तंत्रज्ञान आणि शिक्षण

Magazine Cover

सुषमा शर्मा यांचा पदव्युत्तर शिक्षणादरम्यान भारत जोडो अभियानात सहभाग राहिला. त्यानंतर त्यांनी ग्रामीण क्षेत्रात १५ वर्षे बालवाड्या, बालभवन, पूरक वर्ग, जीवन शिक्षण केंद्र, शिक्षण समित्यांचे सबलीकरण यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून १४ वर्षांपर्यंतच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले. या अनुभवातून त्यांची गांधीजींच्या शिक्षण विचारांशी ओळख झाली. या विचारांवर आधारित नई तालीम समितीद्वारा सेवाग्राम येथे संचालित आनंद निकेतन विद्यालयात त्या २००५ पासून कार्यरत आहेत.

मानवाची निसर्गत: असलेली जिज्ञासा त्याला अन्य जीवांपेक्षा वेगळेपण देणारी आहे. सृष्टीत घडणाऱ्या विविध गोष्टींचे कुतूहल आणि तिचे नियम शोधून काढण्याचे त्याचे वेगळेपण त्याच्या मानव बनण्यापासूनच आपल्याला दिसून येते. ‘त्याचा हा स्वभाव का?’ या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. तंत्रज्ञानाच्या निर्मितीपूर्वीही मानवाचा हा सत्याचा शोध चालूच होता असे दिसून येते. या सृष्टीतील सत्यशोधनाच्या प्रक्रियेतून वैज्ञानिक ज्ञानाची निर्मिती झाली. या सत्यशोधनातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करीत तंत्रज्ञानाची निर्मिती झाली. तंत्रज्ञान हे विज्ञानाचे आनुषंगिक उत्पादन आहे. आपले जीवन सुखकर करण्याच्या व इतरांवर नियंत्रण करण्याच्या प्रेरणेतून तंत्रज्ञानाला आकार आला आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगातून सृजनशीलतेचा आनंद व मानवाच्या कल्याणासाठी उपयोगी पडण्याचे समाधान लाभते तसेच त्याचा उपयोग विध्वंसासाठीही होतो हे अनुभवायला येते. मानव कल्याणार्थ कोणत्या तंत्राना प्राथमिकता द्यावी किंवा विशिष्ट तंत्रज्ञाचा उपयोग कशासाठी करावा याचे दिग्दर्शन होण्यासाठी माणसाला वेगळ्या मानसिक प्रवासाची व प्रयत्नांची गरज असते. निखळ सत्यशोधनाच्या प्रक्रियेतून होणारे शास्त्राचे आकलन आणि विशिष्ट उद्देशाने निर्माण होणारे तंत्रज्ञान यात म्हणूनच फरक करणे गरजेचे ठरते.

निसर्ग नियमांचा शोध घेण्याच्या जिज्ञासेसोबतच मी कोण?, माझ्या आयुष्याचे प्रयोजन काय?, माझ्या आत चाललेल्या सतत संघर्षाची व गोंधळाची कारणे कोणती?, मला माझ्या आंतर्मनाच्या स्तरावर शांतता अनुभवता येऊ शकेल काय? मृत्यू म्हणजे नेमके काय? यासारखे प्रश्नही उपजत कुतूहलातून मानवाला पडलेले दिसून येतात. यातून प्रेम, करुणा, एकरूपता यासारख्या बाबी स्वत:शी व इतरांशी शांततापूर्वक जोडून घेण्यास उपयुक्त ठरतात असे यातील प्रज्ञाप्राप्त व्यक्तींनी आपल्या अनुभवाने सांगितल्याचे दिसून येते आणि सामान्यत: हे बौद्धिकरित्या स्वीकारणे आज सामान्य माणसालाही अवघड राहिलेले नाही. अवघड आहे ते त्याप्रमाणे स्वत:ला घडविणे. या जिज्ञासेतून धर्माची रचना एक अनुषंगिक प्रक्रिया म्हणून झाली असणार. अर्थातच संघटित धर्माचे स्वरूप हे पोथीनिष्ठ व स्वार्थप्रेरित झालेले आपल्याला दिसून येते. धर्माच्या नावावर झालेली हिंसा ही या शोधाचा परिपाक नसून स्वार्थ व सत्तेच्या आकांक्षेतून निर्माण होणारी सांप्रदायिकता असते. म्हणूनच अंतर्मुखतेतून ‘स्व’ला रचनात्मकरित्या इतरांशी जोडून, समजून घेत घडविण्याची प्रक्रिया संघटित स्वार्थप्रेरित धर्मरचनेपासून वेगळी असते हे समजून घेणे गरजेचे आहे.

