संवादकीय…

आदिवासी मुलांच्या एका निवासी शाळेत मी शिकवत होतो तेव्हाची गोष्ट. ही मुलं अशी का वागतात, हा प्रश्न मला नेहमी पडे. आपण त्यांना काही उत्साहानं सांगायला जावं तर काहीबाही उत्तरं देऊन ती पोबारा करायची. आपण जीव तोडून यांना शिकवायचा प्रयत्न करतोय, तरीही ही अशी का वागतात, असं सारखं वाटत राहायचं. हळूहळू ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांचं काम माझ्या वाचनात आलं. अनुताई म्हणायच्या, “शिक्षण म्हणजे मुलांच्या अंगणातलं झाड झालं पाहिजे.” पाच आठवडे, बालवाडी कशी चालवावी या अनुताईंच्या पुस्तकांमधून आदिवासी मुलांना कसं शिकवायचं याचे नमुने मला गवसू लागले. पण शिक्षण म्हणजे मुलांच्या अंगणातलं झाड झालं पाहिजे म्हणजे काय हे नीटसं कळत नव्हतं.

एकदा पाठ्यपुस्तकातला बीजप्रसाराचा धडा मी शिकवत होतो. पाण्याबरोबर पसरणाऱ्या, वाऱ्याबरोबर पसरणाऱ्या, पक्ष्यांमार्फत पसरणाऱ्या बियांची पाठ्यपुस्तकातली ठरावीक उदाहरणं मी सांगितली. दुसऱ्या दिवशी मुलं वीस-पंचवीस प्रकारच्या बिया घेऊन आली, आणि त्यातली एक बी दाखवून म्हणाली, “ गुरुजी सांगजोस बरा, यी बी क्या खाल पसरं?” मला तर त्यातल्या एकाही बीच्या झाडाची माहिती नव्हती. आणि नुसत्या बिया पाहून त्यांचा प्रसार कसा होतो हे सांगण्याइतपत वनस्पतीशास्त्राचं ज्ञानही नव्हतं. मला उत्तर देता येत नाही हे पाहून सगळी खुदूखुदू हसू लागली. पुढचा अर्धा तास त्यांनी माझा वनस्पतीशास्त्राचा वर्ग घेतला! प्रत्येक बी कोणत्या झाडाचं, ते झाड कुठं वाढतं, त्याच्या बिया कशा पसरतात याची माहिती मुलं मला देत होती. त्यांनी सांगितलेल्या झाडांपैकी एकही झाड माझ्या ओळखीचं नव्हतं. पोलाड्या गवत, कसई, चिमणचारा असली नावं ऐकून त्या वनस्पती कशा असतील याचा अंदाजही मला बांधता येईना. वर्गात एरवी बोला म्हटलं तरी न बोलणारी मुलं मात्र आज मला भरभरून शिकवत होती.

असाच अजून एक प्रसंग. आमच्या निवासी शाळेत शहरातून काही मुलं क्रीडा-शिबिरासाठी येऊन राहायची. यातली काही मुलं अथलेटीक्सचे प्रशिक्षण घेणारी होती. आमच्या शाळेतल्या मुलांसोबत जेव्हा या मुलांच्या स्पर्धा लागल्या, तेव्हा आमच्या मुलांनी प्रशिक्षण घेणाऱ्या शहरी मुलांची पार भंबेरी उडवली. झाडाला टांगलेल्या दोरावर चढण्यासारखा व्यायाम करताना शहरी मुलं हैराण व्हायची. क्वचित भीती वाटून रडारडही करायची. आदिवासी मुलांना याचं फार आश्चर्य वाटायचं. दिवसभरात पन्नास वेळा दोरावरून सरसर वर जाऊन ती झाडाच्या फांदीवर बसायची. जी बाब खेळाची तीच गाण्याची. तंबोऱ्यातून किंवा पेटीचा नुसता एक सूर धरला तरी आख्खा वर्ग सुरात गायचा. पट्टी बदलली तरी न सांगताच त्या पट्टीत सगळेजण आवाज लावायचे. अशा वेळी शहरातून आलेल्या मुलांना स्वरात स्वर मिसळणं अवघड व्हायचं. गाणं-नाचणं या आनंदाच्या गोष्टी आदिवासी समाजात समूहानं केल्या जातात त्याचाच हा परिणाम असावा.

