ही आहे उजेडाची पेरणी
महाराष्ट्रातल्या शिक्षणाने उभारी धरावी म्हणून शासकीय संस्थांकडून दोन हजार दहा साली अनेक उपक्रम राबवले गेले. त्यात शिक्षक-प्रशिक्षणे, पाठ्यक्रम-रचना, मूल्यमापन-निकष, राज्यपातळीवरील सर्व संस्थांची जोडणी अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. समविचारी शिक्षकांच्या गटाची उभारणी करणारा प्रकल्प महाराष्ट्राचे त्यावेळेचे राज्यप्रकल्प संचालक नंदकुमार यांनी सुचवला होता. चांगले काम करणार्या शिक्षकांकडून राज्याने शिकावे, प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे; तसेच अशा शिक्षकांनी एकमेकांच्यात विचार-अनुभवांची देवाणघेवाण करावी, आपल्याप्रमाणे आणखी शिक्षक प्रेरित करावेत ; अशा अत्यंत खुल्या दृष्टिकोनातून त्यांनी राज्य पातळीवरील संस्था, अधिकारी व शिक्षकांच्या एकत्र कार्यशाळा घ्यायलाही तेव्हा सुरुवात केलेली होती.
इतरत्र सामान्यपणे वापरली जाणारी प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना बदलायला हवी, याबाबत सर्वांचे एकमत होते. एका तज्ज्ञाने शंभरांना शिकवावे, मग त्या शंभरातल्या प्रत्येकाने आणखी शंभरांना अशा प्रकारे प्रशिक्षणे होत असत. त्याऐवजी महाराष्ट्रासारख्या अवाढव्य राज्यात वापरता येईल अशी एक सशक्त पर्यायी रचना – बीज-प्रात्यक्षिक रचना (डेमो सीड मॉडेल) – विकसित करण्यास सुरुवात केली गेली. या रचनेनुसार प्रशिक्षणे करायची तर अधिक सखोल व अधिक अर्थपूर्ण काम करणार्या बर्याच जास्त लोकांची गरज समोर आली. राज्यातील अनेक चांगल्या शिक्षकांना यात सामावून घ्यायला हवे असे ठरवले गेले. त्यासाठी अशा शिक्षकांसमवेत बैठकाही झाल्या. यापूर्वीही अशा कामांमध्ये शिक्षकांना सहभागी करून घेतले जातच होते, परंतु ते केवळ प्रातिनिधिक स्वरूपात. आता अशा प्रेरित शिक्षकांचे गट मोठेमोठे होऊ लागले. शिक्षकांच्या चांगल्या कामाचे कौतुक करणे, प्रोत्साहन म्हणून शिक्षकांना उपयोगी पडतील अशी पुस्तके भेट देणे (प्रिय बाई, वेचक वेधक इ.), त्यांचे काम समजून घेणे व त्या कामाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या कामात त्यांना सहभागी करून घेणे याला सुरुवात झाली. मुंबई-पुण्यात अनेक कार्यशाळा तर झाल्याच, पण गावोगावी जाऊनही अधिकारी व शिक्षकांच्या कार्यशाळा होऊ लागल्या. त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या अनुभवातून शिकणे आणि त्यांच्या सहभागाने राज्यातील शिक्षणप्रक्रिया पुढे नेणे असे तिहेरी काम जोमाने सुरू झाले.
अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू झालेले हे व्यापक काम त्यानंतर काही कारणांनी बंद पडले. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, नवे राज्यप्रकल्प संचालक यांना वारंवार विनंती करकरूनही ते पुन्हा सुरू केले गेले नाही.
