ऋजुता भागवत खरे
“आई, शाळेत बाईंनी ‘माझी आई’ या विषयावर लिहायला सांगितलेलं, मी लिहिलंय, तुला देऊ वाचायला?”
त्या दिवशी शाळेतून आल्यावर लेक माझ्यासमोर वही नाचवत म्हणाली. आपलं मूल स्वतःच्या भाषेत काही लिहितंय आणि ते आपल्याला वाचायला देतंय हा अनुभव मला फार मोलाचा वाटला. उत्सुकतेनं मी ते वाचू लागले. माझे डोळे शेवटच्या ओळीवर थबकले. ‘माझी आई लहान मुलांसाठी सृजन उपक्रम केंद्र घेते, तिथे खूप मुलं येतात’. मी करत असलेल्या कामाची ‘जगात भारी’ पोचपावती मला त्या दिवशी मिळाली. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या माझ्या आवडत्या सिनेमातल्या माझ्या लाडक्या व्यक्तिरेखेचं, लैलाचं, वाक्य मला त्या क्षणी आठवलं – ‘मै चाहती हूं की जिंदगी मुझे यूंही सरप्राईज करती रहे’. आईबाबा होणं हे असंच एक आनंदाचं सरप्राईज पॅकेज आहे असं मला नेहमी वाटतं. पालक असण्याचा हा प्रवास आपल्या कल्पनांच्या पुष्कळ पुढे जाणारा असतो; नव्या शक्यता, नव्या संधी देणारा असतो.
माझ्या जुळ्या मुली साधारण वर्ष-दीड वर्षाच्या झाल्या त्या टप्प्यावर त्यांना घराच्या पलीकडे जगाची ओळख कशी करून द्यायची इथपासून ते यथावकाश त्यांना कोणत्या शाळेत घालायचं इथपर्यंत अनेक विचार माझ्या मनात डोकावू लागले होते. त्यांच्या आजूबाजूला भरपूर पुस्तकं ठेवायची, अक्षरं लिहिण्याची घाई करणाऱ्या शाळेत त्यांना घालायचं नाही, माती-पाण्यात बागडायला द्यायचं, खूप गोष्टी सांगायच्या, शक्यतो त्यांच्यावर रागवायचं नाही, त्यांना शिक्षा करायच्या नाहीत, स्क्रीनपासून शक्य तेवढं लांब ठेवायचं… एक ना अनेक! वाचलेली पुस्तकं, ऐकलेले पॉडकास्ट, अनुभवी पालक मित्र-मैत्रिणी, आईबाबा आणि काही समविचारी व्यक्तींशी होणाऱ्या चर्चा ह्या सगळ्यातून आपण योग्य वाटेवर आहोत की नाही याची चाचपणी करणंही सुरू होतं. अशातच माझी ओळख स्नेहाशी झाली. ती पेशानं सायकॉलॉजिस्ट आणि समवयस्क-समविचारी आई असल्यानं आमच्या तारा जुळल्या. आमच्या पोरींचीही गट्टी जमली. त्या खेळत असताना आमच्या गप्पा चालत. त्यातून एक कल्पना पुढे आली. आपल्या मुलींसोबत आणखी काही चिल्ल्यापिल्ल्यांना एकत्र करून खेळ, चित्रं काढणं, गोष्टी ऐकणं, नाच करणं अशा काही गमतीजमती केल्या तर? मुलांना यावंसं वाटेल, कोणतेही जाचक नियम-अटी नसतील, मोकळेपणानं खेळायला-बोलायला-नाचायला मिळेल अशी एखादी जागा आपण मुलांसाठी तयार केली तर?
