आम्हालाही ग्रामसभेत आमचे मुद्दे मांडायचेत…

नागरिक शास्त्राचा तास होता. ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांचे कामकाज हा विषय चालू होता. त्या अनुषंगाने ‘आपले सरपंच कोण आहेत? ग्रामसेवक कोण आहेत? ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोण कोण गेले आहे? ग्रामसभा कोणी पाहिलीये?’ अशा अनेक प्रश्‍नांची चर्चा सुरू झाली. सरपंचाचे नाव बर्‍याच मुलांना माहिती होते. काही थोड्या जणांना ग्रामसेवक कोण आहे हे माहिती होते. परंतु ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोणीच गेलेले नव्हते, ग्रामसभा पाहिलेली नव्हती. नागरिकशास्त्र शिकवायचे तर पुस्तकात अडकलेल्या माहितीला आधी मुक्त करायला हवे. आणि या माहितीसह मुलांना प्रत्यक्षाच्या अंगणात घेऊन जायला हवे. वर्गात नागरिकत्वाचे धडे केवळ वाचायचे-शिकायचे नसून, ते समजून घेऊन स्वतः अंगीकारायचे, आचरणात आणायचे असतात; हे मुलांपर्यंत पोचवायला हवे ही जाणीव प्रकर्षाने झाली.

bhau (1).jpg

यातूनच मुलांची ग्रामपंचायतीला भेट ठरली. योगायोगाने त्या दिवशी तिथे ग्रामसेवकही हजर होते. त्यांच्याशी मुलांच्या छान गप्पा झाल्या. निवडणूक कशी होते? सरपंच निवड कशी होते? निवडणूक कोण लढवू शकते? निवडणुकीत पैसे, दारू का वाटतात? करवसुली कशी केली जाते? नळयोजनेचे वाया जाणारे पाणी वाचवता येणार नाही का? उघड्यावर टाकला जाणारा कचरा… एक ना अनेक… प्रश्न विचारून मुलांनी ग्रामसेवकांना अक्षरशः भंडावून सोडले. या उपक्रमातून ग्रामपंचायत कळायला चांगलीच मदत झाली. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली. काही प्रश्‍न अनुत्तरित राहिले… ‘एकप्रकारे ग्रामपंचायत म्हणजे आपल्या गावाचे सरकारच असते’, हा धडा मात्र मुलांना छानपैकी शिकता आला. ग्रामपंचायतीनंतर आता मुलांना ग्रामसभा पाहायची होती. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत मुलांना घेऊन जायचे, तिथले कामकाज पाहायचे, समजून घ्यायचे असे ठरले. मुलांनी ग्रामसभेविषयी पुस्तकात वाचले होते.

एके दिवशी शाळा भरलेली असताना मिरवणूक घेऊन डीजे तिथे आला. डीजेचा आवाज (कर्कश दणदणाट) ऐकून आधी मुलांना भारी गंमत वाटली. आवाजाकडे लक्ष गेल्याने काही क्षण का होईना मुलांची मने वर्गात ‘गैरहजर’ होती. ‘थोडा वेळ बाहेर जाऊन मिरवणूक पाहून या’, असे मुलांना सांगितले. आनंदाने उड्या मारत मुले बाहेर गेली. राणी आणि गीता मात्र लगेचच वर्गात आल्या. डीजेच्या आवाजाने छातीत धडधड होते असे त्यांनी सांगितले.
मिरवणूक शाळेपासून पुढे सरकली. सारी मुले वर्गात येऊन बसली. डीजेचा आवाज किती डेसिबल असावा, तो किती वाजेपर्यंत वाजवावा. डीजेचा दणदणाट, त्यातून उद्भवणारे आजार, होणारे ध्वनिप्रदूषण यावर चर्चा झाली. डीजेच्या आवाजाने लग्नातच काही लोक हृदयविकाराच्या झटक्याने कसे गेले… हे मी मुलांना सांगितले. मुलांना आजवर ज्या गोष्टीची गंमत, आकर्षण वाटत होते. ती गोष्ट समाजाला इतकी त्रासदायक किंवा भयंकर वैताग देणारी असू शकते, हे मुलांना माहिती नव्हते! आजवर त्यांना तसे कुणी सांगितले नव्हते.

