कोविड १९ च्या साथीमुळे आपली सर्वांनी मिळून जगण्याची आणि सहकार्याने काम करण्याची पद्धत कशी बदलली, हे आपण सगळे बघतोच आहोत. टाळेबंदीच्या काळात थोड्याफार प्रमाणात आपण सर्वचजण आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक निवडीचा, भविष्यकाळाच्या नियोजनाचा नव्याने विचार करू लागलो आहोत. सगळ्या प्रकारच्या कामांत आणि कुठल्याही क्षेत्रातील व्यावसायिक, अगदी डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोक, कामगार, शिक्षक, हॉटेल व्यावसायिक, हवाई कर्मचारी, प्रत्येकासमोर आव्हाने आहेत. कलाकारही त्यातून सुटलेले नाहीत.
कलाकार म्हटले म्हणजे ना कायमस्वरूपी सुरक्षित नोकरी, ना किमान वेतन. आरोग्य विमा, सेवानिवृत्तीवेतन यासारख्या काहीही सोयीसुविधा त्यांना नसतात. भारतीय शास्त्रीय कलांना आपल्या समाजात नेहमीच मर्यादित जनाधार लाभलेला आहे. मैफल दर्जेदार आणि उत्तरोत्तर रंगत गेली, तर दर्दी रसिकांचा प्रतिसादही उत्स्फूर्त असतो. रसिक श्रोत्यांची मनापासून मिळालेली दादच कलाकाराचे, त्याच्या कलेचे भरणपोषण करत असते.
गाण्याची मैफल असो, नृत्य असो किंवा अगदी एकट्याचे सादरीकरण असले, तरीही सादरीकरणात इतर कलाकारांची साथ असतेच. बाकी ध्वनियोजना करणारे अभियंते वगैरे तर मदतीला असतातच. चांगल्या दर्जाची ध्वनिप्रणाली हाही कळीचा मुद्दा ठरतो. आणि नृत्य म्हटले म्हणजे तर वेशभूषा, प्रकाशयोजना, व्यासपीठ, ध्वनिक्षेपक अशा एक ना अनेक गोष्टींची भर पडते.
कलाकार, विशेषतः उदयोन्मुख कलाकार हे प्रस्थापितांच्या आणि मायबाप प्रेक्षकांच्या आश्रयावरच जगत असतात. गुरूंचे मार्गदर्शनदेखील त्यांच्यासाठी लाखमोलाचे असते. गुरूंच्या सान्निध्यात राहणे, त्यांचे निरीक्षण करून शिकणे हे गुरुकुल पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. हा पारंपरिक वारसा अजूनही टिकून आहे आणि आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपवला जातो आहे.
आपल्या कलेतून आर्थिक मोबदला मिळू लागण्यापूर्वीची कित्येक वर्षे शास्त्रीय गायक आणि नर्तक कठोर रियाज करत असतात. आणि तरीही नवोदित कलाकाराला मिळणारा मोबदला अगदीच अल्प असतो. इतर क्षेत्रांत काम करणारी त्याची समवयीन मित्रमंडळी तोवर कुठच्या कुठे पोचलेली असतात. अतिशय दर्जेदार कलाकारालादेखील चांगला अर्थलाभ होण्यासाठी अनेक वर्षे झगडावे लागते. वर आणि वाद्यांची देखभाल ही बाबदेखील खर्चिक असते, त्यासाठी विशिष्ट कारागीरच लागतात.
कोविडमुळे कलाकारांचे प्रशिक्षण, एकत्र सराव, सादरीकरण अश्या सर्वच बाबी पणाला लागल्या आहेत. कला हेच ज्यांचे कुटुंबाच्या भरणपोषणाचे माध्यम होते, अशांचे अतोनात हाल झाले. जितकी जास्त वर्षे कलाकार रियाज करतो, तितकी त्याची इतर उपजीविकेची साधने आजमावण्याची शक्यता कमी होत जाते. इतर क्षेत्रातल्या संधी कमी होतात. मुळात इतर कौशल्यांचा अभाव असण्याची शक्यताच वाढत जाते. टाळेबंदीच्या काळात इतर अनेक क्षेत्रातल्या लोकांना योग्य ती काळजी घेऊन काम चालू ठेवण्याची परवानगी मिळाली. आरोग्यक्षेत्रातल्या लोकांना तर स्वतःचा जीव धोक्यात घालून कामासाठी बाहेर पडावेच लागले. काहींना घरून काम करण्याचीही मुभा मिळाली. कलाकारांच्या दुर्दैवाने यातले काहीही त्यांच्याबाबतीत होऊ शकले नाही. या काळात थिएटर पूर्णपणे बंद आणि अंगावर येणारा रिकामा वेळ. या काळाने कलाकारांना आपल्या कलेबद्दल, ती मुख्यजीविका म्हणून ठेवावी की नाही याबाबत विचार करायला भाग पाडले.
