पारंपरिक निर्मिती ते डिजिटल फॅब्रिकेशन
डॉ. योगेश कुलकर्णी हे पाबळच्या विज्ञान आश्रमाचे संचालक आहेत. ‘हाताने काम करत शिकणे’ या पध्दतीने आश्रमातील विद्यार्थ्यांना ते शिकवतात. या पध्दतीनेच विज्ञान आश्रमने तयार केलेला ‘मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ हा पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम शंभरहून अधिक जास्त माध्यमिक शाळांमधून राबवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. पाबळमध्ये व भारतात डिजिटल फॅब्रिकेशन वर आधारित ‘फॅब लॅब्स’ सुरू करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
दोन वस्तू एकमेकींवर घासल्या की उष्णता निर्माण होते, हे झाले विज्ञान. त्या उष्णतेपासून विस्तव तयार करता येणे हे झाले तंत्रज्ञान! पाणी उघड्यावर ठेवले की त्याचे बाष्पीभवन होते आणि मातीच्या सच्छिद्र भांड्यातून पाणी पाझरते हे झाले विज्ञान, पण त्या तत्वाचा वापर करून माठ तयार करणे हे झाले तंत्रज्ञान.
टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान म्हणजे काहीतरी गूढ व चमत्कारिक आहे असा बऱ्याच जणांचा उगीचच समज असतो. खरे तर नेहमीच्या विज्ञानाचेच सिध्दांत जरा कल्पकतेने वापरले किंवा त्यांचा उपयोग नेहमीचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा प्रयत्न केला की तंत्रज्ञान तयार होते.
विज्ञानातील संकल्पना जर व्यवहारात आणायच्या झाल्या तर सगळ्यात पहिल्यांदा आवश्यकता असते ती म्हणजे हत्यारांची (tools). अगदी मूलभूत अशा हॅन्ड टूल्सचा वापर करूनच खूप मोठे शोध लागलेले आहेत. उदा. राईट बंधूंनी बनवलेले विमान त्यांच्या सायकल दुरुस्तीच्या वर्कशॉपमध्येच तयार झाले होते. मात्र सर्वच गोष्टी हॅन्ड टूल्सने तयार करता येत नाहीत. एखादे मशिन बनवताना हवी ती मापातील अचूकता हॅन्ड टूल्सने मिळवायला खूपच कौशल्य लागते. ते सगळ्यांना जमत नाही. बरे, अशा सगळ्याला खूप वेळ, श्रम व पैसा लागतो. त्यामुळे बरेचदा अनेकांच्या कल्पना प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत. शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रकल्पही अर्धवट होतात किंवा काम करत नाही. या सर्व कल्पनांना मूर्त स्वरूप देणे आता नव्या डिजिटल फॅब्रिकेशन तंत्रज्ञानाने सहज शक्य होऊ शकेल. अधिक अर्थपूर्ण, दर्जेदार व नाविण्यपूर्ण असे प्रकल्प या तंत्रज्ञानामुळे शाळेतील विद्यार्थी करू शकतील. ज्यांनी आतापर्यंत संगणक हे केवळ व्हीडिओ गेम्स, टायपिंग व काही स्प्रेडशीट्ससाठी वापरले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी, नवनिर्मितीसाठी संगणकांचा वापर करणे हे खूपच उत्साहवर्धक असणार आहे.
परंपरागत फॅब्रिकेशनमध्ये कटिंग, ड्रिलिंग, ग्राइंडिंग, वेल्डिंग इ.च्या सहाय्याने वस्तू निर्माण केल्या जातात. उत्पादन करण्याच्या पध्दतींमध्ये अनेक बदल होत आहेत. उदा. पूर्वीच्या प्राचीन कारागिरीत मुख्यत्वे कुशल मनुष्यबळामार्फत उत्पादन होत असे. औद्योगिक क्रांतीनंतर केंद्रीय पध्दतीने उत्पादन सुरू झाले. तसेच कामगारांच्या कौशल्यावर विसंबणे थोडे कमी झाले. किंमत कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे सुरू झाले. मात्र आता डिजिटल फॅब्रिकेशनमुळे संशोधक, ग्राहक, उत्पादक हे सर्व एकत्रपणे एखाद्या गिऱ्हाइकाच्या गरजेनुसार त्या व्यक्तिसापेक्ष (personal fabrication) व केवळ त्याच्यापुरतीच वस्तू निर्माण करतील अशी परिस्थिती शक्य होऊ लागली आहे.
