शहाणी वेबपाने – मॉर्निंग जॅम विथ माय लिल् मॅन

मध्यंतरी इंटरनेटवर एक व्हीडिओ प्रचंड लोकप्रिय झाला. याला वेबभाषेमध्ये ‘गॉन व्हायरल’ असं म्हणतात. एखाद्या विषाणूचा संसर्ग व्हावा तसे हे काही व्हीडिओ सोशल मीडियावर पसरतात आणि लोकांच्या मनांवर कब्जा करतात.

आपल्या व्हीडिओचं असं काही होईल असं तो अपलोड करणाऱ्या डॉमिनिक हुंग्रच्या ध्यानीमनीदेखील नव्हतं. काही मित्रमंडळी आणि कुटुंबातल्या लोकांचं मनोरंजन व्हावं इतक्याच काय त्या हेतूनं त्यानं तो फेसबुकवर टाकला आणि पाचच दिवसात ५८,३९१ जणांनी तो शेअर केला. पुढच्या २ महिन्यांत जवळजवळ १० लाख लोकांनी तो यूट्यूबवर पाहिला.

Picture1.jpg

असं काय होतं त्या व्हीडिओमध्ये? जगावेगळं काहीच नाही. २ मिनिटांच्या या व्हीडिओमध्ये वीसेक महिन्यांचा निकोसेक आपल्या बाबांबरोबर सकाळचा व्यायाम (खरंतर नाचच) करताना दिसतो. निकोसेकच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद जगभरातल्या लोकांना भावला असावा आणि त्याला तशी संधी आणि मोकळीक देणाऱ्या डॉमिनिकचं कौतुक वाटलं असावं. एखादं आनंदी, निरोगी आणि हसतं-खेळतं मूल पाहण्यासारखं दुसरं सुख नाही आणि मूल असं असण्यात त्याच्या आजूबाजूच्या प्रौढांचा खूपच मोठा वाटा असतो.

छोट्या मुलांसाठी शिकणं ही अतिशय नैसर्गिक प्रक्रिया असते. त्यांच्या प्रत्येक अनुभवातून ती काही न काही तरी उचलतातच. छोटा निकोसेकही बाबांचं अनुकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. बाबा हिपहॉप प्रकारचा नाच करत आहेत. त्यांच्या हालचालीत एक प्रकारची सफाई, सौंदर्य आहे. निकोसेक नुसत्याच उड्या मारत खिदळतो आहे आणि आपल्या टेडी बेअरला उलटं-पालटं करून आपल्याला जे जमलं नाही ते त्याच्याकडून करवतो आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निकोसेकनी काय करावं किंवा कशा प्रकारे नाचावं याबद्दलची कोणतीच अपेक्षा त्याच्या बाबांनी ठेवलेली नाही. एकत्र मजा करणे एवढाच हेतू आहे. असं मोकळं आणि तणावरहित वातावरण मुलांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी अत्यावश्यक असतं.

निकोसेक या वेळात कायकाय शिकतोय याचा विचार केला तर मोठी यादीच तयार होईल. आपल्या शारीरिक हालचालींबद्दल आत्मविश्वास, हिपहॉप नाचाच्या पद्धतीनुसार आपली पाळी येईपर्यंत वाट पाहणं, बाबांशी संवाद करण्यातून होणारा भाषाविकास, बाबा काय करत आहेत याचं बारीक निरीक्षण व त्यानंतर आपण काय करायचं याचा विचार, नवीन गोष्टी शिकण्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन… आणि खूप काही.

आपल्या लहानग्यासोबत असा छान वेळ घालवून खरं तर हे बाबा त्याच्या आयुष्यभराच्या शिकण्याचा भक्कम पायाच घालत आहेत असं म्हणायला हरकत नाही.

नीलिमा गोखले
neelima.gokhale@gmail.com
9823053272

मधुरा राजवंशी
rmadhuraa@gmail.com
8275369702