तंत्रभरारी: जि. प. शाळा, निमखेडा ते वॉशिंग्टन, यूएस्से!

Magazine Cover

अनिल सोनुने हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निमखेडा खुर्द, जालना येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. वर्ग अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल यासाठी सतत प्रयत्न करत राहणे हा त्यांच्या कामाचा भाग आहे. या संदर्भात त्यांनी दोन वेळा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक फोरममध्ये त्यांचे प्रकल्प सादर केले आहेत.

सन २००७ मध्ये माझी निवड सर्व शिक्षा अभियान तर्फे शिक्षकांसाठी असलेल्या संगणक प्रशिक्षणासाठी झाली. या प्रशिक्षणात संगणकाचा वापर वर्ग-अध्यापनात प्रभावीरित्या कसा करावा याबद्दल माहिती मिळाली आणि मूळता:च संगणकाची आवड असल्यामुळे याबाबत नवनवीन प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. पहिली अडचण अशी होती ती मी जिथे काम करत होतो त्या शाळेत संगणक उपलब्ध नव्हता. मग माझ्याकडे असलेला लॅपटॉप वापरून मी विद्यार्थ्यांसाठी काही पाठ पावरपॉइंटमध्ये तयार केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलांना ते माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त पटीने आवडले.

मी पहिली व दुसरीच्या वर्गांना शिकवताना गोष्टी, गाणी इ. पावरपॉइंट, व्हीडिओ या रूपात घेऊ लागलो. मुलांना पारंपरिक पद्धतीपेक्षा ही पद्धत खूप आवडली. यात आम्ही सर्व गोल करून बसणार अन लॅपटॉप खुर्चीवर ठेवायचा अशी वर्गरचना असायची. माझ्या असे लक्षात आले की फळ्यावर लिहून जेव्हा मी मुलांना लिहायला सांगायचो त्यापेक्षा स्क्रीनवर दिसणारे शब्द मुलांना जास्त लवकर समजत असत, कारण एकतर त्यांत चित्रांचा वापर केलेला असे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुले ते शब्द अत्यंत काळजीपूर्वक, सुबकपणे लिहीत असत. अर्थातच ही अतिशय जमेची बाजू होती.
262069_206230166094047_5030328_n.jpg

त्यानंतर तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निपुण विनायक यांनी शाळेला एका संगणकाची व्यवस्था वरून दिली आणि काम करण्याचा हुरूप आणखी वाढला. पुढे चिप- ईबे तर्फे एल. सी. डी. प्रोजेक्टर व नेटबुक बक्षिस मिळाल्यानंतर आमची शाळा डिजिटलच बनून गेली.

सन २००९ मधील मे महिना. मी सहज काही शिक्षक हस्तपुस्तिका मिळतात का म्हणून पाहायला बालभारती, पुणे येथे गेलो होतो. अचानक एका पालकाची भेट तेथे झाली. सहज गप्पांमधून मी प्राथमिक शिक्षक आहे समजल्यावर त्यांनी विचारले, “इंटरनेटवर माझ्या पाल्याने वापराव्या अशा काही वेबसाइट्स तुम्हाला सांगता येतील का?” मी लगेच त्यांना मला माहीत असलेल्या बऱ्याच साइट्सची नावे सांगितली. त्यांनी मला मध्येच थांबवले आणि माझ्या लक्षात आणून दिले की त्यांचा मुलगा हा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतो आहे. मी ज्या इंग्रजी साइट्स त्यांना सांगतो आहे त्यांचा त्यांना म्हणावा तेवढा उपयोग होणार नव्हता.

