बाबाला नेहमीच कसा उशीर व्हायचा!

अलेक्झांडर रास्किन 

अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश 

लहान असताना इतर मुलांमुलींप्रमाणेच बाबाही शाळेत जायचा. बाकी सर्व मुलं शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच तिथे पोहोचायची; पण छोट्या बाबाला मात्र नेहमीच उशीर व्हायचा. कधीकधी तर त्याचा अख्खा पहिला तास बुडायचा. त्याच्या बाईंना ह्याचं खूपच आश्चर्य वाटायचं. त्या म्हणायच्या, की असा विद्यार्थी त्यांनी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. 

मुख्याध्यापक म्हणायचे, “तो वेगळा आहे. असा विद्यार्थी इतर कोणत्याही शाळेत सापडायचा नाही. तो नेहमीच उशिरा येतो! त्याच्या पालकांचं म्हणणं आहे, की ते यावर काहीच करू शकत नाहीत. मी ह्याबद्दल त्यांच्याशी दोनदा बोललेलो आहे.” 

हे खरंच होतं; छोट्या बाबाच्या पालकांना काहीही करता येणं अवघड होतं. 

दररोज संध्याकाळी एकच एक प्रसंग घडायचा. 

“गृहपाठ केलास का रे?” आजी विचारायची. 

“थांब ना थोडंसं,” छोटा बाबा उत्तर द्यायचा. 

“या क्षणी वाचन थांबव आणि लगेच गृहपाठ करायला घे!” आजोबा म्हणायचे. 

“अजून एकच पान,” छोटा बाबा विनवणी करायचा. 

तो ते पान पूर्ण करायचा आणि मग पुढचं पान वाचायला घ्यायचा. एखादं रंजक पुस्तक बाजूला ठेवून कंटाळवाणा गृहपाठ करणं त्याला काही केल्या जमत नसे. 

“ते पुस्तक आत्ताच्या आत्ता खाली ठेव!” 

“थोडं थांब ना.” 

“ते पुस्तक आत्ताच्या आत्ता खाली ठेsssव!” 

“थोडं थांबा ना, प्लीज.” 

शेवटी, त्याच्या पालकांचा संयम सुटायचा आणि आजोबा किंवा आजीपैकी कोणीतरी छोट्या बाबाच्या हातातून ते पुस्तक हिसकावून घ्यायचे.

“तू अगदी आळशी आणि बिनकामाचा माणूस होशील मोठेपणी,” ते त्याला ओरडायचे. 

छोट्या बाबाला याचं खूपच वाईट वाटायचं. तो ओरडायचा, रडायचा आणि आपलं पुस्तक परत मागायचा. पुस्तक परत मिळेपर्यंत आपण गृहपाठ करणारच नाही, असं म्हणायचा. आणि मग ती संध्याकाळ अशीच रेंगाळायची, वेळ असाच वाया जायचा. अखेरीस छोटा बाबा गृहपाठ करायला बसायचा, तोवर त्याला झोपच येऊन जायची. त्याचे आई-वडील त्याला उठवायचे. तो पुन्हा पेंगायचा. पण ते त्याला पुन्हापुन्हा उठवायचे. त्यामुळेच त्याचा घरचा अभ्यास सहसा अर्धवट झोपेतच कसाबसा पुरा व्हायचा. गृहपाठ पूर्ण होईपर्यंत खूप उशीर झालेला असायचा. आजी आणि आजोबा दोघेही खूप थकलेले असायचे. 

सकाळची परिस्थिती अजूनच वेगळी असायची. 

“उठ रे…!” आजी म्हणायची. 

“एक मिनिट…,” छोटा बाबा पुटपुटायचा. 

“उठ आता!” आजोबा ओरडायचे. 

“एक मिनिट, प्लीज…” 

“तुला शाळेला उशीर होईल!” 

आदल्या रात्री उशिरा झोपल्यावर सकाळी लवकर उठणं किती कठीण असतं, हे सर्वांनाच माहीत आहे. सकाळीच तर सर्वात गोड स्वप्नं पडत असतात. विशेषतः शाळेत जायचं असतं तेव्हा! वेळ झपाट्यानं पुढे सरकायचा, आणि इकडे छोटा बाबा आळस देत जांभया द्यायचा, तोंड-हात धुवायचा, झोपेतच कसेबसे कपडे चढवायचा, नाश्ता करतानाही डुलक्या घ्यायचा. अखेरीस आपली वह्या-पुस्तकं गोळा करून घरातून बाहेर पडायचा आणि शाळेकडे धावत सुटायचा. वाटेत रस्त्यावरच्या घड्याळाकडे पाहताना त्याची छाती धडधडायची. धापा टाकत छोटा बाबा वर्गात प्रवेश करायचा, तेव्हा त्याचे शिक्षकही हसायचे. 

“हा आला आपला झोपाळू!” ते म्हणायचे. 

ते ऐकून त्याला खूप वाईट वाटायचं. हे इतक्यांदा घडलं होतं, की शाळेत भिंतीवरच्या वर्तमानपत्रात छोट्या बाबाचं एक व्यंगचित्र (कार्टून) लावलेलं होतं. 

