तंत्रज्ञानाच्या वापरामागील समज महत्त्वाची!

Magazine Cover

प्रकाश बुरटे यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर येथे झाले. आय आय टी, मुंबई येथून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरी केली. अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके यातून १९७५ पासून ते सातत्याने साहित्य, कला, विज्ञान, समाज-विज्ञान संबंध, सामाजिक प्रश्न, शिक्षण अशा विविध विषयांवर लिखाण करत आले आहेत.

खडू आणि फळा या दोनतांत्रिक बाबी प्रत्येक शाळेत पोहोचणे अत्यावश्यक वाटल्याने विसाव्या शतकातील नव्वदीच्या दशकात शासनाने ग्रामीण शाळांसाठी ‘ऑपरेशन ब्लॅकबोर्ड’ हाती घेतले होते. त्यातून शिक्षणाचा दर्जा सुधारेल अशी कल्पना होती. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात अगदी याच धारणेमुळे अनेक शहरी उच्चभ्रू शाळांनी ‘ऑपरेशन इ-लर्निंग’ किंवा ‘ऑपरेशन व्हाईटबोर्ड’ हाती घेतल्याचे दिसते आहे. ते लोण ‘खाली’ (हा शब्द शाळाशाळांत गरीब-श्रीमंत, शासकीय-खासगी, ग्रामीण-शहरी अशा उतरंडीमुळेआहे) सावकाशीने का होईना पण पाझरणार आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. केवळ तेवढ्याने शिक्षणाचा दर्जा सुधारणार आहे का, या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. दर्जा सुधारण्यासाठी त्याच्या जोडीला आणखी कोणत्या गोष्टींची गरज आहे, याचा सखोल विचार होणे आवश्यक आहे. तोच या लेखाचाही उद्देश आहे.

कोणत्याही क्षेत्रात तंत्र बदलले की त्याच्या वापराचे ज्ञान आत्मसात करावेच लागते. परंतु कोणता परिणाम साधायचा आणि त्यासाठी कोणती तंत्रे निवडायची, याचा निर्णय तंत्रज्ञान आत्मसात करण्यापेक्षा जास्त गुंतागुंतीचा आहे. त्यासाठी माहिती किंवा ज्ञान यापेक्षा चौफेर संवेदनशीलतेतून आलेली समज आणि सर्जनशीलता यात मुरलेले शहाणपण लागते.त्या तुलनेत माहिती आणि ज्ञान यांची आवश्यकता पुरी करणे सोपे होते. माहिती ही सुट्या तुकड्यांची बनलेली असते. हे तुकडे ध्यानात ठेवावे लागतात आणि हवे तेव्हा आठवावे लागतात. त्यासाठी पाठांतर, ते सोपे जावे म्हणून छंद आणि वृत्तांत त्यांची बांधणी करणे, पुस्तके लिहिणे, छापणे, त्यांचे संकलन एखाद्या सीडीवर घेणे अशी अनेक तंत्रे माणसाने वापरली आहेत. तंत्र कोणतेही असले तरी सुट्या तुकड्यांतील माहिती एखाद्या टेलिफोन डिरेक्टरीसारखी असते. हवी तेव्हा माहिती बाहेर काढणे सोपे आहे. माहिती घोकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून वेगळ्या संदर्भात उपयोजन करण्याची क्षमता तयार करणे म्हणजे ज्ञाननिर्मिती.

मुद्दा स्पष्ट होण्यासाठी विविध मूलतत्वांच्या गुणधर्मांचा विचार करूया. सोने, लोखंड, प्राणवायू, पारा अशा माहीत असणाऱ्या सर्व मूलतत्वांच्या गुणधर्मांच्या याद्या करता येतील. पूर्वी अशा याद्या झाल्या आहेतच. परंतु या गुणधर्मांतील साम्ये आणि फरक यांचे विश्लेषण करून आवर्तसारणीची संकल्पना सुचणे आणि तिचा वापर करून ज्ञात नसणारी मूलतत्वे असली पाहिजेत, प्रश्न फक्त शोधायचा आहे, असे सांगता येणे जास्त गुंतागुंतीचे व महत्त्वाचे असते. कोणते ज्ञान नजीक आणि दूरपल्ल्याच्या काळात माणसाच्या हिताचे आहे आणि कोणते नाही, याची समज शहाणपणातून येते.शहाणपणाची ही समज अनुभव आणि त्यावरील चिंतनाच्याउभ्या आडव्या धाग्यांनी विणलेल्या कापडासारखी असते. त्यातील ताणे-बाणे पाहिल्याशिवाय शहाणपणाचा पोत कळत नाही.

