विचार करून पाहू – भाषा व विचार
इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्यप्राण्याचे वेगळेपण त्याच्या भाषेत आहे. इतर प्राणी आपल्या जगण्याच्या व वंश-सातत्याच्या गरजा व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर करतात तर मनुष्यप्राणी विचार करण्यासाठी व तो व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर करतो. आपली भाषा व विचार एकमेकांपासून अलग करता येत नाहीत. भाषेशिवाय विचार किंवा विचाराशिवाय भाषा विकसित होऊच शकत नाही. सुरुवातीला भाषा कमी विकसित असताना तिच्या विकासासाठी विचार प्रक्रिया महत्वाची असते तर भाषा प्रगल्भ झाल्यावर विचार करण्यासाठी भाषेची गरज असते. भाषा शिकणे व विचार करणे या दोन्ही माणसाच्या अंतःप्रेरणा असल्या तरी त्या विकसित करण्यासाठी लहान मुलांच्या आयुष्यातले प्रौढ म्हणून आपण बरेच काही करू शकतो.
नुकते जन्मलेले मूल आपल्या सर्व गरजांसाठी दुसऱ्यावर अवलंबून असते. त्यामुळे ते खूप लवकर आपल्या गरजा व्यक्त करायला शिकते. सुरुवातीला ते रडणे व इतर आवाज करण्यातून आपल्या गरजा व्यक्त करते. मूल रडले की त्याची आई किंवा सांभाळणारे इतर त्याचा गरजा पुरवतात. ते ओले झाले असेल तर बदलणे, भुकेजले असल्यास पाजणे, जवळ घेणे यातून मूल स्वतःबद्दल व स्वतःभोवतीच्या माणसांबद्दल विचार करू लागते. स्व आणि इतर हा फरक समजून घेऊ लागते. जर आई किंवा सांभाळणारे इतर पालक संवेदनशीलतेने बाळाच्या गरजा पुरवीत असतील, बाळाच्या रडण्याला त्वरित प्रतिसाद देत असतील तर बाळाला सुरक्षित वाटते आणि आपण हवेसे आहोत अशी खात्री पटून स्वतःबद्दल त्याच्या मनात सकारात्मक प्रतिमा निर्माण होते. आपण रडलो की आपल्याला प्रतिसाद मिळतो हे लक्षात आल्यावर मूल जाणीवपूर्वक रडण्याचा अभिव्यक्तीसाठी, संवादासाठी वापर करू लागते. रडणे ही केवळ बालकाच्या भाषाशिक्षणाची सुरुवात नव्हे तर त्याच्या भावनिक व सामाजिक विकासाचीही सुरुवात होय.
या टप्प्यापासून पुढे भाषा विकासासाठी आपण काय करू शकतो?
भाषा शिकणे ही एक सामाजिक कृती आहे. भाषेचा संवादाशी असणारा घट्ट संबंध मुलाला खूप लवकर समजतो. सहा महिन्याचे बाळ कुकूक भॉक च्या खेळात आईने भॉक करेपर्यंत ऐकत राहते आणि मगच खळखळून हसते. ऐकणे व प्रतिसाद देणे या प्रक्रियेत अगदी लहान मूलसुध्दा आनंदाने सहभागी होते. बालकाला अशा प्रकारच्या भाषिक देवाणघेवाणीच्या अनेक संधी मिळाल्या तरच त्याला संवादाचे महत्त्व कळते व भाषा शिकाविशी वाटते. अगदी लहान असल्यापासून मुलांच्या या संवादाच्या प्रयत्नाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे.
मुलांच्या भाषेचा अधिक विकास होण्यासाठी जाणीवपूर्वक मुलांचे शब्दभांडार वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. बाळाला आंघोळ घालताना, जेवू घालताना, रोजची काळजी घेताना बाळाबरोबर अर्थपूर्ण संवाद केला पाहिजे. उदा. “भूक लागली बाळाला?” “मऊ-मऊ भात खायचा का?” किंवा “बाहुली हवी की बॉलशी खेळायचे?” मुले जेव्हा संदर्भासह नवीन शब्द शिकतात तेव्हा अनोळखी शब्दांचा अर्थ समजायला त्यांना मदत होते. मुलांशी चालणाऱ्या मोठ्यांच्या संवादातून मुले साबण, भात, वाटी, बाहुली, गरम, कोमट, छान, आवडलं असे खूप नवे शब्द शिकतात. पण आपण आवर्जून योग्य शब्द वापरायला हवेत. “तिकडून ते केस विंचरायला हे आण” असे न म्हणता “कपाटातून तुझी फणी आण” असे म्हणावे. बरेचदा मुलांशी लाडे लाडे, बोबडे बोबडे बोलले जाते. ते जाणीवपूर्वक टाळावे.
संवादाचे दोन भाग आहेत. पहिले म्हणजे बोलणे आणि दुसरे म्हणजे ऐकणे. ऐकण्याची सुरुवात आपण स्वतः मुलांच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन करायला पाहिजे. समोरचे माणूस आपले ऐकते आहे हे लक्षात आल्यावरच मुलाचा संवादातील रस टिकून राहील.
मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी व भाषा शिक्षणातील त्यांचा रस कायम ठेवण्यासाठी मुलांना दररोज गोष्टी सांगितल्या पाहिजेत किंवा वाचून दाखवल्या पाहिजेत. मुले जशी बोलू लागतील तसे त्यांना गोष्ट सांगायला प्रोत्साहन द्यायला हवे.
मोठ्यांच्या मुलांसोबतच्या या सगळ्या देवाणघेवाणीत मोठ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे मुलांना प्रत्येक अनुभव नवा आहे. तो प्रत्येक अनुभव त्यांना नव्याने समजून घ्यावा लागतो. म्हणूनच मोठ्यांनी मुलांबरोबरच्या सगळ्या देवाणघेवाणी खूपच संवेदशीलतेने व विचारपूर्वक करायला हव्यात. यासाठी चूक-बरोबरच्या संकल्पना जरा बाजूला ठेऊन देणे उत्तम.
समृद्ध भाषा हे मुलांचे विचार कौशल्य विकसित करण्याचे साधन आहे. जितके शब्दभांडार अधिक तितके आपले विचार अधिक परिणामकारक रीतीने मांडता येतात. पण या साऱ्या भाषा विकासात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूल आपल्याकडे बघून शिकते आहे हे पालकांनी लक्षात ठेवणे. मुलांनी जे जे शिकावे असे आपल्याला वाटते ते ते आपल्या वागण्या-बोलण्यातूनही दिसायला हवे.
डॉ. नीलिमा गोखले डॉ. मंजिरी निंबकर neelima.gokhale@gmail.com manjunimbkar@gmail.com
9823053272 9822040586