तंत्रज्ञान युगातील शिक्षणाची नवी दिशा
सुनीता कुलकर्णी ‘स्कूल इन द क्लाउड’ या प्रकल्पावर संशोधन संचालक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. शुगातो मित्रा यांच्या कल्पनेतील ‘सोल लॅब’ भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात सुनीता कुलकर्णी यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच ‘ग्रॅनी क्लाउड’ प्रकल्पातील ग्रॅनी निवडण्यापासून ते त्यांना सर्व मदत पुरविण्यापर्यंतचे महत्त्वाचे काम त्या करतात. सोलचा मुलांवर होणारा सकारात्मक परिणाम सध्या त्या भारतातील विविध सोल लॅब्समध्ये अभ्यासत आहेत.
आज जवळ जवळ सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला जातो. त्याला अपवाद आहे शिक्षण क्षेत्राचा. शाळांमध्ये आजही तीचतीबाके, तोच तो फळा, त्याचत्यामुलांच्या ओळी, तेच ते पाठांतर आणि घोकंपट्टीवर जोर! यासर्वांचा आणि सध्या उपलब्ध असलेले तंत्रज्ञान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शिक्षणपद्धतीमध्ये खूपच तफावत आहे. तंत्रज्ञानात जे बदल एकोणिसाव्या व विसाव्या शतकात झाले, ते त्या मानाने हळू हळू झाले. त्यामुळेसुरुवातीला अभ्यासक्रमामध्ये वरचेवर बदल करणे गरजेचे नव्हते.पण जेव्हा टेलिफोन आणि संगणक आले तेव्हा मात्र एक खूप मोठा बदल व्हायला लागला. सध्या फक्त संगणकच नाही तर टेलिफोन, वायरलेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स, आणि इंटरनेट यांमुळे आपल्याला न थांबवता येणारे बदल होऊ लागले आहेत. म्हणून शिक्षण क्षेत्रातल्या मंडळींना आपली शिक्षणाविषयीची असलेली जुनी धारणा बदलायला पाहिजे.
एकीकडे प्रत्येक मुलांपर्यंत शाळा पोहोचलेली नसणे, पुरेसा सक्षम शिक्षक वर्ग नसणे, सर्व भाषांत पुरेसे साहित्य उपलब्ध नसणे यांसारख्या मुलभूत प्रश्नांनाही अजून उत्तरे सापडली नाहीत. तोवर हा तंत्रज्ञानाचा आणखी एक प्रश्न उभा ठाकला आहे. त्यासाठी उत्तर शोधायचे तर चाकोरीबाहेरचाच विचार करावा लागेल. प्रा. शुगातो मित्रा नावाच्या एका माणसाने तो केला.
प्राध्यापक शुगातो मित्रा हे सध्या न्यूकासल युनिव्हर्सिटी (यू.के.) मधे शैक्षणिक तंत्रज्ञान (एज्युकेशनल टेक्नॉलॉजी) या विषयाचे प्राध्यापक आहेत. प्रा. मित्रा हे मूळ भौतिकशास्त्राचे वैज्ञानिक. पण त्यांना खूप वेगवेगळया क्षेत्रांमधे रस आहे. १९९९ मध्ये त्यांनी शिक्षण-क्षेत्राशी संबंधित संशोधन सुरु केले. त्यांच्या या पहिल्या प्रयत्नाला पुढे ‘होल इन द वॉल’ (Hole in the Wall) म्हणून ओळखले जाऊ लागले. होल इन द वॉल म्हणजे वेगवेगळ्या खेड्यांत आणि शहरातील झोपडपट्ट्यांमधील भिंतींमध्ये बसवलेले कंप्यूटर्स होते. हे कंप्यूटर्स इंटरनेटशी जोडलेले होते. त्या काळात बरेचदा गरीब घरातील मुलांना कंप्यूटर म्हणजे काय हे देखील माहीत नसायचे. इंटरनेट म्हणजे काय याचा तर गंधच नव्हता. या मुलांच्या कंप्यूटर वापराचा प्रा. मित्रांनी अभ्यास केला. त्यांच्या सुरुवातीच्या संशोधनात असे आढळून आले की मुले स्वतः संगणक वापरायला शिकत होती. हवे ते गेम्स, व्हीडिओ डाउनलोड करून घेत होती. छोटी- छोटी माहिती शोधू शकत होती. महत्त्वाचे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी मुले करत होती की जी त्यांचे वय लक्षात घेता त्यांच्याकडून अपेक्षितही नव्हत्या.