रूढ अर्थानं अशा प्रकारच्या कामाचा अनुभव किंवा शिक्षण आमच्याकडे, म्हणजे निदान माझ्याकडे तरी नव्हतं. पण नवे प्रयोग करण्याचा आणि चुकत-शिकत पुढे जात राहायचा किडा मात्र नक्कीच होता. टेनिसपटू आर्थर अॅश ह्याचे ‘स्टार्ट व्हेअर यू आर. यूज व्हॉट यू हॅव. डू व्हॉट यू कॅन’ हे सूत्र मनात धरून आम्ही कामाला लागलो. गुढीपाडव्याला एका छोटेखानी कार्यक्रमाद्वारे ‘सृजन उपक्रम केंद्राचा’ शुभारंभ करायचं ठरलं. नव्या कल्पना आणि उत्साहाला तोटा नव्हता. म्हटलं तर सगळंच अमूर्त होतं. आमच्या मनात मात्र स्वच्छंद बागडणाऱ्या छोट्या छोट्या पोरांच्या आनंदी जगाचं चित्र तयार झालेलं होतं. असं सगळं मस्त सुरू असतानाच मार्च २०२० मध्ये करोनानं सगळं जग आपल्या ताब्यात घेतलं…
दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर पुन्हा जगरहाटी सुरू झाली तोवर आमच्या लेकींच्या आयुष्यात शाळा नावाची गोष्ट आलेली होती. करोनाच्या संकटानं लहान मुलांचं जग कसं आणि किती बदलून टाकलंय याबद्दलच्या चर्चा, अभ्यास कानावर पडत होते. अनेक गोष्टी प्रत्यक्ष दिसत होत्या. अनेक प्रश्न, चिंता सतावत असल्या, तरी आपल्या मुलींसोबत भोवतालच्या इतर मुलांचं बालपण आनंदमय असावं म्हणून दोन वर्षांनी पुन्हा एकदा पूर्वीच्याच उत्साहानं आम्ही तयारीला लागलो. चार ते सहा वयोगटातली मुलं, आठवड्यातले दोन दिवस, प्रत्येक दिवशी दोन तास असा प्राथमिक आराखडा आम्ही ठरवला. हा उपक्रम शाळेला पूरक असल्यानं मुलांच्या शाळेचं वेळापत्रक लक्षात घेऊन संध्याकाळी साडेपाच ते साडेसात अशी वेळ निश्चित केली. आणि आमच्या मुली आणि त्यांची मित्रमंडळी अशा आठ मुलांसोबत आमच्या ‘सृजन उपक्रम केंद्रा’चा ओनामा झाला.

मुलांसोबत आपण काय काय करू शकतो याचा विचार करत असताना हॉवर्ड गार्डनर या सायकॉलॉजिस्टचा ‘बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत’ (Multiple Intelligence Theory) आणि डॉ. श्रुती पानसे यांचं ह्याच विषयावरचं ‘बहुरंगी बुद्धिमत्ता’ हे पुस्तक आम्ही संदर्भासाठी वापरलं. साधारणपणे आकडेमोड, स्मरणशक्ती, पाठांतर या क्षमतांना आपल्याकडे ‘बुद्धिमत्ता’ मानलं जातं. परंतु शरीराच्या प्रमाणबद्ध, वेगवान हालचाली, संगीताचं आकलन, दृश्यकला, इतरांच्या आणि स्वतःच्या भावना ओळखून त्यानुसार वागणं, निसर्गातल्या गोष्टींकडे सजगपणे पाहणं हे सगळे बुद्धिमत्तेचेच आविष्कार आहेत. प्रत्येक मूल यापैकी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत रस घेतं. आणि प्रोत्साहन मिळालं तर त्यात पारंगतही होऊ शकतं. सृजन उपक्रम केंद्राचं वेळापत्रक ठरवताना शारीरिक हालचाली, चित्रकला, हस्तकला, गाणी, गोष्टी, चित्रवाचन, मनमोकळ्या गप्पा, प्रार्थना, एकत्र मिळून खाऊ तयार करणं, आपल्या भोवतालाचं निरीक्षण करणं, दगड-पानं-फुलं-पिसं गोळा करणं अशा विविध गोष्टींचा त्यात अंतर्भाव असावा याची आम्ही काळजी घेत होतो.