शासकीय पातळीवर काम थांबले खरे, पण या काळात काही महत्त्वाच्या गोष्टी घडून बसल्या होत्या. चांगले काम करणारे प्रेरित शिक्षक व अधिकारी एकत्र आले तर काय घडवू शकतात हे सर्वांनी अनुभवलेही होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील शाळांमध्ये सकस काम करणार्या शिक्षकांना एकटे वाटणे आता कमी होऊ लागले होते. आपण एकमेकांच्या संपर्कात राहू आणि आपापल्या शाळांसाठी व विद्यार्थ्यांसाठी उत्तम काम तर करूच, पण इतर शिक्षकांनाही मदत करू असे या शिक्षकांनीच ठरविले. त्यातून वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात स्वखर्चाने ‘सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण’ संमेलनही २०१२ मध्ये झाले. यात शिक्षणाशी संबंधित विविध घटकांवर, अभ्यासविषयांवर चर्चा झाल्या, शिवाय महाराष्ट्रातील शिक्षणवास्तव उजळून कसे टाकता येईल- याचा मार्गक्रमही आखला गेला. शासन आपल्याबरोबर असेल तर योजना अ, नसेल तर योजना ब यांचीही आखणी झाली.
हे झाले तरी एकमेकांच्या सतत संपर्कात राहणे शिक्षकांना सहज जमण्यासारखे नव्हते. इमेलवरून काही देवाणघेवाण चालू होती. फेसबुकवर ऍक्टिव टीचर्स फोरम नावाचे पेजही सुरू झाले होते. पण इंटरनेटची उपलब्धता, रेंज मिळणे अशा अनेक तांत्रिक अडचणींमुळे ते फारसे प्रभावीपणे होत नव्हते. अर्थात, फोनवरून बरेचजण एकमेकांच्या संपर्कात होतेच. काही प्रत्यक्ष भेटतही होते.
गेल्या दोन वर्षांत स्मार्ट फोनची सर्वत्र चलती झाली, आणि या शिक्षकांच्या इच्छेने पुन्हा उभारी धरली. विजेची टंचाई असणार्या व इंटरनेटच्या वेगाला मर्यादा असलेल्या भागात काम करणार्या या एकांड्या शिलेदारांची एकमेकांच्या संपर्कात राहण्याची भूक इतकी जबरदस्त होती की पुण्या-मुंबईतील लोकांच्याही आधी अनेक शिक्षकांनी स्मार्ट फोन घेतले.
भाऊसाहेब चासकर हे याच गटातील अत्यंत उत्साही, प्रयोगशील आणि तळमळीने काम करणारे शिक्षक आहेत. शिक्षणाशी आणि मुलांशी बांधिलकी मानणारी एक प्रेरित टीम भाऊंच्या संपर्कात होती. या सर्वांनी पुढाकार घेऊन व्हॉट्सऍपवर ऍक्टिव टीचर्स फोरम चालू केला. या गटाने मग मागे वळून पाहायचेच नाही असे ठरवले. ह्याचे श्रेय भाऊ चासकरांना द्यायला हवे, पण आपण त्यांना जर ते देऊ केले तर ते म्हणतात, उबंटू!
उबंटू म्हणजे I am, because we are!
ऍक्टिव टीचर्स फोरमवर जास्तीत जास्त संख्या शासकीय शाळांमधल्या शिक्षकांची आहे, पुढाकारही त्यांचाच आहे. अर्थात त्याशिवाय अनुदानित शाळांमधील काही शिक्षक, काही शासकीय अधिकारी, शिक्षणकर्मी, इतर संस्थांमधील तज्ज्ञ असे सगळेच यात आहेत. स्मार्ट फोन आणि व्हॉट्सऍपमुळे अधिकाधिक लोक जोडले जाऊ लागले आहेत. या फोरमवर कधी एखादी आवश्यक माहिती एकमेकांपर्यंत पोचवली जाते, कधी आपल्या कामाचे फोटो, कधी गरमागरम चर्चा तर कधी हलक्याफुलक्या गप्पाही. या नव्या माध्यमाला आता इतका प्रतिसाद मिळायला लागला, की व्हॉट्सऍपचा आणखी एक गट तयार करावा लागला.
सतत एकमेकांशी संवाद होताहोताच त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचीही आस लागली. ‘आपण एकमेकांना व्हर्च्युअल जगात सतत भेटतो, पण आपल्यातील अनेकांनी एकमेकांना प्रत्यक्ष पाहिलेलेही नाही, आता एकदा भेटूया’ अशा चर्चेनंतर भाऊप्रभृतींनी लगेच एका संमेलनाची आखणी केली. आणि तसे संमेलन झालेही.