या पद्धतीचा मूळगाभा होता तो म्हणजे मुले आपापसात गप्पा मारत, गटा-गटातून, थोडा फार गोंधळ असलेल्या परिस्थितीत वेगवेगळी शैक्षणिक उदिष्ट्ये साध्य करीत होती. याचमुळे प्रा. मित्रांना वाटू लागले की मुलांच्या शिकण्याला एक स्वरचित प्रणालीचा आकार आहे. हीच स्वरचित अध्ययन अनुभवाची (Self Organised Learning Environment किंवा SOLE/सोल) सुरुवात होती.
सध्या चर्चेत अलेला ‘ग्रॅनी क्लाउड’ हा उपक्रम हा याच स्वरचित अध्ययन अनुभवाचा अविभाज्य घटक आहे. यामध्येनिरनिराळ्या देशातून मुलांबद्दल आपुलकी वाटणारीआणि मुलांसाठी वेळ द्यायला तयार असणारी प्रौढ मंडळी स्काईपच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधतात, मुलांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करतात व त्यांची उत्सुकता जागृत करतात.
‘ग्रॅनी क्लाउड’ हा शब्द कसा निर्माण झाला? तर स्काईपवर गप्पा मारणारी प्रौढ मंडळींची भूमिका एखाध्या आजीसारखी असते. एखादी आजी कशी आपल्या नातवंडांशी गप्पा मारते, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देते, त्यांचे लाड करते, तसेच काहीसे ही मंडळीही करतात. आजी हा शब्द मीडियाने उचलून धरला आणि हा उपक्रम पुढे ‘ग्रॅनी क्लाउड’ या नावाने प्रसिध्द झाला. यामध्ये मुलांची ओळख वेगवेगळ्या देशातल्या ग्रॅनींशी होते. परिणामी मुलांची भाषा कौशल्ये तर विकसित होतातच पण त्याचबरोबर त्यांना इतर संस्कृतीही समजतात. याचा आणखीन एक फायदा म्हणजे ज्या ठिकाणी शाळा किंवा शिक्षक उपलब्ध नसतील अशा ठिकाणीही ज्ञानापर्यंत पोचायला या ग्रॅनी मुलांना मदत करू शकतात. ग्रॅनी मुलांची पातळी लक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांना गोष्टी वाचून दाखवतात किंवा त्यांच्याबरोबर कोडी, कला, क्राफ्ट इत्यादी अन्य उपक्रम करतात. कधीकधी त्या मुलांसमोर एखादा प्रश्न टाकून त्याचे उत्तर शोधायला प्रोत्साहन देतात. या प्रश्नाला Big Question असे संबोधले जाते.
Big Question चे मूळ ध्येय आहे की मुलांची शोधक प्रवृत्ती व उत्सुकता जागृत करणे. या Big Questions ची उत्तरे मुलांना एकट्याला, इंटरनेटशिवाय व पारंपरिक पद्धतीने शोधणे कठीण असते. इंटरनेटवरही ही उत्तरे सहजासहजी एका ठिकाणी मिळत नाहीत. मुले गटागटात बसून इंटरनेटच्या मदतीने उत्तरे शोधतात. मुले स्वतःचे गट स्वतः तयार करतात.त्यांना वाटले तर हव्या तेवढ्या वेळेला गट बदलतात, एकमेकांशी बोलतात, इकडे तिकडे फिरून इतरजण काय करत आहेत हे पाहात स्वतःचे काम करतात. उत्तरे शोधल्यावर प्रत्येक गट आपल्याला काय सापडले याचे सादरीकरण करतो. सादरीकरणामधून वेगवेगळ्या गटात सापडलेली माहिती एकत्रित होतेच पण त्यावर विचार करणेही सोपे जाते. संवाद आणि गटा-गटातील सहकार्य हाच स्वरचित अध्ययन पद्धतीचा किंवा सोलचा गाभा आहे.
