मृणालिनी वनारसे 

माझं एक आजोळ कोकणातलं. आणि दुसरं देशावरचं. हरेक सुट्टीत एकदा या आणि एकदा त्या आजोळी जाण्याचा प्रघात होता. मी नुसती सुट्टीला जात नव्हते, तर त्या दोन भिन्न प्रदेशांची तोंडओळख करून घेत होते; माझ्याही नकळत. पण इकडे पोळी आणि तिकडे भात, इकडे बिटके आंबे तिकडे हापूस, इकडे सपाटी तिकडे घाट… यापलीकडे काही कुतूहल जागं झालं नव्हतं. अंगण परसदार, देऊळ, माळ, ओढा… मी सगळं ‘बघत’ होते; पण काही ‘पाहत’च नव्हते. चाफ्याची अंगठी करून बोटात घातली तेव्हा कुठे चाफ्याची फुलं आवर्जून वेचू लागले. भातखाचरात उगवलेल्या कुठल्या अतिनाजूक पांढऱ्या फुलांची माळ बनवायला शिकले, आणि विसरूनही गेले. खळाळता पाट होता कोकणातल्या घराच्या अंगणात; पण प्रश्नच विचारला नाही की पाणी येतं कुठून? नाही म्हणायला लहान भावानं एकदा आजीला प्रश्न विचारलं होता, की याचं बटण कुठे आहे? हा बंद कसा होतो? डोंगरात फ्रिज बसवला आहे का? पाणी एवढं गार कसं होतं? सगळे हसले आणि विषय संपला. करवंदाच्या जाळीत जाणं, आंबे उतरवायला, अढी करायला शिकणं, हे त्यातल्या त्यात झालं. कडुनिंब धान्य साठवायला कसा वापरतात ते देशावरच्या आजीकडे राहून कळलं. या आणि इतर अनेक बारक्यासरक्या गोष्टी. 

भावंडांसमवेत खेळत होते, भांडत होते, हुंदडत, मौजमजा करत होते. पण परिसर आणि माझी नेत्रभेट झालीच नव्हती. कोकणातल्या धुवाधार पावसानं कधीतरी स्तिमित झाले होते. देशावरून कोकणात जाताना खूप लक्ष ठेवलं होतं, काळ्या मातीची लाल माती कुठे होते, तिची सीमा काय; पण चालत्या बसमधून काही फारसं हाती आलं नाही आणि मीही ते विसरून गेले. 

आणि मग एकदा कधीतरी एका साठीच्या माणसासोबत टेकडी चढले. आम्ही वीस-बावीस वर्षांची मुलं मागे पडत होतो आणि ते साठीचे गृहस्थ भरभर डोंगर चढत होते. वर पोचल्यावर हुश्श झालं. टेकडीच्या माथ्यावरून त्यांनी चौफेर बघायला शिकवलं. लांबवरून वाहणारी नदी दाखवली आणि म्हणाले, “नदीने हे खोरं तयार केलंय. आपण त्याचा भाग आहोत. या टेकड्या लांबच्या पर्वतरांगेचा भाग आहेत. आज आहेत. काही लक्ष वर्षांनी वेगळंच चित्र असेल.” ऐकत राहावी अशी गोष्ट. माणसानं ऐकलेली सर्वात प्रदीर्घ गोष्ट हीच असेल का? त्या टेकडीवर उभे असताना मला आठवलं, शाळेत कधीतरी याच टेकडीवर झाडं लावायला आलो होतो. पावसाचे दिवस होते. ‘एक, दोन, तीन’ असे कुणीतरी म्हणताक्षणी आम्ही समोरच्या खड्ड्यात रोप लावायचं होतं. कुठलं वगैरे काही माहीत नाही; कुणी सांगितलंही नाही. लाव म्हटलं तसं सैनिकी शिस्तीत लावलं आणि परत आलो. सायकल चालवायची मजा आली! टेकडी, झाडं यांच्याशी काही देणंघेणं नाही!