एका शुक्रवारी आम्ही आमच्या संग्रहात असणारी लहान मुलांची सगळी पुस्तकं मांडून ठेवली. मुलांना सांगितलं की तुम्हाला हवं ते पुस्तक घ्या, त्यातली चित्रं पाहा, एकमेकांना दाखवा, आपल्याला पुस्तकातलं काय आवडलं हे इतरांना सांगा. त्यांना पुस्तकं पाहायला आवडेल की कंटाळा येईल याबद्दल आम्ही जरा साशंक होतो; परंतु मुलांनी शंकेला जागाच ठेवली नाही. मुलांना पुस्तकं हाताळायला, त्यातली चित्रं पाहायला मजा येत होती. काहीतरी आठवून मधूनच ती खुदकन् हसत होती, आपल्याला पुस्तकात काय सापडलं हे इतरांना सांगत होती. म्हणजे एक गोष्ट नक्की – मुलांची पुस्तकांशी दोस्ती होऊ शकते. मग पुस्तकातलं आवडलेलं चित्र आपण काढून बघणं, एखादं गाणं म्हणणं, त्यावर नाचणं, चित्रं पाहत पाहत गोष्ट ऐकणं असे अनेक उपक्रम पुस्तकांभोवती गुंफता आले.
सृजन वर्ग सुरू झाला जुलैमध्ये, म्हणजे पावसाळ्यात. मग त्याला अनुसरून होड्या तयार करून पाण्यात सोडणं, बेडूक-उड्या मारणं, बेडकांचं गाणं म्हणणं, बी ते रोप हा प्रवास बघण्यासाठी कडधान्यं पेरून त्यांची रोपं तयार करणं ह्या गोष्टीही आम्ही केल्या. मुलांना मातीत हात घालायला, चिखलात खेळायला खूप आवडत असणार अशी आमची धारणा होती. मात्र दोन मुली ‘शी माती घाण असते, आमचे हात खराब होतील’ म्हणाल्या. माती घाण नसते, मातीत काम करून झाल्यानंतर आपण आपले हात साबणानं स्वच्छ धुवायचे अशी समजूत घातल्यानंतरही काहीशा अनिच्छेनंच त्यांनी मातीत बिया पेरल्या. ‘मुलांशी बोलता-वागताना कोणतीही गृहीतकं मनात ठेवायची नाहीत’ हा ह्यातून आम्हाला मिळालेला पहिला धडा.
मुलांना गप्पा मारायला खूप आवडतात हे लक्षात आल्यानं वर्गाची पहिली किंवा शेवटची पंधरा मिनिटं आम्ही गप्पांसाठी राखून ठेवू लागलो. गोल करून बसायचं आणि प्रत्येकानं कोणतीही एक गंमत सांगायची असं याचं स्वरूप असतं. इतर मुलं बोलत असताना ऐकायची सवय मुलांना आपोआपच लागली. सुरुवातीला बोलायला बिचकणारी मुलं हळूहळू मोकळी होत गेली. मुलांच्या गप्पांना विषयांचं बंधन नसतं. त्यांना कशाचा आनंद होतो, कशाची भीती वाटू शकते, आई/बाबा/शिक्षक यांचं वागणं ती कशी टिपून घेतात अशा अनेक गमती या गप्पांतून आम्हाला उलगडल्या.
सृजनमधे येणाऱ्या सगळ्या मुलांची ओळख ठरेल अशी काहीतरी कलाकृती आम्हा सर्वांना मिळून तयार करायची होती. आम्ही एका मोठ्या कार्डशीटवर झाडाचं खोड काढून ते रंगवलं. मग प्रत्येकानं कागदाचं एकेक पांढरं पान आपल्या आवडीच्या रंगानं रंगवलं. पिवळी, गुलाबी, निळी, हिरवी, चॉकलेटी अशी रंगीबेरंगी पानं खोडावर मिरवणारं झाड आम्हाला सांगत होतं, की प्रत्येकाचा रंग वेगळा आहे, सुंदर आहे, आणि आपण सगळे एकाच मातीत रुजणार आहोत, बहरणार आहोत.

