शकलो नाही.
मुलांचं शिक्षण… शाळेतलं आणि शाळेबाहेरचं
आम्हाला तीन मुलं. अनु-माधव जवळजवळ बरोबरीचे. अनु सात वर्षांची असताना मेघनाचा जन्म झाला. मुलांची आबाळ होऊ नये म्हणून काही वेळा मी माझं काम सोडून दिलं किंवा त्या काळात घरी राहिलो. पण हे थोड्या काळासाठी झालं. श्रीरामपूरला असताना मुलं शाळेत जायला कंटाळली. शाळेत जाणं-येणं फार वेळखाऊ होतं. शिक्षकही शिकवण्याबद्दल अनुत्सुक होते. सुट्टीत दोघं माझ्या आई-वडिलांकडे गेलेली असताना तिथं राहिली. तिथं खेळायला माझ्या भावाबहिणींची मुलं सोबत होती. घराभोवती प्रशस्त आवार होतं. त्यामुळे परत येऊन शाळेला जाण्याच्या बाबतीत त्यांनी कंटाळा केला. एकदा जी शाळा सुटली ती तीन वर्षं सुटली. (चौथी, पाचवी, सहावी). घरीच राहून थोडाफार अभ्यास केला. शेजारपाजारची मुलं खेळायला सोबत होती. घरी त्यांचं काहीकाही शिक्षण झालं. पण शाळेचा अभ्यासक्रम करून घ्यायचा ही दृष्टी नव्हती. या काळातही व्याख्यानं, लिखाण, शिबिरं असं माझं काम परगावी चालूच होतं. त्यामुळं हा काही जाणीवपूर्वक केलेला उपक्रम नव्हता. सहजपणे जे घडलं ते मात्र असं होतं. त्या सगळ्या काळात त्यावरून आम्हा दोघांमध्ये काही वाद झाला असं झालं नाही. घरी राहूनही मुलांचा पुरेसा अभ्यास होतो असं आमचं म्हणणं होतं. पण नातेवाईकांमध्ये याबद्दल खूप असमाधान होतं. मुलं स्वत:ही पूर्णपणे समाधानी नसणार कारण इतर मुलांना ती शाळेत जाताना पाहात होती. मी त्यांना सांगितलं होतं, ‘‘तुम्हाला जेव्हा शाळेत जायचं असेल तेव्हा मी त्याची जबाबदारी घेईन. आमच्या हौसेपायी तुम्ही शाळेपासून वंचित राहणार नाही.’’ त्यामुळे तीन वर्षांनंतर दोघं शाळेत गेली आणि तेव्हा ती काही मागं पडली नाहीत.
पालकत्वाचा विचार आम्ही फार केला होता असं मला आठवत
नाही. जो काही केला तो ‘माझ्या’ मुलांचा म्हणून वेगळा केला असं झालं नाही. शिक्षणाबद्दल एकूणच व्यापक विचार करत होतो, त्याचा भाग म्हणून मुलांच्या शिक्षणाचा विचार केला. मुलं अगदी लहान असताना, त्यांना शिक्षा करण्याबद्दल वेणूची भूमिका वेगळी होती. पण पुढे तिच्या-माझ्या विचारांत त्या प्रकारचं अंतर राहिलं नाही. एकदा रागाच्या भरात माधवला मारलं होतं, ते सोडता मुलांना मारल्याची आठवण मला अजिबात नाही. नंतर माधवची माफी मागितल्याचंही मला आठवतं. कामं करण्यात ती आईला नेहमीच मदत करत असत. घरी मित्र-मंडळी, भाचे-पुतणे येत जात असत. त्या सगळ्यांचं प्रेमानं करणं चालू असे. वेणूला माणसांची – त्यातही मुलांची जात्याच खूप आवड आहे. तिचे मुलांशी संबंध फार चांगले आहेत. मुलांसाठी ती कष्टही पुष्कळ घेत असे. मेघना लहानपणी घरात मांजरं, ससे पाळायची. त्या प्राण्यांनापण घरात इतरांसारखंच पूर्ण सामावून घेतलं जाई.
