आदरांजली – पद्मभूषण इला भट्ट

महिला अधिकार कार्यकर्त्या आणि सेवा (सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन) संस्थेच्या संस्थापक, पद्मभूषण इला भट्ट ह्यांचे मध्यंतरी निधन झाले. गांधींच्या विचारांचा पगडा असलेल्या इलाबेन ह्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले होते, तसेच ‘हिंदू लॉ’ ह्या विषयात सुवर्णपदक मिळवले. टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या महिलांना कायद्याचे संरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘सेवा’ संस्थेची स्थापना केली होती. ह्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या प्रगतीसाठी नवीन कायदे तयार करणे आणि प्रगतीच्या आड येणारे प्रश्न कायदेशीर मार्गाने दूर करण्याबरोबरच महिलांना सक्षम करण्यावर भर दिला. 1974 साली त्यांनी भारतातील महिलांनी महिलांसाठी चालवलेली पहिली बँक ‘श्री सेवा महिला सहकारी बँक’ स्थापन करून दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात पुढे केला. 

रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हली हूड पुरस्कार तसेच पद्मश्री, पद्मभूषण अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. 

पालकनीती परिवारातर्फे इला भट्ट ह्यांना आदरांजली.