मी आठवण्याचा प्रयत्न केला, पण मराठीतून गाणी, कथा अशा काही बेसिक गोष्टी असलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या साइट्स फक्त मला माहीत होत्या. त्या त्यांनी आधीच पाहिलेल्या होत्या. त्यांना अपेक्षित प्रकारची एकही साइट मी सांगू शकलो नाही. तेव्हा लक्षात आले की अरे, या क्षेत्रात खरेच खूप काम करायला वाव आहे. मी वर्गात शिकवण्यासाठी जी पावरपॉइंट प्रेझेंटेशन्स बनवली होती ती इतरांसोबत शेअर करण्यासाठी काहीतरी व्यासपीठ असावे असेही वाटत होतेच.
यातूनच मग घरी आल्यावर मी यासंदर्भात काही करता येईल का याचा शोध घ्यायला सुरुवात केली. माझ्या लक्षात आले की ऑनलाईन काही शेअर करायचे असेल तर ते ॲनिमेशन स्वरुपात तयार करावे लागेल आणि त्यासाठी गरज होती ते ॲनिमेशन सॉफ्टवेअर शिकण्याची. मी रहात असलेल्या गावी अशी कुठलीही सुविधा नव्हती, किंवा त्यासाठी कुठे क्लास जॉइन करायचा तर तेवढे दिवस मला सुटी मिळणेसुद्धा शक्य नव्हते. मग आता काय? पुन्हा एकदा माझ्या मदतीला इंटरनेट आले. तिथले विविध फोरम, ट्यूटोरियल्स पाहून पाहून मी छोटे छोटे ॲनिमेशन्स करायला शिकलो. ते वर्गात वापरायला लागलो. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. हे ॲनिमेशन्स काही शिक्षकांनी पाहिले आणि त्यांनाही ते आवडले.
मी गूगलची गूगल पेजेस ही सेवा वापरून माझी पहिली साइट तयार केली. आश्चर्य वाटेल पण अल्पावधीतच या साइटला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. केवळ महाराष्ट्रातून आणि देशातील विविध राज्यांमधूनच नाही तर जगभरातून साइटला हिट्स मिळत होत्या. बरेच अभिनंदनाचे इमेल्सही आले. मला आश्चर्य वाटत होते कारण मराठी वेबसाइट पाहण्यात महाराष्ट्र सोडून अजून कुणाला रस असणार असा माझा विचार. नंतर कळले जी मराठी कुटुंबे व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात स्थलांतरित झाली आहेत त्यांना त्यांच्या पाल्यांना आपली मातृभाषा शिकवण्याची खूप इच्छा आहे. त्यांना वेबसाइट बरीच उपयुक्त वाटली.

वेबसाइट डेव्हलपमेंटसाठीचे आवश्यक ते ज्ञान माझ्याकडे पुरेसे नव्हते. मग मी त्यासाठी ‘जूमला’ हे कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर शिकण्याचे ठरवले. गुरू अर्थातच इंटरनेट. हळूहळू साइट आकाराला येऊ लागली. मे २००९ मध्ये तिचे नामकरण झाले- बालजगत डॉट कॉम.

साइट लाँच झाली. ५ लाख वाचकांचा टप्पा साइटने केव्हाच ओलांडला.

त्याच दरम्यान राज्य मराठी अभ्यास केंद्र, महाराष्ट्र शासनाचा माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि सी डॅक, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी संकेतस्थळांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मी स्पर्धेत भाग घेतला. इथे आपला टिकाव लागणार नाही असे वाटत होते कारण या सगळ्या क्षेत्रात मी अगदीच नवीन होतो. मात्र काही दिवसातच मला प्रथम पुरस्काराचा धक्का मिळाला.

त्याच वर्षी मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीतर्फे शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा आयेाजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा विषय होता- वर्ग अध्यापनात संगणकाचा प्रभावी वापर. या स्पर्धेसाठी मी माझा ‘आपली पृथ्वी’ हा लेसन प्लॅन सादर केला. देशभरातील विविध शाळा, कॉलेजेस मधून जवळपास ५ लाख शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या सर्व प्रकल्पांमधून देशपातळीवर विजेते १० प्रक्रल्प निवडले जाणार होते.

एक दिवस दिल्लीच्या मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमधून संध्याकाळी ६ ला आनंदाची बातमी सांगणारा फोन आला. क्षणभर काहीच सुचलेच नाही काय बोलावे… कानावर विश्वासच बसत नव्हता. फोन वर सांगितले होते की पासपोर्ट नसेल तर तातडीने तयार करून घ्या. देशपातळीवर निवडलेले १० जण नोव्हेंबर, २०१२ मध्ये होणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या ग्लोबल एज्युकेशन फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार होते. हा फोरम १९५ देशातील शिक्षक व शिक्षणतज्ञ यांचे एक व्यासपीठ असते असे कळले. २०१२ चा फोरम केप टाऊन, दक्षिण अफ्रिका येथे होणार होता.

