मधुरा विश्वनाथ
राजा मिडासची सोन्याच्या शापापासून मुक्तता झाल्यानंतर त्याची कथा लोककथांमध्ये विलीन झाली. नंतर तो जगाच्या काठावर असलेल्या,झाडांच्या वेटोळ्यांत लपलेल्या एका छोट्या राज्यात शांतपणे राहू लागला. त्याला आता संपत्तीची लालसा उरलेली नव्हती; खरं तर संपत्तीची भीतीच वाटत होती.
त्याच्या राज्याबाहेरचं जग मात्र झपाट्यानं बदललं होतं.
युद्धाचे आवाज आता केवळ तलवारी आणि ढालींपुरते मर्यादित राहिलेले नव्हते. गर्जणाऱ्या यंत्रांमध्ये, आकाशातून जमिनीकडे झेपावणाऱ्या आगीमध्ये आणि उद्ध्वस्त होणाऱ्या शहरांमध्ये आता ते गुंजत होते. स्वतःच्या चुकांमधून मिडास राजा खूप काही शिकला होता. म्हणूनच संकट पुन्हा घोंघावतं आहे हे त्याला दिसत होतं.
एका संध्याकाळी, सूर्य मावळत असताना, एक लहान मुलगा महालाच्या अंगणात धावत आला.
“आजोबा!” तो ओरडला. त्याच्या हातात चमकणारं एक छोटं यंत्र होतं.
“पाहा! जग पुन्हा जळतंय.” तो म्हणाला.
मिडास वळला. समोर त्याचा नातू ऑरेलियन उभा होता. नव्या काळात वाढलेला, जिज्ञासू आणि तल्लख ऑरेलियन. त्यानं त्या यंत्रावर मिडासला जगातली दृश्यं दाखवली. उद्ध्वस्त प्रदेश, पळणारी माणसं, झेंडे घेऊन चालणाऱ्या सेना…
“हे युद्ध…” ऑरेलियननं विचारलं, “… हे कधीच थांबत नाही का?”
मिडासनं सुस्कारा टाकत म्हटलं. “आपल्याकडे असलेली शक्ती आपण तिच्या संभाव्य परिणामांशिवाय धारण करू शकतो असं माणसं अजूनही मानतात… मीही कधीतरी हेच केलं होतं.”
ऑरेलियन मात्र घडत असलेल्या गोष्टींकडे फक्त पाहत बसणार नव्हता.
“आपण मदत करू शकतो,” तो म्हणाला. “शस्त्रांनी नाही – शहाणपणानं.”
मिडास साशंक होता, पण त्याला हेही कळत होतं, की गप्प बसणंही धोकादायक असतं.
मग ती दोघं जगात निघाली. मदत करणारे प्रवासी म्हणून.
युद्धग्रस्त शहरात आल्यावर एक अजब गोष्ट घडली.
मिडासनं एका धातूच्या तुकड्याला स्पर्श केला. तो तुकडा म्हणजे पूर्वी असलेल्या शस्त्राचा तुटलेला भाग होता. मिडासनं स्पर्श करताच तो तुकडा चमकू लागला. मात्र पूर्वीसारखं त्याचं सोनं झालं नाही. त्याचं रूपांतर उपयुक्त साधनांमध्ये झालं. मिडासच्या स्पर्शानं अनेक गोष्टी घडल्या. शस्त्रांचे तुकडे शेतीच्या अवजारांमध्ये बदलले. उद्ध्वस्त इमारती लोकांना आधार देणार्या निवाऱ्यांमध्ये बदलल्या. थंड, गोठवणाऱ्या झोपड्या उबदार घरांमध्ये बदलल्या.

ऑरेलियन आश्चर्यचकित झाला. “आता हात लावला की सोनं नाही होत!”
मिडास हलकेच म्हणाला, “नाही… आता जे गरजेचं असतं ते बनतंय.”
ते लोकांना शांतपणे मदत करत राहिले. पण त्यामुळे सगळेच काही आनंदात नव्हते.
युद्ध करणाऱ्यांना भीती वाटू लागली.
“हा म्हातारा सगळं बदलतोय.” ते म्हणाले.
एका रात्री सैनिकांनी त्यांना वेढलं.
“तुम्ही हस्तक्षेप करता आहात,” एक कमांडर म्हणाला. “युद्ध आवश्यक आहे.”
ऑरेलियन पुढे सरसावत म्हणाला, “जर ते आवश्यक असेल… तर त्याचा इतका त्रास कसा होईल? का होईल? त्यांना एवढं का सहन करावं लागतं आहे?”
कमांडर गप्प राहिला.
मिडास त्याला म्हणाला, “मित्रा, मीही एकेकाळी संपत्तीला शक्ती समजलो होतो. पण जबाबदारीशिवाय वापरलेली शक्ती आपल्याला प्रिय असलेलं सर्व काही नष्ट करते; हे युद्ध खरंच काही घडवतंय का? की फक्त तोडतंय-मोडतंय?”
त्या रात्री ऑरेलियनला एक झकास कल्पना सुचली.
“आजोबा, तुमच्यामध्ये असलेली शक्ती गोष्टी बदलते. तिचा वापर करून आपण काहीतरी मोठं बदलू शकतो का?”
“काय?” मिडासनं विचारलं.
“माणसांचं विचार करणं. तेच आमूलाग्र बदललं तर!”
“ते मला कसं जमणार?” मिडास निराश स्वरात म्हणाला.
” जमेल, तुम्हाला आणि मलाही!”
मग ऑरेलियननं लोकांपर्यंत निरनिराळ्या कथा, विचार आणि आशा पोचवायला सुरुवात केली. शत्रूंनी एकत्र येऊन घरं बांधल्याच्या कथा, सैनिकांनी निरर्थक युद्धं नाकारल्याच्या घटना, दोन्ही बाजूच्या मुलांनी परस्परांत मैत्री केल्याचे प्रसंग…
मिडासच्या लक्षात आलं, तो वस्तू बदलू शकत होता.
तर ऑरेलियन मनं बदलू शकत होता.
आणि हळूहळू… युद्धाची ताकद कमी होऊ लागली.
एका शांत रात्री ऑरेलियननं मिडासआजोबांना विचारलं, “आजोबा… सोन्याचा शाप कधीच नको होता मिळायला, असं तुम्हाला वाटतं का?”
मिडास हसला. “नाही. त्या शापानं मला सत्य शिकवलं.”
“कसलं सत्य?”
“स्पर्श करून मी बनवू शकायचो ते सोनं म्हणजे खरं धन नाही,” दूरवर पुन्हा उभ्या राहत असलेल्या गावांकडे पाहत तो म्हणाला, “खरं धन आहे आशा, ती तर तू जगात निर्माण करू शकतोस.”
मिडासची कथा सोन्यावर संपली नाही…
एका लहान मुलाच्या मार्गदर्शनामुळे त्यातून आशा निर्माण व्हायला लागली.
त्याला माहीत होतं, की खरी शक्ती हातात नसते…
ती असते मनं बदलण्यात!
तो आता तुटलेलं जग सांधू बघत होता.
मधुरा विश्वनाथ

madhura.joshi18@gmail.com