२०१३ साली प्रा. मित्रांना टेड अवॉर्ड मिळाळे. अवॉर्डच्या निधीतून भारतात ५ ठिकाणी सोल प्रयोगशाळा (SOLE Labs) उभ्या राहिल्या. प्रा. मित्रांनी सोल रूमची विशिष्ट रचना सुचवलेली आहे. एक म्हणजे मोठ्या टी.व्ही. स्क्रीनचा वापर. त्यामुळे मुलांना ग्रॅनी आणि त्यांनी हातात धरलेले पुस्तक व इतर वस्तू स्पष्ट दिसतात. दुसरे म्हणजे या खोलीत इंटरनेटला जोडलेले पाच ते सहा कंप्यूटर्स असतात. प्रत्येक कंप्यूटरसमोर ५-७ मुले बसू शकतात. बऱ्यापैकी मोठी स्क्रीन असल्यामुळे त्यांना एकत्रित काम करणे व शोध घेणे सोईचे होते. मुले जे काही करीत ते ग्रॅनी सहज पाहू शकतात. त्यामुळे मुले पूर्णतः चुकीच्या किंवा अनुचित साइटवर जाण्याची शक्यता खूप कमी होते.
२००८ ते २०१४ या कालावधीत ग्रॅनी भिंतीला लावलेल्या टी.व्ही. स्क्रीनवर इंटरनेटच्या मध्यमातून यायची आणि मुलांशी बोलायची. पण २०१४ च्या शेवटी त्यात आणखी एका गोष्टीच्या समावेशाचा प्रयत्न चालू झाला. तो म्हणजे रोबो ग्रॅनी. या तंत्रज्ञानामुळे रिमोट कंट्रोलचा वापर करून ग्रॅनी जागाच्या पाठीवर कुठेही असली तरी मुलांच्या वर्गामध्ये किंवा खोलीमधे फिरू शकेल आणि मुले काय करताहेत ते पाहू शकेल. रोबो ग्रॅनीचे काही प्रयोग काही क्लाउड स्कूल्समध्ये करून पहिले आहेत आणि मुलांना ग्रॅनी खरोखरच आपल्यामध्येच आहे असे वाटते.
स्वरचित अध्ययनानुभव हे नवीन तंत्रज्ञान आहे त्यामुळे काही गोष्टींचा विचार अजूनही व्हायला हवा. जेव्हा मुले इंटरनेटवरती माहिती शोधतात तेव्हा त्यांना प्रौढांसाठी लिहिलेले साहित्य सापडते. परंतु मुलांची भाषिक कौशल्ये प्रौढांपेक्षा कमी विकसित असतात. या समस्येवर मुले काही अंशी मात करू शकतात. असे दिसते की बरीच मुले एकत्र काम करत असताना त्यांच्या वयाच्या मानाने बऱ्याच वरच्या पातळीवरचा मजकूर ती वाचूही शकतात आणि त्यांना तो त्यांना समजतो देखील! यामागे ‘जिज्ञासा’ आणि ‘रस’ या दोन महत्त्वाच्या बाबी असतात. ज्यामध्ये आव्हान आहे अशा गोष्टी करून पहायला मुले घाबरत नाहीत. उलट त्यांना आव्हाने आवडतात.
सोल तंत्रज्ञानाची सगळी उत्तरे अजून सापडलेली नाहीत. पण हा प्रवास सुरू आहे. शिक्षकाची भूमिका नेमकी काय असेल, परीक्षा पद्धती कशी असेल, सातत्यपूर्ण शिक्षण कसे देता येईल, विशेष गरजा असणाऱ्या मुलांना याचा कसा वापर करता येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.
