अलेक्झांडर रास्किन 

बाबा व्हिट्याकाकाला अगदी एकटं सोडतो तेव्हा…

बाबा लहान होता पण त्याला त्याच्याहून धाकटा असा अजून एक भाऊ होता. त्याचा तो भाऊ म्हणजे आपले व्हिट्याकाका! ते इंजिनिअर आहेत आणि त्यांनाही आता एक मुलगा आहे. आणि त्याचंही नाव व्हिट्याच आहे.

पण तेव्हा व्हिट्याकाका अगदी पोरगेलासा होता. नुकता चालायला शिकला होता. कधीकधी तो चालण्याऐवजी रांगतच सुटायचा. कधीकधी जमिनीवर नुसताच बसून राहायचा. त्यामुळेच त्याला एकटं सोडणं शक्यच नव्हतं. तो खूपच लहान होता.

एके दिवशी, छोटा बाबा आणि धाकटा व्हिट्याकाका मागच्या अंगणात खेळत होते. त्या दोघांना थोड्याच वेळासाठी एकटं सोडलेलं होतं. तेवढ्यात त्यांचा चेंडू रस्त्यावर गडगडत गेला. छोटा बाबा त्यामागे धावला. आणि त्याच्यामागे व्हिट्याकाका!

त्यांचं घर एका टेकाडावर होतं. चेंडू टेकाडावरून खाली गडगडत गेला. बाबा त्याच्यामागे धावला. व्हिट्याकाका बाबामागे गडगडला.

त्या टेकाडाच्या पायथ्याशी एक रस्ता होता. तिथे जाऊन चेंडू थांबला. छोटा बाबा त्याच्यापाशी पोहोचला. व्हिट्याकाकाही बाबाच्या मागोमाग तिथे थडकला.

त्या तिघांमध्ये चेंडू सगळ्यात लहान असला तरीही तो अजिबात दमला नव्हता. छोटा बाबा थोडा दमला होता. आणि लहानगा व्हिट्याकाका अगदीच दमून गेला होता. आत्ता कुठे तो चालायला शिकला होता. त्यामुळे त्यानं रस्त्याच्या बरोब्बर मध्यात फतकल मारली.

लांबवर धुळीचे लोट उठताना दिसत होते. आणि थोड्याच वेळात बरेच घोडेस्वार दृष्टिक्षेपात आले. ते रस्त्यावरून रपेट मारत चालले होते. हे खूप खूप काळापूर्वीचं आहे; दुसर्‍या महायुद्धानंतर लगेचचं.

छोट्या बाबाला हे ठाऊक होतं, की युद्ध संपलं आहे. पण तरीही तो खूप घाबरला. त्यानं चेंडू फेकला. लहानग्या व्हिट्याकाकाला तिथेच, रस्त्याच्या मधोमध सोडून बाबा पळाला, ते थेट त्यानं घरच गाठलं.

व्हिट्याकाकाला काहीच खबरबात नव्हती, तो मस्त चेंडूशी खेळत तिथेच बसला होता. त्याला काही घोड्याबिड्यांची, सैनिकांची भीती नव्हती. त्याला कशाचीच भीती नव्हती. तो अगदीच लहान होता ना!

तोपर्यंत घोडेस्वार खूपच जवळ पोहोचले होते. त्यांचा कप्तान पांढर्‍या घोड्यावर आरूढ होता. 

तो ओरडला, “थांबा!” घोड्यावरून पायउतार होत त्यानं व्हिट्याकाकाला उचललं, हवेत उंच उडवलं, अलगद परत झेललं आणि हसला.

“काय मग, कसं काय?” त्यानं विचारलं.

व्हिट्याकाका हसला आणि त्यानं कप्तानाला चेंडू देऊ केला. 

तेवढ्यात आजोबा, आजी आणि छोटा बाबा टेकाडावरून धावत येत होते.

आजी आरडतच आली, “माझं बाळ कुठाय?”

आजोबा ओरडले, “उगी आरडू नकोस.”

बाबा हमसून हमसून रडत होता.

मग कप्तानसाहेब म्हणाले, “तुमचं बाळ इथंय! एकदम गोड बाळ आहे बुवा! घोड्यांनाही घाबरत नाही!”

कप्तानानं व्हिट्याकाकाला परत एकदा हवेत उडवलं आणि अलगद झेलून आजीच्या हातात दिलं. आजोबांच्या हातात चेंडू दिला. मग कप्तानसाहेब छोट्या बाबाकडे बघत म्हणाले, “गारून फ्लेड फास्टर दॅन अ डो.”     

सगळे हसले. मग ते सैनिक घोडे दौडवत निघून गेले. आजोबा, आजी, बाबा आणि व्हिट्याकाका सगळे घरी गेले. 

आजोबा बाबाला म्हणाले, “गारून हरणापेक्षाही वेगात पळून गेला कारण तो भित्रा होता. लर्मोंटोव्हच्या कवितेतली ही एक ओळ आहे. शरम वाटली पाहिजे तुला.”

छोटा बाबा अगदी लाजला.

मोठं झाल्यावर त्यानं लर्मोंटोव्हच्या सगळ्या कविता वाचल्या. त्यात ही ओळ आली, की त्याला खूपच वाईट वाटत असे.    

अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश 

jonathan.preet@gmail.com

पालकनीतीच्या संपादकगटात सक्रिय सहभाग. आपल्या आयुष्याला नेमका हेतू नसतो हे जाणवून पर्यावरण, शिक्षण आणि लेखन या माध्यमांतले समोर येईल ते आणि आवडेल ते करण्याचा प्रयत्न करतात. 

सौजन्य : अरविंद गुप्ता टॉईज