माणसाची प्रत्येक पिढी माहिती, ज्ञान आणि शहाणपणाचे आपले संचित पुढील पिढीला देण्याचा आणि पुढील पिढी ते स्वीकारण्याचा प्रयत्न करते.यापैकी माहिती ही नदीतून अव्याहत वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे असते. नदी तीच, परंतु पाणी बदलेले असते. माहितीच्या तुलनेत ज्ञान कमी वेगाने बदलते. आणि मानवी आयुष्याला समाधानाची आणि स्थैर्याची आस लावणारे शहाणपण तर दूरच्या धृव ताऱ्याप्रमाणे स्थिर परंतु स्वार्थामुळे हाती न लागणारे भासते. त्यामुळे शहाणपणाची शिदोरी पोहोचता पोहचत नाही. तरीही माहिती आणि ज्ञानाच्या शिदोरीमुळे प्रत्येक नवी पिढी आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभी राहून प्रवास पुढे चालू ठेवताना दिसते, तिथेच घुटमळत नाही. पिढ्यांपिढ्यांतून चाललेले संचिताचे हे देणे-घेणे अनौपचारिक आणि औपचारिक या दोन वाटांवरून झाले आहे. यातून निसर्गातील सजीव-निर्जीव घटकांची चालचलणूक माणसाला चुकत-माकत समजू लागली. परिणामी माणसाचे आयुष्य जास्त सुरक्षित होत गेले. संचिताचे देणे-घेणे जास्त जाणीवपूर्वक होऊ लागले, तसतसे औपचारिक शिक्षणाची वाट जास्त प्रशस्त होत गेली. दोन्ही वाटांवरील प्रवासात अनुभव गोळा होत गेले आणि त्यावर बौद्धिक संस्कारही झाले. दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायच्या भावभावना, अनुभव, विचार, माहिती, ज्ञान, शहाणपण हा कोणत्याही संवादाचा गाभ्याचा आशय असतो.

गाभ्याचा आशय दुसऱ्या मना-बुद्धीपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रांची मदत घ्यावी लागते. भुकेसाठी संकटांचा सामना करत टोळीने केलेली शिकार हा प्राचीन काळातील एक थरारक अनुभव उदाहरणासाठी घेऊ. त्यातील थरार, भीती, जोश, संकटे, उत्साह हे सारे दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याच्यावर बेतलेली ‘आमच्या टोळीने अवघड शिकार कशी केली’ याची कथा कुठल्याशा निवांत क्षणी कथन केली जाते. हळूहळू कथेच्या घाटांमध्ये, आणि इतर तंत्रांत बदल, सुधारणा आणि विस्तार होऊ लागतो. मजेची गोष्ट म्हणजे आपल्या उदाहरणातील गाभ्याचा आशय शिकारीचा सर्वांगी अनुभव होता. त्याने कथेचे रूप घेतले. कथा कथनातील अनुभवामुळे कथनातील खाणाखुणा, देहबोली, शब्दांची योजना यांचा वापर लक्षात येऊ लागल्यावर त्यांचीही तंत्रे बनू लागली. त्यातून अवतरली कथाकथन, नृत्य, नाटक, अशी अभिव्यक्तीची माध्यमे. माध्यमांना तंत्र हे असतेच. त्याच्याशी दोस्ती करावी लागते; अपूर्व असा आशय, नव्या प्रतिमा आणि अफलातून संकल्पना मांडताना माध्यमतंत्रांची जाणीवपूर्वक मोडतोडही करावी लागते.

