बसवंत विठाबाई बाबाराव
गेली काही वर्षं आम्ही ‘सृजन बुक्स’ ह्या नावानं पुस्तक-वितरणाचं काम करतो. त्याचाच एक भाग म्हणून निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही पुस्तकांचं छोटंसं दुकानही लावतो. ह्या उपक्रमांतून मला पुस्तकांपेक्षा माणसंच अधिक भेटली. लेखक, संपादक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते, शिक्षक, पालक, वाचकांशी ओळखी झाल्या. काही ओळखी मैत्रीत बदलल्या. वाचन, लेखन, पुस्तकं आणि मुलांचं शिक्षण याभोवती समविचारी माणसांचा एक छोटासा समुदाय तयार झाला. हा समुदाय व्हॉट्सॲप ग्रुपसारखा केवळ संदेशांची देवाणघेवाण करणारा नाही. पुस्तक वाचून त्यावर बोलणं, एखाद्या पुस्तकाची इतरांना शिफारस करणं, मुलांसाठी म्हणून पालकांनी काय वाचावं यावर चर्चा करणं, एखाद्या अनुभवातून आपलं मत बदलणं, असे अनेक संवाद त्यात घडत असतात.
पुस्तकांच्या वितरणातून मला आर्थिक मदत होते हे खरं असलं तरी, हा माझ्यासाठी निव्वळ व्यवसाय कधीच नव्हता. केवळ आर्थिक फायदा हेच त्यामागचं कारण असतं, तर हे काम कदाचित कधीच थांबलं असतं. कारण अनेकदा दूरच्या कार्यक्रमाला पुस्तकांचं प्रदर्शन घेऊन जाणं, येण्या-जाण्याचा, पुस्तकांच्या वाहतुकीचा खर्च करणं, दिवसभर तिथे बसणं आणि शेवटी एखादंही पुस्तक विकलं न जाणं, असे अनुभवही आले आहेत. त्या वेळी थोडी निराशा होते खरी; पण अशा वेळीही पुस्तकांपेक्षा लोकच जास्त काही शिकवून जातात.
हे पुस्तक उपयोगाचं आहे ना?
एका पुस्तक प्रदर्शनात एक लहान मुलगा पुस्तकांकडे उत्सुकतेनं पाहत होता. एक पुस्तक हातात घेऊन तो पानं उलटू लागला. तेवढ्यात त्याच्या पालकांनी त्याच्या हातातलं पुस्तक काढून घेतलं. ‘आधी शाळेची पुस्तकं वाच. अभ्यास पूर्ण कर.’
मुलगा बिचारा पुस्तकाकडे वळून वळून पाहत असताना पालक त्याला हाताला धरून पुढे निघून गेले. असा प्रसंग एखाद्याच प्रदर्शनात एखादाच घडतो असं नाही; तो वारंवार घडतो.
मुलानं पुस्तक हातात घेतलं, की त्यानं त्यातून काहीतरी शिकायलाच हवं, अशी पालकांची अपेक्षा असते. फक्त चित्रांचं पुस्तक घेतलं तर त्यातून काय शिकणार… गोष्टींचं पुस्तक घेतलं तर अभ्यासाला त्याचा काय उपयोग… प्राणी, पक्षी, गमतीजमती, विनोद, कविता यांची पुस्तकं म्हणजे नुसता वेळ घालवणं… शालेय पुस्तक म्हणजे खरं वाचन… अनेकदा अशी एक विभागणी पालकांच्या मनात असते. मुलासाठी पुस्तक विकत घेताना पालकांचा पहिला प्रश्न असतो, ‘हे पुस्तक उपयोगाचं आहे ना?’
पण मुलासाठी पुस्तकाचा उपयोग नेहमी मोठ्यांच्या मोजपट्टीनंच ठरतो का?
एक पुस्तक की दहा गोष्टी?
साताठ वर्षांहून लहान मुलांसाठी पालक पुस्तकं निवडत असतील, तर हा अनुभव आणखी गमतीचा असतो. अशा मुलांसाठी आम्ही कमी मजकूर आणि अधिक चित्रं असलेली पुस्तकं दाखवतो. अनेकदा एका पुस्तकात एकच गोष्ट असते. अक्षरांची ओळख नुकतीच होत असलेल्या किंवा वाचन अजून सुरू न झालेल्या मुलांसाठी अशी पुस्तकं जास्त उपयुक्त असतात. पण काही पालक लगेच विचारतात, ‘एकच गोष्ट आहे? मग पुस्तक लगेच संपणार!’ त्यांना एका पुस्तकात दहा-पंधरा गोष्टी हव्या असतात. पुस्तक मोठं हवं, त्यात भरपूर मजकूर असायला हवा. मुलानं ते लगेच संपवता कामा नये.
