पुस्तक परिचय

‘शाळेत तुमचा सर्वात नावडता, भीतीदायक वाटणारा विषय कोणता होता?’ ह्या प्रश्नाला दहातले नऊ जण तरी ‘गणित’ असेच उत्तर देतील. मात्र तुम्ही त्यांना विचारले, ‘तुमच्या मुलाच्या शिक्षणात सर्वात महत्त्वाचा विषय कोणता?’  तर त्याचे उत्तरही ते ‘गणित’ असेच देतील. 

गणिताची हीच गंमत आहे. सर्वजण हे मान्य करतात, की गणित महत्त्वाचे आहे, आपल्या मुलांना ते चांगले आले पाहिजे. परंतु पिढी बदलली तरी परिस्थितीत बदल झालेला दिसत नाही – पालकांनाही गणिताची भीती वाटत होती आणि आजही बहुतेक मुले शालेय गणिताशी झगडत असल्याचेच पाहायला मिळते. अशा वेळेस बऱ्याचशा पालकांना आपल्या मुलाला मदत करण्याची इच्छा असते. इतर सर्व विषयांचे ठीक आहे, पण गाडी अडते ती गणितावरच. होम स्कूलिंग करणाऱ्या, किंबहुना आपल्या मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकालाच हा प्रश्न असतो, की गणित समजेल, भीती वाटणार नाही, गंमत येईल, आनंददायी वाटेल अशा प्रकारे कसे शिकवावे? शालेय पाठ्यपुस्तकांच्या मार्गाने (म्हणजे सूत्रे पाठ करा, उदाहरणे सोडवा) जाऊन चालणार नाही हे जवळजवळ प्रत्येकालाच स्वतःच्या अनुभवाने समजलेले असते. मग काय करता येईल? 

गणित सोपे करून शिकवायचे म्हणजे उदाहरणे सोडवण्याच्या ‘ट्रिक्स’ सांगायच्या असा एक समज असतो. परंतु आधीच गोंधळलेला मुलगा या ट्रिक्सने ‘हे करू की ते करू’ अशा संभ्रमात पडतो आणि आणखीनच गोंधळून जातो. मग शेवटी, ‘गणित आहेच अवघड, आपल्या रक्तातच नाही ते’ असे म्हणून निराशाजनक शैक्षणिक कामगिरी स्वीकारायची का? याशिवाय इतर काही उपाय नाही का?

गणित मुलांना अवघड जाते याचे कारण ‘तो विषय अवघड आहे’ असे नसून तो विषय शिकवण्याची पद्धत चुकीची आहे. त्यात बदल व्हायला हवा. शिक्षणक्षेत्रात आज हे बहुतेकांनी मान्य केले आहे. गणिती संकल्पना अमूर्त असतात, त्या कळायला अवघड जातात; म्हणून त्या मूर्त स्वरूपात आधी समजून घेऊन मग अमूर्त चिन्हांमध्ये मांडले तर मुलांना गणित समजू शकते हा अनुभव आहे. अशा पद्धतीने गणित शिकवण्यासाठी पालक-शिक्षक सर्वांनाच मदतीची गरज असते. 

ही गरज क्टिव्हिटी बेस्ड टीचिंग इन मॅथेमॅटिक्स : अ प्रायमर फॉर टीचर्स (Activity Based Teaching in Mathematics : A Primer for Teachers) या श्री. आमोद कारखानीस यांच्या पुस्तकाने भागवलेली आहे. सध्या या पुस्तकाचा पहिला भाग प्रकाशित झाला आहे. यामध्ये अगदी सुरुवातीपासून (संख्याज्ञान) ते साधारण चौथीपर्यंतचे गणित समाविष्ट केलेले आहे.

लेखक स्वतः आय.टी. क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, परंतु आय.टी. क्षेत्र सोडून गेली २०-२५ वर्षे ते शालेय शिक्षण चांगल्या पद्धतीने कसे शिकवता येईल यावर विविध संस्था व एनजीओ बरोबर काम करत आहेत. विविध खेळांच्या माध्यमातूनही ते गणित सोपे करून शिकवतात. हे पुस्तक त्यांच्या  अनुभवातून साकार झालेले आहे. कारखानीस यांनी समाजाच्या वेगवेगळ्या थरांबरोबर काम करत ही पद्धत विकसित केलेली आहे; मग ती ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जंगलातील खेड्यांमधली शाळा असो, की मुंबईची उच्चभ्रू लोकांची शाळा असो! सर्व ठिकाणी अशा पद्धतीने गणित शिकवून त्याचा फायदा होतो हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. 