मुलं सात-आठ वर्षांची झाली की स्वतंत्रपणे विचार करायला लागतात. आपण जर त्यांना वाव दिला तर आपल्यासोबत अनेक प्रकारच्या कामांमध्ये सहभागी होतात. उदा. आम्ही मंचरला राहात असताना शेजारच्या गावी कुसुम कर्णिक राहात असत. त्यांच्याशी आम्हा दोघांचा दाट परिचय. साहजिकच अनुची कुसुमशी दोस्ती झाली. त्यावेळी कर्जतजवळच्या कशेळ्याला ऍकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सायन्स या संस्थेमध्ये माझं जाणं पुष्कळवेळा होत असे. तिथल्या लोकस्वास्थ्य परंपरा संवर्धन समितीमध्ये मी काम करत होतो. यांचं काम भारतभरात ठिकठिकाणी चालू असे. मुख्य काम कशेळ्याहून चालत असे. तिथल्या शिबिरांमध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी आणि आदिवासींच्या वेगवेगळ्या भाषांमधून विषय मांडला जाई. त्याची भाषांतरं करण्याची वेळ येई. हे काम करायला मला आवडत असे. या कामात अनुचा पुष्कळ सहभाग होता. मंचरच्या घराजवळच्या टाइपिंगच्या क्लासमध्ये मदत करायला माधवला आवडे. वेणूनं भाषांतर केलेल्या ‘एका काडातून क्रांती’चं बरंचसं टाइपिंग त्यानं केलेलं आहे.
त्याच वेळेला ‘परिसर’चं काम सुरू झालं होतं. परिसरच्या सभा, शिबिरांच्या वेळेला जे काही काम पडे ते करायला अनु-माधवला आवडे. मी या काळात पुण्याला विद्या व सुजित पटवर्धनांकडे राहत होतो. नर्मदेच्या कामाचं एक केंद्रच यांच्या घरात होतं. त्यांच्या मुली नर्मदा आंदोलनात जात असत. आमची मुलंही आंदोलनाच्या पुण्यातील कामात सहभागी असत. या काळात वेणू कॉलेजच्या कामात बुडालेली असली, तरी माझ्या सर्वच कामांशी जोडलेली असे. घरही सर्वांना उघडं असे त्यामुळे सर्वांशी घरातल्या सगळ्यांचे चांगले घनिष्ठ संबंध असत.
याच सुमारास अक्षरनंदन शाळा समितीचं काम चालू झालं. सतत अभ्यास-चर्चा चालत. एकूणच समाज कसा असायला हवा, व्यक्ती कशी असायला हवी, त्यासाठी मग शिक्षण कसं असायला हवं असे विषय असत. त्या अनुषंगानं माध्यम, स्पर्धा, पर्यावरण.. कुठलाही विषय बाजूला राहत नसे. करपव-कशरीीं-कशरव या सर्वांना शिक्षणात सारखंच महत्त्व असावं याचीही चर्चा होई. हे सारं तत्त्व म्हणून मान्य झालं तरी प्रत्यक्ष व्यवहारात आणताना अडचणी येत. तेव्हा व्यापक विचार व्हावेत, सोपे मार्ग घेतले जाऊ नयेत, वैचारिक पाया भक्कम व्हावा यासाठी खूप चर्चा झडत.
याशिवाय ‘नवभारत’ मासिकाचं काम मी रेग्यांसोबत करायला लागलो होतो. पुढं त्याचं संपादन माझ्याकडे आलं. नवभारततर्फे घेतलेली शिबिरंही गाजली. यामध्ये मुख्यतः रेगे आणि इतर काही वेगवेगळी मंडळी मांडणी करायला असत. इथं विशेष गोष्ट अशी होती की कोणत्याही विशिष्ट विचारधारेचा प्रचार करण्यासाठी ही मांडणी नसे. वेगवेगळ्या वैचारिक छटा असलेली माणसं एकमेकांबद्दल आदर ठेवून आपली मतं मांडत. चर्चेची पूर्वतयारी म्हणून मी काही लिखित साहित्य पाठवत असे. रेगे मुख्य असले तरी, चर्चा नियंत्रित करत नसत. चर्चेची पातळी चांगली रहावी इकडे त्यांचं ध्यान असे. ही शिबिरं आम्ही सहभागी असलेल्या सर्वांचे विचार सुस्पष्ट व्हावेत यासाठी घेत होतो. आपापल्या दृष्टीनं ही स्पष्टता व्हावी अशीच इच्छा होती. एखाद्या माणसानं मार्क्स ( किंवा गांधी) तत्त्वज्ञानाचा अर्थ लावावा असं न होता, मार्क्स अनेकांना वेगवेगळा कळलेला असतो, तो सगळा समजावून घ्यावा असा प्रयत्न असे.