सृजनचं हे रोपटं यंदा पाच वर्षांचं होऊ घातलं आहे. स्नेहा, मी आणि आठ मुलांपासून सुरू झालेल्या ह्या कुटुंबाचा आज चांगलाच विस्तार झाला आहे. या पाच वर्षांत आम्ही सर्वांनी आनंदाचे अनेक क्षण अनुभवले. व्यक्तिशः मला हा आनंद थक्क करून टाकतो. लहान मुलांच्या सहवासात आपण इतके खूश राहू शकतो याची मला खरोखरच कल्पना नव्हती. आई म्हणून आपल्या मुलांसोबत रमणं आणि पूर्णपणे अनोळखी मुलांच्या भावविश्वाचा भाग होणं या दोन्ही गोष्टींत खूप अंतर आहे. अर्थात याचं सगळं श्रेय मुलांचंच. त्यांच्याकडे असणारा प्रेमाचा निर्व्याज झरा त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला वाहतं करतो. त्यांच्या निष्पाप सहवासात आपले स्वतःबद्दलचे, जगाबद्दलचे अनेक समज ढासळतात.
***
‘ताई सृजन वर्ग रोज का नसतो?’, ‘ताई मला शाळापण सृजनसारखीच पाहिजे!’ असं म्हणत इथे येणारी मुलं एक जादुई आनंद घेऊन येतात. हा आनंद संसर्गजन्य असतो. त्यांच्या
सहवासातल्या सर्वांना त्याची लागण होते आणि हळूहळू आपल्या जगण्याला एक कोवळी, पोपटी किनार चढू लागते. या पोरांचं उद्याचं जग अधिक सुंदर होण्यासाठी आपण निमित्तमात्र ठरू शकलो ही जाणीव मोठंच समाधान देऊन जाते.
पालक होण्याच्या खूप आधीपासून मी पालकनीतीची वाचक होते. पालकनीतीमध्ये वाचलेल्या लेख-कविता-चित्रांचा, इथे भेटलेल्या माणसांचा माझ्या आईपणावर कळत नकळत पुष्कळ प्रभाव पडत गेला. त्यामुळे पालकनीतीच्या माध्यमातून सृजन उपक्रम केंद्राच्या अनुभवांबद्दल लिहिण्याचा मनस्वी आनंद होतो आहे. आपण करत असलेल्या कामाकडे तटस्थ होऊन पाहिलं तरच आपण नेमकं, मार्मिक लिहू शकतो. मात्र आठवणीत रमणं हा माझा स्थायिभाव असल्यानं तटस्थ होऊन लिहिणं जमेल का अशी शंका माझ्या मनात डोकावते. अर्थात, केवळ आठवणींची मालिका लिहिणं हा या लेखनाचा उद्देश नाहीये. गेल्या पाच वर्षांत सृजन उपक्रम केंद्रामध्ये पन्नासेक मुलांना आणि त्यांच्या पालकांना जवळून पाहता आलं. त्याचबरोबर शिक्षण, पालकत्व याबद्दल थोडंफार, खरं तर फार थोडं, वाचन झालं. या सगळ्यामुळे मुलं, पालक, शिक्षण यांकडे पाहण्याची एक सजग आणि सावध नजर हळूहळू तयार होऊ लागली आहे. मूलकेंद्री काम करणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्थांशी परिचय झाला आहे. झपाट्यानं बदलणाऱ्या भोवतालानं माझ्या मनात अनेकदा चिंतेचं, काळजीचं मोहोळ उठवलं आहे. हे सगळं संचित सोबत घेऊन पुढे जात असताना मला जाणवणाऱ्या गोष्टी, येणारे अनुभव नोंदवणं हा धागा मनात ठेवून दर महिन्याच्या अंकातून एक विषय – अनुभव मांडायचा माझा प्रयत्न असेल.
लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून विचार करणाऱ्या, काम करणाऱ्या एका मोठ्या साखळीशी जोडलं जाण्याच्या या प्रवासात आनंदाचं एखादं सरप्राईज पॅकेज माझी वाट पाहत असणार याची मला खात्री आहे.
ऋजुता भागवत खरे