पुस्तक किती दिवस पुरतं यापेक्षा ते मुलाच्या मनात किती दिवस पुरून उरतं, हे महत्त्वाचं नाही का? लहान मुलांसाठी असलेलं चित्रांचं पुस्तक बाहेरून पाहिलं, तर फार छोटं असतं; पण मुलासाठी ते छोटं असेलच असं नाही. चित्रात कोणता प्राणी आहे, तो कुठे उभा आहे, त्याच्या मागे काय आहे, त्याचा रंग कोणता आहे, तो काय करतोय, पुढे काय होईल, चित्रात आणखी काय काय आहे… पुस्तकातल्या प्रत्येक चित्राबाबत अशा अनेक गोष्टी मूल स्वतःच्या भाषेत सांगत असतं. मोठ्यांनी एकदा सांगितलेली गोष्ट चित्र पाहत मूल नंतर स्वतःच्या पद्धतीनं सांगू शकतं. अक्षरं अजून नीट वाचता येत नसली, तरी चित्र वाचता येतं. आणि वाचनाची सुरुवात अक्षरांपासूनच व्हायला हवी, असंही नाही.
गोष्ट समजण्यासाठी जगही माहीत असावं लागतं
लहान मुलांसाठी पुस्तक निवडताना आणखी एक गोष्ट लक्षात येते. आपण मुलांना गोष्ट वाचून दाखवतो खरी; पण त्या गोष्टीतलं जग मुलाला माहीत आहे का? गोष्टीत वाघ आहे. तो दिसतो कसा हे मुलाला चित्रातून समजू शकतं; पण वाघ म्हणजे काय, जंगल म्हणजे काय, जंगलात कोण कोण राहतं, वाघ कुठे राहतो, तो कसा चालतो, त्याचा आकार केवढा असतो, याचा प्रत्यक्ष अनुभव मुलाला नसला, तर गोष्टीतला वाघ आणि मुलाच्या अनुभवातला वाघ यांच्यामध्ये एक अंतर राहतं.
जंगल प्रत्यक्ष अनुभवलेलं असेल, तर पुस्तकात वाचत असलेली जंगलाची गोष्ट वेगळ्या प्रकारे उलगडते. शेत पाहिलेलं असेल, तर शेताची गोष्ट ऐकताना शब्दांना वेगळा अर्थ मिळतो. नदी पाहिलेली असेल, तर पुस्तकातली नदी मनात अधिक सहज उभी राहते.
म्हणूनच पुस्तकं देताना मुलांना त्याच्याबरोबर जगही द्यावं लागतं. जंगल, समाज, परिसर, जग यांचंही पुस्तकासारखं वाचन करायला हवं.
मुलांना बाहेर घेऊन जाणं, झाडं दाखवणं, बाजारात घेऊन जाणं, शेत पाहू देणं, बसनं प्रवास करताना बाहेरचं जग दाखवणं, घरातल्या वस्तूंबद्दल बोलणं, आजीआजोबांच्या गोष्टी ऐकायला मिळणं, मनात आलेले प्रश्न त्यांना विचारू देणं, या सगळ्याचा पुढे वाचनाशी संबंध जोडला जातो. मुलाच्या अनुभवविश्वात शब्दांसाठी जागा तयार झाली, की पुस्तकातले शब्द त्याच्याशी बोलायला लागतात. याचा अर्थ असा नाही, की मुलांना असा अनुभव मिळाल्याशिवाय पुस्तकंच वाचायला द्यायची नाहीत. उलट, पुस्तकं आणि अनुभव यांची एकमेकांना साथ मिळाली, तर वाचन अधिक समृद्ध होतं. सुरुवातीला अधिक चित्रं असलेली, मुलांच्या वयोगटाला साजेशी आणि त्यांच्या आसपासच्या अनुभवांशी जोडलेली पुस्तकं निवडता येतात.
जन्मल्यापासून स्पर्धा परीक्षा?
