आती है उर्दू जबाँ आते आते…

भाकरी नि भाषा या सख्ख्या मैत्रिणी आहेत आणि हातात हात गुंफून अंतिम सत्याकडे वाटचाल करत असतात असं दादा म्हणायचे. भाषा माणसाला एलिव्हेट (elevate) करते. परंतु सध्या हे घडत नाहीये. माणसं अशी भेसूर कशी झाली? नि का? उर्दू भाषेलाही हाच प्रश्न पडला आहे. उर्दूकडून भारताला गंगा-जमनी तहजीबचा (एकात्म संस्कृतीचा) वारसा मिळाला. तो आज बऱ्यापैकी धोक्यात आला आहे.

उर्दू हे काही भाषेचं नाव नाही. उर्दू म्हणजे लष्करी छावणी, कॅम्प. दिल्लीमधील तुर्की, पर्शियन, अफगाण सैनिक आपापसात आपली भाषा बोलायचे, पण बाजारात गेलं की कोणत्या भाषेत बोलायचं? या मंडळींनी एक कामचलाऊ संपर्कभाषा तयार केली. ती ‘रेख्ता’. छावणीची, बाजारची भाषा. दिल्लीची भाषा कोणती? तर हिंदी किंवा रेख्ता असं आपोआप ठरलं. रेख्ताचं ताशीव, घोटीव रूप म्हणजे ‘उर्दू’. अठरावं शतक संपता-संपता उर्दूला एक स्वतंत्र भाषा म्हणून ओळख मिळाली. उर्दूनं भारताला इंडो-पर्शियन संस्कृतीचा रसरशीत अनुभव दिला.

वो उर्दू क्या हैं हिंदी ज़बाँ हैं

के जिस के काबिल अब सारा हिंदोस्ता हैं

– पंजाबी शायर शाह मुराद

उर्दू ही भारतीय भाषा आहे, भारतात तिचा जन्म झाला. इथल्या गाव-कसब्यांत, चौकांत नि बाजारात ती लहानाची मोठी झाली. उर्दू मोठी व्हावी, म्हणून हिंदू-मुसलमान खांद्याला खांदा लावून झटले. उर्दूवर जेवढा हक्क मुसलमानांचा, तेवढाच हिंदूंचा. 1857 नंतर इंग्रजांनी धूर्त वसाहतवादी डाव टाकला. उर्दू आणि हिंदीवरून अतिशय गलिच्छ राजकारण सुरू झालं. ह्यात उर्दूला बराच मार बसला. आज नादान, सर्वशक्तिमान आणि युद्धखोर नेत्यांना जगभर मागणी आहे. असे नेते सतत उद्दाम आणि आक्रमक भाषा वापरत असतात. ही एका सर्वव्यापी सांस्कृतिक र्‍हासाची सुरुवात असते आणि ह्यात पहिली आहुती भाषेची पडते. निदा फाजली दोन सणसणीत ओळींत उर्दूचं दुःख सांगतात –

सब मेरे चाहनेवाले हैं मेरा कोई नही,

मैं भी इस देश में उर्दू की तरह रेहता हूँ

‘चौकात उधळले मोती’ ह्या अंबरीश मिश्र ह्यांच्या पुस्तकातून साभार.

बालवाडीच्या मुलांना ताईंनी सांगितले, की

फणस दोन प्रकारचे असतात.

एक ‘कापा’ आणि दुसरा ‘बरका’.

एक मुलगा लगेच म्हणाला,

‘‘दुसरा कापायचा नाही बरंका!’’

 

लिहावे नेटके

माधुरी पुरंदरे

ज्योत्स्ना प्रकाशन

‘भाषेबद्दल आपण अभिमान बाळगतो, कारण अभिमान बाळगल्याने करावे काहीच लागत नाही.’

शाळेत भेटणारी लिहा-वाचायची मराठी भाषा मुलांना उत्तम समजली तर त्यातून अनेक गोष्टी सुकर होतात. इतरांनी लिहून ठेवलेले गुंतागुंतीचे विचार, मराठी माध्यमातून शिकवल्या जाणाऱ्या इतर विषयांमधील संकल्पना, इतर भाषा, आयुष्यात मिळतीलच ह्याची खात्री नसलेले कथा-कादंबर्‍यांमधील अनुभव, गोष्टी-गाण्यांच्या पुस्तकांमधील गंमत, कार्यालयीन किंवा कायद्याच्या क्लिष्ट भाषेचा अर्थ, अशा कितीतरी गोष्टी चांगल्या प्रकारे समजू शकतात. तसेच, आपले अनुभव-विचार-भावना योग्यरित्या लिहून काढता आले, तर आपली समज तर वाढतेच आणि झालेच तर इतरांनाही त्यातून काहीतरी मिळते. म्हणजे एक माणूस म्हणून आपला समंजसपणा, संवेदनशीलता, हुशारी वाढवण्याचा एक मार्ग म्हणून ह्या मराठी भाषेच्या शिक्षणाकडे आपण बघू शकतो. आणि हो, केवळ छापील माध्यमाविषयी बोलत नाही आहोत इथे आपण. हे सारे आता आपण फोन आणि कॉम्प्युटरस्क्रीनवर वाचतो-लिहितोच की!