नवीन पिढीतील कलाकारांनी समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याचा मार्ग शोधला. काहींनी ध्वनिचित्रमुद्रण करून काही ना काही कार्यक्रम, मालिका सादर केल्या. श्रोत्यांना उत्तम दर्जाचे ध्वनिचित्रमुद्रण ऐकण्या-बघण्याची सवय झालेली. त्यामुळे त्याच दर्जाची त्यांना अपेक्षा होती; मात्र अचानक उद्भवलेल्या अशा परिस्थितीत, नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना मुरलेल्या कलाकारांनीदेखील अगदी प्राथमिक दर्जाचा फोन वापरून चित्रिकरण केले. नेटिझन्सना घरी बसून केलेल्या मनोरंजनासाठी पैसे मोजण्याची सवय नव्हती, शिवाय चांगले प्रथितयश कलाकारदेखील विना मोबदला काम करत होते. मनापासून कलासाधना करणारे कलाकार आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनापासून वंचित राहिले. सहकलाकारांच्या भेटीगाठी बंद झाल्या. नाही म्हणायला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काही वर्ग झाले; पण त्यात प्रत्यक्ष वर्गात अनुभवास येणारी ‘ती’ मजा, असोशी नव्हती. इतर सर्वच क्षेत्रांप्रमाणे कलाक्षेत्रानेही अनेक चमकते, उदयोन्मुख कलाकार ह्या साथीत गमावले.
या कोविडसाथीने मानवी इतिहासात आपल्या खुणा मागे ठेवल्या आहेत. आपण काय गमावले नाही? जिवाभावाची माणसे, नाती, संधी, भविष्यकाळाच्या योजना… सर्व काही. कधीतरी हे सगळे पूर्ववत होईल अशी आपण आशा केली असेल, तर ‘साथीच्या साथीने’ हे नवे जगणेदेखील आपण शिकत आहोत. प्रत्यक्ष मैफलींचा आनंद इतर कशानेही मिळणार नाहीये, कलाकारांनादेखील नाही आणि प्रेक्षकांनाही नाही! तसा तो आपल्याला पुन्हा अनुभवायला मिळो! रसिक प्रेक्षकांनी सभागृहे पुन्हा ओसंडून वाहोत. मात्र ह्या साथीच्या काळाने आभासी माध्यमाचे दालन आपल्यापुढे खुले केले आहे. तिचाही पूर्ण क्षमतेने वापर करून घ्यायला हवा. हळूहळू का होईना, पण तिकीट लावून ऑनलाईन सादरीकरणे होत आहेत. निरनिराळ्या स्पर्धा, पुरस्कार-वितरण समारंभही ऑनलाईन होत आहेत. कलाकारमंडळीही नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने जास्त प्रभावीपणे ध्वनिचित्रमुद्रण, सादरीकरण करू लागली आहेत. शिवाय एकमेकांना सहकार्य करू लागली आहेत. या सर्व बाबींमुळे कधी नव्हे तो भौगोलिक आणि अवकाशीय मर्यादा गळून पडल्या आहेत. हे संधीचे दालन सगळ्यांना उपलब्ध नाही हे मान्य! आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर असलेले आणि कानाकोपऱ्यातील कलाकार अजून तिथवर पोचू शकलेले नाहीत; पण साथीला प्रतिसाद देताना आपणही तंत्रस्नेही होत आहोत हे निश्चित. तेव्हा लवकरच हा पूल सांधला जाईल अशी आशा करू या!
आता ही साथ आटोक्यात आली आहे, तिच्यासह जगायला आपण शिकलो आहोत, शिवाय तिच्याबद्दलची भीतीही आता कमी झाली आहे. यातूनसुद्धा नवीन कला उदयाला येईलही कदाचित. सक्तीच्या टाळेबंदीतील हा काळ कलाकार नक्कीच स्वत:ला जोखण्यासाठी, आत्मपरीक्षणासाठी, नवनिर्मितीसाठी वापरतील. सादरीकरणाच्या वेळी कलाकाराने कलेमध्ये संपूर्णपणे झोकून देणे आणि त्याचवेळी जे चालले आहे, त्यापासून अलिप्त राहणे आवश्यक असते. एक कलाकार म्हणून कलेत आणि जीवनातही समतोल राखणे गरजेचे असते, ते साध्य होईल हीच अपेक्षा!
अंकिता आठवले | ankita.athawale@gmail.com
लेखिका गेली ६ वर्षे शास्त्रीय धृपद संगीताचा अभ्यास करत आहेत. त्याचबरोबर त्या नाट्यसंहिता, लघुकथा तसेच वैचारिक लेखन करतात.
अनुवाद: नीलिमा कुलकर्णी