काही पालक मात्र याच्या अगदी उलट दिशेनं धावताना दिसतात. लहान बाळासाठी पुस्तक हवं म्हणताना काही जण लगेच विचारतात, ‘सामान्य ज्ञानाची पुस्तकं आहेत का?’ एक-दोन वर्षांच्या मुलांसाठी मुळाक्षरांची पुस्तकं शोधली जातात. मराठी-इंग्रजी अक्षरं, रंग, संख्या, प्राणी यांची माहिती देणारी पुस्तकं घेतली जातात. मुलाला अक्षरं ओळखता यायला हवीत, ह्यात चुकीचं काही नाही; पण बालपण हे काय अक्षरं, संख्या आणि सामान्य ज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई करण्याचं वय आहे का? मुद्दा हा आहे, की आपण मुलाला पुस्तक देतोय, की अभ्यासाचं आणखी एक साधन देतोय?
मुलानं पुस्तक हातात घेतलं, ते उलटलं-पालटलं, त्यातली चित्रं पाहिली, प्रश्न विचारले, स्वतःच्या शब्दांत काहीतरी सांगितलं, त्यातल्या पात्रांशी स्वतःला जोडून घेतलं… हा सारा वाचन-प्रक्रियेचाच भाग आहे. पुस्तक किती पानांचं आहे यापेक्षा मुलानं त्यातून काय अनुभवलं, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.

मुलांसाठी पुस्तकं घेणारे पालक आणि पालकांसाठी पुस्तकं
पुस्तक-प्रदर्शनात आणखी एक गंमत दिसते.
काही पालक मुलांसाठी पुस्तकं घेण्यासाठी येतात. मुलांवर ‘चांगले’ संस्कार व्हावेत म्हणून धार्मिक पुस्तकं, बोधकथा, चांगल्या सवयी सांगणारी पुस्तकं शोधतात. मुलाचा वयोगट काय आहे, त्याला ते पुस्तक समजेल का, त्याची आवड काय आहे, हे बहुतेक वेळा दुय्यम ठरतं. पालकांच्या मनात मुलाला काहीतरी चांगलं शिकवायचं असतं. हेतू चांगला असतो. पण मुलाला पुस्तकातून नेमकं काय मिळतंय, यापेक्षा आपण त्यातून मुलाला काय शिकवू इच्छितो, याला जास्त महत्त्व मिळतं.
मुलांसाठी पुस्तकं निवडताना आपण ज्या समजुती घेऊन येतो, त्या केवळ पुस्तकाच्या निवडीपुरत्या मर्यादित नसतात. त्या आपल्या पालकत्वाच्या कल्पनांशी जोडलेल्या असतात. म्हणूनच मुलांसाठी पुस्तकं निवडताना पालकांनी स्वतःसाठीही काही पुस्तकं निवडायला हवीत आणि स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत.
माझ्या मुलाला मी वाचताना पाहू इच्छितो, की माझ्या सांगण्याप्रमाणे वाचताना?
मुलानं पुस्तक स्वतः निवडावं असं मला वाटतं का?
मुलाला त्याच्या आवडीचं पुस्तक वाचू देण्याची माझी तयारी आहे का?
मुलानं पुस्तक पूर्ण केलंच पाहिजे, असा माझा आग्रह आहे का?
पुस्तक वाचल्यानंतर त्याला काय समजलं याची मी परीक्षा घेणार आहे का?
आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, मी स्वतः वाचतो का?
पालकत्वाचंही वाचन असतं
मुलासाठी पुस्तक घेण्यापूर्वी पालक म्हणून स्वतःसाठीही काही पुस्तकं वाचा असं आम्ही कधीकधी नव्या पालकांना सांगतो. यावर काही पालकांचं उत्तर मजेशीर असतं. ‘आता आम्ही वाचून काय करायचं? आमचं सगळं झालं गेलं!’ पण पालकत्वात आपलं ‘सगळं’ कधीच झालेलं नसतं. मुलाबरोबर पालकही पुन्हा शिकत असतो.
मुलं कशी शिकतात?
मुलं का रडतात?
का हट्ट करतात?
का खोटं बोलतात?
का एखाद्या गोष्टीला घाबरतात?
त्यांना किती स्वातंत्र्य द्यावं?
अभ्यासासाठी किती आग्रह करावा?
त्यांच्याकडून चूक झाल्यावर काय करावं?
परीक्षेचं महत्त्व किती असावं?
मुलांच्या खेळाला, प्रश्नांना आणि कंटाळ्यालाही जागा असावी का?
