मनीषा आनंद क्षेमकल्याणी
बराच वेळ बाई विद्यार्थ्यांनी लिहिलेले कागद वाचत बसल्या होत्या. बाईंच्या हातातले हे कागद परीक्षेचे पेपर नाहीत हे एव्हाना बाईंची लेखन-मदतनीस असलेल्या सुरेखाच्या लक्षात आले होते. पण मग बाई बराच वेळच्या काय वाचताहेत, मधून मधून का हसताहेत, वाचताना त्यांचे डोळे का चमकताहेत हे मात्र सुरेखाला उमजत नव्हते आणि याची उत्सुकताही तिला स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी थोडे धाडस करून तिने बाईंना त्याबद्दल विचारलेच. तिच्या हातात कागद देत बाई उत्साहाने म्हणाल्या, “अग, हे बघ मुलांनी काय काय लिहिलेय… तूही वाच…” बाईंनी वर्गात मुलांना काही प्रकल्प दिले होते. त्यात मुलांनी लिहिलेला मजकूर वाचण्यात बाईंप्रमाणे तीही रमून गेली.
प्रकल्पाचे नाव : कविता सर्वेक्षण (कवितांबद्दलची समज वाढवण्यासाठी केलेले सर्वेक्षण)
मुलांनी प्रकल्पात केलेल्या काही नोंदी –
- …कविता ही एक संवादाची भाषा आहे, जी बाणासारखी तीक्ष्ण आणि फुलपाखरासारखी स्वतंत्र आहे… तुम्हाला माझा प्रकल्प वाचण्यासाठी शुभेच्छा !
- कवितेबद्दल सर्वेक्षण करताना ‘आवडलेली कविता’ या विषयावर एका काकांनी त्यांना कविता खूप आवडतात असं सांगितलं आणि ‘श्रावणमास’ ही संपूर्ण कविता आम्हाला म्हणून दाखवली; पण दुसरीकडे एका ताईने आम्हाला सर्व उत्तरे गूगलवरून सांगितली. तिला वाटले की आम्हाला हे कळणार नाही.
प्रकल्पाचे नाव : बालकुमार दिवाळी अंक
मुलांनी प्रकल्पात केलेल्या काही नोंदी –
- जसे दिवाळीतले दिवे आपल्या घराला सजवतात, तसे दिवाळी अंक आपल्या मनाला सजवतात.
- छोट्यांच्या दिवाळी अंकात सर्व चित्रे एकाच माणसाने काढल्याने शैली एकच आहे.
- या दिवाळी अंकात छोट्या लेखकांना आणि चित्रकारांनाही संधी द्यायला हवी होती .
- मराठीच्या तासाला रोजचा अभ्यास सोडून दिवाळी अंकासारखे काहीतरी भन्नाट प्रकल्प करायला अतिशय मजा आली. तास संपला की घाईघाईत ग्रंथालयात जायची एक वेगळीच ओढ जाणवली.
प्रकल्पाचे नाव : शब्दकोश
मुलांनी प्रकल्पात केलेल्या काही नोंदी –
- शब्दकोश म्हणजे साठा.
- शब्दकोश आणि व्याकरण हे भाषेचे दोन डोळे आहेत.
- शब्दकोशात हवा तो शब्द सापडत नसताना होणारी तळमळ आणि तो विशिष्ट शब्द सापडल्यावर मिळणारी शांती याचा अनुभव अतुलनीय होता.
- अर्थच काय शब्दांचे उच्चारही आम्हाला नीट जमत नव्हते. ‘आपले मराठी चांगले’ या अभिमानाला पोचे पडत होते .
सुरेखाने पुढची पानेही भराभर वाचून संपवली. हे सगळे मुलांनी अतिशय प्रामाणिकपणे लिहिले होते. तिचे मन मुलांबद्दलच्या कौतुकाने भरून गेले.
वाचकहो, तुम्हीही या कथेत रमलात ना? हा प्रसंग अगदीच काल्पनिक नाही; ‘प्रकल्पवाटा – एक प्रभावी शिक्षणपद्धती’ ह्या जयश्री काटीकरांच्या पुस्तकातला आहे. हे पुस्तक, ज्यांच्या घरात शाळेत जाणारी मुले आहेत त्या प्रत्येकासाठी आहे; मूल कोणत्याही माध्यमात आणि कुठल्याही बोर्डात शिकणारे असले तरीही!
१२-१५ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी- जयश्रीताईंनी अत्यंत कल्पक प्रकल्प तयार केले. नियोजनापासूनच त्यांनी विद्यार्थ्यांना त्यात सामील करून घेतले. त्यांनी ते कसे केले, मुलांचा उत्साह, त्यांची ऊर्जा, अवखळपणा, नितळ, निखळ, प्रामाणिक प्रयत्न, त्याचा परिपाक, त्याचे घरीदारी दिसणारे दृश्य-अदृश्य परिमाण याकरिता पालकांनी हे पुस्तक जरूर वाचावे.
