संवादकीय

शिकण्याची आंतरिक ऊर्मी सतत जागृत ठेवण्याची कला फार थोड्या जणांना साधते. शिकणं ही ज्यांच्या जगण्याची वृत्तीच झाली आहे, अशांपैकी सुलभाताई एक होत्या. सुलभा देशपांडे या नावाचा मराठी रंगभूमीच्या, अभिनयाच्या क्षेत्रात काय दबदबा आहे हे वेगळं सांगायला नको. अभिनयाच्या क्षेत्रात चाळीसएक वर्षं काम केल्यानंतरही काही तरी नवं करण्याची उमेद सुलभाताईंजवळ होती. रंगायन, छबिलदास, आविष्कार यांसारख्या मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाच्या चळवळींच्या सुलभाताई केवळ साक्षीदारच नव्हे तर अविभाज्य भाग होत्या. सुलभाताईंनी प्रत्येक भूमिका किती जीव ओतून केली असेल याची कल्पना मला त्यांच्यासोबत काम करताना आली.

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मी आणि माझा सहकारी वसिम मणेर दोघेजण मिळून ‘कलानुभव’ नावाची एक शैक्षणिक शॉर्ट फिल्म बनवत होतो. फिल्मची संकल्पना व संवाद मी लिहिले होते, तर दिग्दर्शन वसिम करणार होता. फिल्ममधल्या एका भूमिकेसाठी सुलभाताईंना विचारायचं ठरलं. आमची त्यावेळची वयं आणि अनुभव लक्षात घेता सुलभाताईंना अशा कामासाठी विचारणं एक धाडसच होतं. स्क्रिप्ट पाठवून दिल्यावर दोन दिवसांनी वसिमनं सुलभाताईंना फोन केला. त्यावेळी त्यांनी वसिमला साडी कोणत्या रंगाची नेसायची, कानातले घालायचे का नाहीत, हातात बांगड्या हव्यात की घड्याळ, कुंकू केवढं मोठं लावायचं असे बारकाव्याचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. आम्ही या कशाचाच विचारही केला नव्हता. त्यामुळे तत पप करत या प्रश्नांची उत्तरं दिली. शेवटी आम्ही ही फिल्म एका सामाजिक संस्थेतर्फे करत असल्याचं सागंनू मानधनाबाबत विचारल. त्यावर “मानधन दतेाय? किती देणार?” असा प्रश्न विचारून सुलभाताई खळखळून हसल्या. आणि आमच्या फिल्ममध्ये काम करायला तयार झाल्या.

प्रत्यक्ष शूटिंगच्या दिवशी सुलभाताई लोकेशनवर आल्याबरोबर एकदम शांतता पसरली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं, तिथल्या अस्तित्वाचं प्रचंड दडपण आम्हा सगळ्या नवशिक्यांवर आलं. सुलभाताई मला म्हणाल्या, “या फिल्मची कल्पना तुमची आहे ना? मग आपण तुम्हाला हवं तसं करू”. एखादं वाक्य म्हणताना त्यातून मला अभिप्रेत असलेला अर्थच पोचतो आहे ना, असं सुलभाताई सर्वांसमोर नि:संकोचपणे विचारायच्या. मी नाही म्हटलं, तर त्याबाबत सविस्तर चर्चा करून एकच वाक्य वेगवेगळ्या प्रकारे म्हणून दाखवायच्या. हे करताना त्यांचं वय, अनुभव, अधिकार यातलं काहीही आडवं येत नव्हतं. एकदा लायटिंगच्या सोयीसाठी म्हणून वसिमने सुलभाताईंना भिंतीवर चिकटवलेल्या चिकटपट्टीच्या तुकड्याकडे बघून काही वाक्यं म्हणायला सांगितली. तो असं का करतोय हे त्यांच्या लक्षात येईना. त्यांनी ती वाक्यं म्हटली, पण जेवणाच्या वेळेत वसिमने नेमकं काय केलं हे त्याच्याशी चर्चा करून सविस्तर समजून घेतलं. आपल्यापेक्षा वयानं, अनुभवानं कितीतरी लहान असणार्या व्यक्तींकडून एखादी गोष्ट शिकताना त्यांना अजिबात कमीपणा वाटला नाही. माणसाचं मन शिकण्यासाठी असं उत्सुक असलं म्हणजे मग वयाचं सावट त्यावर येत नाही. म्हणूनच प्रदीर्घ काळ रंगभूमी गाजवल्यानंतरही सुलभाताई सिनेमा किंवा टेलिव्हिजनसारख्या तंत्राधारित माध्यमांनाही सहजतेनं आपलंसं करू शकल्या.

मुलांची रंगभूमी ही संकल्पना भारतातल्या फारच थोड्या भाषांत अस्तित्वात आहे. आधीच भारतीय समाजात मुलं हा घटक दुर्लक्षित. त्यामुळे बालरंगभूमीसारखी कल्पना भारतीय समाजात फारशी फुलली नाही, याचं आश्चर्य वाटायला नको. मराठीतल्या बालरंगभूमीला सुलभाताईंचं मोठंच योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दुर्गा झाली गौरी’मध्ये अभिनय करत करत मुलांच्या अनेक पिढ्यांनी नाटकाशी आपलं नातं जुळवलं आहे. एकाच नाटकाचे इतक्या वेगवेगळ्या मुलांसोबत परत परत प्रयोग सुलभाताईंनी का केले असावेत? बहुतेक नव्या नव्या मुलांच्या गटाबरोबर काम करताना त्यांना नवीन ऊर्जा मिळत असावी. नाटक जरी तेच असलं तरी प्रत्येक मूल त्यातली भूमिका आपल्या परीने करत असणार. आणि हा नवा अनुभव सुलभाताईंना काही नवं शिकवून जात असणार. अशा सतत शिकत राहण्याच्या वृत्तीमुळेच सुलभाताई त्यांच्या पिढीनंतरच्या अनेक पिढ्यांशी मैत्रीचं नातं जोडू शकल्या. खरंतर त्या मराठी रंगभूमीच्या चढत्या काळाच्या प्रतिनिधी होत्या. पण आम्ही केलं ते किती ग्रेट होतं आणि नवी पिढी कशी काहीच करत नाही असा भाव त्यांच्यामध्ये कधी आला नाही. असं म्हणतात, की शिकण्याची प्रक्रिया आजन्म चालू असते. जगाबद्दलचं कुतूहल मनात जागं असलं की माणूस सतत शिकत राहतो. मग त्या शिकण्याला स्थळकाळाचं, शिकणार्याच्या किंवा शिकवणार्याच्या वयाचं कसलंच बंधन उरत नाही. ज्यांचं शिकणं आणि जगणं जणू एकरूप झालं होतं अशा सुलभाताईंना मन:पूर्वक आदरांजली.