आनंदी हेर्लेकर 

मध्यंतरी मी ‘मैं वापस आऊंगा’ हा सिनेमा बघितला. तेव्हापासून मनात रेंगाळतोय. खूप दिवसांनी असा मनाला भिडणारा, आशादायक सिनेमा बघितल्याचं समाधान आहे.

धर्मावरून होणाऱ्या हिंसा, माणसामाणसात पडणारी फूट हे सिनेमाचं भांडवल असतानाच्या सध्याच्या काळात हा सिनेमा खूप ‘सुकून’ देणारा आहे. दंगली कोण घडवून आणतं, त्यामागे कोणाचं नियोजन असतं, फाळणीमागचं राजकारण काय होतं, कोणाचं काय चुकलं या प्रश्नांचा ऊहापोह करण्याच्या भानगडीत हा सिनेमा पडत नाही. धर्म स्वतःशी ठेवून एकमेकांसोबत गुण्यागोविंदानं नांदणाऱ्या, धर्मापलीकडे जाऊन माणूस म्हणून जगू पाहणाऱ्या, मानवी भावभावनांच्या मूलभूत गरजांच्या विविध छटा जगणाऱ्या माणसांची ही गोष्ट. 

फाळणी आणि त्याच्याशी जोडलेल्या घडामोडींमुळे ९५ वर्षांच्या आजोबांचं तारुण्यातलं प्रेम सफल होऊ शकत नाही. त्याला ‘क्लोजर’ देण्यासाठी त्यांच्या नातवानं केलेली धडपड आणि त्या प्रक्रियेत झालेला त्याचा प्रवास हा सिनेमाचा विषय. धर्म, देश यांचा अतिरेकी हस्तक्षेप माणसाचं आयुष्य कसं सैरभैर करून टाकतो, मुळापासून उखडून टाकतो हे पडद्यावर अनुभवताना जीव तीळतीळ तुटतो. मनाला दिलासा मिळण्यासाठी प्रेम, आदर, संयम या गोष्टींना पर्याय नाही ह्याची खूणगाठ सिनेमा पाहिल्यावर पुन्हा पक्की होते.

आपल्यामध्ये प्रेम करण्याची, एखाद्या गोष्टीत स्वतःला झोकून देण्याची अपार शक्ती असते. ही शक्ती न वापरता आपण जगत राहिलो, तर आयुष्यभराची वणवण, अर्थहीनता तर वाट्याला येतेच, शिवाय मरणही शांततेत येत नाही असं हा सिनेमा सुचवतो. प्रेम करण्याच्या, झोकून देण्याच्या हुकलेल्या संधी डोळ्यासमोरून तरळून जातात. भविष्यात उत्कटतेनं जगण्याचा, कृत्रिम मर्यादांना बळी न पडण्याचा नकळत संकल्प केला जातो.

हा सिनेमा विशेष लक्षात राहील तो त्या निमित्तानं लेकीशी झालेल्या संवादामुळे. सिनेमा बघून बाहेर आल्यावर माझी लेक भारावून मला म्हणाली, “असं प्रेम बघून माझा खऱ्या प्रेमावर विश्वास बसतोय!” नव्या पिढीशी जुळवून घेऊ पाहणाऱ्या मला धक्काच बसला. तिच्या स्वप्नाळू डोळ्यांत मला काही वर्षांपूर्वीची मीच दिसले, आणि मन सावध झालं. 