हीच मुले घरी असताना हल्ली काय चित्र दिसते? त्यांचे वागणे, बोलणे, आकलन क्षमता, एकाग्रता, शिस्तीचा अभाव, मोबाईलचे व्यसन, सांगितलेले अजिबात न ऐकणे, हट्टीपणा, खाण्यातल्या आवडीनिवडी… यादी भलीमोठी आहे. यामागची म्हणून जी कारणे सांगितली जातात ती वरवरची आहेत. आईवडिलांना मुलांसाठी पुरेसा वेळ नसणे, आजीआजोबांना झेपत नसणे अशा कारणांच्या पलीकडे जाऊन मुलांच्या वागण्याचा विचार करायला हवा. त्यासाठी हे पुस्तक मदत करते. मुलांशी संवाद साधताना त्यांचे ‘ऐकणे’ महत्त्वाचे आहे हा गुरुमंत्र हे पुस्तक देते.
‘मुलांचे ऐकणे’ यावर ह्या संवेदनशील शिक्षिकेने शोधलेले मार्ग फक्त इतर शिक्षकांसाठी नाहीत, तर पालकांसाठीही आहेत. त्या अर्थाने ‘प्रकल्पवाटा’ हे पुस्तक पालक-बालक नात्यालाही झळाळी देईल.
| ‘प्रकल्पवाटा – एक प्रभावी शिक्षण पद्धती” हे पुस्तक वाचताना एक संशोधक, वाचक म्हणून मला वेगळा, समृद्ध आणि प्रेरणादायी अनुभव आला. नेहमीच्या पाठांतराधारित शिक्षणापेक्षा प्रकल्पाधारित शिक्षण किती प्रभावी ठरू शकते, याची सुस्पष्ट जाणीव या पुस्तकातून झाली.या पुस्तकातील सर्वात विशेष बाब म्हणजे प्रत्येक प्रकल्पाची रचना अत्यंत विचारपूर्वक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून केलेली आहे. विषयप्रवेशापासून ते मूल्यांकनापर्यंतचा प्रवास सुबोध आणि टप्प्याटप्प्याने मांडलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात काम करताना शिक्षकांना मार्गदर्शक हात मिळाल्यासारखे वाटेल. विशेषतः तक्ता क्रमांक १ मध्ये दिलेल्या क्षमता, अपेक्षित अध्ययन निष्पत्ती आणि त्या निष्पत्तींची ब्लूम्स प्रणालीशी घातलेली सांगड ही अत्यंत उपयुक्त आणि अभिनव बाब वाटली. त्यामुळे अध्यापन अधिक वैज्ञानिक आणि उद्देशपूर्ण होते. |
शिक्षण घेणे म्हणजे अनुभवणे – अनुभव घेणे आणि अनुभव देणे, प्रश्न पडणे, त्या प्रश्नांचा शोध घेणे. त्यातून मुलांची विविध कौशल्ये विकसित होत जातात. ती टप्प्याटप्प्याने वयानुसार, वयाला साजेसे व्यक्त व्हायला शिकतात. त्यासाठी विचार करणे, भाषा शिकणे, आपले विचार मांडता येणे, इतरांचे ऐकून घेणे, छोटे छोटे निर्णय – जबाबदाऱ्या घेणे, त्या पार पाडणे, संघ भावना – गटकार्य, यश-अपयश हाताळणे, त्यातून पुन्हा पुढे जाणे… शिक्षक आणि पालकांना हेच तर अपेक्षित असते. शिक्षकांनी पाठ्यक्रमाला थोडी कृतीची जोड दिली, तर त्याचा परिमाण किती सुंदर होतो हे वर दिलेल्या प्रकल्पांतून आपल्याला ठसठशीतपणे दिसते.
| वर्गात शिक्षक शिकवतो आणि विद्यार्थी समोर बसून (बहुधा) ऐकतात. शिक्षण म्हणजे ‘घेणे’ या भूमिकेत ती असतात. यातून खरेच शिक्षण घडते का? बहुधा नाही. म्हणूनच तर आतापर्यंतच्या सर्व राष्ट्रीय शिक्षण धोरणांत, अगदी अलीकडच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्येही, कृतीतून शिक्षण, अनुभवातून शिक्षण, प्रकल्पावर आधारित शिक्षण; अर्थात ‘शिक्षण म्हणजे करणे’ या संकल्पनेवर विशेष भर दिलेला आहे. अर्थात, असे असले तरी अनेक शिक्षकांना ‘शिक्षण म्हणजे करणे’ म्हणजे नक्की काय, ते कसे द्यायचे, अभ्यासक्रमाशी त्याची सांगड कशी घालायची, त्याचे मूल्यांकन कसे करायचे याबाबत संभ्रम आहे. आणि म्हणूनच त्याबाबत उदासीनताही आहे. या पार्श्वभूमीवर ‘शिक्षण म्हणजे करणे’ या संकल्पनेच्या उपरोल्लेखित सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यात ‘प्रकल्पवाटा’ यशस्वी ठरेल. |
या पुस्तकाची साधीसोपी भाषा, नियोजनाचे बाईंनी ठरवलेले टप्पे, त्यात मुलांनी घातलेली भर, त्यातून निर्माण झालेल्या नवनिर्मितीच्या शक्यता, मुलांनी केलेल्या कविता, व्यक्तिचित्रे, रचलेल्या छोट्या कथा, आपल्याच भावनांबद्दल लिहिलेले परिच्छेद… पुस्तकात हे सगळे वाचायला मिळते.
