या वर्षी सुट्टीत खेळघरात इयत्तेच्या मानाने भाषेत मागे असणाऱ्या मुलांसोबत सलग पंधरा दिवस काम करण्याचे ठरवले.

मुलांची शाळा १५ जूनला सुरू होणार आहे, म्हणून १ ते १२ जूनपर्यंत सकाळी १० ते १२ असे दोन तास वर्कशॉप घेण्याचे ठरवले. त्याची तयारी म्हणून २८ मे ला काही व्हॉलेंटिअर आणि खेळघरातील सर्व तायांची एक मिटींग घेतली.

या मुलांसाठी भाषेचे बरेच साहित्य तयार केले आहे. हे साहित्य व्हॉलेंटिअरना दाखवणे, ते कसे वापरायचे सांगणे हा त्यामागचा हेतू होता.

प्रत्यक्ष हे वर्ग एक तारखेपासून सुरू झाले. १ ली ते ८ वी पर्यंतची २५ ते २८ मुले होती. सात व्हॉलेंटिअर आणि सात आठ ताया असल्यामुळे प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देता आले. बरीच मुले खूपच रेग्युलर येत होती. जवळपास १ ते १.३० तास सलग वेळ मिळाला. वैयक्तिक लक्ष मिळत असल्याने मुलांनी स्वतःलाही बरेच ताणले. अनेक मुलांना मुळाक्षरेही ओळखता येत नव्हती. पण या १२ दिवसांत त्यांच्यात फरक जाणवतो आहे. आता त्यांना सोपे शब्द आणि सोपी वाक्ये येऊ लागली आहेत. त्यांना गोडी लागली आहे, हे सर्व व्हॉलेंटिअरना जाणवले आहे. काही मुलांनी ही गोष्ट बोलूनही दाखवली.

मुलांचे कौतुक करण्यासाठी १२ तारखेला मुलांना सर्टिफिकेट देऊन छोटासा समारंभ केला. यावेळी असे लक्षात आले की थोड्याशा कौतुकानेही मुले वर्गात यायला शिकायला उत्सुक आहेत.

याच पद्धतीचे काम पुढेही करण्याची इच्छा आहे. काही व्हॉलेंटिअरनी त्यासाठी सकारात्मकता प्रतिसाद दिला आहे.

अपर्णा क्षीरसागर