त्या चित्रात तो अंथरुणावर गाढ झोपलेला दाखवलेला होता आणि त्याचे आई-वडील त्याच्या अंगावर पाण्याच्या दोन मोठ्या बादल्या ओतत होते. एक मोठं गजराचं घड्याळ लहानग्या बाबाचा एक कान ओढत होतं, तर एक मुलगा त्याच्या दुसऱ्या कानात तुतारी फुंकत होता. त्या व्यंगचित्राखाली ’शाळेच्या दिवसाची अंगाई’ (A School day Lullaby) असं शीर्षक लिहिलेलं होतं. हे चित्र पाहिलं, की बाबाला राग यायचा, मात्र तरीही शाळेत तो नेहमी उशिराच पोहोचत असे. आपला गृहपाठ तो अगदी दिवस संपता संपता करायचा, त्यामुळे तो कधीच नीट होत नसे. आणि नेहमी उशिरा येत असल्यामुळे, शिक्षकांनी एखाद्या नवीन विषयाबद्दल दिलेली माहिती अनेकदा त्याच्याकडून हुकत असे. यामुळे वर्गातील इतर मुलं काय करत आहेत हे समजणं त्याला कठीण जाई. शिवाय तो नेहमीच घाईत असे, त्याला नेहमीच उशीर झालेला असे. नेहमी धावपळ, नाही तर गडबड. या सगळ्याच गोष्टी त्याच्यासाठी खूपच वाईट होत्या. आणि तरीही, तो नेहमीच उशिरा जात असे. 

मला तुम्हाला असं सांगायला नक्कीच आवडलं असतं, की ‘एकदा शिक्षक त्याला ओरडले, इतर मुलांनी त्याची चेष्टा केली… मग एके दिवशी तो इतरांपेक्षा लवकर शाळेत आला आणि त्यानंतर त्याला कधीच उशीर झाला नाही’. 

… पण मला खोटं बोलायचं नाहीये. 

बाबा आयुष्यभर सगळीकडे उशिराच जात राहिला. लहान असताना तो शाळेत उशिरा पोहोचे. नंतर कॉलेजच्या तासांना उशीर. त्यानंतर कामावरही उशिरा पोहोचू लागला. लहान असताना त्याला शिक्षा झाली, ओरडा बसला आणि त्याची फजितीही झाली. मोठं झाल्यावर, या वाईट सवयीमुळे त्याला आयुष्यातील अनेक गोष्टींना मुकावं लागलं. तो नाटकांना उशिरा पोहोचला आणि त्याचा पहिला अंकच हुकला. पार्ट्यांना तो अनेकदा इतका उशिरा पोहोचे, की त्याला पुन्हा कधीच बोलावलं जात नसे. व्यावसायिक भेटीगाठींसाठी उशिरा पोहोचल्यामुळे ते सर्व कामच बिघडून जात असे. नवीन वर्षाच्या पार्टीला उशीर झाल्यामुळे अनेकदा निर्जन रस्त्यावर त्याला एकट्यानंच नवीन वर्षाचं स्वागत करावं लागलं आहे. अनेक लोक त्याची व्यर्थ वाट पाहत बसत. त्याच्या उशिरा येण्याबद्दलच्या गमतीशीर गोष्टी सांगायला त्याच्या मित्रांना खूप आवडतं. 

आजही बाबाला हळू चालताच येत नाही. तो नेहमीच घाईत असतो, कारण त्याला उशिरा येण्याची सवयच झाली आहे. रात्री झोपेतही त्याला आपण एखाद्या भेटीसाठी उशिरा पोहोचलो आहोत, असं स्वप्न पडतं. झोपेत तो दचकतो आणि अस्वस्थ होऊन कण्हतो. कधीकधी त्याला स्वप्न पडतं, की तो पुन्हा लहान मूल झाला आहे आणि शाळेकडे धावतोय; स्वप्नातच तो घड्याळाकडे पाहतो, तर ते घड्याळ अजून लवकरचीच वेळ दाखवत असतं! सगळे त्याचं अभिनंदन करतात… मुख्याध्यापक त्याला फुलांचा गुच्छ देतात… शाळेच्या सभागृहात त्याचं छायाचित्र लावलं जातं… त्याच्यासाठी बँड वाजवला जातो… 

ह्याच वेळी त्याला जाग येते. मग तो विचार करतो, की आपण पुन्हा लहान मूल झालोच, तर शाळेत कधीच उशिरा जाणार नाही.

अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश 

jonathan.preet@gmail.com

पालकनीतीच्या संपादकगटात सक्रिय सहभाग. आपल्या आयुष्याला नेमका हेतू नसतो हे जाणवून पर्यावरण, शिक्षण आणि लेखन या आवडत्या माध्यमांतले समोर येईल ते आणि आवडेल ते करून आनंदात राहण्याचा प्रयत्न करतात. 

सौजन्य : अरविंद गुप्ता टॉईज