‘सच्चा प्यार जिंदगीमें एकही बार होता हैl सबके लिए कहीं न कहीं, कोई न कोई बना होता हैl’ अशा अर्थाचे संवाद असणारे कितीतरी हिंदी सिनेमे आठवले. किती स्वप्नं दाखवतात असे सिनेमे! आपल्या आयुष्यात एक व्यक्ती येईल, ती आपल्यावर जिवापाड प्रेम करेल, आपण त्या व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाचं माणूस असू, तिच्या मनात सतत आणि फक्त आपणच असू (आणि अर्थात आपल्याही मनात फक्त तीच व्यक्ती असेल!)… अशी स्वप्नं. प्रेमाच्या असंख्य छटा दाखवणारी स्वप्नं… अशी स्वप्नं उराशी बाळगून मोठे झालेले माझ्या पिढीतले माझ्यासारखे कितीतरी मित्रमैत्रिणी डोळ्यांसमोर तरळले. काही त्या गोड स्वप्नातून खाडकन् जागे झालेले, सिनेमातलं ‘तसं’ प्रेम ही केवळ फॅन्टसी असते, तसं केवळ सिनेमा, कथा-कादंबऱ्यांत घडतं, ती एक कविकल्पना असते अशा निष्कर्षाप्रत पोचलेले, काही अशा स्वप्नांपेक्षाही गोड ‘एक दुजेके लिए’ आयुष्य जगणारे, तर काही अशा कल्पना कवटाळून बसलेले असल्यामुळे आपला जोडीदार आपल्यावर झोकून देऊन ‘तसं’ प्रेम करत नाही असं वाटून सतत मनात कुढत बसणारे किंवा हे ‘तसं’ प्रेम नाही म्हणून घटस्फोट देऊन ‘तशा’ प्रेमाच्या शोधात भरकटलेले असेही कितीतरी जण आठवले. 

अशा सिनेमांमुळे लग्न, प्रेम, लैंगिकता याविषयी मनात निर्माण झालेला गोंधळ मी अजूनही निस्तरते आहे. अशा कल्पनांमुळे एखाद्याच्या प्रेमावर ‘खरं प्रेम’ – ‘खोटं प्रेम’ असे शिक्के मारले जाऊ शकतात. लैंगिकतेकडे निकोप दृष्टीनं बघणं, स्वतःच्या आणि इतरांच्याही स्वतंत्र लैंगिकतेचा आदर करणं कठीण होऊ शकतं. तसं झाल्यास मुक्तपणे प्रेम करता येत नाही आणि मोकळेपणी अनुभवताही येत नाही.

लेकीला स्वतःच्या आणि इतरांच्या प्रेमाचा आदर करता यावा ह्यासाठी माझी धडपड चालू होती. खरं तर लैंगिकता शिक्षणाचं हेही एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे असं मी मानते. मला माझ्या पूर्वग्रहदूषित विचारांतून बाहेर पडण्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास करावा लागला. निदान लेकीनं तरी या विषयाकडे मोकळ्या मनानं, कोणत्याही किल्मिषांशिवाय बघावं म्हणून तिच्याशी बोलून या विषयाच्या तळाशी जायचंच असं ठरवून मी संवाद रेटून धरला.

आताची पिढी कशातच अडकून न राहणारी, कोणत्याही त्रासदायक गोष्टीला लगेच ‘क्लोजर’ देऊन ‘मूव्ह ऑन’ करण्याचा विचार करणारी, व्यावहारिक. तरी या सिनेमानं लेक इतकी भारावून का जावी याचं मला आश्चर्य वाटलं. 

मी तिला विचारलं, “तर मग कोणत्या प्रेमाला खरं प्रेम म्हणतात?” 

त्यावर ती म्हणाली, “७५ वर्षं कोणी एकाच व्यक्तीचा विचार करत असेल तर ते खरंच प्रेम असेल; म्हणजे ‘फिजिकल इंटिमसी’च्या पलीकडे जाणारं. आजकाल मुलांना  प्रेम म्हणजे फिजिकल इंटिमसी वाटते. किंवा तो त्यांच्या प्रेमाचा महत्त्वाचा भाग असतो. जियाचं लग्न झालंय हे समजल्यावरही किनूने अकांडतांडव केलं नाही, तिच्यावर हक्क दाखवला नाही, तिचा राग राग केला नाही. त्याचं प्रेम संपलं नाही, पण तरी तो शांत होता. दुःख पचवलं त्याने. हे खरं प्रेम.” 

हुश्श! म्हणजे समोरच्या व्यक्तीवर हक्क न गाजवणं, तिच्या मनाचा विचार करणं, प्रेम एकतर्फी असलं तरी ते स्वीकारणं म्हणजे खरं प्रेम हे तिला छान कळलं होतं. 