या शाळेतल्या काही मुलांनी आदिवासींच्या मासेमारीच्या पध्दतींचा तुलनात्मक अभ्यास केला होता. आदिवासींच्या पारंपरिक पध्दती जरी कष्टदायक आणि वेळखाऊ असल्या तरी त्या आधुनिक पध्दतीपेक्षा पर्यावरणपूरक आहेत असा निष्कर्ष आकडेवारीनिशी मांडून त्यांनी आपला प्रकल्प राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत मांडला होता. तिथल्या परीक्षकांनी विचारल्याबरोबर काही प्रात्यक्षिकं तिथल्या तिथे करून दाखवून या मुलांनी उपस्थितांची वाहवा मिळवली होती. अभ्यासाचा विषय स्वत:च्या जगण्यावागण्याशी घट्ट जोडलेला असणं हा त्यांच्या या यशातला एक महत्त्वाचा घटक होता.

जशीजशी मला आदिवासी संस्कृतीची ओळख होऊ लागली तसा अनुताईंच्या उक्तीचा अर्थ उलगडू लागला. अंगणातलं झाड जसं मुलांना आपलं वाटतं तसं शिक्षणही वाटलं पाहिजे हा तो अर्थ. शिक्षण तसं वाटावं म्हणून अनुताई आणि त्यांच्या सहकारी सिंधूताई अंबिके यांनी विलक्षण खटाटोप केलेला दिसतो. वारली भाषेतली गाणी, उखाणे वर्गामध्ये वापरणं, आदिवासी मुलांच्या रोजच्या जीवनातल्या प्रसंगांवर वाचन-पाठ बेतणं, मुलांच्या खेळांचा वापर गणित शिकविण्यासाठी करणं असे अनेक उपाय या शिक्षणतज्ज्ञांनी योजले. जे जे मुलांच्या घरात होतं ते ते शाळेत आणून त्याचा वापर शिकण्या-शिकविण्यासाठी करणं हे या शिक्षणतज्ज्ञांचं मोठंच योगदान म्हणावं लागेल.

पालकनीतीच्या या अंकात ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स या सदरात फ्रेंच तत्त्ववेते, मानसशास्त्रज्ञ पिएर बोर्द्यू यांच्या कार्याबाबतचा लेख आहे. बोर्द्यूंनी सांगितलेली सांस्कृतिक भांडवलाची कल्पना ताराबाई आणि अनुताईंना माहीत होती का, याची कल्पना नाही. पण आदिवासी मुलांचं सांस्कृतिक संचित निराळं आहे आणि त्याचा योग्य वापर केल्याशिवाय ही मुलं शिकती होणार नाहीत हे त्यांनी नक्कीच जाणलं होतं. म्हणूनच मुलांच्या गरजेप्रमाणे शाळेनं बदलायला हवं, शिक्षणाचा आशय आणि उद्दिष्ट्यं बदलायला हवीत हा रास्त विचार त्यांच्या कामातून दिसतो. मुलांच्या भाषेला, खाण्यापिण्याच्या सवयींना, नाचगाण्याला त्यांनी त्यांच्या शाळेत आदराचं स्थान दिलेलं दिसतं. खरं तर ताराबाई, अनुताई आणि सिंधूताई, सगळ्याच समाजाच्या प्रबळ वर्गातल्या. पण आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतल्यानं त्यांनी शिक्षणातलं यश आणि मुलांची संस्कृती यांच्यातला संबंध ओळखला असावा. या साऱ्याजणी आयुष्यभर कामात व्यग्र राहिल्यानं म्हणा, किंवा भारतीय समाजाच्या परंपरेनुसार म्हणा, त्यांनी शिक्षण आणि संस्कृतीतल्या संबंधांचं सिद्धांतन कधी केलं नाही. त्यामुळे सांस्कृतिक विविधतेला शिक्षणात सामावून घेण्याचं आव्हान आजही आपल्यासमोर आहे. त्याकडे आपल्याला आता दुर्लक्ष करता येणार नाही. मग त्यासाठी आजची व्यवस्था अगदी मुळापासून बदलावी लागली तरी बेहेत्तर.
——***——