आइडियाज वर्थ स्प्रेडिंग!

इंटरनेटवर Text, Visuals, Audio आणि Video या प्रकारात माहिती साठवलेली असते. यामध्ये Video स्वरूपाची माहिती म्हटले की Youtube असे एक समीकरण बनून गेले आहे. मात्र जगावेगळ्या उपक्रमांची रोचक आणि अभ्यासपूर्ण माहिती उपक्रम केलेल्या व्यक्तींच्याच शब्दात ऐकण्यासाठीचे अजून एक ठिकाण येथे आहे. ते म्हणजे टेड डॉट कॉम. टेक्नोलॉजी, एन्टरटेन्मेंट व डिझाइन म्हणजेच टेड (TED) ही एक जागतिक स्तरावरील सेवाभावी संस्था. तंत्रज्ञान, मनोरंजन आणि डिझाइनिंग या क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन १९८४ मध्ये वास्तूविशारद आणि ग्राफिक डिझाइनर रिचर्ड सॉल वुर्मन यांनी ही संकल्पना जगापुढे आणली.
जगभरातील विचारवंत, काही तरी विशेष करू पाहणारी व्यक्तिमत्वे, नवे प्रयोग, आज सर्वत्र जाणवणारे विविध प्रश्न यांना जगासमोर आणणारे टेड हे एक उत्तम व्यासपीठ आहे. ‘आइडियाज वर्थ स्प्रेडिंग’ असे ब्रीदवाक्य असलेल्या या मंचावर लोक त्यांचे विचार किंवा त्यांनी बनवलेले तंत्रज्ञान जगासमोर केवळ १८ ते २० मिनिटांच्या अवधीमध्ये मांडत असतात. यालाच ‘टेड टॉक’ असे म्हणतात. ज्ञानाला कोणत्याही भाषेचे बंधन नसावे म्हणूनच हे टेड टॉक १०० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत ज्यामध्ये मराठीसह इतर काही भारतीय भाषांचा देखील समावेश आहे.
या मंचावर कोण कोण अवलिया भेटतील सांगता येणार नाही. इथे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि अॅपलचे निर्माते स्टीव्ह जॉब्ज आहेत, आफ्रिकेतल्या एका लहानशा खेड्यात केवळ एका पुस्तकाच्या मदतीने पवनचक्की बनवून आपल्या घरात वीज आणणारा आणि आपल्या गावातील शेतीच्या सिंचनासाठी मोठी पवनचक्की बनवण्याचे स्वप्न पाहणारा १९ वर्षांचा विल्यम कामक्वाम्बा आहे, कर्करोगास कारणीभूत केवळ कर्करोगाच्या पेशीच नसतात असा ब्रेकिंग शोध लावणारी मीना बिसेल आहे आणि अक्षरशः ५ मिनिटांत ‘गाजराची पुंगी’ बनवून त्यातून अविश्वसनीय सुरेल धून वाजवणारा ऑस्ट्रेलियाचा लिन्झी पोलकही आहे.
‘होल इन द वॉल’ प्रयोगाचे जनक शिक्षण-तंत्रज्ञ शुगातो मित्रा यांच्या ‘स्कूल इन द क्लाउड’या संकल्पनेची दखल घेऊन टेडने त्यांना २०१३ चे टेड पारितोषिक दिले. याच पारितोषिकेच्या रकमेतून जगातील आणि भारतातील काही ठिकाणी स्कूल इन द क्लाउडचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले जात आहे.
या टेड टॉक्समध्ये मुलांच्या मनामध्ये प्रेरणा व नव्या क्षेत्रांबद्दल आकर्षण निर्माण करण्याची शक्ती आहे. मुलांच्या विचारांची दशा आणि दिशा यांना वेगळे वळण टेड टॉक्समुळे मिळू शकते. कदाचित आपले विद्यार्थीही भविष्यातील भारतीय ‘टेड’र्स म्हणून पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही!
वैचारिक दृष्टीने आपल्या मुलांना अधिक सक्षम करायचे असेल आणि जगभरातील भन्नाट कल्पना जर एकाच मंचावर पहायच्या, अनुभवायच्या असतील तर ‘टेड डॉट कॉम’ ला भेट द्याच!

काही निवडक टेड टॉक्स

विल्यम कामक्वाम्बा http://www.ted.com/talks/william_kamkwamba_on_building_a_windmill?langua…

शुगातो मित्रा
http://www.ted.com/talks/sugata_mitra_build_a_school_in_the_cloud?langua…

लिन्झी पोलक
http://tedxsydney.com/site/item.cfm?item=80400313F33C023FBECB7B4C05390323

मराठी सबटायटल्स असलेले टॉक्स http://www.ted.com/talks?language=mr&page=1

प्रकाश अनभूले
anbhuleprakash@gmail.com
9960460474