बाबा एका मुलीबरोबर खेळतो तेव्हा…

अलेक्झांडर रास्किन 

बाबा लहान असताना त्याला एक मैत्रीण होती, माशा नावाची! ते नेहमी एकत्र खेळायचे. वाळूत सुंदर घर बांधायचे, मोठ्या डबक्यात कागदाच्या बोटी सोडायचे, डबक्यात मासे पकडायलाही जायचे. कधी काही मिळायचं नाही, पण मज्जा भरपूर यायची त्यांना!

छोट्या बाबाला माशासोबत खेळायला भारीच आवडायचं. ती कधीच त्याच्याशी भांडायची नाही, त्याच्यावर दग़ड फेकायची नाही, कधी त्याला पाडायची नाही. आपल्या आसपासचे ओळखीचे सगळे मुलगे तिच्यासारखे असते तर किती बरं झालं असतं… बाबाला वाटायचं. पण ते तसे नव्हतेच. ते त्याला चिडवायचे कारण तो एका मुलीबरोबर खेळायचा. 

त्याला पाहिलं की ते गाणं म्हणायला लागायचे,

साशाला आवडते माशा!

साशाला आवडते माशा!!

वर आणि विचारायचे, “लग्न कधी आहे तुमचं?”

त्या सगळ्यांना वाटायचं, की मुलग्यांनी असं मुलींबरोबर खेळणं सपशेल चुकीचं आहे. बाबाला हे खूपच लागायचं. कधीकधी तर तो रडायचादेखील.

छोटी माशा मात्र फक्त हसायची. म्हणायची, “त्यांना जेवढं चिडवायचंय तेवढं चिडवू देत.”

त्यामुळेच माशाला चिडवण्यात काही मजाच नव्हती. मग सगळे मुलगे एकट्या बाबालाच चिडवायचे. माशाकडे ढुंकूनही बघायचे नाहीत.

एक दिवस एक मोठ्ठा कुत्रा यार्डात पळत आला. कोणीतरी जोरात ओरडलं, “तो पिसाळलेला आहे.” सगळ्यात धीट मुलंही भीतीनं गांगरून गेली. छोटा बाबापण जिथल्या तिथे थिजला. तो कुत्रा त्याच्या अगदीच जवळ होता. तेवढ्यात माशा पळत पळत बाबाजवळ आली आणि तिचं छोटं फावडं कुत्र्यावर उगारत टेचात म्हणाली, “चल, चालता हो इथून!”

दोन पायांत शेपूट घालून तो वेडा कुत्रा यार्डातून पळून गेला. तेव्हा कुठे सगळ्यांच्या लक्षात आलं, की तो पिसाळलेला नव्हताच मुळी. एवढंच की तो नेहमीचा नव्हता. सगळ्या कुत्र्यांना ‘अपनी गली’ आणि ‘दूसरेकी गली’ नीटच कळत असते.

अगदी खूंखार कुत्रीसुद्धा दुसर्‍यांच्या गल्लीत गेली, की स्वतःचं भयानक असणं विसरून जातात. तो कुत्रा पिसाळलेला नाही हे लक्षात आल्यावर सगळी मुलं त्याच्या मागे काठ्या अन् दगड घेऊन पळाली. अर्थात, हे करायला काही मोठं धैर्य लागत नाही, हे त्या कुत्र्यालाही कळत होतं. रस्त्यावर पोहोचताच तो गर्रकन मागे वळला आणि गुरगुरला. मुलं उलट पावली यार्डात पळत गेली आणि छोट्या बाबाला चिडवू लागली, “घाबरलेलं मांजर! घाबरलेलं मांजर! तू इतका घाबरला होतास की तू पळूही शकला नाहीस!”

“मी काही एकटा नव्हतो घाबरलेला! तुम्हीपण घाबरलाच होतात. माशा एकटीच घाबरली नव्हती.”

सगळ्या मुलग्यांनी शरमेनं मानच खाली घातली. आता त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं.

तेवढ्यात माशा म्हणाली, “ते काही खरं नाही. मीपण घाबरले होते.”

मग सगळेच हसले. त्यानंतर मात्र त्यांनी छोट्या बाबाला कधीच चिडवलं नाही. माशा आणि बाबाची मैत्री मस्त टिकून राहिली. ते चांगले दोस्त राहिले.  

अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश 

jonathan.preet@gmail.com

पालकनीतीच्या संपादकगटात सक्रिय सहभाग. आपल्या आयुष्याला नेमका हेतू नसतो हे जाणवून पर्यावरण, शिक्षण आणि लेखन या माध्यमांतले समोर येईल ते आणि आवडेल ते करण्याचा प्रयत्न करतात. 

सौजन्य : अरविंद गुप्ता टॉईज