डिजिटल फॅब्रिकेशनमध्ये संगणकाच्या सहाय्याने वस्तूचे चित्र काढले जाते व संगणकामार्फत यंत्राला आज्ञा देऊन हव्या त्या आकाराची वस्तू तयार केली जाते. या पध्दतीमध्ये आपल्याला अगदी मायक्रॉन पातळीच्या अचूकतेने वस्तू तयार करता येतात. तसेच हाताने करणे अवघड असे आकारही तयार करता येतात. संगणकावर एखादे चित्र काढून प्रिंट आज्ञा देण्याइतके हे सोपे असते. संगणकातील मूलभूत गोष्टी वापरता येणारा कोणी पण आपली कल्पना डिजिटल फॅब्रिकेशन तंत्रज्ञान वापरून सहजपणे प्रत्यक्षात आणू शकतो. ‘You can make almost anything!’ असे आश्वासक घोषवाक्य असलेल्या फॅब लॅब्स अनेक देशांत वेगाने पसरत आहेत.
शाळांमध्ये प्रकल्प करण्यासाठी उपयोगी पडतील अशा डिजिटल फॅब्रिकेशनमधील सर्वसामान्यपणे आवश्यक मशीन्स म्हणजे लेझर कटींग मशीन, मिलिंग मशिन, इलेक्ट्रॉनिक्स किट व थ्री डी प्रिंटर. तसेच Tux paint, Sketch up, Inkspace ही काही सॉफ्टवेअर्स शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. पाबळ मधील विज्ञान आश्रमातील फॅब लॅब मध्ये वर उल्लेखलेली सर्व मशीन्स वापरली जातात. चांगल्या कल्पनांवर प्रकल्प करण्यासाठी त्यांचा वापर पूर्वपरवानगीने करता येणे शक्य आहे.
डिजिटल फॅब्रिकेशन हे तुलनेने नवे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे ते आज जरी खर्चिक वाटत असले तरी जशी संगणकाची किंमत आवाक्यात आली त्याप्रमाणे याच्या किमतीही काही कालावधीत आवाक्यात येतील अशी शक्यता आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या शक्यतांना आपण उत्साहाने सामोरे जायला हवे.
संगणकाची मेमरी ही आपल्या स्मरणशक्तीपेक्षा लाखोपटीने जास्त आहे. तसेच तो गणिते व आकडेमोडही मनुष्यापेक्षा लाखोपटीने जलद करू शकतो. यामुळेच आपण सगळेचजण हळूहळू संगणकावर अवलंबून राहू लागलोय. परंतु म्हणून घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. संगणकाकडे नसलेल्या दोन गोष्टी आपल्याकडे आहेत. त्यातील पहिली म्हणजे सृजनशीलता व दुसरी म्हणजे इतरांविषयी असलेली सद्भावना किंवा सहवेदना. FabLab@school या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनात त्यांनी सुचवले आहे की प्रत्येक शाळेत अशी जागा असावी जेथे ‘शिकवणे’ न होता विद्यार्थ्याँना विविध विषयांचा समन्वय असलेले व प्रत्यक्ष जीवनातील खऱ्याखुऱ्या प्रश्नांवर आधारित प्रकल्प करायला दिले जातील. शाळेमध्ये प्रयोगशाळेप्रमाणे कार्यशाळा पण आवश्यक आहेत. महात्मा गांधींनी नई तालीममध्ये उत्पादक कामातून शिक्षणाचा आग्रह धरताना याच गोष्टी तेव्हाच्या काळानुरूप सांगितल्या होत्या. परंपरागत साधनांच्या ऎवजी डिजिटल टूल्स वापरल्याने विद्यार्थ्यांचे श्रम कमी होतील व प्रकल्पात सुबकता जरूर येईल, मात्र त्यांच्या मनात सृजनशीलता व सद्भावना जागृत ठेवण्याचे काम तर फॅब (फॅब्युलस) पालक व शिक्षकांनाच करावे लागणार आहे.
योगेश कुलकर्णी
vapabal@gmail.com
9730005016