‘‘डीजे कधीच बंद होणार नाही का सर?’’ अरुणने उत्सुकतेने विचारले. मग काही गावांनी डीजे वाजविण्यावर घातलेल्या बंदीचीही माहिती मी दिली. आता मुलांची उत्सुकता आणखीन चाळवली गेली. ‘अच्छा, असे होऊ शकते तर…’ असा आविर्भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. मग चर्चा ग्रामसभेच्या दिशेने निघाली. ‘‘आपण डीजेचा विषय मांडू शकतो का ग्रामसभेत?’’ संकेत विचारत होता. ‘‘आपल्याला ठराव मांडू देतील का मोठी माणसं?’’ विशालने शंका उपस्थित केली. त्यावर चर्चा झाली…
नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते… शाळा आणि मंदिर परिसरात मोठी माणसे पैशावर पत्ते (जुगार) खेळत बसतात… गुटखा विक्री कायद्याने बंद असताना गावातल्या किराणा मालाच्या दुकानात राजरोस गुटखा विकला जातो… असे काही विषय मुलांकडून आले. अजून काही मुलांनी इतर काही मुद्दे मांडले. मोठ्या माणसांची होते तशी मुलांनी या विषयांवर चर्चा केली! शिक्षक म्हणून ही बाब मला खूप सुखावणारी होती. मुलं आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा गंभीरपणे विचार
करत होती. त्याबद्दल भूमिका घेत होती,

ग्रामसभेची तारीख जवळ येत होती, तशी मुलांची उत्सुकता वाढत गेली. नंतर नंतर तर मुले ‘हा विषय घेता येईल का, तो विषय घेता येईल का?’ असे विचारून भंडावून सोडू लागली. ‘ग्रामसभेचे कामकाज कसे चालते, हे पाहण्यासाठी ग्रामसभेला उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी.’ असे पत्र मुलांनी लिहिले आणि सरपंचांना दिले. ग्रामसभेचा दिवस उगवला. सगळ्या मुलांनी ग्रामसभेला न जाता निवडक वर्गप्रतिनिधींना पाठवायचे असे ठरले. मुले मंदिराच्या मंडपाजवळ रेंगाळत उभी होती. ६०- ७० मोठी माणसे जमली होती. सरपंच, ग्रामसेवक तिथे आले. सभेचे कामकाज सुरू झाले. तशी मुलेही तिथे जाऊन बसली.

bhau (4).jpg

‘‘काय कामय रे तुमच्यावालं? चला निघा. इथं ग्रामसभा सुरूयेे. तमाशा नाही!’’ ग्रामपंचायतीच्या शिपायाने मुलांना दरडावले! कदाचित मुले टाईमपास म्हणून इथे आलीत, असे त्यांना वाटले असावे. मुले काहीही न बोलता तिथेच बसून राहिली. मुलांच्या उपस्थितीने काही लोकांच्या कपाळाला आठ्या पडलेल्या स्पष्टपणे दिसत होत्या. त्यातला एक ग्रामस्थ तावातावानेच म्हणाला, ‘‘टळा आता. गंमतबिम्मत पुरे झाली. हा पोरखेळ नाहीये. भाऊसाहेब, (ग्रामसेवक) यांच्यावालं काय कामय इथं?’’ ‘‘ हां, राजूशेठ म्हणत्यात ते खरंय. पोरांचं काय कामय इथं. जा रे पोरांनो. १८ वर्षांचे झाल्यावर मतदान करायला लागा आणि मग या.’’ असे म्हणत एकाने पहिल्याच्या सुरात सूर मिसळला. नवीन काही शिकू पाहणार्‍या मुलांचे ग्रामसभेत असे ‘स्वागत’ झाले… आम्ही मागच्या बाजूला बसून सारे शांतपणे पाहत होतो.

काही लोक आपल्याला हुसकावून द्यायला लागल्याचे पाहून कुणालला राहवले नाही. उभा राहून तो म्हणाला, ‘‘पुस्तकात ग्रामसभेचा धडा आहे. म्हणून आमी सभा पाहायला आलोय. आमी बी गावाचेच पोरं आहे. गप्प बसू. आमाला बसू द्या.’’ त्याच्या या विनंतीवर सरपंचांनी मौन सोडले. ‘‘शांत बसणार असाल तर बसू देतो,’’ असे ते म्हणाले. ते ऐकून मुलांचा जीव भांड्यात पडला. त्यांचे पडलेले चेहरे एकदम खुलले.

विषयपत्रिकेनुसार विषय सुरू झाले. कधी हसत खेळत तर कधी गरमागरम चर्चा. काही विषयावरून हमरीतुमरीवर येणे… मुले मागच्या बाजूला बसून सगळे शांतपणे औत्सुक्याने पाहत होती… गावातल्या देवस्थानाबाबतचा वादग्रस्त विषय सरपंचांनी अत्यंत कौशल्याने हाताळला! शिवाय बहुमताने ठराव मंजूर करून घेतला. विकासकामांबाबत सरपंचांचे कौतुक करताना मुलांनी टाळ्या वाजवल्या. त्यामुळे इतरांनाही टाळ्या वाजवाव्या लागल्या! विषयपत्रिकेवरील विषय संपले. ऐन वेळचे विषय आहेत का? असे विचारले गेले… ग्रामस्थांनी काही विषय मांडले. त्यावर साधकबाधक चर्चा झाली.