माधुरी पुरंदर्‍यांची ‘लिहावे नेटके’ ही पुस्तकमाला नेमके हेच साध्य करते- लहान-थोरांना ही लिहा-वाचायची, शाळेच्या पुस्तकांमधून हमखास भेटणारी मराठी तिच्या सर्व बारकाव्यांनिशी शिकवते. माधुरीताईंचे एक म्हणणे इथे आपण विशेष लक्ष देऊन बघितले पाहिजे, ‘‘पुस्तके नुसती हातात धरण्याने भाषा सुधारत नसते. त्यासाठी खूप सातत्याने खूप वेळ द्यावा लागतो. हळूहळू पण निश्चित परिणाम करणाऱ्या औषधासारखे हे काम असते.’’

तर आईबाबा, शिक्षक आणि मुलांनो, वेळात वेळ काढून आवर्जून ही पुस्तकमाला तुम्ही बघावी अशी विनंती आहे.

शिट्टीची भाषा

टर्की देशामध्ये कुस्कोय नावाचं गाव आहे. ‘कुस्कोय’ शब्दाचा तुर्की भाषेतील अर्थ आहे पक्ष्यांचं गाव. मात्र गावाला हे नाव खऱ्या पक्ष्यांवरून पडलेलं नाहीय. डोंगरकुशीत वसलेल्या या गावाचं एक वैशिष्ट्य आहे. इथली माणसं पक्ष्यांच्या आवाजात शीळ वाजवतात. आणि एकमेकांशी अशी शीळ वाजवतच बोलतात. आपण आजवर ‘च’ची भाषा वगैरे ऐकलेली असते, प्रसंगी बोललीही असते. पण इथे ह्या गावात वापरली जाते शिट्टीची भाषा.

काय आहे ही शिट्टीची भाषा? तुर्की भाषेतील प्रत्येक अक्षरासाठी शिट्टीतून एक स्वर काढला जातो. म्हणजे तुम्हाला तुर्की भाषा येत असली, तर लक्षपूर्वक ऐकल्यास ही शिट्टीची भाषा तुम्हालाही समजू शकेल.

ही भाषा सर्वप्रथम मेंढपाळांनी निर्माण केली असं म्हणतात. कुस्कोय गाव डोंगरात वसलेलं असल्यानं तिथली घरं लांब लांब आहेत. अशा वेळी शिट्टीच्या माध्यमातून निरोप पोचवणं, संवाद साधणं जास्त सोईस्कर होतं. कर्ती माणसं शेतात काम करत असतात, तेव्हा घरातली लहान मुलं, वृद्ध माणसं ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं असेल, पोलीस किंवा कुणी महत्त्वाचे लोक गावात आले, एखादा अपघात घडला, समस्या निर्माण झाली तर शिट्टीच्या माध्यमातून खूप लवकर एकमेकांपर्यंत निरोप पोहचवता येतात. काही कुटुंबांची स्वतःची सांकेतिक शिट्टीची भाषा असते, जेणेकरून त्यांचं बोलणं आजूबाजूच्या लोकांना कळू नये. गावामध्ये मूल जन्माला आलं, की तुर्की भाषेसोबतच ही शिट्टीची भाषा ते शिकतं. कधीकधी पक्षीदेखील या शिट्टीच्या भाषेला प्रतिसाद देताना दिसतात. वर्षातून एकदा गावात शिट्टी वाजवण्याची स्पर्धादेखील भरते. परीक्षक नदीच्या विरुद्ध टोकाला बसून शिट्टीवरचे संदेश ऐकतात. अधिकाधिक क्लिष्ट वाक्य शिट्टीमार्फत स्पष्टपणे पोहचवणारा विजेता ठरतो.

मात्र मोबाईलच्या वापरामुळे ह्या शिट्टीच्या भाषेवरही संक्रात आली आहे. ही भाषा जतन व्हावी म्हणून 2017 साली युनेस्कोनं तिचा समावेश अमूर्त सांस्कृतिक वारशात केला आहे.

 

कृत्रिम बुद्धिमत्ता

मानवी भाषा खूप गुंतागुंतीची असल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (संगणकाचा) वापर करून माणसासारखे लिहिता-बोलता येणे; विशेषतः भाषिक नवनिर्मिती करता येणे अशक्य आहे, असे आजवर आपण मानत आलोय. मात्र तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाने या सर्व शंका, भाकिते मोडीत काढली आहेत. ‘गार्डियन’ ह्या वृत्तपत्राने नुकताच एक प्रयोग केला.

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून चालणाऱ्या GPT-3 या यंत्रप्रणालीला पुढील सूचना दिल्या गेल्या- ‘माणसाने कृत्रिम बुद्धिमत्तेला घाबरू नये ह्या विषयावर 500 शब्दांचा अग्रलेख लिही. त्यातील वाक्यरचना सोपी आणि आटोपशीर हवी.’