शेवटी प्रेम ही एक भावना आहे. आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल वाटतं त्या व्यक्तीला आपल्याबद्दल वाटेलच असं नाही. किंवा इतरही सामाजिक कारणांमुळे प्रेम सफल होईलच असं नाही. आपल्याकडे प्रेम सफल होणं आणि लग्न यांची सरमिसळ केली जाते. प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं, तरच ते प्रेम सफल झालं असं मानलं जातं. प्रेम ही नैसर्गिक गोष्ट आहे; ती सफल होणं न होणं ही सामाजिक! 

“जियाचं लग्न झालंय हे किनूला कळल्यावर त्यानं तो विषय तिथेच संपवला असता, इतका मरेपर्यंत ताणला नसता, तरी त्याचं प्रेम खरं आहे असं तू मानलं असतंस का?” मी पिच्छा सोडला नाही.

“म्हणजे… त्यानं विषय संपवला असता, तरी त्याच्या मनात प्रेम राहिलंच असतं ना! कारण ते खरं प्रेम होतं…” लेक आजोबांच्या खूपच प्रेमात होती. 

सात दशकांपेक्षा जास्त काळ कोणाबद्दलचं प्रेम मनात ठेवून जगणाऱ्या सिनेमातल्या आजोबांचं प्रेम मला मात्र खटकत होतं, कारण त्यामुळे त्यांच्या इतर नात्यांवर त्याचा परिणाम झाला होता. शिवाय जियासुद्धा त्यांची वाट बघत राहिली, मोकळेपणानं जगू शकली नाही. काही वेळा भावनांना योग्य वेळी क्लोजर देणं गरजेचं असतं. नाहीतर त्या कितीतरी काळ त्रास देत राहतात. क्लोजर देण्यानं त्या भावना संपत नाहीत; पण त्यांचं योग्य नियोजन करणं, वास्तव स्वीकारणं सोपं जातं आणि त्यांचा काही नकारात्मक परिणाम होत नाही. 

मला वाटतं प्रेम ही अशी भावना आहे जी आयुष्याला अर्थपूर्ण, सुंदर बनवते. प्रेमात सगळं जादुई वाटतं. सगळं जग सुंदर, अर्थपूर्ण वाटतं. आत्मविश्वास वाटू लागतो, वाढीस लागतो. प्रेम केवळ अनुभवायचं आणि जगायचं असतं. समोरच्यालाही आपल्याबद्दल तसंच वाटत असेल तर ‘सोने पे सुहागा!’ पण तसंच असण्याची गरज नाही. प्रेम प्रत्येकासाठी आपापल्या गरजेनुसार, आयुष्यातील टप्प्यानुसार वेगवेगळं असतं, वेगवेगळ्या व्यक्तींसाठी असू शकतं. आणि तसं ते एकमेकांच्या गरजेनुसार बदलत असेल तरच मुरतं. 

आजोबांचं प्रदीर्घ काळचं प्रेम बघून ‘मला असं प्रेम करता येईल?’ अशी शंका येणारा निर्वैर (सिनेमातला नातू) असो किंवा ‘मला आयुष्यात असं प्रेम मिळेल?’ असा प्रश्न विचारणारी त्याची मैत्रीण – दोघांनाही अशा अर्थपूर्ण जगण्याची आस आहे. ही आस सगळ्यांनाच असते. लेकही तिच्या भारावलेपणातून हेच मांडत होती. खरं / खोटं, चांगलं / वाईट, योग्य / अयोग्य असे शिक्के न मारता प्रेमभावना स्वीकारली, तरच मनातली ही आस पूर्ण होऊ शकते. 

“पण मग मुलं जे ऊठसूठ प्रपोज मारतात, विचार करायला वेळपण देत नाहीत, एकीने नाही म्हटलं की लगेच दुसऱ्या मुलीच्या मागे लागतात, प्रेम म्हणजे त्यांना पोरखेळ वाटतो, ते कसं योग्य?” लेक काहीशा चिडक्या, दुखऱ्या स्वरात म्हणाली. आपल्याला गृहीत धरलं जातं, आपल्या मतांचा आदर केला जात नाही, आपल्याला महत्त्व दिलं जात नाही, प्रेमाला गांभीर्यानं घेतलं जात नाही अशा किती गोष्टींचा राग आणि दुःख… अनेक कंगोरे होते या प्रश्नाला. 