अनु-माधव बारावीनंतर पुण्यात होस्टेलला राहिले. पुढं आम्हाला पुण्यात माझ्या मावस भावाचा फ्लॅट राहायला मिळाला. इथं तीन वर्षं फार चांगली गेली. स्वतंत्रपणे राहणं, आवडीनुसार कामं, मैत्री किंवा भावंडांच्या बरोबर वेळ घालवणं हे सर्व त्यांना मनापासून करायला मिळालं. या काळात त्यांना जे जगायला मिळालं त्यानं त्यांची क्षितिजं रुंदावली. अनु आणि मेघना या दोघी शिकायला/ काम करायला महाराष्ट्राबाहेर बंगलोर, दिल्ली इकडे गेल्या. त्या दोघींना मार्जरी साइक्स, राधाबहन भट (लक्ष्मी आश्रम, कौसानी), जेन साही (सीता स्कूल, बंगलोर) यांचा दीर्घकाळ सहवास मिळाला. त्यांच्या सहवासात त्यांनी पुष्कळ शिकून घेतलं. अनु एम.एस.सी. पास झाल्यानंतर जेनच्या शाळेत काम करायला गेली. सध्या ती कृष्णमूर्तींच्या शाळेत काम करते आहे. या दोन्ही शाळा ही वेगवेगळ्या प्रकारानं पर्यायी शिक्षण देणार्‍या शाळांची उदाहरणं आहेत. माधव एम.एस.सी. कॉम्प्युटर झाल्यानंतर त्या क्षेत्रात काम करण्याऐवजी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात काम करू लागला. त्यावेळी ते नुकतं स्थापन झालं होतं. त्या काळात विद्यापीठाच्या उभारणीचं सर्व स्तरांमधलं काम त्यानं राम ताकवले यांच्याबरोबर केलं. मेघनाचं शिक्षण स्वतंत्रपणे पुण्याला झालं. ते घेत असताना तिनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम केलं. बी.एस.सी.नंतर वर्षभर मेघना कौसानीच्या आश्रमात राहिली. तेव्हा मुलींबरोबर शेतात काम करणं आणि शाळेत शिकवणं हे काम तिनं केलं. पुढं तिनं जपानी आणि इटालियन भाषांचा अभ्यास केला. आता त्या भाषा शिकवण्याचं आणि इंटरप्रीटरचं काम ती करते.

येथवर आमच्या मागच्या कामाचा आढावा घेतला. आता पुढच्या दृष्टीनं याचा काही बोध घेता येईल का ते सांगतो.
मूल लहान असल्यापासून शिकतच असतं, त्याला हवं तसं, त्याला पाहिजे ते वेगवेगळ्या वाटांनी शिकत असतं. ते कुठल्याही परिस्थितीत वाढत असलं तरी शिकण्याची ऊर्मी उपजत असते. त्यामुळे कुटुंब, परिसर, समाज हे नवनवीन शिकण्याच्या दृष्टीनं समृद्ध हवेत. मुलाला प्रेम देणं, वेळ देणं हे महत्त्वाचं. मुलानं काही शिकावं म्हणून त्याच्या मागे लागू नये, घाई करू नये. शाळेत घालायचीही घाई करू नये. मोठं झाल्यावर वाचन-लेखन-गणित अशी कौशल्यं शिकण्यासाठी फक्त त्याला शाळेत जाऊ द्यावं. शाळेत जाणारी मुलंही शाळेबाहेरून, मित्रमंडळींकडून, घर-परिसरातून शिकतच असतात. हे सगळं वातावरण असं हवं की मूल त्यातून आपणहून मूल्यंही शिकेल.