पहिला आणि दुसरा असे व्हॉट्सऍपचे दोन गट तयार झालेलेच आहेत, पण या दोहोंना आता एकत्र आणले पाहिजे, आणखी लोकांना यात सामावून घेतले पाहिजे ही नवी गरज आता निर्माण झाली आहे. एकीकडे तंत्रज्ञान कामाला हातभार लावते, काम भराभर पसरवते, तशा तंत्रज्ञानाच्या मर्यादाही समोर येताहेत. आणखी मोठा गट तयार करता येणारे ‘टेलिग्राम’ हे नवे तंत्रज्ञान वापरायला सध्या सुरुवात केलेली आहे, पण त्यालाही मर्यादा आहेत. लवकरच त्याही समोर येतील.
काही काम करायचे तर ते सर्वांच्या सहभागाने, एकमताने. मग येणार्या अडचणींवरही एकमेकांच्या मदतीने मार्ग काढायचे, अशा पद्धतीने काम करणारा हा ऍक्टिव टीचर्स फोरम महाराष्ट्रातल्या शिक्षणाला आणखी पुढे नेईल यात शंका नाही.
(ऍक्टिव टीचर्स फोरम या गटामध्ये सहभागी होण्यासाठी आपण टेलिग्राम हे सॉफ्टवेअर आपल्या स्मार्ट फोनवर डाऊनलोड करून गटाशी जोडून घेऊ शकाल. अधिक माहितीसाठी संपर्क :
भाऊसाहेब चासकर bhauchaskar@gmail.com)
उबंटू! अर्थात आय ऍम् बिकॉज वुई आर!!
(उबंटू ही मूळ आफ्रिकन संकल्पना आहे.)
आफ्रिकेत मानववंशशास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. संस्कृतीकरण (लर्ळींळश्रळूरींळेप) न झालेल्या दूर जंगलातल्या आदिवासी मुलांना त्यांनी एकत्र केले. त्यांना सांगितले की, समोर काही अंतरावर ताज्या रसरशीत फळांनी भरलेली एक परडी ठेवलीये. तुमच्यापैकी जे कोणी वेगाने धावत जाऊन परडीला शिवेल, त्याला/तिला ही सारी फळे मिळतील. एक रेषा आखून तिच्यावर मुलांना उभे केले होतेच.
‘गेट सेट गो…’ झाले. शास्त्रज्ञांना वाटले होते, फळे मिळवण्यासाठी सगळी मुले आपापल्या परीने जोराने धावतील. जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील… एकमेकाला मागे टाकण्याचा प्रयत्न होईल… शास्त्रज्ञांना इथे मोठाच धक्का बसला! त्यांचा साफ अपेक्षाभंग झाला.
शर्यत सुरू झाल्यावर सगळ्या मुलांनी एकमेकांना स्पर्धक मानण्याऐवजी एकमेकांच्या हातात हात घेतला! सगळेजण सोबत, हळुवार पावले टाकत फळांच्या परडीपाशी पोहोचले. सगळ्यांनी मिळून ती परडी उचलून घेतली. एकमेकांना देत सगळ्यांनी ती फळे वाटून घेतली.
शास्त्रज्ञ मुलांच्या या कृतीने चक्रावून गेले. ‘असे का वागलात तुम्ही?’ असा प्रश्न त्यांनी मुलांना विचारला. तेव्हा मुलांनी दिलेले उत्तर लाखमोलाचे होते. मुले म्हणाली, उबंटू! ते न कळल्याने शास्त्रज्ञ पुरते गोंधळून गेले. दुभाषाच्या मदतीने प्रचंड उत्सुकतेने शास्त्रज्ञांनी ‘उबंटू म्हणजे काय?’ असे विचारले. तेव्हा त्या मुलांनी खुलासा केला. आम्ही या इथे दूर जंगलात राहतो. निसर्गात जसा एक घटक दुसर्या घटकावर अवलंबून आहे तसेच आमचेही आहे. आम्ही सगळे एकमेकांपासून वेगळे नाही. माणुसकीच्या धाग्याने आम्ही गुंफलेलो आहोत. आमचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे! आम्ही सारे एकमेकांसोबतच आहोत. आम्ही एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न कशाला करू? Ubuntu means `humanity to others. It also means `I am what I am because of who we all are’.