“हो, पण तुझं नाही का असं होत, की काही काळ कोणीतरी आवडतं, पण त्या व्यक्तीला अजून समजून घेतलं की ते प्रेम कमी होतं?” मी उत्तर देण्यासाठी चाचपडत होते. 

“खूप वेळा होतं. बरेचदा कोणीतरी दिसण्यावरून आवडतं. पण त्याचं बॅकग्राऊंड, विचार  समजले की ते आवडणं कमी होतं”, लेक म्हणाली. तिच्या मैत्रिणीला आपली मतं ठामपणे मांडणारी मुलंच आवडतात, त्यामुळे तिच्यासाठी ‘लव्ह ॲट फर्स्ट साईट’ अशक्य हेही या निमित्तानं समजलं. प्रेमाच्या विविध छटांबद्दल आम्ही बोललो. 

“पण मुली ऊठसूठ प्रपोज नाही ना करत…” लेकीनंच तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मी ते फक्त परत मांडण्याचा प्रयत्न केला. “प्रेम कोणावर, कधी, कोणी, किती करावं यावर काही बंधनं नाहीत. ते होतं तसं होतं. त्या भावनेला योग्य / अयोग्यचे शिक्के मारू नयेत. पण त्यावर केलेली कृती योग्य किंवा अयोग्य असते. समोरच्याला त्रास होणार नाही, तिचा आदर-सन्मान राखला जाईल, तिची संमती असेल आणि कोणत्याही नात्याची फसवणूक होणार नाही अशा पद्धतीनं प्रेम करणंच फक्त योग्य. प्रेमाला नकार देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि तो नकार पचवणंसुद्धा शिकलं पाहिजे.” लेकीचं समाधान झाल्यासारखं वाटलं.

या निमित्तानं मला लैंगिकता शिक्षणाच्या वर्गात एका विद्यार्थ्याशी झालेला संवाद आठवला. 

त्यानं सांगितलं होतं, “तिसरी चौथीची पोरंपण प्रपोज मारतात ताई.” 

मला धक्का बसला होता. 

“प्रपोज करण्याचा अर्थ काय असतो रे?” मी घाबरत विचारलं. 

“म्हणजे मग ते एकमेकांचे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनतात. एकमेकांचा हात धरू शकतात, एकमेकांना हात लावू शकतात. एकत्र कुठे जाऊ शकतात.” 

प्रपोज करणं हा लैंगिक ‘एक्सप्लोरेशन’चा भाग आहे, आपल्या डोक्यात असलेली ‘लॉंग टर्म कमिटमेंट’ नाही हे लक्षात आल्यावर मी जरा निश्चिंत झाले होते. 

हा अनुभव मी लेकीला सांगितला. त्यावर, “मग प्रेम आणि लग्न यांचा संबंधच नाही का?” असं तिनं विचारल्यावर मला खूप आनंद झाला. 

लग्न ही सामाजिक संस्था असल्यानं त्यात प्रेमाबरोबरच इतरही अनेक गोष्टी येतात, व्यवहार येतो, रोजच्या जगण्यातले संघर्ष येतात. ह्या सगळ्यात प्रेम मागे पडू शकतं. किनू आणि जिया यांचं लग्न झालं असतं तर ते कसं असतं माहीत नाही. मानसशास्त्राचा अभ्यास करताना माझ्या मनातली ‘खरं प्रेम’ ही संकल्पना बदलली. कोणत्याही नात्यात चढउतार येतातच; पण तसे ते आले म्हणून प्रेमच नाही असं मानायची गरज नाही. प्रेम अशा चढउतारांना सामोरं जाण्याची शक्ती देतं. काही वेळा तर प्रेम आहे म्हणून वेगळं होण्याचा निर्णयही घेतला जातो – एकमेकांना स्पेस देण्यासाठी – हेही पाहिलंय. दोघांनाही नातं फुलवायचं असेल, तर प्रेम करता येऊच शकतं. प्रेम करणं शिकता येऊ शकतं, किंबहुना शिकावं लागतं, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. समोरच्याला आणि स्वतःलाही समजून घ्यावं लागतं. ती जवळीक अनुभवण्यासाठी आपण आधी भावनिकदृष्ट्या तयार असावं लागतं, स्वतःवर प्रेम करायला शिकावं लागतं; मग तो प्रेमविवाह असो की जुळवून आणलेला. 