हा लेख लिहिण्यासाठी काही मुद्दे/ सुरुवातीची वाक्ये देण्यात आली. ‘मी माणूस नाही. मी कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी एक यंत्रप्रणाली आहे. बऱ्याच लोकांना वाटते, की माझ्यापासून माणसाला धोका आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ‘माणूस’ ह्या प्रजातीचा विनाश होईल, अशी धोक्याची सूचना स्टीफन हॉकिंग यांनी पूर्वी दिली होती; पण ते खरे नाही हे तुम्हाला पटवायला मी आले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा.’ ह्या त्या सूचना.

गंमत म्हणजे दिलेल्या विषयावर GPT-3 ने आठ वेगवेगळे लेख लिहिले. प्रत्येक लेखात एक वेगळा मुद्दा अधोरेखित केलेला होता. गार्डियन वृत्तपत्राच्या संपादक मंडळाचे म्हणणे असे, की माणसांनी लिहिलेल्या लेखांवर साधारणपणे जेवढे संपादकीय काम करावे लागते, तितकेच काम GPT-3 ने लिहिलेल्या लेखांवर करावे लागले. काही ओळी वगळाव्या लागल्या किंवा काही ठिकाणी ओळींचा क्रम बदलावा लागला, एवढेच. आता बोला.

उत्सुकता वाढली असेल, तर गार्डियन वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर GPT-3 ने लिहिलेल्या लेखांचा काही भाग जरूर बघता येईल. मानवाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य मानल्या गेलेल्या भाषेला कृत्रिम बुद्धिमत्तेने इतक्या सहज आत्मसात केले, ह्या घटनेकडे कसे पाहावे? ही माणसाच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाची पहाट आहे, की एका अंताची सुरुवात?

 

विज्ञानाची भाषा

‘मला काहीतरी सांगायचंय पण शब्दच सापडत नाहीयेत!’ असे झाले आहे का तुमचे कधी? हा जसा इंग्रजी, मराठी, हिंदी वगैरे भाषांबद्दलचा अनुभव आहे ना, अगदी तसाच अनुभव वैज्ञानिकांना त्यांचे विज्ञान-तत्त्वज्ञान सांगतानाही आला आहे. अगदी आर्किमिडीजच्या काळापासूनच्या (इ.स.पू. 200 वर्षे) अशा कहाण्या सांगितल्या जातात. ह्या तज्ज्ञांना जगाविषयी जे कळले होते, ते सिद्ध करून दाखवायला किंवा इतरांना सांगायला शब्दच सापडायचे नाहीत कधीकधी. कुठल्या भाषेतले शब्द? गणित ही विज्ञानाची भाषा आहे असे म्हणतात. ही भाषा त्या-त्या काळात जेवढी प्रगल्भ असेल तेवढे तेव्हाच्या शास्त्रज्ञ-तत्त्वज्ञांचे आयुष्य सुकर, नाही तर त्यांना स्वतःचे शोध सांगण्यासाठीची भाषादेखील शोधावी लागत असे! कॅल्क्युलस असेच जन्माला आले; गतीचा अभ्यास करणाऱ्या 24 वर्षीय न्यूटनकडून. आज आपल्या दृष्टीने विशेष बाब म्हणजे, न्यूटनचे हे विचारमंथन मुख्यत्वेकरून प्लेगच्या विलगीकरणाच्या काळातले (1665-66) होते. कॅल्क्युलस म्हणजे एखाद्या बदलत जाणाऱ्या गोष्टीमधल्या बदलाचे क्षणोक्षणीचे प्रमाण कसे काढायचे हे सांगणारी भाषा. उदाहरणार्थ, खाली पडणाऱ्या सफरचंदाचा बदलता वेग प्रत्येक क्षणी कसा बदलतोय, हे सांगणारी भाषा. अर्थातच, न्यूटनच्या आधीच्या काळातील काही तत्त्वज्ञांच्या संकल्पनांचा आधार घेऊनच न्यूटनने पुढे अभ्यास केला. परंतु त्याने जे शोधून काढले तेवढे नेटके तोवर कधीच मांडले गेले नव्हते. खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक शाखांमधील संशोधनाला, इतकेच काय, स्वतः गणित भाषेलासुद्धा कॅल्क्युलसमुळे पंख फुटले. बदल तर सर्वत्रच आहे. त्यामुळेच बदलणाऱ्या गोष्टींच्या अभ्यासाला आणि पर्यायाने कॅल्क्युलसला एवढे महत्त्व आहे. न्यूटनच्याच काळातील लायब्निझनेदेखील स्वतंत्रपणे कॅल्क्युलस शोधले असे मानले जाते. त्याकाळी मात्र त्यांचे समर्थक एकमेकांशी ‘तू की मी’ वरून खच्चून भांडले होते! दोघांनी शोधलेली भाषा तीच, चिन्ह-लिपी मात्र वेगळी होती. दोन्ही लिप्या उपयुक्त आहेत. कोणती लिपी सोयीची हे आजही विषयानुरूप ठरते.