ऍक्टिव टीचर्स फोरमची विचारदृष्टी हीच आहे, त्यानुसारच त्यांचे कामकाज सुरू आहे. यातले सारे लोक जमिनीवर पाय रोवून काम करणारे प्रयोगशील शिक्षक आहेत. नवनिर्माणाचे शिलेदार. इथे कोणी नेता नाही. सारेच कार्यकर्ते आहेत. राज्यभरातील शिक्षकांनी एकमेकांसोबत राहून एकमेकांना समृद्ध करण्याला इथे प्राधान्य दिले जाते. एकमेकाचे सहअस्तित्व स्वीकारून एकमेकाला समजून घेत, कामे तपासत, त्यातल्या उणिवा- अडचणी दूर करत, परस्पर सहकार्याने, समूहभावनेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे जाण्याचा हा प्रवास ही सारी मंडळी करत आहेत.
भाऊसाहेब चासकर
ऍक्टिव टीचर्स फोरम हा ‘व्हॉटसऍप’ वरचा मुख्यत: शिक्षकांचा गट आहे. मीही या गटाचा एक सभासद आहे. इथे दिवसातून शंभरेक संवाद झडतातच. (मात्र ‘कट-पेस्ट’ करायला परवानगी नाही. त्यामुळे हे संवाद खरेच असतात, त्यात एकमेकांच्या कामाचं कौतुक जसं असतं तसं उचकवणंही असतं.) या संवादांमधून रचनावादी शिक्षण, वर्तनवादी शिक्षण, सरकारची धोरणं, प्रत्यक्ष शाळांमधलं वास्तव, शिक्षक-प्रशिक्षणांवरची समीक्षा यावर गंभीर चर्चा असतात. यातले अनेक शिक्षक वृत्तपत्रांमध्ये लिहितात, काही कविता करतात, काही चित्रं काढतात. अनेकजण संगणकावर उत्तम व्याख्यानं तयार करू शकतात. विद्यार्थ्यांना शिकवणं आणि आपण शिकणं यात तर सारी मंडळी मुरलेली आहेत.
व्हॉट्सऍपवरची अनेक पत्रं माझ्या डोळ्यांपुढे आहेत.
१) एका शिक्षकानं त्याच्या शाळेत वर्गातल्या सर्व मुलांना चित्रं दिसावीत म्हणून संगणकाचा पडदा बत्तीस इंचाइतका मोठा करून घेतला. त्यासाठी लोकांकडून मदत मिळविली.
२) सातारा जिल्ह्यातील एका शाळेतल्या मल्लखांबपटूंचे आणि जिम्नॅस्टिक खेळाडूंचे खेळ त्यांच्या शिक्षकानं रेकॉर्ड करून इतरांना पाहण्यासाठी पाठवले. अशा अनेक शाळांवर आधारित ‘शाळा भेट’ या मालिकेमधील काही भाग यू ट्यूबवर बघता येतील.
३) एका पत्रकार सभासदानं त्याच्या ब्लॉगवरील लेख पाठवले होते. त्यानं नुकतीच जपानला भेट दिली. तिथल्या लोकांची वाहतुकीसंदर्भातील जाणीव (आणि उगीच आवाज करत करत पुढे जाण्याची इथल्या चालकांची आवड), तिथल्या आणि इथल्या नद्यांची स्वच्छता याबद्दल लिहिलं होतं. पर्यावरणाच्या संदर्भातले बरेच मुद्दे यानंतरच्या चर्चेत पुढे आले होते. ही चर्चा अनेक शाळांच्या वर्गांमधूनही नक्कीच झाली असणार. ‘आटपाडीचे शापित आड’ यांची शिवाजी महाराजांच्या काळात सुरू झालेली कहाणी…, आजच्या काळात त्यांचा उपयोग सांडपाण्याच्या टाक्या म्हणून होईपर्यंत इथे सांगितली जाते.
४) एका शिक्षिकेनं स्वत:च्या बालपणात वाचायची सवय कशी लागली याबद्दल लिहिलं आहे. मग पुढची चर्चा मुलांना वाचायची आवड कशी लावावी इथपासून, आपापल्या वाचायच्या सवयी, आपल्या स्वत:च्या पुस्तकांच्या संग्रहापर्यंत गेली.