आता कुतूहल जागृत होत होतं. जाग दर्दे इश्क जाग! अचानक परिसर दिसू लागला, हळूहळू माझ्याशी बोलू लागला आणि वेगळ्या नात्याचा प्रारंभ झाला. आता हे प्रेम पंचविशीत आलंय! पण पंचविशीचा उथळ खळखळाट त्याच्यापाशी नाही. नदी संथ वाहते आहे.

ही प्रेमकहाणी सुरू झाली तेव्हापासून काय काय झालं? खडकापासून झाडाझुडपांपर्यंत आणि मुंगीपासून पक्ष्यांपर्यंत सगेसोयरे वाढत गेले. ओळख वाढली तशी टेकडीवरच्या गणेरीपासून ते अंगणात कुणी न लावता उगवणाऱ्या आंबुशीकडे लक्ष जायला लागलं. कुठून आलीस बाई तू? कशी रुजलीस?… असे संवाद होऊ लागले. पसरणारी मुळं  आणि उधळणाऱ्या बियांचं अप्रूप पुरायला लागलं. कुठे एखादी ढोली लक्ष वेधायला लागली, कुठे एका झाडानं दुसऱ्या झाडाला मारलेल्या मगरमिठीचं रहस्य खुणावायला लागलं. किती गोष्टी. चालताना दिसतात; गाडीतून नाही. म्हणून चालण्याचं सत्र सुरू झालं. सोबतीला कुणी असलं तर ठीक, नसलं तर जास्त चांगलं! मला रस्त्यानं बरेचदा चालताना बघून एका मैत्रिणीनं काळजीनं विचारलं होतं, “सगळं ठीक आहे ना? आर्थिक आघाडीवर काही प्रश्न तर नाही? सतत चालताना दिसत्येस म्हणून विचारलं!”

प्रेम तुम्हाला उंची, खोली सगळं दाखवतं म्हणतात. मीही अनेक डोंगर-दऱ्या फिरले. नदीकाठानं चालले, किती एक ओढे ओलांडले, किनाऱ्यावरच्या खडकांवर चालले, माळाचे चटके सहन केले. अधाशीपणाच तो. सारा पुरा सजीव-निर्जीव आणि त्याच्या मधला निसर्ग पिऊन टाकण्याची असोशी! काही डोंगर-ओहोळांशी थोडी जास्त रेंगाळले. ऋतू न्याहाळले. आणि लक्षात येऊ लागलं, की हे जास्त आवडतं आहे. भूमीसोबत मन एकेका गवताच्या पात्यानं गुंततं. तसं गुंतलं की अनिवार होतं. नाहीतर नुसतं घास गपकन् गिळल्यासारखं होतं. निसर्गाच्या विराट दर्शनानं भारावून जाणं आणि केवळ त्या अनुभवासाठी पुन्हापुन्हा अशा जागांचा शोध घेत राहणं हे माझ्यासाठी प्रेम नाही होऊ शकलं. हळू गूज ऐकणं, सावकाश उलगडणं हे माझं. 

मला टेकडीवर घेऊन गेलेल्या त्या निसर्गवेत्त्यानं हे भान आणून दिलं, की ही भूमी आणि तू – तुमचं नातं आहे. ते ओळखलं, जोपासलं तर जिंदगी ‘बडी’ होती जाती है! आपलं स्वतःशी नातं असतं, आजूबाजूच्या माणसांसोबत असतं आणि त्या पलीकडच्या निसर्गासोबतही असतं. वृक्षवल्ली, वनचर, पक्षी खरेच आपले सोयरे असतात. या सोयरिकीची जाणीव नसेल तर आपली कहाणी अधुरी म्हणावी लागेल. एखादा माणूस स्वतःपलीकडे बघतच नाही, दुसऱ्याचा विचार करतच नाही, अशी तक्रार आपण ऐकलेली असते. एखादी व्यक्ती दुसऱ्यांचा विचार करण्यात एवढी विरघळून गेलेली असते, की आपलं असं काही भान तिच्यापाशी आहे की नाही असं वाटतं. या दोन्ही नात्यांना न्याय द्यावा लागतो हे आपण जाणतो. आणि या पलीकडचं नातं? ते जोडण्याची धडपड फार कमी जण करतात, करू शकतात. आणि याचं एक कारण असं असतं, की टेकडीवरून भूचित्र दाखवणारा कुणी एक त्यांना भेटलेला नसतो! खाली वाकून बसून एखादं चिमुकलं फूल बघायला शिकवणारा भेटलेला नसतो.

‘पाळीव’ प्रेमाबद्दल मी बोलत नाही. अकृष्ट निसर्गासोबत असलेल्या नात्याबद्दल बोलते आहे. त्यातही केवळ पक्षी बघायला आवडणं, वाघ बघायला आवडणं (!) याबद्दलही नाही. ‘हे सर्व कोठून येतं’ याबद्दलचं भान जागवण्याबद्दल आहे. आपण कोण, कुठून आलो, कुठे चाललो, हे प्रश्न विचारताना ज्या निसर्गाप्रत आपण जातो त्याबद्दल आहे. 

ही भावना म्हणजे प्रेम की जिज्ञासा? फरक सोपा नाही. जिज्ञासेतून जागृत झालेलं प्रेम किंवा प्रेमातून वाटत राहणारी जिज्ञासा दोन्ही आहे. खूप वर्षांनी पुन्हा एकदा कोकणातल्या गावी गेले तेव्हा परसबागेच्या मागचं जंगल बघतच राहिले. भव्य सागवानाचे, ऐनाचे वृक्ष. रस्त्यातल्या नागकेशराचं फूल हातात घेऊन पाहिलं. आता सुकलेला पण एकेकाळी वाहता असल्याची साक्ष देणारा पाट पाहिला आणि बराच वेळ तिथे दगडीवर बसून राहिले. खुणेची अंगठी मिळाल्याप्रमाणे मला माझ्या परिसराची ओळख पटली होती. मी केवढी धनदौलतीत वाढले असं वाटत राहिलं. लहान वयात या सगळ्याबद्दल माझ्याशी कोणी बोललं असतं तर? पण दगडधोंड्यांची आणि फुलापानांची आपली भाषा असते. त्यांनी मला जे सांगायचं ते सांगितलं होतं. मला फक्त स्मरण करायचं होतं. 

माझ्या दोन्ही आजोळी घरादारावर निगुतीनं फिरणारे हात मला आठवतात. काही वाया जायचं नाही, काही दवडायचं नाही. नारळाच्या फोकाचा सुंदर खराटा बनवत बसलेले आजोबा आठवतात. स्वयंपाकघराच्या सांडपाण्यावर फुललेली कर्दळ बघत ताक करणारी आजी आठवते. मी भुईवर पडलेल्या चाफ्याच्या फुलाची अंगठी करून घालते आणि बराच वेळ तशीच बसून राहते. 

हे सगळं एक आहे. भूमीवर प्रेम करणारी माणसं स्वतःसोबत आणि इतरांसोबतही अलवार होत जातात. या नात्याचा स्पर्श आता दूर जात चालला आहे. ‘आभासी’ होतो आहे. यातून पुढे काय होणार कोण सांगणार? पावलं अजूनही टेकडीच्या ओढीनं निघतात. कधी बाजूला विशी-बाविशीची मुलंही असतात. आमचा संवाद चालू राहतो… ती दूरवरची पर्वतरांग दिसते ना… नदी तिथून येते! 

मृणालिनी वनारसे 

ioraespune@gmail.com

विज्ञान आणि तत्त्वज्ञान-आधारित जीवनशैलीच्या संशोधिका. लेखक आणि शैक्षणिक फॅसिलिटेटर. www.mvanarase.com