मानवाचे वेगळेपण जसे जिज्ञासेत आहे तसे ते त्याच्या समाजशील प्राणी असण्यातही आहे. कदाचित या जिज्ञासेतूनच त्याने आपल्या अस्तित्वासाठी समाजशील बनण्याचे विविध प्रयोग केले असणार हे उघड आहे. त्याचा अर्थ एका बाजूला सृष्टीमागील नियम शोधत सत्याचा वेध घेणे आणि या आपल्या आकलनाच्या आधारे प्रयोग करीत आपले जीवन तंत्रज्ञान आणि समाजज्ञान या दोन्हीच्या सहाय्याने सुखकर करण्याचा त्याचा प्रयत्न राहिला आहे. सामाजिक बांधणी करतानाही स्वार्थ आणि नियंत्रण या बाबी प्रभावी झाल्याचे सर्वत्र दिसून येते. सामाजिकशास्त्राचे उत्तम ज्ञान बाळगणाऱ्या व्यक्तीचे वर्तन जबाबदार असतेच असे नाही हा आपल्या दैनंदिन जीवनातील आपला अनुभव असतो. म्हणूनच हे लक्षात घ्यावे लागते की स्वत:ला घडविण्याची प्रक्रिया ही अंतर्मुखतेतून येते, केवळ समाजशास्त्रीय ज्ञानातून नाही.

शिक्षणाचा उद्देश ‘मुलांचा सर्वांगीण विकास घडविणे’ असल्यामुळे स्वाभाविकपणे मन, बुद्धी व शरीर यांचा समतोल विकास होईल असा दर्जेदार शिक्षण पाठ्यक्रम कुठल्याही शाळेचा असला पाहिजे. त्यामुळे ‘तंत्रज्ञान आणि शिक्षण’ या विषयावर विचार करतानाही शिक्षणाचे व्यापक संदर्भ घेउनच विचार करता येईल. विज्ञान व तंत्रज्ञानात्मक समज विकसित करतानाच चांगला माणूस घडण्याची प्रक्रियाही म्हणून तेवढीच महत्वाची ठरेल.

‘तंत्रज्ञान आणि शिक्षण’ या विषयावर आपली अनुभव व विचार मांडणी करावी अशी सूचना पालकनीतीकडून आली आणि मनात विचार घोळू लागले. २००५ मध्ये शाळा सुरू झाली तेव्हा नई तालीमची शाळा म्हणजे तंत्रज्ञानाचा सर्व प्रकारे विरोध
करणारी शाळा असा समज (गैरसमज?) अनेकांच्या मनात होता. आणि तंत्रज्ञानाला विरोध नसेल तर आजच्या संदर्भातील नई तालीमचे शिक्षण कसे असावे आणि ते कसे दिले जावे याबद्दल काय पथदर्शक भूमिका असेल अथवा असावी असा वैचारिक खल झाला जो आजतागायत विविध वेळी व विविध संदर्भात शाळा उभी होताना चालूच आहे. या विषयावर मांडणी करताना दोन प्रमुख आयाम लक्षात घ्यायला हवे असे वाटते, एक, म्हणजे ‘तंत्रज्ञानाचे शिक्षण’ व दोन, ‘तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण’. या दोन्हीही गोष्टींचा विचार शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांच्या परिघात करावा लागतो आणि त्याच बरोबर हे शिक्षण ज्यांच्यासाठी आहे त्या मुलांचे वय, त्या वयात शिकण्याची पद्धत याबाबतही विचार करणे आवश्यक ठरते.