५) पालकनीतीच्या अंकाच्या इ-प्रती शिक्षकांना पाठवल्या गेल्या, तेव्हा सभासदांनी आपले इ-पत्ते पाठवून त्यासाठी मागण्या नोंदवल्या.
६) सरकारी पत्रकांबद्दलची माहिती या गटाला अगदी झटकन मिळते.
७) संगणकीय कौशल्यं एकमेकांकडून पटकन देता घेता येतात.
सध्या ‘टेलिग्राम’ वापरण्याबद्दल काम चालू आहे. ते वापरून बघूनच फायदे-तोटे निश्चित होतील. व्हॉट्सऍपच्या गटासाठी पन्नासची मर्यादा असते ती टेलिग्रामवर दोनशेपर्यंत वाढते, १ जीबी पर्यंत माहितीची देवाणघेवाण इथे चालते पण याचा वेग अद्याप कमी आहे.
सोशल मिडीयाच्या या वातावरणात एकमेकांपासून लांब लांब राहणार्या लोकांना संपर्कात राहणं सहज शक्य झालं, महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व जिल्हयांमधले शिक्षक या संमेलनासाठी येऊन एकत्र भेटले, ते हा व्हॉट्सऍप गट असल्यामुळेच!
भाषा एक असली म्हणजे झालं, बाकी तुमचं राहण्याचं ठिकाण किती का दूर असेना ! स्मार्ट फोन आणि नेट-पॅक यांची किंमत आता शिक्षकांच्या आवाक्यात आली आहे. समविचारी शिक्षक याचा उपयोग करून आता एकमेकांशी संवाद करू लागलेत. वैयक्तिक संवादात त्यांच्या कामाचं क्षेत्र आपोआप आलेलं आहे. कृतिशील शासनाला याचा उपयोग शिक्षक-प्रशिक्षणासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी करता येईल.
मुलांना मिळालेल्या शिक्षणहक्कांमध्ये बालककेंद्री शिक्षणाची आवश्यकता व्यक्त केलेली आहे. एक पायरी पुढे जाऊन त्याचं रूपांतर शिक्षककेंद्री प्रशिक्षणात व्हायला हवं. शिक्षकांना मुळातच जर गणिताची भीती वाटत असेल तर मागं पडणार्या मुलांना शिकवायला त्यांनी कितीही जास्तीचा वेळ काढला, तरी त्यातून गणित विषय आवडायला लागणार नाही. इथं शिक्षकांची गणिताची भीती घालवणं हीच गरज आहे. ‘पहिली दुसरीच्या वर्गांना गणित शिकवणं हे सोपं काम आहे, ते काय कुणीही करू शकतं’ या मूळ विचारातच गडबड आहे. गणिताच्या पायर्या शिकवणं आणि संकल्पना शिकवणं यात फरक आहे. गणित शिकवण्याच्या क्षमतेचा एकच तुकडा वापरून ते शिकवलं की काय होतं, ते आपण ‘असर’ अहवालात नेहमीच पाहिलेलं आहे.
शिक्षककेंद्री प्रशिक्षण द्यायचं तर त्यासाठी आधी शिक्षकांकडून तशी मागणी यायला हवी, शिक्षकांना आपल्याला अमुक एक येत नाही ही जाणीव झाली; आणि व्यवस्थेनं ते मान्य केलं तरच हे होऊ शकतं. बहुतेक शिक्षकांना त्यांच्या निवडीनुसार प्रशिक्षण हवं आहे, असं भाऊ चासकर सांगतात. पण राज्यशासनानं तशी इच्छा आणि तयारी अजून तरी दाखवलेली नाही, ते होईपर्यंत शिक्षणहक्क प्रत्यक्ष मिळण्याची अपेक्षाच नको ! असा शिक्षणहक्क मिळवण्यासाठीच या शिक्षकांनी ऍक्टिव टीचर्स फोरम आकाराला आणला आहे.
नवं काय ?
हे जे महाराष्ट्रात घडतं आहे, म्हटलं तर त्यात नवं काय आहे? कृतिशील शिक्षक इथं पूर्वीपासून होतेच, त्यांचे गट असणं हेही काही नवं नाही. हे संपर्कमाध्यम तेवढं नवं आहे. अमरावती, अकोले, संगमनेर इथे असे गट केव्हापासूनच काम करत आहेत. पण एकमेकांना भेटायचं तर ते वेळखाऊ, खर्चिक काम होतं. लांबचे लोक लांबच राहत. फेसबुक आल्यावर ते काहीसं शक्य झालं होतं, तरी त्यासाठी संगणक हवा, वीज हवी. आणि मुख्य म्हणजे नेट मिळायला हवं. इतर कामातून उठून संगणकासमोर बसायलाही हवं. या मर्यादा आता राहिलेल्या नाहीत.
‘काही तरी चांगलं’ करण्याच्या वृत्तीला आता स्मार्ट फोन व नेट पॅक यांच्या शोधाचा हातभार लागतोय. काही अर्थपूर्ण करण्याचं समाधान एखाद्याला समजलं, की तसं अर्थपूर्ण काम पुन:पुन्हा केलं जातं. त्यातून आपोआप कामगिरी सुधारते, अधिक चांगली होते. ही अधिक चांगल्याची प्रेरणा मिळालेले म्हणून या मंडळींना ‘प्रेरित’ म्हणून ओळखलं जातं.
ज्यांचं काम आसपासच्या परिस्थितीवर आणि मिळणार्या पगारावर अवलंबून असतं, ती मंडळी वेगळी असतात. पण दुसर्यांच्या वागण्यापेक्षा, परिस्थितीपेक्षा, स्वत:च्या ‘समाधानाला’ अनुसरून काम करणार्या स्वयंप्रेरित मंडळींना एकमेकांच्या संपर्कात राहायला या नव्या मीडियाचा भरपूर उपयोग नक्कीच झालेला आहे. परिस्थितीतून येणार्या निराशेला तोंड द्यायलाही त्यांना त्याची मदत होते. या उपक्रमाला किंवा संवादवृत्तीला शासनानंही प्रोत्साहन द्यायला हवं. या प्रयत्नातून अतिशय उत्तम शिक्षणसाहित्य निर्माण होत आहे; त्याचा, प्रशिक्षणाच्या मागण्यांमधून सुचवलेल्या विषयांचा, उपक्रमांच्या कल्पनांचा उपयोग शासनानं करून घ्यायला हवा.
नंदकुमार
——————————————————————————————————————
नंदकुमार
शिक्षणाबद्दल विलक्षण आस्था असलेले एक आय. ए. एस. अधिकारी. एस. सी. इ. आर. टी.चे माजी संचालक, सर्व शिक्षा अभियानाचे माजी ऱाज्य प्रकल्प संचालक, उच्चपदांवर काम करत असतानाच प्रत्यक्ष शाळेत काम करणार्या हजारो शिक्षक-अधिकार्यांशी सतत संवाद साधत, हसतखेळत त्यांना प्रेरणा देण्याबाबत प्रसिद्ध.
nand41@yahoo.com
गीता महाशब्दे
नवनिर्मिती लर्निंग फौंडेशन संस्थेच्या संचालिका,
गेली वीस वर्षे शिक्षण-क्षेत्रात कार्यरत. अनेक राज्यांमध्ये गणिताच्या सार्वत्रिकीकरणाचा ‘सक्रिय जनगणित’ हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात पुढाकार.
geetamahashabde @gmail.com
भाऊसाहेब चासकर
ऍक्टिव टीचर्स फोरमचे समन्वयक
सतरा वर्षे प्रयोगशील शिक्षक म्हणून कार्यरत. प्राथमिक शिक्षणात सातत्याने वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग. अनेक गौरव पुरस्कार प्राप्त. राज्यभरातील शिक्षकांच्या क्षमता-बांधणीसाठी प्रयत्नशील. शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांची-अभ्यासकांची व्याख्याने, चर्चासत्रे, शिबिरे आयोजित करण्यासाठी सतत पुढाकार.
bhauchaskar@gmail.com