संवादकीय – ऑगस्ट २०१४

स्वातंत्र्य म्हणजे काय?

एखादी गोष्ट करण्याची शारीर वा बौद्धिक क्षमता आपल्याजवळ आहे व ती करण्याची आपल्याला मुभाही आहे. आपल्याला ती गोष्ट सक्तीनं करायला लावण्याचा किंवा करू न देण्याचा प्रयत्नही कुणी करत नाहीय; इतकंच नाही तर ती करण्या न करण्यातून कोणतंही सामाजिक वा वैयक्तिक नुकसान होत नाही, अशा परिस्थितीत या गोष्टीचं आपल्याला स्वातंत्र्य आहे असं म्हणता येतं.

उदाहरणार्थ, रात्री रस्त्यांवर संपूर्ण काळोख असताना, रहदारी संपल्यावर मला घराबाहेर पडायचं आहे. त्या कृतीसाठी माझं शरीर सक्षम आहे, पण वातावरण असं आहे की कधी लुटले जाऊ, किंवा हल्ला होईल, किंवा अत्याचार होतील याची शाश्‍वती नाही. तर त्याचा अर्थ पुरेसं स्वातंत्र्य मला उपलब्ध नाही.

समजा, मला शिकायचं आहे, शिकण्याची क्षमताही मजजवळ आहे, न्यायासनानं मला शिक्षणहक्क बहाल केलेला आहे. मला एक विशिष्ट आजार आहे, माझ्या सहाध्यायांना वा शिक्षकांना माझ्याशी लैंगिक संबंध वा रक्ताची देवघेव केल्याशिवाय तो होण्याची शक्यता नाही, तशा वर्तनाची शक्यताही नाही. मी शाळेच्या सुव्यवस्थेत कोणतीही बाधा आणलेली नाही, तरीही शाळेनं मला काढून टाकलेलं आहे; तर मला स्वातंत्र्य उपलब्ध आहे असं कसं म्हणता येईल?

या अंकाच्या मुखपृष्ठावर काही लहान मुलामुलींनी ‘उद्याच्या जगात त्यांना काय हवं’ याचं चित्र रेखलं आहे. ती म्हणतात – ‘पोटभर जेवायला हवं’, ‘तहान भागेल असं स्वच्छ पाणी हवं’, ‘श्‍वासभर शुद्ध हवा हवी’, ‘आई काम करताकरता गाणं गुणगुणत असायला हवी’ आणि ‘आसपास चांगली माणसं हवीत.’ ह्यासारख्या साध्यासुध्या मूलभूत गरजा जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत स्वातंत्र्याचा उपयोग तरी काय?

एक रोजचीच गोष्ट! माझी मातृभाषा नसलेली अशी एक भाषा माझ्या आसपास गोंगाट करत राहते. गोंगाट अशासाठी म्हटलंय, की ती माझ्या पालकांनीच लहानपणापासून भावनिक संवादासाठी आणि जगाच्या आकलनासाठी माझ्या मनात उपजवलेली भाषा नाही; पण जागतिक वगैरे स्तरावर त्या भाषेला मोठं महत्त्व मात्र आहे. घटनेनं मला दिलेलं भाषणस्वातंत्र्य उपलब्ध होण्यासाठी मला किमान एक भाषा तरी उत्तम यायला हवी, म्हणजे समग्र आणि साक्षेपी विचार करणं सहजशक्य होईल. त्यासाठी मला माझ्या मातृभाषेचा नीटसा आवाका यायला हवा, म्हणजे नवी भाषा शिकायची तरी माझ्या भाषेच्या साहाय्यानं मी ती शिकेन. आता हे माझ्या पालकांना समजत नसलं आणि ते सांगण्याइतकी संवादक्षमता माझ्याकडे वयपरत्वे नसली, तर हे स्वातंत्र्य राज्यव्यवस्थेनं दिलेलं असूनही मला उपभोगता येणार नाही.

समजा, मी एक मुलगी आहे. शरीरानं आणि मनानंही. पळणं ह्या वैयक्तिक क्रीडाप्रकारात मी कष्टपूर्वक प्रावीण्य मिळवलं आहे, पण माझ्या शरीरात पुरुष अंतस्रावांचं प्रमाण सामान्य स्त्रियांच्या मानानं निसर्गत: जरा जास्त आहे. त्याचा खेळताना विशेष फायदा मिळतोच असं सिद्ध झालेलं नाही, पण समजा होत असला, तरी प्रत्येकच व्यक्तीला तिच्या शरीरवैशिष्ट्यांचा फायदा मिळतोच की. कुणाचे हात लांब आहेत, त्यामुळे पोहण्याच्या स्पर्धेत अव्वल यश मिळतं, किंवा कुणाची नजर अतिशय तीक्ष्ण असल्यानं नेमबाजीत उपयोग होतो. पण माझ्या बाबतीत मात्र मला ‘पुरुष ठरवलं गेलं’ आणि मला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं. इतकंच नाही तर, आतापर्यंत मिळवलेली बक्षिसंही माझी कुठलीही चूक नसताना माझ्याकडून हिसकावून घेतली गेली. इतर स्त्रियांना स्पर्धांमध्ये भाग घेण्याचं स्वातंत्र्य असताना माझं स्वातंत्र्य मात्र डावललं जातं आहे.