तंत्रज्ञानाचे शिक्षण:
बाह्य जगावर प्रक्रिया करीत जगणे सुखकारक करण्याच्या प्रयत्नातून उभ्या झालेल्या अद्भुत वाटाव्या अशा तंत्रज्ञानाने आपण स्वत:च दिपून जावे असे यश मानवाने मिळविले आहे. हे यश मिळविण्याची प्रक्रिया कशी राहिली याचा विचार केल्यास विविध प्रकारच्या वस्तू, पदार्थ व जीव (स्वत:सह) हाताळत घेतलेले शोध, केलेले निरीक्षण, अंदाज बांधणे, विश्लेषण करणे, निष्कर्ष काढणे या प्रक्रिया किती अनिवार्य आहेत हे समजणे अवघड जाऊ नये. याच प्रक्रियेचा भाग म्हणून मानवाचे मूल कसे शिकते याचे अनेक प्रयोग आपण केले व मेंदूच्या स्तरावर चालणाऱ्या प्रक्रियेपर्यंतही आपण पोहोचलो. अवतीभवतीच्या परिसर व जगातून अशा प्रक्रियांच्या सहाय्याने म्हणजेच प्रत्यक्ष अनुभव घेत, त्यावर आपल्या संबोधांची बांधणी व पुनर्बांधणी करीत मूल शिकतं. प्रत्यक्ष ज्ञानेंद्रियांद्वारे अनुभव घेत शिकणे हीच लहान वयात शिकण्याची सर्वात प्रभावी व टिकाऊ पद्धत आहे. तसे पाहिल्यास आयुष्यभर प्रत्यक्ष अनुभव घेतच नव्या गोष्टी माणूस शिकत असतो. शिक्षण ही परिसरातील अनेक गोष्टींशी क्रिया-प्रतिक्रिया होत घडणारी गोष्ट आहे. परिसरातील विविध जैविक-अजैविक घटक, कुटुंब, समाज यांच्याशी संवाद साधत, क्रिया प्रतिक्रिया अनुभवत मूल शिकत असते. विविध प्रकारचे पदार्थ, वस्तू यांचे गुणधर्म जाणत व त्यांची शिस्त सांभाळतच निर्मितीची प्रक्रिया आपण अनुभवत असतो. हे अनुभव घेतच व्यक्तींची सूक्ष्मदृष्टी विकसित होत असते. हे सृजनात्मक अनुभव केवळ पुस्तकी शिक्षणातून कसे येणार? पण हे कळूनही आजचे बव्हंशी शाळांतून दिले जाणारे शिक्षण पुस्तकाधारित व परीक्षाकेंद्री आहे. यातून तंत्रज्ञानात्मक समज कशी वाढणार? नई तालीममध्ये जगण्याच्या अत्यंत जवळ जाणारे अनुभव छोट्या व सोप्या हस्तोद्योगातून अथवा व्यवसायातून मूल घेते तेव्हा विज्ञान व तंत्रज्ञानात्मक समजच नव्हे तर त्याच्या आधारे अन्य सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, पर्यावरणीय आणि भावनिक समज विकसित करण्याचा प्रयत्न अपेक्षित असतो. प्रोजेक्ट पद्धतीचा वापर करूनही या प्रकारचे अनुभव देण्याचा प्रयत्न मोजक्या शाळांतून होताना दिसतो. शेती, स्वयंपाक, मातीकाम, सुतारकाम, बांबूकाम, शिवणकाम, कागदकाम, सायकल दुरुस्ती, सोलर ऊर्जेवर आधारित उपकरणांचे काम, चुलींचा अभ्यास व बांधणी इ. प्रकारची कामे शाळेत घेताना सहजगत्या अनेक गोष्टींबाबत वैज्ञानिक व तंत्रज्ञानात्मक समज विकसित होण्यास मदत होते.

तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण:
आजच्या घडीला तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे याबाबत शंकाच नाही. संगणक तंत्रज्ञानाने व माहिती तंत्रज्ञानाने चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्याच्या संधी अनेक पटीने वाढल्या आहेत हे खरे आहे पण त्याचसोबत हे वास्तव सर्व भाषांमध्ये व सर्व आर्थिक सामाजिक गटांसाठी तेवढ्याच गुणवत्तेने आज उपलब्ध झाले आहे काय? या तंत्रज्ञानाचा वापर करीत तयार झालेल्या शैक्षणिक कार्यक्रमांची गुणवत्ता काय आहे? याचा विचार न करता तंत्रज्ञानाच्या मदतीने झालेले शैक्षणिक कार्यक्रम हे उत्तम दर्जाचे कार्यक्रम असतात असा गैरसमज सामान्यत: होऊ शकतो किंबहुना असे मोठ्या प्रमाणावर होताना दिसतेय. ई-लर्निंगचे जे अनेक कार्यक्रम आज बाजारात व शाळांत येताना दिसताहेत त्यात पाठ्यपुस्तकेच ई-रूपात थोड्या आकर्षक पद्धतीने दाखवलेली दिसतात. पाठ्यपुस्तके चांगली लिहिली जाण्याची खूपच गरज आहे हे आज सर्वमान्य झालेले आहे. आजची आपली बहुतांश पुस्तके माहिती सांगणारी आहेत. वर्तनवादी शिक्षणपद्धतीकडून ज्ञानरचनावादाकडे जायचे झाल्यास केवळ माहितीवजा पुस्तके आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवल्याने शिक्षणात सरसकटपणे गुणवत्ता येईल असे ठरवणे भ्रामकपणाचे ठरेल. तंत्रज्ञानाची आकर्षकता मुलांमध्ये शिकण्याची इच्छा जागृत करते असे सांगितले जाते. हे खरे आहे, पण या संचांमध्ये वापरली जाणारी भाषा व मुलांची भाषा, तेथे दाखविले जाणारे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ व मुलांचे स्थानिक संदर्भ या सगळ्यांचा विचार करणे गरजेचे आहे. या साधनांचा वापर करताना हे संदर्भ काळजीपूर्वक हाताळणे, मुलांच्या आत्मप्रतिमा व विचारप्रक्रिया निरोगी राहतील हे बघणं गरजेचं आहे आणि यात संवेदनशील शिक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते. मी पाहिलेल्या अनेक प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरील ई-लर्निगच्या कार्यक्रमात या महत्त्वाच्या उणिवा दिसून आल्या.