आताची व्यवस्था कुचकामी आहे असं मी म्हणतो, कारण शिकणार्‍यांपैकी चाळीस टक्क्यांइतक्या मुलांवर नापासाचा, अपयशी असल्याचा शिक्का मारला जातो. शाळेत जाणार्‍या मुलांची जिज्ञासा, शिकण्याची ऊर्मी नष्ट होते. आत्मविश्‍वास खच्ची केला जातो. याचं भान ठेवावं आणि मुलाच्या शिक्षणाची, विकासाची, तयारीची जबाबदारी पूर्णपणे शाळेवर टाकू नये.

शब्दांकन – नीलिमा सहस्रबुद्धे
neelimasahasrabudhe@gmail.com

कौसानीच्या आश्रमात सगळ्या लहान मोठ्या मुली स्वावलंबी आयुष्य जगत. वयानुसार जेजे काम जमेल तेते करत. जंगलातून लाकूडफाटा, पडलेले पाईनकोन गोळा करायचे, स्वयंपाकात मदत करायची, गोशाळेत काम करायचं, शेतीची माकडांपासून राखण करायची, लहान मुलींची अंघोळ, वेणीफणी करायची… लहान मुली परीक्षेसाठी तयारी करायच्या, त्यांचा अभ्यास घ्यायचा ही कामं मोठ्या मुली करत. काही मुली गालिचे आणि स्वेटर विणत. काही खादी भांडाराचं किंवा इतर उद्योगाचं काम बघत. फार छान काळ होता तो. सगळ्यांनी मिळून डोंगरात फळं गोळा करायची, नाचायचं, गायचं. असली भूक लागायची की वाट्टेल तश्या भाज्या नि पोळ्या बिनबोभाट पचायच्या. अजिबात कंटाळा यायचा नाही. तिथं दरवर्षी बालवाडी शिक्षकांसाठी प्रशिक्षण घेत असत. त्या सुमारास बाबा तिथं जात असत.
मेघना पळशीकर.

मार्जरी साइक्स भारतामध्ये पुष्कळ वर्षं राहिल्या. इथल्या मिशनरी शाळेत त्यांनी काम केलं. शिवाय रवींद्रनाथ टागोर आणि गांधीजी यांच्याबरोबर त्यांच्या शिक्षणसंस्थांत काम केलं. त्या दोघांच्या तत्त्वज्ञानाबद्दल सांगत असत. त्या म्हणत की ते दोघे विरुद्ध दिशेला नव्हते, त्यांची तत्त्वज्ञानं दोन वेगळ्या टोकाची तत्त्वज्ञानं नाहीत, तर त्या दोघांच्या भर देण्याच्या जागा वेगळ्या आहेत. इतर सर्व कामं सांभाळून त्यांनी आपल्या आयुष्यात भरपूर ग्रंथलेखन केलं. आचारविचारांचा सुमेळ कसा घालायचा, आपला दिवसभराचा वेळ वेगवेगळ्या कामात कसा कारणी लावायचा आणि हे सर्व करत असताना राहणी बिनखर्चिक कशी ठेवायची याचा उत्तम वस्तुपाठ त्यांच्या सहवासात मिळत असे. अत्यंत कमी संसाधनांमध्ये त्या जगत असत. स्वतःचे कपडे त्या हातानंच शिवत, तेही रेल्वे प्रवासादरम्यान. चहा-कॉफीसाठी काळ्या गुळाचा पाक करून ठेवत. कमीत कमी जळणात भात शिजावा म्हणून गोधडीच्या टोपीत भांडं ठेवत. सारं अगदी निष्ठेनं चालू असे. ग्रामीण भागामध्ये काम करायचं ते कसं, कोणत्या वृत्तीनं, कोणती सूत्रं पाळायची हे सारं आपल्या राहणीमधून त्या पोचवायच्या.