रोजच्या वर्तमानपत्रातलं शाळकरी मुलामुलींवरच्या अत्याचाराच्या बातम्यांचं प्रमाण निश्‍चित वाढलेलं आहे. हे प्रमाण प्रत्यक्षातही थोडं वाढलेलं आहे, की आता बाललैंगिक अत्याचाराच्या विरुद्धचा कायदा आहे त्यामुळे असे प्रसंग अधिक प्रमाणात नोंदवले जात आहेत, याची नेमकी कल्पना नाही; पण दोन्ही गोष्टी असण्याची शक्यता आहे. लहानपणी कधी असा काही अनुभव सोसावा लागला होता का, असं विचारलं तर बहुसंख्यांना विशेषत: स्त्रियांना त्या आठवणीनंही क्लेश होताना दिसतात. त्या प्रसंगाला अनेक वर्षं होऊन गेलेली असूनही ती वेदना त्यांच्या चर्येवर स्पष्ट दिसते. या व्यथेचं मूळ कारण अत्याचार होणं हे असतंच, पण त्याहून जास्त दु:ख असतं ते ज्यांनी या प्रसंगात मदत करायला हवी होती, त्या पालकांनी, शिक्षकांनी ती केली नाही, आपल्या पाठीशी कुणी उभं राहिलं नाही, अत्याचारी व्यक्तीला सुनावलं नाही ह्याचं असतं. ही वेदना संपता संपत नाही. अत्याचारी व्यक्ती नंतर दिसणारही नसली, तिच्याशी कुठलाही संबंध येणार नसला तर अत्याचाराच्या यातना विसरायला मदत होते. मात्र अत्याचारी व्यक्तीशी पुढे संपर्क येत राहणार असेल आणि ती व्यक्ती छद्मी सभ्य चेहर्‍यानं आसपास वावरणार असेल, तर त्या यमयातना असह्य असतात.

अत्याचारी व्यक्ती विकृतच असतात. आजूबाजूचं एकंदरीत वातावरण अत्यंत सभ्य आणि सतर्क असलं तर अशा व्यक्तींवर काही प्रमाणात तरी मनाचं नाही तरी जनाचं बंधन येण्याची शक्यता आहे. एरवी विकृत व्यक्ती काय वागेल, यावर आपण चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. त्यांना समाजजीवनापासून दूर ठेवण्याची जबाबदारी न्यायासनाची आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं पालकशिक्षकांना आमची कळकळीची विनंती आहे, की कुठल्याही बालकावर असा अत्याचाराचा प्रसंग आलेला असेल, आणि आपण आसपास असू तर आपण त्याला/तिला आधार द्यायला हवा. मुख्य म्हणजे बालकाची यात कुठलीही चूक नाही, अत्याचारी व्यक्तीनं गुन्हा केलेला आहे, आणि त्याबद्दल त्या व्यक्तीला खडसावलं तर जाईलच, याशिवाय कायद्याप्रमाणे जी शिक्षा असेल तीही होईल; हा वज्रविश्‍वास बालकाला आपण द्यायलाच हवा.

स्वातंत्र्य ही काही घडवून घेऊन चोरीला जाईपर्यंत गळ्यात वा कुलूपबंद कपाटात ठेवण्याची ठेव नाही. आपल्या स्वातंत्र्याची निर्मिती आपल्याला सर्वांना मिळून आणि प्रत्येकालाही आपापली करावी लागते. असं म्हणतात की ‘आपण विचार कसा करायचा’ ही बाब तरी संपूर्ण आपल्या स्वत:च्या हातात, म्हणूनच स्वतंत्र असते. प्रत्यक्षात हे अर्धसत्य आहे. आपल्या वागणुकीवर आणि विचारांवरही आसपासच्या संस्कृतीचा, परिस्थितीचा, आणखी हजार गोष्टींचा परिणाम असतो. त्यातून आपला स्वत:चा मोकळा विचार सुचायला देखील सतर्कपणे प्रयत्न करावे लागतात. जणू आपल्याच मनाशी स्वातंत्र्यलढा लढायची गरज पडते.

असे लढे जिंकण्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा!