१९९०च्या दशकात मी मुंबईच्या एका मागास उपनगरात राहत होतो. तिथे मोठी मोठी गुलमोहोराची झाडं होती. त्यांच्या सावलीत आम्ही चिखलाचे गोळे करून फेकण्याचा खेळ खेळायचो. त्या काळात मला आईवडील, आज्जी, मित्रांकडून खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या. तिथे एक लहानसं वाचनालयही होतं. तिथल्या पुस्तकांमधून गोष्टी वाचायला मिळाल्या. शिवाय रेडिओ आणि टीव्ही होतेच गोष्टी सांगायला. प्रत्येक गोष्टीचा माझ्यावर जो खास प्रभाव पडत असे, त्यातून ‘आजचा मी’ घडलोय. माझी आई तिच्या लहानपणच्या, तारुण्यातल्या बंडखोरीच्या गोष्टी सांगायची. रेखा-अमिताभ जोडीचा प्रत्येक सिनेमा पहिल्याच दिवशी पहिल्याच ‘शो’ला बघायचा म्हणजे बघायचाच असं तिचं ठरलेलं असे. मैत्रिणींबरोबर केलेल्या धाडसी सहलींची वर्णनंही ती ऐकवायची. माझे वडील गोष्ट सांगत ती त्यांच्या उडुपीजवळच्या लहान गावातून ते १६ वर्षांचे असताना कसे मुंबईपर्यंत नोकरीच्या शोधात आले त्याबद्दल. आज्जी मला माझ्या बाळपणाच्या गोष्टी सांगत असे. ‘एकाच वेळी स्थिर-शांत आणि चळवळ्या!’ अशी तिची पुस्ती असायची.
पुस्तकांतल्या गोष्टींनी हसू यायचं. त्यात वर्णन केलेल्या ठिकाणांचा प्रवास आपण कसा करू याची कल्पनाचित्रं डोळ्यांपुढे उभी राहायची. टीव्हीवरच्या गोष्टींमध्ये उडते गालिचे, जादुई शक्ती असलेली माणसं आणि दूर दूर कुठेतरी लपलेली जंगलं असायची. पण टीव्हीवरच्या सर्वात भारी गोष्टींमध्ये एक होती डॉक्टरांबद्दल. दुःख, दैन्य सहन करणाऱ्या मरणासन्न अशा माणसांना डॉक्टर कशी मदत करतात त्याबद्दलची. भविष्यातल्या माझ्या उपचारक (थेरपिस्ट) या पेशाची बीजं या कार्यक्रमानं पेरली असणार. ती गोष्ट इतक्या प्रभावी पद्धतीनं सांगितलेली होती, की मी डॉक्टर व्हायचं ठरवूनच टाकलं. मी माझ्या आईसारखी बंडखोरी करत वाढलो, वडिलांसारखा समाधानी वृत्तीचा आणि आज्जी म्हणायची तसा शांत-उचापत्या. विचारीही झालो. जादू आणि धाडस आवडणारा, सगळ्यांची काळजी घेणारा आणि शिवाय रेखा-अमिताभ यांचा चाहता. त्या कथांनी मला घडवलं आणि ते घडवणं अजून चालूच आहे. आपल्याला सांगितल्या जाणाऱ्या आणि आपण सांगत असतो त्या कथा आपली स्वतःबद्दलची आणि भोवतालच्या समाजाबद्दलची समज सतत वाढवत असतात, आपल्याला घडवत असतात. लहान मुलांच्या मनावर तर कथांचा खोल परिणाम होतो. मुलांमध्ये भलेपणा, विचारीपणा रुजवायला कथा नेहमीच मदत करतील. संशोधनाचा निष्कर्षही तसाच आहे.
वाढवयातल्या मुलांचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या हार्वर्डच्या केंद्रानं काही मुलं इतरांपेक्षा जास्त समंजस आणि भल्या वृत्तीची का असतात याचा अभ्यास केला. त्यात त्यांना ताणतणावाचा विषारी परिणाम मुरू न देणारे खालील घटक आढळले –
- मोठ्या माणसांचा आश्वासक सहवास मिळणं
- त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावर त्यांचा ताबा राहील अशी कृतिशील वृत्ती जन्मतः लाभणं
- समस्या हाताळण्याचं कसब
- आशा आणि विश्वास टिकून राहील अशी माणसं आयुष्यात येणं
मुलांबरोबर काम करताना माझाही अनुभव असाच आहे. ज्या मुलांवर विश्वास ठेवणारं एक तरी मोठं माणूस असेल, कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याचं हुनर त्यांना शिकायला मिळालं असेल, आधारासाठी साद घातल्यावर त्यांना कोणीतरी सकारात्मक प्रतिसाद दिला असेल आणि सिनेमा, गाणी, पुस्तकं, खेळ यातून ज्यांची आशा जागती राहिली असेल, अशी मुलं संकटाला जास्त चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकली आणि त्यांचं मनःस्वास्थ्यही टिकून राहिलं.
अशी सकारात्मक वृत्ती मुलांमध्ये रुजवण्यासाठी चित्रपुस्तकं खूप उपयुक्त ठरतात. कथांमध्ये वर्णन केलेल्या प्रदेशातून ही चित्रपुस्तकं सैर घडवून आणतात. त्यातून भलेपणाची रुजवण होते आणि समस्यांना सामोरं जाण्याचे अनेक नवे मार्ग पुढे येतात. नीट नियोजन करून आणि युक्त्या लढवून संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग मुलांना सुचत जातात. एकाकी वाटत असताना पुस्तकांमधल्या व्यक्तिरेखा मित्र बनून त्यांच्या चित्तवृत्ती फुलवतात. त्यातून मुलांचं असं एक सुरक्षित जग निर्माण होतं. तिथे मुलांना स्वतःबद्दलच्या अनेक गोष्टी हळुवारपणे, त्यांच्या त्यांच्या कलानं समजतात. ही चित्रपुस्तकं मुलांना साहसाच्या सफरीवर घेऊन जातात आणि कुतूहल जागं करून त्यांची जगाबद्दलची समज वाढवतात. ह्या पुस्तकांची ताकद आपण अजून ओळखलेली नाही. मुलांभोवती आनंदकोश विणणारी अशी पुस्तकं कशी ओळखायची, ते आपण बघू या.
शारीरिक त्रास आणि भावभावना व्यक्त करणारी भाषा
आपल्या दररोजच्या वापरातल्या भाषेत आपल्या भावना आणि आपलं शरीर काय सांगतंय याला फारसं स्थान नसतं. आपल्याला काय वाटतंय आणि आपल्या शरीरात काय घडतंय याबद्दल मुलं जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त होतात. या भावना योग्य रीतीनं व्यक्त करणारा शब्दसंभार अधिकाधिक विस्तारत जाईल अशी काही वानगीदाखल पुस्तकं पाहू या –
- ‘हाऊ आय फील’ – वर्षा शेषन आणि गीतांजली अय्यर
- ‘युवर बॉडी इज युवर्स’ (आपका शरीर, आपका अधिकार) – यामिनी विजयन आणि ऐन्द्री सी.
हे पुस्तक भीती, उत्सुकता, दुःख, बेचैनी या भावना मुलांच्या भाषेत मांडतं.
मुलांची भाषा विकसित व्हायला त्यात आपला थोडा सहभाग उपयुक्त ठरतो. त्यामुळे त्यांना व्यथित करणाऱ्या गोष्टी नेमकेपणानं मांडता येतात. हे तिसरं पुस्तक त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे.
- ‘हू स्टोल भैय्याज स्माईल?’ (भय्याचं हसू कुणामुळं पळालं?) – संजना कपूर आणि सुनयना कोएल्लो.
मोठी माणसं आणि मुलं यांच्यातलं नातं
मुलं आसपासच्या मोठ्या माणसांना पाहत पाहतच सर्व गोष्टी शिकतात. मोठ्यांनी त्यांना प्रेम आणि आश्वासक वातावरण दिलं, तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. ती कुठल्या त्रासात असतील तेव्हा ‘सगळं सुरळीत होणार आहे, आपण सगळे मिळून तो त्रास निपटून टाकू’ अशी त्यांना खात्री मिळाली पाहिजे.
- ‘नानीज वॉक इन द पार्क’ (आजीबरोबर बागेत) – दीपा बलसावर
- ‘गुठली हॅज विंग्ज’ (गुठली तो परी है) – कनक शशी
- ‘नाबिया’ – चतुरा राव आणि रुची म्हसाणे
- ‘पिशी अँड मी’ (आत्या आणि मी) – तिमिर गुप्ता आणि राजीव आय्पे
- ‘गिगी अँड डॅडी’ – रिचा झा आणि मिथिला अनंत
ही सर्व पुस्तकं प्रेमळ वडीलधारं माणूस आणि मूल ह्यांच्यातलं समृद्ध नातं उलगडून दाखवतात आणि ती मिळून प्रश्नातून मार्ग कसा काढतात याची गोष्ट सांगतात.
जिज्ञासू कल्पनाशक्ती
एखाद्या नव्या, अनोळखी गोष्टीची कल्पना करणं, नव्या गोष्टीबद्दल कुतूहल असणं ह्या गोष्टी हताशा वाटत असताना कामी येतात. त्यामुळे मुलांना त्यांना हव्याशा वाटणाऱ्या भविष्यकाळाची चित्रं रंगवता येतात. मुलांनी काय करावं ते त्यांना थेट सांगणाऱ्या पुस्तकांपेक्षा त्यांचं औत्सुक्य आणि कल्पनाशक्ती जागी करणारी पुस्तकं त्यांना मिळायला हवीत. म्हणजे ती त्यांच्या किंवा इतरांच्या बाबतीत काही चुकीचं घडत असेल तर प्रश्न विचारायचं धाडस करतील, संकटापासून स्वतःचा बचाव करू शकतील, चिंतेच्या राक्षसाला दूर पळवतील आणि आपलं स्वास्थ्य टिकवून धरतील. इथे रिचा झा आणि एवा सांचेझ गोमेझ यांचं ‘द मिडल’ (मध्य) हे पुस्तक, ‘व्हॉट विल हॅपन’ (तर मग काय होईल?) हे वर्षा शेषन, विवेकानंद घटक यांचं पुस्तक, ‘भीमराव आंबेडकर: द बॉय हू आस्क्ड व्हाय’ (का असं विचारणारा मुलगा) हे सौम्या राजेन्द्रन आणि सात्विक गाडे यांचं भीमराव आंबेडकरांवरचं पुस्तक, ‘व्हेन आय ग्रो अप आय विल हॅव अ हाऊस’ (मोठा होईन तेव्हा, माझं एक घर असेल!) हे जेरी पिंटो आणि शीला देवैय्या यांचं पुस्तक… अशी बरीच पुस्तकं सांगता येतील. यातली मुलं कठीण परिस्थितीत धीरानं आणि स्थिरपणे पुढे जात स्वतःच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणतात.
विविधता
मुलांना प्रेम मिळालं, की ती विचारी-स्थिर होतात आणि त्यांच्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या माणसांनाही स्वीकारतात. माणसांचं वेगळेपण स्वीकारण्यातून ती स्वतःचा, आपण जसे आहोत तसे, आस्थेनं स्वीकार करायला शिकतात.
- ‘द वेटलिफटींग प्रिन्सेस’ (पहलमान राजकुमारी) – सौम्या राजेन्द्रन आणि देबस्मिता दासगुप्ता
- ‘कॅच दॅट कॅट’ (पकडा त्या मांजराला) – तारिणी विश्वनाथ आणि नॅन्सी राज
- ‘मालाज सिल्व्हर अँकलेट’ (मालाचे चांदीचे पैंजण) – अॅनी बेझंट आणि नॅन्सी राज
- ‘रेनबो बॉईज / रेनबो गर्ल्स’ (बहुरंगी मुलं / बहुरंगी मुली) – कमला भसीन आणि प्रिया कुरीअन
- ‘दॅट नाईट’ (त्या रात्री) – बीजल वाखार्जनी, सृजना श्रीधर
- ‘माछेर झोल’ – रिचा झा आणि सुमंत डे
- ‘दिसैबोन हूल – रुबी हेम्ब्रोम आणि साहेबराम तुडू
ही पुस्तकं पंगुत्व, जात आणि जातीभेद, आदिवासी संस्कृती, लैंगिकता, लिंगभाव, धर्म अशा अनेक विषयांची मुलांना नीट ओळख होईल आणि मुलं या गोष्टी चांगल्या प्रकारे स्वीकारतील अशी लिहिलेली आहेत.
आशेचा किरण
मोठ्यांना काय किंवा मुलांना काय, ‘लवकरच परिस्थिती सुधारणार आहे’ असं आश्वासन मिळणं महत्त्वाचं असतं. कसंही करून आपण उभं राहायचं आहे, वाटेवर कितीही खाचखळगे असले, तरी चालत राहायचं आहे, आव्हानं झेलायची आहेत, असा सांगावा देणारी ही पुस्तकं बघा –
- ‘रझिया लर्न्स टु स्विम’ (आणि रझिया पोहायला शिकली…) – दिव्या पाणीकर आणि लावण्या नायडू
- ‘स्टेज फ्राइट’ (स्टेजची भीती) – यामिनी विजयन आणि सोमेश कुमार
- ‘द व्हाय गर्ल’ (का का कुमारी) – महाश्वेतादेवी आणि कनिका किणी
ह्या तीनही पुस्तकातील पात्र आव्हानांचा मुकाबला करत आपली स्वप्नं साकार करतात.
पुस्तकांनी कित्येक आयुष्य सावरली आहेत, लढाया रोखल्या आहेत, दूरवर प्रेमाची पखरण केली आहे. माझ्या मते, पुस्तकं म्हणजे जणू वाट दाखवणारे नकाशे आहेत; काही वाटा दडलेल्या, काही कठीण तर काही धाडस मागणाऱ्या. मात्र सगळी पुस्तकं विचारी, स्वीकारशील मुलं घडवणारी आहेत.
सरतेशेवटी, तुम्हाला अशी अद्भुत पुस्तकं सापडोत आणि ती मुलांबरोबर वाचताना तुम्हाला सुभग आनंद मिळो अशी इच्छा व्यक्त करतो.

रविराज शेट्टी |
अनुवाद: अंजनी खेर