नोव्हेंबर २०१२ ला मी केप टाऊन येथे भारताच्या टीमचे प्रतिनिधित्व केले. खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे कामाची दिशा ठरवता आली. तंत्रज्ञान प्रभावीपणे कसे वापरता येईल हे शिकलो.
संगणक वापरून शिकवताना एक अडचण जाणवायची ती म्हणजे ही डेमॉन्स्ट्रेशन पद्धत होती. वरच्या वर्गासाठी ती कदाचित प्रभावी ठरेलही परंतु माझ्या छोट्या दोस्तांसाठी मात्र ती थोडी अपूर्णच वाटत होती. यात अजून काय करता येईल यासाठी मी विचार करू लागलो. शोध घेतल्यावर कमी खर्चात इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड बनवणे शक्य आहे असे लक्षात आले. मग त्यासाठी साहित्याची जुळवाजुळव करायला सुरुवात केली.

गेम कॉन्सोलवर गेम खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रिमोटचा सेन्सर वापरून माझा इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड तयार झाला. या बोर्डवर पारंपरिक पद्धतीने शिकवण्यासारखाच अनुभव शिक्षकांना येणार होता. त्याचबरोबर संगणकावरील मल्टीमीडियाही सोबत होताच. अशा पद्धतीने माझ्या शाळेची क्लासरूम मी अत्याधुनिक बनविली.

इतर शाळांमधील शिक्षक भेट द्यायला येऊ लागले आणि त्यांच्याशी चर्चा करतानाच पोर्टेबल उपकरण तयार करण्याची कल्पना सुचली. जर संगणक, प्रोजेक्टर, वायमोट सेन्सर मिळून एकच उपकरण बनविले तर ते शिक्षकांना वापरणे तसेच एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणेसुद्धा सोईचे ठरणार होते.
DSC01313.JPG

यातूनच मग ‘क्लासमेट’ हे उपकरण तयार झाले, जे बाजारातील अन्य उपकरणांपेक्षा किमान २० टक्क्याने स्वस्त होते. यात संगणक, प्रोजेक्टर, इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड हे सर्व काही तर होतेच पण त्यासोबतच होता मायक्रोसॉफ्टने विकसित केलेला कायनेक्ट सेन्सर. कायनेक्ट सेन्सरव्दारे हालचालींच्या सहाय्याने संगणक वापरणे शक्य होते. हाताच्या इशाऱ्यावर संगणक कामे करत असल्याचे पाहून मुलांनाही गंमत वाटायची. क्लासमेटचे प्रात्यक्षिक मला प्राग, चेक रिपब्लिक येथे करायला मिळाले.

सन २०१४ मध्ये झालेल्या मायक्रोसॉफ्टच्या स्पर्धेत परत एकदा भाग घेतला. यावेळचा माझा प्रकल्प हा मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर ‘वर्ल्ड वाईड टेलिस्कोप’ यासाठीचा पोर्टेबल व्ह्यूअर हा होता. सर्वसामान्यपणे ग्रामीण भागात टेलिस्कोपसारखे महागडे उपकरण उपलब्ध होणे हे आवाक्याच्या बाहेर असते. अशा वेळी तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला पर्याय म्हणून कमी किमतीत तोच अनुभव मुलांना देता यावा म्हणून मी हा पोर्टेबल व्हयूअर बनवला. या प्रकल्पाची निवड परत एकदा देशपातळीवर झाली असून मायक्रोसॉफ्टने मार्च २०१५ मध्ये वॉशिंग्टन येथे होणाऱ्या Microsoft in Education Global Forum साठी Microsoft Innovative Education Expert म्हणून माझी निवड केली आहे.
हे उपकरण मला कम्युनिटी डिव्हाइस म्हणून सामान्यांपर्यंत पोचवायचे आहे. आणि याहूनही सरस असे प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शाळांमध्ये राबवायचे माझे स्वप्न आहे.

अनिल सोनुने
baljagat@gmail.com
www.baljagat.com
9960650807