या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपल्या बालपणातून मिळतीलच असं नाही. मुलं बदलली आहेत. जग बदललेलं आहे. पालकत्वाच्या प्रश्नांकडे पाहण्याची आपली समजही बदलायला हवी. यासाठी मराठीत पालकांसाठी चांगलं वाचन-साहित्य उपलब्ध आहे. श्रुती पानसे यांची ‘पहिली आठ वर्षं’, ‘मेंदूचा पासवर्ड’, ‘अशी का वागतात मुलं?’, ‘आई-बाबांची डायरी’ यांसारखी पुस्तकं पालकत्वाकडे नव्यानं पाहायला मदत करतात. शोभा भागवत यांची ‘सारं काही मुलांसाठी’, ‘झर्यातलं आकाश’ ही पुस्तकंही मुलांना समजून घेण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची वाटतात. फारूक काझी यांची ‘शहाण्या बाबाची कहाणी’ पालकत्वाकडे अनुभवाच्या नजरेतून पाहते. रेणू दांडेकरांचं लेखनही मुलांना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतं. निलेश निमकर आणि ‘क्वेस्ट’च्या माध्यमातून संशोधनावर आधारित असलेलं पालक आणि बालशिक्षणाशी संबंधित साहित्य उपलब्ध झालेलं आहे. त्यांचा ‘पहिली पायरी’ हा पालकांसाठीचा अभ्यासक्रम आणि साहित्यही याच दिशेनं काम करतात.
ही नावं म्हणजे पालकांसाठी पुस्तकांची अंतिम यादी नाही. उलट, सुरुवातीला स्वतःसाठी पुस्तक शोधण्याची ही काही दारं आहेत. कारण मुलांच्या वाचनाची काळजी करणाऱ्या पालकांनी थोडं स्वतःचं वाचनही जपायला हवं.
मी स्वतः पालक झालो तेव्हा माझ्या मनात पालकत्वाविषयी काही ठाम समजुती होत्या. त्यातल्या काही समजुती ह्या चुकीच्या गृहीतकांवर आधारित होत्या, हे आज मागे वळून पाहताना मान्य करायला मला अजिबात संकोच वाटत नाही.
मुलांनी काय करावं, काय करू नये, किती वाचावं, किती अभ्यास करावा, शिस्त म्हणजे काय, ‘चांगलं मूल’ म्हणजे काय, याबद्दल आपल्याकडे तयार कल्पना असतात. तशा त्या माझ्याही होत्या. पण मुलांबद्दलची काही पुस्तकं वाचली, शिक्षणाकडे आणि बालकांच्या विकासाकडे पाहण्याच्या काही नव्या कल्पना समजल्या आणि पालकत्वाबद्दल माझ्या मनात असलेल्या अनेक संकल्पना बदलल्या. मुलाला बदलण्यापेक्षा आधी स्वतःला समजून घ्यावं लागतं, हे लक्षात आलं. कदाचित म्हणूनच आज पुस्तकांच्या दुकानात एखादा पालक मुलासाठी पुस्तक शोधत असतो, तेव्हा मला केवळ त्याला पुस्तक विकायचं नसतं.
पुस्तकांच्या दुकानात किंवा प्रदर्शनात कधीकधी एखादं मूल पुस्तक हातात घेऊन बराच वेळ उभं राहतं. कधी त्यातली चित्रं पाहतं, कधी पानं उलटतं, कधी पुस्तक परत ठेवतं. पुन्हा तेच पुस्तक उचलतं. मोठ्यांना कदाचित त्यात काही विशेष दिसत नाही; पण त्या मुलाला मात्र तिथे काहीतरी सापडलेलं असतं… कदाचित एखादं चित्र… एखादी गोष्ट… एखादा प्रश्न… किंवा फक्त पुस्तक हातात धरून पाहण्याचा आनंद…
मोठं होताना आपली पुस्तकांकडे पाहण्याची पद्धतही बदलते. पुस्तकात काय आहे, त्याचा उपयोग काय, मुलाला त्यातून काय शिकता येईल, ह्याकडे आपलं लक्ष जातं. मुलाला मात्र कधीकधी ते पुस्तक आवडतं. बस.
आणि पुस्तक निवडताना त्या आवडीसाठी आपण एवढीशी जागा ठेवली, तरी पुरेसं आहे. शेवटी पुस्तक मुलाच्या हातात जातं. पुढची गोष्ट तोच ठरवतो…
बसवंत विठाबाई बाबाराव

गेली पंधरा वर्षे शाळेमधील पर्यावरण शिक्षण विषयात कार्यरत. पुण्यातील वनराई संस्थेच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचे कार्यक्रम समन्वयक.