विशिष्ट परिणाम घडविण्यासाठी हुकमी तंत्रांचा वापर होतो. घडलेल्या परिणामांचे विश्लेषणही केले जाते. त्यातून अजाणतेपणे वापरलेल्या तांत्रिक बदलांची इंगिते हाती येतात आणि नव्या तंत्रांचा विशिष्ट परिणामांसाठी सर्रास वापर होऊ लागतो. अनेकदा विविध तंत्राचे अपेक्षित आणि अनपेक्षित परिणामही होतात. तंत्र-तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधीही समज उमगण्यासाठी ‘माणसे खोटे बोलायला केव्हा शिकली’ याचे स्पष्टीकरण देणारे एक मजेशीर उदाहरण पाहू: ‘भाषा आहे पण लिपी नाही’, असा केवळ मौखिकतेवर भर असणारा काळ माणसाच्या इतिहासात अत्यंत प्रदीर्घ होता. उघड्या पोटाकडे जाणारा हात आणि जोडीला तोंडातून काढलेला एखादा आवाज/ शब्द, भुकेचे सूचन करी. ते टोळीतील इतरांना कळत असे. किंवा सूर्याकडे बोट दाखवून तो उगवल्याचे, डोक्यावर आल्याचे, वातावरण गरम होत असल्याचे सांगण्यासाठी मोजके ध्वनी/ शब्द वापरले जात. जे सांगायचे त्यासाठी प्रत्यक्षाचा वापर होत असे. या प्रारंभिक काळातील भाषेच्या मर्यादेमुळे खरे बोलण्याला पर्यायच नव्हता. जिथे बोलणेच कमी तिथे खोटे बोलण्याची गरजही नव्हती. निसर्ग-जंगलाशी पक्के नाते असणारा कठीण जीवन जगणारा, बोलण्याच्या विषयांना खूपच मर्यादा असलेला माणूस आजही दिल्या शब्दाला जागतो. तो खोटे बोलत नाही, हा या साधेपणाचा पुरावा आहे. या आदिम माणसाच्या भाषेची सुरुवातीची लिपी चित्रलिपी होती. सूर्याचे चित्र काढून झालेली चित्रलिपीतील अभिव्यक्ती सूर्याबद्दल काही सांगू पाहते आहे, हे चटकन समजत असे. प्रत्यक्ष आणि चित्रलिपीतील मजकूर यांचे काही एक नाते शिल्लक उरले होते.

परंतु चित्रलिपीच्या प्रदीर्घ काळानंतर माणसाच्या सामाजिक जीवनात आणि लिपीमध्येदेखील उत्क्रांती झाली. प्रत्यक्ष सूर्याशी किंवा त्याच्या चित्राशी कसलेही साम्य नसणारी लिपी अवतरली. जसे ‘सूर्य’ या शब्दचित्राचे किंवा इंग्रजीतील ‘Sun’ या शब्दचित्राचे प्रत्यक्ष सूर्याशी मुळीच नाते नाही. अशा लिपीमुळे प्रत्यक्ष आणि लिखित शब्द यांतील साम्य पूर्णपणे संपले. सूर्यापेक्षा त्याचे वर्णन करणाऱ्या संकेत-शब्दाला महत्त्व आले. वास्तवाचे वर्णन करणारे सांकेतिक ‘शब्द’ बदलले तरी वास्तवात बदल होत नाही, हे ध्यानात आल्यानंतर खरे बोलण्याची भाषिक गरज संपली. त्याच वेळी काही व्यक्तींसाठी जगण्यातील गुंतागुंतीसोबत खोटे बोलण्याची सामाजिक गरज तयार झाली. महाभारतातील धर्मराज हे पात्र नाही का ‘नरो वा कुंजरोवा’ म्हणत? याचे इतिहासाने नोंदलेले दोन परिणाम आपण पाहू: १. अनेक साक्षर सावकारांनी लिखापढीच्या मदतीने कितीतरी निरक्षरांना लुबाडले. २. संस्कृतसारख्या भाषेने एका सूर्यासाठी बरेच शब्द गोळा केले आणि त्यांचा वापर सूर्याच्या विविध अवस्थांतील किंवा भावनिक पातळीवर सूर्याबद्दल वाटणाऱ्या नात्याच्या बंधांतील अर्थछटा वर्णन करण्यासाठी जेवढा केला, त्यापेक्षा अधिक व्यायाम आणि सूर्यनमस्कारांच्या पुण्यकमाईसाठी केला. भाषेच्या अशा वृत्तींमधून कर्मकांडांचे फावले. भाषेने मौखिक परंपरेची मर्यादा ओलांडून लिखित शब्दाला कवटाळले तेव्हापासून खऱ्या-खोट्याच्या सरमिसळीचा आणि कर्मकांडांचा काळ अवतरला. जगभरातील कोणत्याही लिपीच्या निर्मितीमध्ये सहभागी असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा त्यामागे निरक्षर माणसांची खरे बोलण्याची सवय मोडून काढण्याचा किंवा कर्मकांडांचे स्तोम माजविण्याचा हेतू असणे केवळ अशक्य आहे. परंतु ध्यानी-मनी नसलेला लिखित भाषेचा असाही परिणाम झाला आहे.