मुलांमध्ये सुसंगत तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणात गणित हा विषय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तो शिकवताना मुलांना सूत्रे सांगणे, ती पाठ करणे हे त्यांना अजिबात मान्य नाही. प्रत्येक सूत्र, प्रत्येक पद्धत ती कशी व का आहे हे मुलाला समजले पाहिजे अशी ठाम भूमिका कारखानीस यांनी या पुस्तकात मांडली आहे. हे सारे शिकवणे अवघड व क्लिष्ट नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. अनेक कृती (activities), खेळ, गोष्टी, प्रात्यक्षिके यातून प्रत्येक संकल्पना कशी शिकवावी याचे सविस्तर वर्णन या पुस्तकात आहे. तसेच प्रत्येक कृती केल्यानंतर मुलांबरोबर कशा प्रकारे चर्चा करावी, त्यांना विचार करायला, समजून घ्यायला कशा प्रकारे प्रवृत्त करता येईल हेदेखील दिलेले आहे. त्यामुळे अध्यापकाला संपूर्ण मार्गदर्शन मिळते. 

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दिलेले खेळ, कृती किंवा वापरलेले टीचिंग लर्निंग मटेरियल्स (TLM) जरासुद्धा खर्चिक नाहीत व कोणासही सहज उपलब्ध होऊ शकतात. उदाहरणार्थ, संख्या लिहिण्याच्या स्थानीय मानाची पद्धत समजण्यासाठी ते आईस्क्रीमच्या काड्यांचा वापर करतात. एक अवघड संकल्पना एकदम सोपी होऊन जाते. अपूर्णांकासारख्या, मुलांना क्लिष्ट वाटणाऱ्या, संकल्पनाही मुलांच्या आवडत्या चित्रकलेसारख्या विषयातून मांडतात. मुलांना योग्य दिशा दिली, तर गणितासारख्या विषयातही ती किती कल्पक होऊ शकतात हे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. अशीच काही चित्रे आपल्याला पुस्तकाच्या मुखपृष्ठावरही दिसतात. 

गणित हे जीवनाशी जोडले गेले पाहिजे याचे प्रत्यंतर देणारी अनेक उदाहरणे या पुस्तकात सापडतील. आकडे शिकवताना ‘पळसाला पाने तीन’ म्हणून पळसाचा फोटो आहे, तसेच मुलांना आपल्या सभोवारचे गणित बघायला शिकवणारे ‘जर पौर्णिमेचा चंद्र पूर्ण चंद्र असेल तर अष्टमीच्या चंद्राला एक द्वितियांश म्हणायचे का?’ असे प्रश्नही आपल्यासमोर आणले आहेत. एकंदर या पुस्तकातील पद्धतीने गणित शिकणे आणि शिकवणे म्हणजे एक आनंददायी प्रवास आहे. 

तुम्ही या वयोगटातील मुलांचे पालक किंवा कोणत्याही प्रकारे गणित अध्यापनाशी संबंधित असलात, तर हे पुस्तक आपल्या संग्रही जरूर ठेवा. तुम्ही अगदी नियमित शिक्षक नसलात, तरीही एखादी संकल्पना कशी समजावून सांगावी हे जाणून घेण्यासाठी संदर्भ म्हणूनही हे पुस्तक तुम्ही वापरू शकता.  

शिल्पा कुलकर्णी 

ranu273@gmail.com 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रायगड येथे ग्रंथपाल. विविध नियतकालिकांत प्रामुख्याने पर्यावरण विषयावर लेखन.

क्टिव्हिटी बेस्ड टीचिंग इन मॅथेमॅटिक्स : अ प्रायमर फॉर टीचर्स (Activity Based Teaching in Mathematics : A Primer for Teachers Vol. I)  

लेखक : आमोद कारखानीस 

कोमल प्रकाशन

पुस्तक मिळवण्यासाठी 9820908241 ह्या क्रमांकावर संपर्क साधा.