इतक्यात संकल्प उभा राहिला. ‘‘आम्ही ग्रामसभा कशी असते ते पाहायला आलोत. पण आम्हालाही काही सांगायचं आहे. त्याची परवानगी आम्हाला द्यावी.’’ अशी विनंती त्याने केली. ते ऐकून जमलेले बहुतेक लोक ‘ही पोरं काय बोलणार?’ अशा उत्सुकतेने पाहू लागली. ‘‘निर्मलग्राम, महात्मा गांधी तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातला ‘स्वच्छ गाव सुंदर गाव’ असे पुरस्कार आपल्या गावाला मिळालेले आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो,’’ असे त्याने सांगितले.
त्यानंतर डीजेविषयी सविस्तर बोलून झाल्यावर ‘आपल्या गावात डीजे वाजवायला बंदी करावी,’ असे मुलांचे मत असल्याचे त्याने सांगितले. त्यावर तरुण मुलांनी लगेचच नापसंतीचा सूर लावला. ‘हे काय भलतं खूळ काढलंय?’ असे त्यांचे चेहरे सांगत होते. त्यात लग्नसराई तोंडावर आलेली होती. डीजेशिवाय लग्न किंवा रात्रीची वरात म्हणजे…? असे त्यांचे म्हणणे आले. सीताराममामा विचारी, वयोवृद्ध गृहस्थ. सभा सुरू झाल्यापासून ते कोपर्‍यात शांत बसलेले होतेे. आता त्यांना राहवले नाही. ते बोलू लागले. पहिल्यांदा त्यांनी मुलांचे कौतुक केले. डीजेविषयी काही घटना, प्रसंग सांगत मुलांनी सुचवलेल्या विषयाला त्यांनी अनुमोदन दिले. दामू तात्यांनी डीजेच्या आवाजाने एका म्हातार्‍या माणसाला कसा त्रास झाला, हे ‘जसे पाहिले तसे’ सांगितले. संकल्प आणि सीताराममामांच्या मताशी त्यांनी सहमती दर्शवली. ‘‘सरपंच, मुलांचे म्हणणे बरोबर आहे, हा डीजे नकोच. आयत्या वेळचा विषय म्हणून मीच हा विषय मांडतो आहे. तुम्ही ठराव करून घ्या’’ असे त्यांनी वडीलकीच्या नात्याने सांगितले. या विषयावर स्पष्ट भूमिका न घेता, अंदाज घेणारे सरपंच आता सभेचा मूड पाहून ठरावाच्या बाजूने झाले. तरुणांना हा ठरावच नको होता. ‘‘पोराटोरांचे ऐकून कुठे गावचा कारभार करता येईल काय?’’ असे एकाने तिथेच सरपंचांना सुनावले. (तो गावातल्या डीजेवाल्याचा भाऊ होता!) पण बहुतेक मोठ्या माणसांनी ठरावाला अनुकूलता दर्शवल्याने ठराव मंजूर झाला. या चालू सीझनमध्ये लग्नाला डीजेचे बुकिंग झालेले असल्यामुळे दिवाळीनंतर ठरावाची अंमलबजावणी करावी असे ठरले. यानंतर मुलांनी मांडलेल्या जवळजवळ प्रत्येक विषयाची सीताराममामांनी त्यांनी स्वत: मांडलेला आयत्या वेळचा विषय म्हणत नोंद घेतली. ठराव करायला लावले. गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवल्या आणि मुलांच्या न्याय्य मागण्यांना योग्य ते स्थान मिळवून दिले.

पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. रस्त्यात चिखल होतो. डबकी साचतात. दुर्गंधी पसरते. डास, माशा होतात. यावर तोट्या बसविण्याचा विषय अंकिताने मांडला. तोट्या बसविण्याचा निर्णय लगेच झाला. मंदिर आणि शाळेच्या परिसरात मुले जेवायला बसतात. तिथेच काही लोक पत्ते खेळतात. पान-तंबाखूच्या पिचकार्‍या मारतात. हे योग्य नसल्याचे मुलांनी सांगितले. ‘पुन्हा असे दिसल्यास दंडात्मक कारवाई करावी लागेल,’ अशी तंबी सरपंच आणि ग्रामसेवकांनी दिली. अभिजित आणि जनार्दन यांनी दिवसा पथदिवे सुरू असतात याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले. काही गोष्टींबाबत तात्काळ निर्णय झाले. सभेला उपस्थित राहू दिल्याबद्दल प्रशांतने सर्वांचे आभार मानले.

ग्रामसभेला गेलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी शाळेतल्या इतर मुलांना सभेचे कामकाज आणि मुलांनी घेतलेल्या सहभागाविषयी माहिती दिली. ग्रामसभेतील मुलांची उपस्थिती हा गाव परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

नागरिकशास्त्रातले धडे मुलांनी प्रत्यक्ष पाहिले. इतकेच नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेही. सजग नागरिकत्वाकडे नेणारी ही प्रक्रिया इथेच थांबणार नाही, हा विश्‍वास शिक्षक म्हणून मला वाटतो आहे.

bhauchaskar@gmail.com