सध्या चालू असलेल्या संशोधनातून एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीत असणाऱ्या स्कूल्स इन द क्लाउड साठी वेगवेगळा विचार करावा लागेल. जिथे शिक्षक व शाळा मिळू शकत नाहीत किंवा नसतात तिथे मुलांचे शिक्षण कसे होऊ शकेल हा प्रा. मित्रांचा मूळ प्रश्न होता. त्यातूनच खरे तर होल इन द वॉल ची सुरुवात झाली होती. आताच्या काही सोल लॅब्सही प्रशिक्षित शिक्षक असणाऱ्या शाळांमध्ये आहेत, तर काही लोक सहभागातून चालू आहेत. ज्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाहीत तिथे काही अप्रशिक्षित युवक किंवा प्रौढ असतात जे केवळ मुलांना आधार देण्याचे काम करतात. अशा परिस्थितीसाठी पूर्णपणे वेगळा विचार करावा लागतो.
एक गोष्ट मात्र सर्वांसाठी सारखीच असलेली आढळते ती म्हणजे मुलांना ग्रॅनी आणि त्यांची सेशन्स भयंकर आवडतात. तसेच Big Questions चा समावेश असणारी आणि शोध घ्यायला प्रवृत्त करणारी सोल सेशन्सही वर्गातल्या तासांपेक्षा जास्त आवडतात.
जसजसा हा प्रकल्प पुढे जात आहे तसतसे पुन्हा पुन्हा जाणवते की अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि परीक्षा पद्धतीमधे बदल होणे अत्यंत गरजेचे आहे. ‘कॉमन कोअर करिक्युला’ तयार करणे, अध्यापन व परीक्षा पद्धतीमधे तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि ‘शिस्त व पद्धत’ यापेक्षा सृजनशीलता वा कल्पकतेला जास्त महत्त्व देणे हे रास्त ठरेल.
अर्थात हे करताना आपल्याला काही नवीन कल्पनांचा स्वीकार करावा लागेल. उदाहरणार्थ, शिकत्या मुलांना सगळे काही माहीत असले पाहिजे असे नाही. त्या ऐवजी जे माहीत करून घ्यायचे आहे ते लवकरात लवकर शोधून काढण्याची कौशल्ये हवीत. सृजनशीलता वा कल्पनाशक्ती यांना शिस्त व पद्धत यापेक्षा जास्त महत्त्व दिले तरच शिक्षण परिणामकारक ठरू शकेल हेही मान्य करावेच लागेल. अर्थात हे सारे सुचवताना एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी असे वाटते. ते म्हणजे Big Questions तयार करणे ही सोपी गोष्ट नाही. आत्ताच्या शिक्षकांपुढे हे मोठे आव्हान आहे. असे प्रश्न मुलांसमोर ठेवावे लागतील की जे खरोखरीच विचार करायला भाग पाडतील.
मग अशा इंटरनेटमध्ये न्हाऊन निघालेल्या जगामध्ये प्रमाणपत्रे, पदविका आणि पदव्यांचे काय? मुलांना सर्वात अद्ययावत माहिती संशोधन झाल्या झाल्या उपलब्ध असेल अशा परिस्थितीत पाठ्यपुस्तकांचे प्रयोजन काय? शैक्षणिक उपक्रमांचे काय? या साऱ्यांचा काय परिणाम होईल? पारंपरिक शिक्षणपद्धतीतून येणाऱ्या या प्रकारच्या प्रश्नांना आपल्याला उत्तरे द्यावी लागतील. सद्य शिक्षण पद्धती बदलेल तेव्हा बदलो. पण ग्रॅनी क्लाउड व सोलच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी तयार करण्यासाठी पहिली छोटी पावले नक्की उचलणार आहोत.
डॉ. सुनीता कुलकर्णी
suneeta.kulkarni@gmail.com
9822401603