बाईंनी प्रकल्पासाठी निवडलेले विषयही तितकेच छान आहेत. पाऊस, कविता, दिवाळी अंक असे सहज फुलवता येणारे आणि मुलांना गुंतवणारे विषय त्यात आहेतच; शिवाय ‘शब्दकोश’, ‘समाज समजून घेताना’, ‘हा खेळ भावनांचा’… असे कठीण विषयही त्यांनी घेतले आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते.
| प्रत्येक वर्गप्रकल्प-लेखात विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे नमुने सादर केलेले आहेत. ते फारच वाचनीय व विचारणीय आहेत. पुस्तकात प्रत्येक पानाच्या उजवीकडे भरपूर मोकळी जागा सोडलेली आहे. त्यात लेखिका वाचकांशी संवाद साधणारी विचारवाक्ये लिहिते. त्यातून आपल्याला त्या विशिष्ट प्रसंगाबद्दलचे लेखिकेचे मत, निरीक्षण, अनुभव कळतात. लेखिकेबरोबर आपणही कधी अंतर्मुख होतो, तर कधी उत्स्फूर्तपणे त्या प्रतिक्रियेला दाद देऊन जातो. प्रत्येक प्रकल्पलेखात चौकटींमध्ये कधी संकल्पनेविषयक तर कधी जास्तीची माहिती, मार्गदर्शन आहे. प्रकल्प अधिक चांगला कसा करावा याची मुद्देसूद मांडणी आहे. क्यूआर कोडचा वापर करून काही लेख उपलब्ध करून दिलेले आहेत. वाचक ते डाउनलोड करून वाचू शकतात. |
मुलांना आपण गृहीत धरू नये. त्यांना जमेल का, झेपेल का, ती टाळतील – नाकारतील का, त्यांना आवडेल का, ती रमतील का, कंटाळतील का… इ. बद्दलची साचेबद्ध लेबले आधीच न लावता जयश्रीताईंनी मुलांचा सहभाग घेतला, त्यांच्या कल्पनांचे स्वागत केले, त्यांना स्वातंत्र्य दिले. ते सगळे जसेच्या तसे पालकांनी कॉपी केले, तरी ‘शालेय शिक्षण म्हणजे शाळेतले घर आणि घरातील शाळा’, असे बालक-पालकांचे आयुष्य आनंददायी होईल असा विश्वास हे पुस्तक देते. पुस्तक वाचताना पालकांनी पुस्तकात मधे मधे येणाऱ्या सुरेखा या पात्राच्या जागी स्वतःला ठेवावे! मुलांना केवळ शाळा-शिक्षक यांच्या हवाली न करता शिक्षक आणि पालक अशी समांतर चाके लयीत चालावीत.
‘पालक’ म्हणजे मुलाबाळांचे कर्तेधर्ते असे पिढ्यानुपिढ्या चालत आलेले गृहीतक. ‘कानसेन’ म्हणजे शास्त्रीय संगीतातले दर्दी ही व्याख्याही रूढ आहे. पालकांना आपल्या मुलांबरोबरचा संवाद वाढवायचा असेल, तर त्यांना ‘कर्तेधर्ते’पणाकडून ‘कानसेन’ होण्याच्या दिशेने प्रवास केला पाहिजे. श्रवण, अर्थात लक्षपूर्वक ऐकणे, हा संवादातला सर्वात महत्त्वाचा घटक! मुलांचे सगळे सगळे मनापासून ऐका, त्या संवादात सामील व्हा… थोडक्यात आपल्या मुलांचे ‘कानसेन’ व्हा!
पालकांची सगळी धडपड मुलांसाठीच असते; पण बरेचदा या भावनेला एक अपराध गंड चिकटलेला असतो. ‘प्रकल्पवाटा’ हा गंड घालवायला मदत करते. आपली मुले आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची आहेत. आपणही त्यांच्या इतके लहान होऊन त्यांच्या आयुष्यात जाणे फार कठीण नाही. उलट ती आनंदयात्रा ठरावी.‘प्रकल्पवाटा’ हे पुस्तक तुमच्यासाठी आहेच.
मनीषा आनंद क्षेमकल्याणी

manisha887@gmail.com
प्रासंगिक मुक्त लेखक. आयोजन सेल्स प्रमोशन्स अँड इव्हेंट्सच्या संचालक.
‘प्रकल्पवाटा – एक प्रभावी शिक्षणपद्धती’
लेखक : जयश्री काटीकर
ज्योत्स्ना प्रकाशन