जिथे शिक्षक सक्षम नाही, मुलांची संख्या खूप आहे किंवा शिक्षकाची योग्य संख्येत उपलब्धता नाही आणि जेथे मूल शिक्षकाशिवाय स्वतंत्रपणे शिकू इच्छिते अशा परिस्थितीत ई-लर्निंग खूप मदतीचे ठरू शकेल असे वाटते. पण त्याद्वारे शिक्षकाची गरज संपवून स्वस्तात सर्वांगीण शिक्षण मुलांना देता येईल असे मात्र वाटत नाही.

निश्चित उद्देश समोर असल्यास योग्य वेबसाईटसचा शोध घेऊन आपल्याला आवश्यक ती माहिती मिळविणे, यूट्यूबवरून आपल्या गरजेनुरूप दृक्श्राव्य कार्यक्रमाद्वारे स्वशिक्षण करणे, ब्लॉग्स वरून इतरांचे लेखन- चिंतन वाचता येणे यासारख्या अनेक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणावर माहितीचे दालन सहजगत्या उपलब्ध झाले आहे. पण त्याचसोबत हे विसरता कामा नये की ही माहिती आहे. हिचे ज्ञानात व उपयोजनाच्या स्तरावर रूपांतर होण्यासाठी अवतीभवतीच्या वास्तव जगताशी जोडून या माहितीचा उपयोग करणे महत्त्वाचे ठरते, शिवाय गरज स्पष्ट नसल्यास माहितीच्या जंजाळात माणूस पूर्णपणे हरवू शकतो; चुकीच्या दिशेने वाहवू शकतो व संपू शकतो.

माहितीच्या जंजाळात विवेक, स्पष्टता या सारखे गुण मदतीला येऊ शकतात. पण या गुणांचा विकास मात्र मानव स्पर्शाने किवा शिक्षकांच्या सान्निध्यातच होउ शकतो हे विसरून चालणार नाही. या माहितीच्या उपयोगातून व योग्य तंत्रज्ञानातून स्वत:चा, समाजाचा व मानवत्वाचा उत्कर्ष साधायचा आहे; त्याचसोबत या पृथ्वीतलावरील गुंतागुंतीच्या संतुलनातून आकाराला आलेल्या परिसंस्थांची, जीवनजाळ्याची वीण टोकाच्या उपभोगातून व हिंसेतून विसविशीत करून पुढील पिढ्यांचे जीवन खडतर करण्याचा उद्दामपणा थांबवायचा आहे. मानवाचे वेगळेपण त्याच्या सर्जनशीलतेत आहे विध्वंसकतेत नाही हे शहाणपण येण्याच्या दिशेने आपल्याला अजून मोठी वाटचाल करावयाची आहे. ही वाटचाल शिक्षकाची व मुलांचीही सोबत सोबत होत असते. मुले व शिक्षक सर्वांनाच ‘तंत्रज्ञान म्हणजे सर्व काही’ या भ्रमातून बाहेर पडत त्याला दिशा देणारे मनही तेवढ्याच ताकदीने घडवण्याची गरज आहे. प्रेम, सहकार, करुणा या सारखी मूल्येच मानव कल्याणासाठी दिशादर्शक ठरू शकतात.

सुषमा शर्मा
sushama.anwda@gmail.com
9881018188