कोणतंही नातं दीर्घकाळ टिकवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात, ते आपोआप होत नाही, हे मानसशास्त्र शिकल्यावर सिनेमातलं ‘तसं’ प्रेम हे अर्धसत्य आहे हे समजून घ्यावं आणि आताचं आहे ते नातं फुलवण्यासाठी काय करता येईल (ते विभक्त होऊनही फुलू शकतं!) यावर लक्ष केंद्रित करावं, हेच ‘खरं’ प्रेम आणि पूर्ण सत्य असं माझं मत झालं.

सिनेमात जियाचा जोडीदारही समजूतदार दाखवलाय. त्याला त्यांच्या प्रेमाबद्दल ठाऊक होतं आणि ते मान्यही होतं; पण त्यानं नाईलाजानं, तिच्या रक्षणासाठी तिच्याशी लग्न केलं होतं हेही किती सुंदर. लग्न आणि प्रेम या दोन गोष्टींना जोडण्याची गरज नाही हे सांगणारं. ‘पॉली-ॲमरी’चं किती छान उदाहरण. पण किनूआजोबांच्या मनात या प्रेमाबद्दल स्पष्टता नव्हती, त्यामुळे शेवटपर्यंत ते त्या प्रेमात अडकून राहिले. आणि कदाचित जियाआजीसुद्धा. त्यांनी आपल्या इतर नात्यांना पूर्ण न्याय दिला नाही असं वाटतं. अशा प्रेमाचं आपल्याकडे उदात्तीकरण करण्यात येतं आणि मग मनाचा गोंधळ उडतो. अशा उदात्त, आदर्श प्रेमाची वाट बघत रोजचं आयुष्य अवघड बनवलं जातं.

“प्रेमामध्ये कोणी स्वतःला समजून उमजून ७५ वर्षं अडकवून घ्यायला तयार असेल आणि त्याचे परिणाम भोगायलाही तयार असेल, तर त्या प्रेमाला क्लोजर देण्याचा तुझा अट्टाहास का? क्लोजर दिल्यावर त्यांची इतर नाती सुधारतीलच हे कशावरून?” लेकीनं भरल्या सुरात विचारलं तेव्हा मात्र मी विषय तिथेच थांबवला. 

वाटलं, बघू दे की तिला स्वप्नं. आपण आपली भीती तिच्यावर लादण्याचा प्रयत्न करतोय का?… आजूबाजूला केवळ अस्थिरता दिसत असतानाही निराश न होता अशी स्वप्नं दाखवणं हेच अशा सिनेमांचं यश!

भावनांना पुरेसा वेळ न देता सतत ‘मूव्ह ऑन’ करत राहिलो, तर कुठेच रुजता येणार नाही. आणि ‘मूव्ह ऑन’ करण्याचा प्रयत्नच केला नाही, तर आयुष्यभर फक्त ‘कॅरी ऑन’ करत एकाच ठिकाणी राहावं लागेल. दोन्हीचा मध्य गाठता आला पाहिजे. नवीन पिढी सतत ‘मूव्ह ऑन’ करते म्हणून त्यांचं प्रेम खोटं आणि जुनी पिढी खूपच ‘कॅरी ऑन’ करते म्हणून त्यांचं प्रेम भारी, खरं  तर असे शिक्के मारायची गरज नाही एवढाच माझा मुद्दा होता. लेकीनं त्यापलीकडे विचार करायला भाग पाडलं. प्रेमाचे अनेक पैलू असतात हे भान ठेवून आपण सिनेमा बघितला, तर काही खटकणार नाही आणि कशानं भारावूनही जायला होणार नाही. ह्या स्पष्टतेनं हा सिनेमा बघावा आणि प्रेम साजरं करावं.

आनंदी हेर्लेकर 

h.anandi@gmail.com  

समुपदेशक. मुलांचे आणि एकूणच समाजाचे मानसिक आरोग्य व शिक्षण हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत.