
पालकनीती वाचक…
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, लेखक, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी ह्यांचे नुकतेच निधन झाले. संवाद, विवेक आणि संविधानिक मूल्यांवर अढळ श्रद्धा असलेली व्यक्ती म्हणून आपल्याला त्यांची ओळख होती.
येरवडा विद्यापीठातील दिवस, व्यक्तिरंग मी पाहिलेले, धर्माबद्दल, सत्याग्रही, सत्याग्रही विचारधारा ही त्यांची सर्वांनी, विशेषतः तरुणांनी, अभ्यासावी अशी ग्रंथसंपदा आहे. यूट्यूबवर त्यांची अनेक व्याख्याने उपलब्ध आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील त्यांचे योगदान समजून घेण्यासाठी ही व्याख्याने निश्चितच उपयुक्त ठरतात. ‘मनुस्मृती‘ वरील त्यांचे व्याख्यानही जरूर ऐकावे असे आहे.
आणीबाणीच्या विरोधात झालेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. एकूणच त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा मोठा भाग आंदोलने आणि सत्याग्रही संघर्षांनी व्यापलेला होता. जातिव्यवस्था आणि सामाजिक विषमतेवर निर्भीडपणे भाष्य करणारा प्रभावी आवाज आता आपण गमावला आहे.
पालकनीती परिवारातर्फे डॉ. कुमार सप्तर्षी ह्यांना विनम्र आदरांजली!
– संपादक, पालकनीती
बाबा नेहमीच सोबत असायचा काकाच्या. कालपण घरी दुपारी दोन वाजल्यापासून गप्पा, चर्चा, नियोजन, विनोद सुरू होते दोघांचे. संध्याकाळी साधारण साडेपाच वाजता खाणं झालं. मग सरबत घेताना एक घोट अडकला आणि एकदम मान टाकली. तीन दिवसांपासून खोकला आणि लंग इन्फेक्शन होतं. घरी ट्रीटमेंट सुरू होती. त्यांना लगेच जोशी हॉस्पिटलला नेलं; पण ते आधीच निघून गेलेले होते. नुकतेच ते पायावरील शस्त्रक्रियेतून बरे होत होते. कुठल्याही आजारपणाला घाबरून खचून जाणं त्यांना माहीत नव्हतं. चालायचा सराव करून लवकरच त्यांचं ऑफिसला जाण्याचं नियोजन सुरू होतं. त्यामुळे त्यांचं अचानक निघून जाणं आम्हाला धक्कादायक वाटलं.
नंतर विचार करताना वाटलं, की ते नेहमीच भरभरून आयुष्य जगत होते. कुठलाही आजार त्यांना थांबवू शकला नाही. त्यामुळे ते कधीही गेले असते तरी असेच गेले असते – गप्पा मारत… हसत खेळत…
– रुबी रमा प्रवीण, संपादक मंडळ, पालकनीती