त्याच वेळी लिखित शब्दामुळे प्रत्येक पिढीला प्राप्त झालेली माहिती, ज्ञान आणि शहाणपणा यांची शिदोरी तयार होऊ लागली. या शिदोरीत आपण कधीही न पाहिलेल्या, न बोललेल्या माणसांनी निर्माण केलेले असंख्य विषयांतील संचितांचे घबाड गुंडाळून ठेवले जाते. साहजिकच लिपी हे तंत्र औपचारिक शिक्षणात मेहनतीने आत्मसात करण्याला महत्त्व मिळाले. ते तंत्र एकदा हाती आले की ग्रंथांत गुंडाळून ठेवलेले घबाड माणसासाठी उघडते. मौखिक परंपरेत अभावानेच ही सोय होती. लिखित भाषेमुळे ती अनेकांच्या हाती आली. परंतु लिपी आत्मसात करून देणाऱ्या शिक्षणात घबाडातील काय बरोबर, नैतिक, ऐतिहासिक, काल आणि तर्क सुसंगत आहे आणि काय चूक, अनैतिक, अनैतिहासिक, निरर्थक, आणि काळ व तर्क यांच्याशी उभा दावा सांगणारे आहे, याची निवड करण्याची कुवत माणसात तयार करणे आवश्यक होते. ही कुवत म्हणजे जगभरचे ज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याकडे मानवी भले कशात आहे, याची शोधक नजर कमावण्याची गोष्ट होती. मौखिक परंपरेच्या काळातील मर्यादांमुळे तयार झालेल्या ‘बिन गुरू ग्यान कहाँ से पाऊँ’ च्या प्रचंड पगड्याचा तिला अडसर होता. परिणामी ही कुवत अपवादानेच तयार झाली. तरीही लिखित भाषेच्या वापरकाळातील उत्तरार्धात (युरोपातील पुनुरुत्थानाच्या काळानंतर) शिक्षणाचा आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा विस्तार व विकास झाला. माणसाच्या सामाजिक उत्क्रांतीचा वेग प्रचंड वाढला. परंतु माणसामधील शहाणपणाच्या मर्यादेमुळे माणसाचे दैन्य, दुःख, ताण-तणाव अपेक्षेइतके कमी झाले नाहीत.

तंत्र आणि तंत्रज्ञान वापराच्या अपेक्षित परिणामांकडे घेऊन जाणारी, अनपेक्षित परिणामांबाबत कायम जागरूक असणारी आणि शक्य ते विपरीत परिणाम टाळणारी शहाणपणातून येणारी समज सर्व शाखांतील औपचारिक शिक्षणात गरजेची आहे. ती समज जागी ठेवून शिक्षणात सर्व आधुनिक तंत्रांचा वापर जरूर केला पाहिजे. अभ्यासक्रमात या आव्हानात्मक आणि सर्जनशीलतेच्या अंगाने बदल घडले पाहिजेत. किमान सुट्या माहितीच्या तुकड्यांची जागा ज्ञानाला मिळाली पाहिजे. माहितीचे ज्ञानात रुपांतर करू धजणारी काही उदाहरणे पाहूयात:

इतिहास म्हणजे जर केवळ नोंदी असतील तर इतिहास आणि टेलिफोन डिरेक्टरीत फरक काय उरला, विचार करून सांगा. शिवाजी महाराज किती साली जन्मले आणि अकबराने कोणती लोकाभिमुख कामे केली अशा नोंदी नशिबी येण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या हाती इतिहासाची साधने यावीत. शाळेत जाण्यापूर्वी लहान मुले अशी साधने जमा करत असतातच. माणसाची उंची, वयाचा अंदाज, केसांचा रंग या साधनांच्या आधारे ती कुणाला दादा, ताई, काकू, मावशी, आजी-आजोबा म्हणायचे हे ठरवितात. परंतु या साधनांना मर्यादा असतात. नुकतेच बसायला येऊ लागले तेव्हाचा माझा आणि सहा वर्षांच्या माझ्या नातीचा असे दोन फोटो नातीला दाखविले होते. या दोघात वयाने कोण मोठे, हे तिला ठरविता येत नव्हते. शेवटी कुणाच्या तरी आधाराने बसलेले बाळ म्हणजे मी नव्हेच, असे ती म्हणू लागली. ती आता दहा वर्षांची झाली आहे; तिला आता स्वतंत्र फोटोंतील माणसांची वये निश्चित करण्यासाठी या साधनाच्या मर्यादा आडव्या येतात हे समजले आहे. शिवाजी महाराज राजे असूनही लांब जायचे असल्यास मोटार, स्कूटर, विमान का वापरत नव्हते, घोड्यावरूनच का जायचे, असा प्रश्न चौथीच्या विद्यार्थ्याला पडला पाहिजे आणि जमेल तसे त्याचे उत्तर देता आले पाहिजे. उत्तर बरोबर असण्यापेक्षा उत्तर देण्याचा प्रयत्न जास्त महत्त्वाचा असतो. ताजमहाल शहाजहान बादशहानेच बांधला, का त्या आधी चार-पाचशे वर्षे दुसऱ्याच कोणी तरी बांधला होता, हे ठरवायला कार्बन डेटिंग हे तंत्र का उपयोगी नाही हे इतिहास घेऊन पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्याला समजणे महत्त्वाचे आहे. नाही तर मनुष्यनिर्मित गणपतीच्या काल्पनिक चित्रावरून प्लॅस्टिक सर्जरीचा शोध लागून गोंधळ उडायचा!

भूगोल शिकताना नकाशांचा उपयोग शिकणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईपासून स्वतःचे गाव किती दूर आहे हे नकाशा वापरून शोध घेण्याचे तंत्र हाती येणे यात केवढे अप्रूप आहे! असे अप्रूप हाती आलेला तिसरी-चौथीतील मुलगा किंवा मुलगी वेड लागल्याप्रमाणे आपल्या नातेवाईकांच्या गावांची अंतरे, नद्यांची लांबी मोजू लागेल. त्यामुळे जाताजाता त्याचे आकडेमोडीचे कौशल्य वाढेल. पुढच्या पायरीवर, पृथ्वी गोल असूनही जिल्हा, भारतासारखे देश यांचे नकाशे आयताकृती किंवा चौरस कसे असतात, या प्रश्नाशी विद्यार्थ्याला भिडायची संधी मिळाली पाहिजे. हळू हळू घर ते शाळा या रस्त्यावरील खाणाखुणा, उपग्रहाने पाठविलेली माहिती यांचा नकाशे बनवायला कसा उपयोग करून घेतला जातो हे भूगोल शिक्षणात कळले पाहिजे.

परिसर भाषा मराठी असणाऱ्या मुलांना प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत किंवा पदवीसाठी मराठी शिकवायचे म्हणजे नेमके काय शिकवायचे याबाबत स्पष्ट भूमिका असल्या पाहिजेत. मराठी कुटुंबातील पाच सहा वर्षाचे मूल सर्वनाम म्हणजे काय हे माहीत नसतानाही खुर्चीला ‘ती’ आणि टेबलाला ‘ते’ अशी सर्वनामे बिनचूक वापरत असतेच. वापरातून भाषेचे व्याकरण हळूहळू सर्वांना कळते. त्यामुळे व्याकरण शिकविणे, हा भाषा शिक्षणाचा महत्त्वाचा भाग होऊ शकत नाही. सुरुवातीला मूल त्याच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेचा हेल काढून बोलेल. तेथून ते प्रमाण आणि प्रमाणेतर मराठी भाषा यातील साम्ये व फरक समजण्याप्रत येऊ शकते. आधुनिक नाटकात, ग्रेस यांच्या कवितेत आणि वृत्तपत्राच्या बातमीत मराठी भाषेचा वापर एकाच पद्धतीने होत नसतो. भाषा शिकताना अशा बारकाव्यांकडे लक्ष वेधणे हे काम ऐतिहासिक स्थळे दाखविणाऱ्या एखाद्या कसबी गाईडप्रमाणे असते. भाषा शिक्षणात म्हणूनच कोणी काय लिहिले, लिखाणाचा आशय काय, अशा नोंदी लक्षात ठेवण्याऐवजी अभिव्यक्तीनुसार भाषेचा वेगवेगळा वापर समजणे, त्याचा आनंद घेता येणे, स्वत:ला व्यक्त करण्याच्या उर्मीला प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे.

न्यूटनचे गतिविषयक नियम विचारताच सांगता येणे, किंवा त्यानुसार विशिष्ट प्रकारची गणिते पटापट सोडविता येणे हे झाले स्मरणशक्ती आणि विशिष्ट कौशल्याचे उदाहरण. याला विज्ञान समजण्यातून आपण विज्ञानाचा आवाका छोटा करतो. तसेच प्रयोगाचा हेतू ते माहीत असलेले निष्कर्ष येथवर हवेत प्राणवायूचे प्रमाण दाखविणारा (किंवा दुसरा कोणताही) प्रयोग आकृतीसह लिहिता येणे, हा देखील विज्ञानाचा संकोच आहे. प्रयोग ही स्वतः प्रत्यक्ष करायची गोष्ट आहे. प्रयोग करणे म्हणजे भटजींनी सांगितल्याबरहुकूम पूजा घालणे नसते. विविध शक्यतांमधून निवड करण्यासाठी प्रयोगांची बांधणी केली जाते. विज्ञान शिक्षणातदेखील प्रयोग स्वतः रचण्याच्या आणि ते करून पाहाण्याच्या संधी असल्या पाहिजेत. प्रयोग अगदी साधेदेखील असू शकतील. उदाहरणार्थ, स्वतःला श्वासोच्छवासासाठी दिवसाला किती हवा लागते याचा अंदाज बांधणे, किराणा दुकानातून आणलेले मूग सजीव आहेत का निर्जीव आहेत हे ठरविण्यासाठी निकष ठरविणे यासाठी प्रयोग उभे राहू शकतात. वरचा आणि खालचा सा, तसेच प हे स्वर अचूक लागलेल्या तानपुऱ्याच्या मस्त झंकारात गंधार कसा काय ऐकू येतो, याबद्दल तानपुऱ्याच्या साथीसह गाणे ऐकणाऱ्यांना केव्हा तरी कुतूहल वाटले पाहिजे. चुंबकात चुंबकीय गुणधर्म कशामुळे येतात, याचे उच्चमाध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याला कुतूहल असले पाहिजे, नाही का? ज्वारीची भाकरी, घडीची चपाती, फुलके आणि तळलेली पुरी या पदार्थांच्या पाककृती भिन्न आहेत, तरी फुगणे हा परिणाम कशामुळे सामाईक आहे? कुतूहल असेल तर चुकत-माकत उत्तरे/ स्पष्टीकरणे शोधली जातील; त्यात सुधारणा होतील. परंतु कुतूहलच नसेल, तर मार्कांसाठी पाठ करून उत्तरे लिहिली जातील; काम करण्याचे कसब कमावले जाईल आणि अगदी भरपूर वेतनाच्या नोकऱ्याही मिळतील. अशा कामात स्वतःच्या प्रयत्नाने कुतूहल शमविल्याचा आनंद मिळणार नाही.

गणित म्हणजे पटापट आकडेमोड करता येणे हा निकष गणिताचा खरे तर अपमान करतो. तसे असते तर रद्दीच्या दुकानदाराला गणितज्ज्ञ म्हटले असते. कुठल्याशा तथाकथित वैदिक सूत्रांचा वापर करून आकडेमोड झटापट होते, म्हणून त्या सूत्रांच्या संपादित पुस्तकाला वैदिक गणित म्हणत त्याचे अभिमानाने अति गोडवे गाणे, यापेक्षा या सूत्रांच्यामागील बीजगणिताच्या संकल्पनांचा शोध घेण्याने गणिताचा परिसर थोडा विस्तारेल. कंपासपेटीतील कोनमापकाने वहीच्या पानावर काढलेले कोन मोजता येतात, परंतु आकाशातील दोन जवळच्या चांदण्यानी आपल्या नजरेशी केलेला कोन मोजण्यासाठी एखादे साधन तयार करायचा प्रयत्न करणे, हे आपला गणिताचा परिसर विस्तारणे आहे. हाताशी कॅलक्यूलेटर, संगणक, आयपॅड, स्मार्ट मोबाईल फोन असताना पाढे पाठ करण्यात वेळ आणि ऊर्जा घालविण्यापेक्षा पाढे तयार करण्याचे तर्कशास्त्र शिकून त्याआधारे चुकतमाकत प्रोग्रॅम करणे जास्त आव्हानात्मक आणि जास्त सर्जनशील कृती आहे.
‘मनात आणीन जर बच्चमजी’ अशी सुरुवात करणारी मर्ढेकरांची एक कविता आहे. ठरवलं, तर बच्चमजी मी पण अलंकारांनी सजलेली फर्डी कविता रचेन, पण मला ते करायचेच नाही, अशीच भावना चित्रकाराची असली पाहिजे. चित्रकला शिकताना काही कौशल्ये कमावणे आवश्यक आहे. परंतु हुबेहूब चित्र काढणे हे चित्रकलेचा दर्जा खालावणारे लक्षण आहे. कॅमेरे हाती असताना हुबेहुबचा बडेजाव टिकणे अवघड आहे. अशा आधुनिक काळात चित्रकलेने चित्र पाहाणाऱ्या व्यक्तीशी हुबेहुबच्या क्षितिजापलीकडील भावनिक पातळीवरून संवाद साधला पाहिजे.

विविध ज्ञानशाखांच्या अशा शिक्षणात संगणक, माहिती आणि ज्ञानाच्या सर्च इंजिनांनी विद्यार्थ्यांच्या मदतीला आवर्जून यावे. अनुभवी शिक्षक मित्र-मैत्रिणींच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये माहिती आणि ज्ञान ओलांडून निवडीची क्षमता तयार करण्याला जोरदार हातभार लागावा. थोडक्यात म्हणजे २१ व्या शतकात माहिती, ज्ञान, इलस्ट्रेशनसाठी चित्रकला, संगीत, अशा अनेक क्षेत्रांतील अगणित गोष्टी साठवून ठेवायला आणि हवे तेव्हा हात जोडून माणसासमोर येण्यासाठी संगणक, जागतिक माहिती जाल, उपलब्ध झाले आहे. जी माहिती, ज्ञान आणि कौशल्ये इ-तंत्र आत्मसात करते आहे त्यांचे ओझे शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टाकू नये. ही तंत्रे वापरण्याची कौशल्ये विद्यार्थ्यांना देऊन एक नवे मुक्त जग त्यांच्यासाठी उपलब्ध करावे.
आज ही आधुनिक तंत्रे विद्यार्थ्यांमध्ये ती समज किंवा जगाकडे पाहण्याची नजर तयार करण्यात कमी पडत आहेत, हे जिभेखाली न सरणारे सत्य आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या विविध वैयक्तिक वाटा वापरण्याकडे शिक्षकांनी आपला मोर्चा वळवावा. त्यासाठी अनेक स्मार्ट तंत्रे आवर्जून वापरावीत, परंतु त्यासाठी अडून मात्र बसू नये.

प्रकाश बुरटे
prakashburte123@gmail.com
9987943666